दाऊद इब्राहीम नाही तर हा आहे भारताचा मोस्ट वाॅन्टेड..!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


नक्षलवाद ही भारतासमोरील एक फार मोठी गंभीर समस्या आहे. नक्षलवादाविरोधातील लढाईत भारताचे अनेक सुपुत्र आजवर शहीद झाले आहे. पण सध्या भारताच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला मोठे यश मिळताना दिसून येत असून एक कुख्यात नक्षलवादी नेता गणपती लवकरच पोलिसांना शरण जाणार असल्याचा चर्चा आहेत.

देशातील या सर्वात कुख्यात माओवादी नेत्याच्या मृत्यूचा याआधी अनेक वेळा बातम्या आल्या होत्या, पण त्या खोट्या ठरल्या होत्या, आता तो लवकरच पोलिसांना शरण जाणार असल्याची बातमी आली आहे. गणपती हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी किती मोठा धोका आहे याचा अंदाज त्याच्या डोक्यावर कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमपेक्षा जास्त रक्कमेचा इनाम आहे, यावरून येतो. गणपती हा अनेक राज्यात मोस्ट वॉन्टेड अपराधी आहे.

गणपतीचे खरे नाव मुप्पला लक्ष्मणराव असे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, बिहार व छत्तीसगडचे पोलीस दल त्याच्या शोधात आहे. नॅशनल इन्व्हेस्टिंगेशन एजन्सी (NIA) देखील याच्या शोधात आहे.

अनेक राज्यांनी या कुख्यात माओवादी नेत्यावर किती तरी कोटींचे इनाम ठेवले आहे. अनेकांनी हा आकडा २.५ कोटी असल्याचे म्हटले आहे. हा इनाम दाऊद इब्राहिमच्या दुप्पट आहे.

गणपती हा फार महत्वाचा नक्षल कमांडर असून त्याच्या भोवताली जंगलात राहून युद्ध करण्याचे सामर्थ्य असलेल्या नक्षली गोरिला गार्डसचा संरक्षण कडा आहे. ही सुरक्षा भारतातील अनेक राजकारण्यांना मिळणाऱ्या सुरक्षेच्या तोडीची आहे. या सुरक्षा कड्याला भेदून त्याच्यापर्यंत पोहचणे अवघड आहे.

इतकंच नाही तर गणपतीकडे गुप्तचरांची मोठी फौज आहे, जे त्याला पोलिसांच्या प्रत्येक गतीविधींच्या सूचना देत राहतात, यामुळेच त्याच्यापर्यंत पोहचण्याचा कुठलाच प्रयत्न यशस्वी होत नव्हता.

आज पोलिसांकडे गणपतीचा जो फोटो आणि चित्र आहे ते अनेक वर्षांपूर्वीच आहे. आज हा ७४ वर्षांचा गणपती कसा दिसतो याचा पोलिसांना अंदाज नाही आहे. त्याच्या आधीच्या फोटोनुसार तो सडपातळ आणि काहीशा भुरकट केसांचा आहे, पण अनेकांच्या मते गणपती हा सदैव आपल्या डोक्याला डाय लावून केसांचा रंग बदलत असतो, जेणेकरून त्याला कोणी ओळखू नये.

गणपती सर्वप्रथम चर्चेत आला १९९५ साली, त्याने त्यावेळी पोलिसांच्या गाडीला बॉम्बने उडवले होते. ज्यात २५ लोक आपल्या प्राणास मुकले होते.

२००६ साली गणपतीने सलवा जुडूम अभियानाचा सामना करण्यासाठी आपल्या साथीदारांच्या मदतीने ३५ आदिवासींची बस्तरच्या एरॅबोरमध्ये निर्घृण हत्या केली होती.

२००६ साली त्याने उपलेटा कॅम्प मधील २२ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केली होती आणि १४ नागा सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला त्याने उडवले होते. २००८ मध्ये त्याने सीआयएसएफच्या हिरोली माईन्स कॅम्पवर हल्ला करत ८ जवानांना मारले होते.

तेलंगणाच्या करीमनगरमध्ये जन्मलेला गणपती पेशाने शिक्षक होता. परंतु आधीपासूनच त्याला लोकांना एकत्र करून व्यवस्थेत बदल घडवून आणायचा होता. याच विचाराला घेऊन त्याने माओवादी आंदोलनात उडी घेतली आणि काही काळातच तो नक्षलवादी कमांडर बनला.

गणपतीचे नेटवर्क देश-विदेशात पसरले होते. याचाच वापर तो नक्षली चळवळीसाठी रसद आणि हत्यार मागवत होता. त्याचा श्रीलंका आणि इतर देशातील राष्ट्र विरोधी शक्तींशी लागेबंध होता.

गेल्या काही वर्षांपासून तो आजारी असल्याने त्याने पार्टीच्या कामकाजातुन स्वतःला मुक्त केले होते. त्याची तब्येत ठीक नसल्याने तो शरणागती पत्करायच्या विचारात आहे. तो शरणागती पत्करणार ही बातमी मीडियात पसरल्याने त्याचे इतर नक्षलवादी साथीदार चांगलेच बिथरले असून त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून त्याने नक्षलवादी चळवळीला सोडले असल्याचा बातमीला दुजोरा दिला आहे.

पण त्यांनी तो शरणागती पत्करेल हा नक्षलवादी चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

गणपती हा खूप मोठा नक्षल कमांडर असल्यामुळे त्याचा शरणागतीच्या बाबतीत पोलीस साशंक आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गणपती हा इतका मोठा लीडर आहे की तो स्वतःसाठी सहजपणे आरोग्ययंत्रणा उभारू शकतो, तो इतर माओवादी नेत्यांप्रमाणे स्वतःसाठी सहज ‘ICU’ रूम व डॉक्टरची व्यवस्था करू शकतो. वैद्यकीय कारणासाठी तो शरण येईल हे अजिबात विश्वासार्ह नाही.

परंतु एकीकडे पोलीस अधिकारी तो शरण येणार असल्याचे समाधान देखील व्यक्त करत आहेत. बस्तरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की जर तो शरण आला तर नक्षलवादी चळवळीला खिंडार पडेल आणि पोलिसांना त्यांचा नायनाट करण्यात मोठी मदत होईल.

आता हा गणपती शरण येतो की नाही आणि त्याच्या माध्यमातून भविष्यात या भारताला लागलेल्या नक्षली किडीचा नाश करता येतो की नाही, याचे उत्तर भविष्यातच मिळेल. पण भारताला या रक्तरंजित चळवळीचा बिमोड करता आला पाहिजे, अशी आशा करूया..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!