कॉंग्रेसच्या रॅलीला जागा दिली नाही म्हणून या कलाकाराला रस्त्यावरच मारून टाकण्यात आलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


तो एक नाटककार होता. शहरातील कामगारापासून ते खेड्यातील मजुरापर्यंत प्रत्येकाच्या आवाजाचा तो प्रतिध्वनी होता. तो वंचित आणि दबलेल्या घटकांचा प्रतिनिधी होता. तो राजकारणाचे नाव ऐकताच नाक-डोळे मुरडणाऱ्या लोकांना शहाणे करण्याचे काम करत होता.

कविता, नाटक, शिल्प अशा अनेक कलामाध्यमातून त्याने समाजातील लोकांशी या विषयावर जोडून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय नाटक क्षेत्रात तर त्याचे नाव खूपच वरचे आहे.

अशा व्यक्तीचा वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी देशाच्या राजधानीत, दिल्लीत, दिवसाढवळ्या, भर रस्त्यात खून करण्यात आला.

उंच शिडशिडीत बांधा, टोकदार नाक आणि अचूक निरीक्षण करणारे तेजस्वी डोळे, असा तो आपल्या गाण्यातून, नाटकातून, शब्दातून, कलेतून प्रत्येकाच्या काळजाला हात घालत होता. त्याच्या शब्दात अशी आग होती की, हरलेल्या माणसातही जिंकण्याची उर्मी उसळेल. अशा उमद्या कलाकाराला आपल्या सत्य बोलण्याची किंमत प्राण देऊन चुकवावी लागली.

या अवलिया कलाकाराचे नाव होते, सफदर हाशमी.

समाजातील शोषित घटकांना जागे करणाऱ्या या व्यक्तीचे शब्द कुणालाही आपलेसे वाटतील असे होते. शाळकरी मुलापासून कॉलेजमधील तरुणापर्यंत प्रत्येकाला त्याच्या शब्दात स्वतःच्याच भावनांचे प्रतिबिंब दिसेल असे.

त्याची कला खेड्यापासून शहरापर्यंत सर्वांना व्यापणारी होती. त्याचे शब्द कधी एखाद्या स्त्रीचे दुख मांडत तर कधी प्रश्नोत्तरांनी सर्वांना हैराण करून सोडत. कधी कुठे बंधुत्वाच्या संकल्पनेला धक्का लागत असेल किंवा कधी कुठे एखादा कामगार मशीनमुळे जखमी होत असेल तर अशा गोष्टींकडे सर्वात आधी याचेच लक्ष जात असे. या सर्व शोषितांचा आवाज सर्वात आधी याच्याच कानावर पडत असे.

प्रत्येक पिडीतासाठी त्याच्याकडे एक अंगाई होती. त्याला दाखवण्यासाठी एक दृश्य होते. आपल्या एका इशाऱ्यावर तो धावपळीत हरवलेल्या रस्त्यालाही नाटकाचे थिएटरचे रूप देऊ शकत होता.

सतत धावणारा तो रस्ता त्याला पाहून एकाच ठिकाणी स्तब्ध राहत होता. त्याच्या नाटकात राजकुमार आणि राजकुमाऱ्या नसत. तर, रोजच्या जगण्याशी दोन हात करणारा कोणीही सामान्य माणूस त्याच्या नाटकाचा नायक असे.

त्याचे नाटक म्हणजे सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याचे प्रतिबिंबच!

त्याच्या या नाटकात थोडा वेळ जो रमेल कदाचित त्याला आपल्या दुखण्यावर एखादा कायम स्वरूपी इलाजही सापडत असेल. १९७३ साली त्यांनी जन नाट्य मंचची (जनम) स्थापना केली होती.

परंतु, सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज २ जानेवारी १९८९ रोजी कायमचा मूक झाला. दिल्लीच्या एखाद्या चौकात उभे राहून दिल्लीतील शोषितांचा आवाज बनण्याचे त्याचे स्वप्न हेच त्याच्यासाठी कर्दनकाळ ठरले. आवाज उठवण्याच्या आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतानाच त्याचा आवाज कायमचा शांत झाला. रस्त्यावर नाटक करून रस्त्यावरील लोकांच्या जीवनात काही परिवर्तन घडवून आणण्याचे त्याचे स्वप्नच त्याच्या जीवावर उठले.

ही घटना आहे, १ जानेवारी १९८९ रोजीची. जन नाट्य मंच नावाच्या आपल्या नाटक संस्थेतील सदस्यांसोबत सफदर हाशमी दिल्लीतील गाजियाबाद येथे पोहोचले. इथे ते एक पथनाट्य सादर करणार होते ज्याचे नाव होते, ‘हल्ला बोल.’

तेंव्हा गाजियाबाद मधील महानगर पालिकेच्या निवडणुका होणार होत्या. मतदानाची तारीख होती १० जानेवारी. यासाठी सीपीएमच्या वतीने रामानंद झा हे नगरसेवकाच्या पदासाठी उमेदवार होते. या नाटकाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी प्रचार करण्याचाही उद्देश होता.

