या एका व्यक्तीमुळे भारतातले गावं एसटीडी बूथने जोडले गेले होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


2019 साली लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुका काँग्रेससाठी फार महत्त्वाच्या होत्या. 2014 साली आलेल्या मोदी लाटेने काँग्रेसला चांगलेच गोत्यात आणले होते. आता 2019 साली काँग्रेस या मोदी लाटेला थोपवणार का? असा प्रश्न साहजिकच सगळ्यांच्या मनात होता.

त्यात ऐन निवडणुक तोंडावर असताना पुलवामा हल्ला आणि बालाकोट मधील एअर स्ट्राईक मिशन वर वादग्रस्त वक्तव्य करून सॅम पित्रोदा यांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर अविश्वास दाखवला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या गडबडीत कॉंग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत आला होता.

पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना पित्रोदा म्हणाले होते, की पुलवामा हल्ल्यामागे कुणी दहशतवादी नसून यामागे आठ लोकांचा हात आहे. पुलवामा हल्ल्यासाठी संपूर्ण पाकिस्तानला शिक्षा देणे योग्य ठरणार नाही.

यावर भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. देशभरातून पित्रोदा यांच्या विधानावर नागरिकांनी आपला निषेध नोंदवला होता.

सॅम पित्रोदा यांचे खरे नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा असे आहे. त्यांचा जन्म 4 मे 1942 रोजी ओरिसामधील एका गुजराती कुटुंबामध्ये झाला होता. सॅम यांचे शालेय शिक्षण गुजरातमधील आनंद वल्लभ विद्यालयातून झाले. पुढे त्यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन विषयांमध्ये एम्.एस्सी. ही पदवी घेतली.

पुढे ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत शिकावयास गेले. तेथे शिकागोच्या एलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील टीव्ही बनवणार्‍या एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली.

कंपनीत काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना पहिल्या महिन्याचा जेंव्हा चेक मिळाला त्यावर त्याचे नाव सॅम पित्रोदा असे लिहिलेले होते.

त्यांनी याबाबतची तक्रार आपल्या मॅनेजरकडे केली असताना तुझे नाव खूप लांबलचक आहे त्यामुळे मी ते शॉर्ट करून टाकले असे उत्तर त्यांना मिळाले. त्याच्यानंतर आजतागायत पित्रोदा यांनी हे छोटे सुटसुटीत नाव स्वतःला कायमचे ठेवून घेतले.

पित्रोदा यांनी अमेरिकेतील शिकागो येथील जीटीई कॉर्पोरेशन या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये डिजिटल स्विच तंत्रज्ञानक्षेत्रात दहा वर्षे काम केले. त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयांमध्ये जात्याच गती होती. त्यामुळे फार काळ त्यांचे मन नोकरीमध्ये रमले नाही.

त्यांनी वेसकॉम स्विचिंग या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी काही वर्षे नफ्यामध्ये चांगली चालली त्याच्यानंतर त्यांनीही कंपनी रॉकवेल इंटरनॅशनल या मोठ्या कंपनीमध्ये विलीन करून टाकली. ‘रॉकवेल इंटरनॅशनल’ या मोठ्या कंपनीत सामील झाल्यानंतर सॅम पित्रोदा या कंपनीचे उपाध्यक्ष बनले.

अमेरिकेत काम केल्यानंतर पित्रोदा यांना आपल्या जन्मभूमीला परतण्याचे वेध लागले. ते भारतामध्ये काही कामानिमित्त आले होते. मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. ज्या दिवशी ते ताज’मध्ये उतरले होते त्या दिवशी त्यांनी रस्त्यावरून त्या काळातल्या भारतीय टेलिफोनची रस्त्यावरून चालली प्रतीकात्मक शवयात्रा बघितली.

भारतात त्यावेळी टेलिफोनची स्थिती अत्यंत खराब असायची. कनेक्शन लवकर मिळायचे नाही. टेलिफोन अत्यंत चैनीची गोष्ट होती आणि फोन देखील अवजड अशा स्वरूपाचे होते. पित्रोदा यांनी हे भारतातले टेलिफोनचे स्वरूप बदलून टाकायचे त्या क्षणाला ठरवून टाकले होते.

