अवघ्या १४ महिन्यांचा असताना त्याने आपल्या करामती दाखवून इंटरनेटवर राडा केलाय!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


काही मुले जन्मजातच विशिष्ट गुण, कला, कौशल्य घेऊन जन्माला आलेली असतात. जेंव्हा लहान वयापासूनच त्यांच्यातील या सुप्त गुणांना वाव मिळतो तेंव्हा त्यांच्यातील कलेचा अविष्कार पाहून थक्क व्हायला होते. काही बालकांच्या बाललीला खरोखरच चकित करणाऱ्या असतात. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांच्यातील कलाकाराने भरपूर प्रगती केलेली असते.

फक्त १४ महिन्याचे मुल कोलांटी उड्या मारताना पहिले तर तुम्हाला काय वाटेल? दीड वर्षाचे मुल जर स्पायडर मॅनसारखे भिंतीवर चढू लागले तर नक्कीच हे मुल काही साधारण मुल नाही असेच उद्गार आपल्या तोंडातून निघतील!

इराणच्या अरत हुसैनीला पाहिल्यावरही तुम्ही हाच विचार कराल. जेव्हा तीन वर्षाची मुलं नुकतीच धडपडत चालत असतात तेव्हा हा पोरगा माकडाने झाडावर चढावे तितक्या सराईतपणे भिंतीवर चढायचा. शरीराला रबराप्रमाणे हवे तसे वाकवू शकतो.

सहा वर्षाच्या अरतच्या शारीरिक कसरती पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

अरत हुसैनीच्या या करामतींना सोशल मिडीयावर तर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अरतच्या स्टंटचे फोटो आणि व्हिडीओजना सोशल मिडियावर भरपूर प्रसिद्धी मिळत आहे. इतका छोटा मुलगा ज्या काही कसरती करतो ते पाहून कुणालाही आश्चर्या वाटल्या वाचून राहणार नाही.

स्पायडर मॅन, सुपरमॅन, बॅटमॅन यांना तर टीव्हीवर कसरती आणि करामती करताना पाहूनही आपण आश्चर्यचकित होतो. पण, असा कुणी खराखुरा सुपरमॅन भेटला तर आपली प्रतिक्रिया काय असेल? असा कुणी सुपरमॅन वस्तवात असेल यावर आपला विश्वासही बसणार नाही.

पण अरतला त्याच्या चाहत्यांनीच स्पायडर बॉयची पदवी दिली आहे. त्याच्या या करामती म्हणजे स्टंट तुम्ही पहिले तर ही उपाधी त्याच्यासाठी किती सार्थ आहे, हे तुम्हालाही पटेल.

२०१७मध्ये अरत हुसैनीचे फेसबुकवर ६,५०,०००० फॉलोअर्स होते. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या आता ३.९ दशलक्षच्या घरात पोहोचली आहे.

सोशल मीडियातून त्याचे जिमनॅस्टिक कसरती करणारे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले जातात. विशेष बाब म्हणजे अशा प्रकारच्या लवचिक कसरती तो कोणत्याही आधाराशिवाय आणि आधुनिक साधनांशिवाय करतो. त्याचे चाहते तर त्याला स्पायडर बॉय या नावानेच ओळखतात.

अरतने कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या जिममध्ये या कसरतींचे प्रशिक्षण घेतले नाही. तर, जिम्नॅस्टिक्सचे छोटे छोटे व्हिडीओ बघून अरतच्या वडिलांनी घरीच त्याला प्रशिक्षण दिले आहे. अरतचे वडील मोहम्मद हुसैन हेही काही खेळाडू नाहीत.

जिम्नॅस्टिकमधली तर त्यांना मुलभूत माहितीसुद्धा नव्हती. तरीही त्यांनी अरतला अगदी लहानपणापासून हे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. अरतच्या बाललीला पाहूनच त्यांनी अरतला असे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

अरत तीन महिन्याचा असतानाच तो वडिलांचे बोट धरून उभे राहण्याचा प्रयत्न करत होता. रांगायला येण्याआधीही तो हाताला सापडेल तो आधार पकडून उठून उभे राहण्याचा प्रयत्न करत होता. त्याची ही धडपड पाहून मुहम्मद यांनी घरीच थोड्या थोड्या अंतरावर त्याच्या हाताला येतील असे हँडल तयार केले.