आंबेडकर पार्कमध्ये सकाळी ११ वाजता हे नाटक सुरु झाले. नाटक अर्ध्यावर पोहोचले तोच रामानंद झा यांच्याविरोधात उभे असलेले कॉंग्रेसचे उमेदवार मुकेश शर्मा आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन तिथे पोहोचले.

या उमेदवारांचे म्हणणे होते की त्यांचे नाटक थांबवून त्यांना पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा. सफदर हाशमी म्हणाले नाटक संपायला थोडा वेळ बाकी आहे. एक तर त्यांनी थोडावेळ वाट पहावी किंवा दुसऱ्या रस्त्याने पुढे जावे.

पण, मुकेश शर्मा आणि त्यांचे कार्यकर्ते अजिबात ऐकण्यास तयार नव्हते. नाटक आत्ताच्या आत्ता थांबवून त्यांना रस्ता करून देण्यात यावा, यावरच ते अडून बसले. सफदर यांचे म्हणणे होते, अशाप्रकारे नाटक अर्ध्यावर सोडल्यास नाटकाची लय तुटेल.

मुकेश शर्मा आणि त्यांचे कार्यकर्ते अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी नाटक पाहायला जमेलेले प्रेक्षक आणि नाटक करणारे कलाकार यांच्यावर हल्ला केला. नाटक पाहायला जमलेला जमाव निशस्त्र होता पण, कॉंग्रेस उमेदवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडे हत्यारे होती.

या कार्यकर्त्यांनी लोखंडी सळ्या आणि इतर शस्त्रांनी या जमावावर हल्ला करणे चालूच ठेवले. या भागातील एक कामगार राम बहादूर याचा तर जागीच मृत्यू झाला. सफदर हाशमी यांना देखील या दंग्यात गंभीर दुखापत झाली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हाशमी यांना सिटू (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन) च्या ऑफिस मध्ये नेण्यात आले. मुकेश शर्मा आणि त्यांचे कार्यकर्ते तिथेही पोहोचले आणि त्यांनी ऑफिसची तोडफोड केली.

आधीच गंभीर जखमी असलेल्या हाशमींना त्यांनी तिथे जाऊन पुन्हा मारहाण केली. त्यांची तब्येत खालावत गेली. त्यांना तातडीने राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हाशमी या जगातून निघून गेले. नाटकाला एक नवी आणि व्यापक भाषा देणाऱ्या या कलाकाराने अवेळीच या जगातून एक्झिट घेतली.

या कलाकाराच्या अशा जाण्याने संपूर्ण देशात खळबळ माजली. दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रेतयात्रेत इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते की, लोकांची ही रांग सुमारे १० मैल दूरवर पसरली होती. समाजातील सर्व थरातील लोक यात होते. शिक्षक, कलाकार, कामगार असे सर्व लोक या अंत्ययात्रेत सहभागी होऊन आपल्या लाडक्या कलाकाराला जड अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते.

या घटनेने सर्वजण हादरून गेले होते. जमेलेल्या प्रत्येक व्यक्तीत राग धुमसत होता आणि त्याहून अधिक हताशा दिसत होती. सर्वांना एकच प्रश्न सतावत होता, “लोकशाही देशात सत्तेसमोर उभे राहून आपल्याच वास्तवाबद्दल बोलणे हा कोणता गुन्हा आहे? या गुन्ह्यासाठी आम्हाला मृत्यूला सामोरे जावे लागणार का?”

यानंतर दुसऱ्याच दिवशी चार जानेवारीला जनमची टीम पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचली जिथे हल्ला झाला होता. सत्तेच्या उन्मत्त टाचेखाली जे नाटक सत्तांधानी चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला तेच नाटक त्याच ठिकाणी पुन्हा करण्यात आले. या कलाकारात सफदर हाशमी यांची पत्नी मौलश्री देखील होती. आपल्या दु:खाला दाबून टाकून ती कलाकाराचे ऋण फेडण्यासाठी आली होती.

लोकशाहीत दिवसाढवळ्या, भर रस्त्यात, चौकात जर कुणी हक्क आणि अधिकारांसाठी आवाज उठवत असेल तर त्याची अवस्था काय होते याची प्रचीती सर्वांनाच आली होती.

आवाज उठवणाऱ्यांचा आवाज सुरक्षित राहीलच हे कुणीही सांगू शकणार नाही. सफदरच्या मारेकऱ्यांचं पुढे काय झालं? त्यांना शिक्षा झाली?

हो कारण ही हत्या दिवसा ढवळ्या झाली होती. तिथे उपस्थिती असाणारे साक्षीदारही भरपूर होते. या खटल्यात १२ लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पण, या खटल्याचा निकाल लागला.

३ नोव्हेंबर २००३ रोजी म्हणजे सत्याला न्याय मिळण्याआधी त्यालाही १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला. यात मुकेश शर्मासह इतर बारा व्यक्तींना दोषी ठरवण्यात आले. पण, या घटनेतील आणखी दोन आरोपी निकाल लागण्याआधीच या जगातून निघून गेले होते.

न्याय मिळाला पण, तो इतक्या उशिरा मिळाला की, तो मिळाला किंवा नाही मिळाला याने काहीच फरक पडणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!