आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आज सगळं जग सोशल मिडियाच्या जाळ्यात अडकलंय. सगळ्या गोष्टी आता “ट्रेंड”नुसार चालतात. हेच सोशल मिडिया आज अनेकांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनलंय. यात सगळ्यात वर नंबर लागतो तो युट्युबचा. युट्युब काय आहे हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.
आज युट्युबवर जगातील जवळपास प्रत्येक विषयावर व्हिडीओ आहेत. पण जगातला पहिला युट्युब व्हिडिओ कधी बनला असेल? कुठल्या विषयावर असेल? कोणी बनवला असेल? असे प्रश्न जर तुम्हालाही पडत असतील तर त्याची उत्तरं तुम्हाला या लेखात नक्की मिळतील!
२३ एप्रिल २००५! हीच ती तारीख आहे ज्यादिवशी जगातला पहिला युट्युब व्हिडीओ बनवला होता.
हा व्हिडीओ युट्युबचा को-फाउंडर जावेद करीम याने बनवला होता. “जावेद” या नावाच्या पहिल्यावहिल्या युट्युब अकाऊंटवरून हा व्हिडीओ टाकण्यात आला होता.
१९ सेकंदाच्या या व्हिडीओचं नाव होता “मी ऍट द झू”. हा व्हिडीओ सॅन डीएगो प्राणीसंग्रहालयात शूट करण्यात आला होता. दोन हत्तींच्या समोर बनवलेल्या या व्हिडीओपासून युट्युबचा प्रवास सुरु झाला.
कुठला मेकअप नाही, काही अद्ययावत तंत्रज्ञान नाही, कुठली स्क्रिप्ट नाही. असा हा व्हिडीओ बघाल तर तुम्हाला त्यात छोटा करीम उगाचच दोन हत्तींबरोबर गप्पा मारताना दिसेल.
“तर, आम्ही इथे आज झूमध्ये आलो आहोत. इथल्या हत्तींसमोर आम्ही उभे आहोत. आणि गमतीची गोष्ट अशी की या हत्तींची सोंड खूप खूपच लांब आहे. बस! एवढंच सांगायचं आहे.”
एवढं बोलून हा व्हिडीओ संपतो. तुम्ही बघाल तर आजच्या युट्युबर्स सारखं करीम आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला सांगत नाहीये. हा व्हिडीओ एकदम साध्या कॅमेरा वापरून बनवला होता त्यामुळे याची क्वालिटी पण खूप चांगली नाहीये.
पण हा पहिला व्हिडीओ आजही तुम्हाला जावेदच्या चॅनेलवर दिसेल आणि या व्हिडीओला १२३ मिलियनहून अधिक लोकांनी बघितलंय.
आजवरच्या युट्युब व्हिडीओ पैकी हा सगळ्यात महत्वाचा व्हिडीओ आहे असंच म्हणावं लागेल. कारण कुठल्याही तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय बनवलेला हा व्हिडीओ युट्युबचा खरा उद्देश सांगतो. तुमच्याकडे असणारी एखादी गोष्टं, एखादी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असणारं साधन म्हणजे युट्युब! तुम्हाला त्यासाठी खूप मोठा सेटअप हवा, मोठाले कॅमेरे हवे असं काही नाही. साध्या कॅमेरावर शूट करून तुम्ही तुम्हाला हवा तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकता हेच हा व्हिडीओ सांगतो.
आज युट्युब २०२१ सालात युट्युबची किंमत जवळपास ३०० बिलीयन डॉलरपेक्षा जास्त आहे. दोन बिलियन लोकांनी आज युट्युबवर लॉग इन केलं आहे. प्रत्येक मिनिटाला ५०० तासांचे व्हिडीओ युट्युबवर पडतायत.
जगातील कितीतरी लोकांच्या करियर सुरुवात युट्युबला केलेल्या एका व्हिडीओमुळे झाली आहे. आज ते लोक आपापल्या क्षेत्रात खूप चांगलं नाव कमावताना दिसतायत.
आणि या सगळ्याची सुरुवात झाली एका १९ सेकंदाच्या प्राणीसंग्रहालयातील व्हिडीओने! त्या व्हिडीओसाठी आणि युट्युबसाठी करीमचे खूप खूप आभार!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.