पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या विदेशी दौऱ्याचा खर्च उचलणारा हा माणूस भारतात युद्धकैदी होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली युद्ध झाले आणि बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या काही सैनिकांना कैद केले होते. यातील पाकिस्तानचा एक सैनिक भारतीय युद्धबंदी जेलमधून गुंगारा देऊन पळून गेला. भारतातील युद्धकैदी तुरुंगातून पळून गेलेला हा सैनिक पाकिस्तान लष्करात मोठ्या हुद्द्यावर पोहोचला होता. या सैनिकाने निवृत्तीनंतर स्वतःची खाजगी सुरक्षा यंत्रणा उभी केली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयात याची मोठी पोच आहे, असेही म्हटले जाते.

भारताच्या लष्करी तुरुंगातून फरार झालेल्या या युद्धकैद्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दावोसच्या मंचावर कृतज्ञता व्यक्त केली होती. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि हा युद्धकैदी यांच्यात नेमके काय नाते आहे जाणून घेऊया या लेखातून.

जगभरातील देशांनी एकत्र येऊन एकमेकांच्या आर्थिक, औद्योगिक, व्यापार, शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करुन त्यावर काही मार्ग काढण्यासाठी म्हणून जागतिक आर्थिक मंचाची स्थापना झाली. दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे या मंचाची जागतिक परिषद भरते. या परिषदेत आपल्या आर्थिक धोरणांचा मागोवा घेण्यासाठी आणि जगभरातील इतर देशांना त्यातून काही मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतात.

यावर्षीच्या दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान दोघेही उपस्थित होते. इमरान खान यांना दावोसच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत सामील होता व्हावे यासाठी पाकिस्तानातील दोन मोठ्या व्यक्तींनी त्यांच्या या परदेश दौऱ्याचा पूर्ण खर्च उचलला होता. इमरान खान यांनी आपल्या भाषणातून त्या दोन्ही व्यक्तींचे जाहीर आभार मानले होते.

इमरान खान यांच्या परदेश दौऱ्याचा आणि त्यांच्या आईच्या नावाने जे शोकत खानम कॅन्सर सेंटर चालवले जाते त्याचाही खर्च याच दोन व्यक्ती उचलतात. त्यापैकी एक व्यक्ती कधीकाळी भारताचा युद्धकैदी होता.

इमरान खान यांनी ज्या दोन व्यक्तींचे आभार मानले त्यातील पहिल्या व्यक्तीचे नाव आहे इकराम सहगल. पाकिस्तानातील प्रसिद्ध वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार इकराम सहगल हे पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील एक खास व्यक्ती आहेत.

तर दुसरे नाव आहे इमरान चौधरी. इमरान चौधरी हे पाकिस्तानमधील एक मोठे उद्योगपती आहेत. शोकत खानम कॅन्सर सेंटरचा खर्च इमरान चौधरीच पाहतात. तेही इमरान खान यांचे जिवलग मित्र आहेत. इमरान खान यांना या दोघांकडूनही बरीच आर्थिक मदत होत आहे.

यातील इकराम सहगलचे वडील पंजाबी आणि आई बंगाली होती. फाळणीनंतर हे कुटुंब पूर्व पाकिस्तानमध्ये गेले. इकराम सहगल हे पाकिस्तानच्या वायुदलात दाखल झाले. १९७१ साली जेंव्हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान बांगलादेश प्रश्नावरून युद्ध सुरु झाले तेंव्हा इकराम सहगल हे पाकिस्तानच्या फायटर प्लेनचे पायलट होते. युद्ध सुरु होण्यापूर्वीच काही काळ भारतीय सैनिकांनी त्यांना ढाका मधून ताब्यात घेतले आणि युद्धबंदी बनवून ठेवले.

युद्धबंदी म्हणून त्यांना पानागढच्या छावणीत कैदेत ठेवण्यात आले होते. या छावणीत सहगल चार महिने बंदिस्त होते. तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना चकमा देऊन ते कैदेतून निसटण्यात यशस्वी झाले. युद्धकैदेतून फरार होण्यात यशस्वी झालेले पाकिस्तानचे ते पहिलेच कैदी होते.

भारतातील कैदेतून निसटल्यावर इकराम थेट पाकिस्तानमध्ये पोहोचले. तिथे ते पुन्हा सैन्यात भरती झाले. भारतीय युद्धबंदी असूनही कैदेतून निसटण्यात ये यशस्वी झाले याचाही त्यांना फायदा झाला. भारतातून ते अक्षरश: फक्त अंडरवियरवरच फरार झाले होते.

इकराम सहगल यांनी पाकिस्तानी सैन्यात मोठ्या पदावर मजल मारली. सतत भारतावर टीका करण्यासाठी आणि पाकिस्तानमधील एक तज्ञ युद्ध विश्लेषक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या डिबेट पनेलवर त्यांना हमखास आमंत्रण दिले जाते. ते पाकिस्तानच्या वृत्तपत्रातून स्तंभलेखनही करत असतात.

पाकिस्तानी सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी स्वतःची खाजगी सुरक्षा संस्था स्थापन केली. त्यांच्या संस्थेचे नाव आहे पाथफाइंडर. पाथफाइंडर कंपनी आज पाकिस्तानमध्ये खाजगी सरंक्षण क्षेत्रातील ही एक नावाजलेली कंपनी आहे.

इकराम सहगल हे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे जवळचे मित्र आहेत. इमरान खान यांच्या परदेश दौऱ्यावर ते भरपूर पैसे खर्च करत असतात. दावोसमधील त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी एकूण १.६ लाख डॉलर इतका खर्च झाला. यात इकराम खान यांनी यातील खर्चाचा मोठा वाटा स्वतःहून उचलला. इमरान खान यांच्या मते पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या तुलनेत त्यांचा हा खर्च दसपटीने कमी आहे. त्यांच्या आधीच्या अनेक पंतप्रधानांचे परदेश दौरे याहून महागडे असत.

शिवाय, इमरान खान यांची आई शौकत खानम हिच्या नावाने जे कॅन्सर सेंटर चालवले जाते त्यालाही इकराम सहगल मोठा हातभार लावत असतात.

इमरान खान यांचे आणखी एक मित्र आहेत इमरान चौधरी. हे पाकिस्तानमधील एक मोठे उद्योगपती आहेत. इमरान चौधरीसुद्धा इमरान खान यांच्या परदेश दौऱ्याचा खर्च उचलतात. शिवाय शौकत खानम या कॅन्सर सेंटरला त्यांचीही मदत होते. इमरान चौधरी हे मार्टिन डो ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांच्या या कंपनीकडूनच इमरान खान यांच्या परदेश दौऱ्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते.

इकराम सहगल आणि इमरान चौधरी हे गेली अनेक वर्षे इमरान खान यांना आर्थिकदृष्ट्या मदत करत आहेत. दोघांचीही पंतप्रधानांसोबत नेहमी उठबस असते. पंतप्रधान कार्यालयातही या दोघांना चांगला मान दिला जातो. इमरान चौधरी सध्या व्यवसायाचा निमित्ताने दुबईत राहतात. अखाती देशात त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या व्यवसाय विस्तारला आहे. या देशांत व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी भरपूर पैसे गुंतवले आहेत.

इकराम सहगल यांना आज पाकिस्तानमध्ये एक “तज्ञ युद्धविश्लेषक” म्हणून ओळखले जाते.

भारतातील एक युद्धकैदी ते पाकिस्तानी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याचे स्पॉन्सर आणि “ज्येष्ठ युद्धविश्लेषक” इथपर्यंतचा इकराम सहगल यांचा हा प्रवास अचंबित करणारा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!