आजच्या पिढीला भारतातली दूरदूरची खेडी मोबाईल फोनने जोडणारे धीरूभाई अंबानी माहित आहेत.

परंतु सत्तरच्या दशकामध्ये टेलिफोन भारतीय घरात पोहोचला पाहिजे आणि भारतातील प्रत्येक माणूस टेलिफोनने जोडला गेला पाहिजे हे स्वप्न अगोदर इंदिरा गांधी आणि त्यानंतर राजीव गांधी यांनी बघितले होते.

हे स्वप्न प्रत्यक्षात साकारायला मदत केली ती पित्रोदा यांनी.

राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘द सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स’ (सी-डॉट) या केंद्राची स्थापना केली होती. एक रुपया वार्षिक वेतन या पगारावर सॅम पित्रोदा यांची या कंपनीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती.

या सी-डॉटचे भारतातील योगदान म्हणजे देशभरात पसरलेले एसटीडी बूथचे जाळे होय. या कार्यामुळे भारताच्या दूरसंचार क्रांतीचे शिल्पकार म्हणून पित्रोडा यांना नावाजले जाते.

अगदी आत्ता आत्तापर्यंत चौकाचौकात आणि गल्लीगल्लीत पिवळ्या रंगाचे एसटीडी बूथ असायचे. त्यांच्या निर्मितीमागे सॅम पित्रोडा यांचे मोठे योगदान आहे. भारताच्या प्रत्येक रस्त्यावर टेलीफोन असला पाहिजे अशी त्यांची दूरदृष्टी होती. त्यांच्यामुळेच एका रुपयात भारतात कुठेही कॉल लावू शकणारे एसटीडी बूथ भारतीयांच्या वाट्याला आले.

सार्वजनिक दूरध्वनी केंद्राच्या रूपात सबंध भारतात स्वस्त आणि सुलभ टेलिफोन सेवा उपलब्ध झाली.

त्यांचे कार्य पाहून १९८७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लगार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९८९ मध्ये भारतीय दूरसंचार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून देखील त्यांची निवड करण्यात आली.

सॅम पित्रोदा यांचा डंका फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील गाजलेला आहे. पित्रोदा हे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक दूरसंचार सल्लगार परिषदेचे संस्थापक-सदस्य आहेत.

पित्रोदा यांना राजीव गांधी यांचे जवळचे सहकारी मानले जाते, राजीव गांधी यांना तंत्रज्ञानामध्ये विशेष रस होता त्यामुळे पित्रोदा बरोबर त्यांचे सूर अत्यंत चांगले जुळलेले होते.
पित्रोदा हे राजीव गांधी यांच्यामुळे राजकारणामध्ये आले परंतु त्यांनीही राजकारणामध्ये खास कुठली निवडणूक लढवली नाही. मात्र काँग्रेस पक्षातर्फे त्यांना वेळोवेळी मानाचे सरकारी पद मिळत गेले.

दूरसंचार क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल पित्रोदांना भारताच्या पंतप्रधानांकडून भारतीय राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याशिवाय कॅनडा-इंडिया फाउंडेशन या संस्थेद्वारा देण्यात येणारा ‘चंचलानी ग्लोबल इंडियन’ अवॉर्ड (२००८), आंध्र प्रदेश सरकारतर्फे ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ ही सन्माननीय पदवी (२००८), काँग्रेसच्या प्रशासन काळात 2009 साली पद्मभूषण पुरस्कार, राजीव गांधी ‘ग्लोबल इंडियन’ अवॉर्ड इ. अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभलेले आहेत.

सध्या पित्रोदा इंस्टीट्यूट ऑफ ट्रांस-डिस‌िप्लीनेटरी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नोलॉजी, द ग्लोबल नॉलेज इनिशिएटिव, इंडिया फूड बँकिंग नेटवर्क, पीपल फॉर ग्लोबल ट्रांसफॉरमेशन, ॲक्शन फॉर इंडिया या 5 सामाजिक संस्था चालवतात. राजकारणाच्या बाहेर त्यांचे कार्य चांगले चालू आहे. राजकारणात मात्र त्यांचा कल काँग्रेसकडे झुकलेला स्पष्ट दिसून येतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!