सुरुवातीला मुहम्मद अगदी दहा ते पंधरा मिनिटेच अरतकडून कसरती करवून घेत. नंतर त्याचे वय वाढले तसा त्यांनी त्याच्या कसरतीचा वेळही वाढवला. १४ महिन्याचा अरत सलगपणे १५ कोलांट उड्या मारत होता.

कोवळ्या वयातही अरत अगदी सहजपणे हातावर उलटा उभा राहू शकतो. सहजपणे पूलअप्स काढू शकतो. ६.५ किलो वजनासह तो प्रेस-अप्स करतो आणि त्यापेक्षा जास्त वजनासह सीट-अप्स करू शकतो.

कपाटावरून उड्या मारणाऱ्या अरतचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेत. स्प्लिट करण्यात आणि उलट्या दिशेने चालण्यातही तो चांगलाच तरबेज आहे. चार वर्षाचा असतानाच त्याने सिक्स पॅक्स बनवले आहेत. त्याच्या मजबूत देहयष्टीचे फोटो चांगलेच लोकप्रिय झालेत.

अरतकडे शारीरिक मजबुतीचे, लवचिकपणाचे एक निसर्गदत्त वरदान आहे. जे त्याच्या वडिलांनी वेळीच ओळखले आणि त्याला त्याच पद्धतीचे प्रशिक्षण दिले. खरेतर त्यांना स्वतःलाही या क्षेत्रातील फारसं ज्ञान नाही. ते राहतात ते गावही अगदी खेडं आहे. शहरापासून कित्येक किलोमीटर दूर. या गावातही हे सगळे प्रकार शिकण्यासाठी लागणाऱ्या कसल्याही सुविधा उपलब्ध नाहीत.

पण, अरतची आवड आणि त्याचा कल लक्षात घेऊन त्यांनी त्याला सहाय्यभूत ठरतील अशी साधने एकतर घरीच बनवली किंवा घरातील उपलब्ध साधनांचा त्यांनी कौशल्यपूर्वक वापर करून घेतला. जिम्नॅस्टिक्सच्या ऑनलाईन व्हिडीओची मदत घेत ते स्वतःच अरतचे प्रशिक्षक बनले.

सहा वर्षांच्या अरतमध्ये खेळाची प्रचंड आवड, ओढ आणि उपजतच प्राविण्यही आहे. फुटबॉलमधील त्याच्या कौशल्याने त्याला सहा वेळा बॅलन दिओरचा पुरस्कार मिळाला आहे. फ्रांस फुटबॉल न्यूज मॅगझीनच्या वतीने दरवर्षी हा फुटबॉल पुरस्कार दिला जातो.

मेस्सी आणि रोनाल्डो सारख्या दिग्गज फुटबॉल खेळाडूंनीही अरतच्या या फुटबॉल मधील कौशल्याचे कौतुक केले आहे.

तो सध्या लिव्हरपूल फुटबॉल क्लब्ज अकॅडमीमध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण घेत आहे. आर्सेनल, एमयु, आणि बार्सिलोनासारखे प्रसिद्ध फुटबॉल क्लब यांनीही अरतला प्रशिक्षण देण्यात रस दाखवला आहे. अरतला फुटबॉलमध्ये चांगले भविष्य आहे असे या क्लब्जना देखील वाटते.

रोनाल्डो हा त्याचा आवडता फुटबॉलपट्टू आहे. सध्या तो रोनाल्डो सारखा दिसण्याचा प्रयत्न करतो आहे. फुटबॉलचे तीन हजार किक-अप्स खेळतानाचा त्याचा व्हिडीओ अलीकडेच व्हायरल झाला आहे. यामध्ये तो बर्का टीशर्ट घालून फुटबॉलची प्रॅक्टिस करताना दिसत आहे.

अरत भविष्यात नक्कीच एक यशस्वी फुटबॉलपट्टू म्हणून उदयास येईल. पण, योग्यवेळी त्याचा कल ओळखून त्याला प्रशिक्षण देणारे त्याचे वडीलच त्याच्या या यशाचे खरे शिल्पकार असतील. कारण, त्यांनी अरतच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्वतःहून जी मेहनती घेतली ती कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

आपल्या पाल्यातील सुप्त गुणांना वाव देण्याची त्यांच्यातील ही उर्मी प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!