आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गुरु शिष्य परंपरेला आपल्या संस्कृतीत आदराचे स्थान आहे. आजही गुरूपौर्णिमेसारख्या सणांच्या निमित्ताने गुरुप्रती शिष्याला असलेला आदरभाव व्यक्त करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. शिष्याच्या यशात गुरूचा अनन्य साधारण वाटा असतो. गुरूने पेरलेले बीजच शिष्याच्या रूपाने एक पूर्ण झाड बनून उभे असते.
अशीच एका गुरु-शिष्यातील नात्याची आणि शिष्याची गुरूबद्दलच्या कृतज्ञतेची कहाणी आपण आज वाचणार आहोत. गुरु-शिष्याच्या या जोडीला देशाच्या आणि धर्माच्या सीमांचे बंधनही रोखू शकले नाही.
विज्ञानाच्या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती होत आहे. अनेक नवनवे शोध लावले जात आहे. मानवी मनातील संशोधनाची ही उर्मी कधीच आटली नाही. हिग्ज बोसॉन किंवा गॉड पार्टिकल नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध प्रयोगाची तर तुम्हाला माहिती असेलच. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य जाणून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. या प्रयोगासाठी अणू पदार्थविज्ञानाचा पाया रचणाऱ्या अब्दुस सलाम यांचा १९७९मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता.
सलाम हे पाकिस्तानचे शास्त्रज्ञ होते आणि त्याच्या या यशाबद्दल पाकिस्तानमध्ये त्यांच्या खूप गौरव करण्यात आला. आज चार दशकानंतरही अब्दुस सलाम यांचे नाव ओळखणारे पाकिस्तानात खूप कमी लोक असतील.
कारण अब्दुस हे पाकिस्तानातील अहमदिया समुदायातून येतात जो पाकिस्तानमधील एक अल्पसंख्य समुदाय आहे. पाकिस्तानी सरकारने या समुदायाकडे खूपच दुर्लक्ष केले आहे.
अलीकडे द फर्स्ट नोबेल लॉरेट या नावाने नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली होती जी सलाम यांच्या वैज्ञानिक कार्यावर चांगला प्रकाशझोत टाकते.
१९७९च्या डिसेंबर मध्ये डॉ. सलाम यांना जागतिक दर्जाचे नोबेल पारितोषिक मिळाले. सलाम यांना मिळालेले हे यश साधारण अजिबात नव्हते. पण या यशाचे श्रेय त्यांनी स्वतःला दिले नाही. त्यांच्यात विज्ञान आणि गणिताचे आवड निर्माण करणारे प्राध्यापक गांगुली यांना त्यांनी या नोबेल मिळण्याचे श्रेय दिले.
यासाठी त्यांनी भारत सरकारला प्राध्यापक गांगुली यांना भेटू देण्याची विनंती केली. सुमारे दोन वर्षानंतर म्हणजे १९८१ मध्ये त्यांना भारतात येऊन आपले शिक्षक श्री. अनिलेन्द्र गांगुली यांची त्यांनी भेट घेतली.
श्री. अनिलेन्द्र गांगुली हे फाळणीपूर्व भारतातील लाहोरच्या सनातन धर्म कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांनीच सलाम यांच्यामध्ये गणिताची आवड निर्माण केली. त्यामुळे हे नोबिल मिळवण्याचे खरे श्रेय त्यांचेच आहे, असे त्यांचे मत होते. भारताच्या फाळणी नंतर प्राध्यापक अनिलेन्द्र गांगुली भारतात स्थायिक झाले.
१९ जानेवारी १९८१ रोजी सलाम यांनी प्रा. गांगुली यांची दक्षिण कलकत्त्यातील त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. परंतु प्रा. गांगुली यांची तब्येत बरीच खालावली होती. त्यांना उठून बसणे देखील शक्य नव्हते. वार्धक्यामुळे ते अंथरुणावर पडूनच असत.
अब्दुस यांच्या मुलाने सांगितले, “माझ्या वडिलांकडे या भेटीचा एक फोटो होता. ज्यात प्रा गांगुली अगदीच वृद्ध दिसत आहेत. ते शिक्षक आपल्या अंथरुणावर पडून आहेत आणि उठून बसू शकत नाहीत. माझे वडील त्यांच्या हातात हे मेडल (नोबेल पारितोषिक) देत आहेत.”
अणूभौतिक शास्त्रात अब्दुल सलाम यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांना १९७९ साली हे नोबेल देण्यात आले होते. त्यांनी केलेल्या कामामुळेच हिग्ज-बोसॉनच्या प्रयोगाचा पाया घातला गेला.
खरे तर अब्दुस सलाम यांचे हे काम इतके मोठे आहे की, पाकिस्तानला आजही त्यांच्या कार्याबद्दल गौरव वाटला पाहिजे. परंतु, आज पाकिस्तानला सलाम यांच्या नावाचा विसर पडला आहे, असे दिसते.
सलाम यांनी नोबेल मिळाल्यानंतर आपल्या गुरुचा शोध घेतला आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कारण, कॉलेजच्या काळात गांगुली सरांनी त्यांच्यात गणिताची जी ओढ निर्माण केली, अभ्यासाप्रती जी आस्था आणि आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली त्यामुळेच हे यश मिळवले शक्य झाले असे ते म्हणत.
सलाम आणि गांगुली यांच्या भेटीत झालेल्या संवादात ते आपल्या गुरूंना म्हणाले देखील, “सर हे पदक म्हणजे तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दल जे प्रेम निर्माण केले, त्याचेच फळ आहे.” आणि त्यांनी ते मेडल आपल्या शिक्षकांच्या गळ्यात घातले. मुस्लीम टाईम्सच्या लेखात झिया एच. शाह यांनी या प्रसंगाचे वर्णन केले आहे.
नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंटरी मध्ये सलाम यांच्या मुलाने सांगितलेली आठवण काहीशी वेगळी आहे.
“ते भारतातील आपल्या शिक्षकांच्या घरी हे मेडल घेऊन गेले. तोपर्यंत ते फारच म्हातारे झाले होते. त्यांचे शिक्षक आपल्या बिछान्यावर पडून होते आणि त्यांना उठून बसणे देखील शक्य नव्हते. माझे वडील त्यांच्या हातात हे मेडल ठेवत असल्याचा एक फोटो आमच्याकडे आहे. माझे वडील आपल्या शिक्षकांना म्हणाले की, “सर, हे मेडल तुमचे आहे. माझे नाही.”
शिक्षकांप्रती दाखवलेली ही अत्युच्च कोटीची कृतज्ञता होती. कृतज्ञतेच्या या भावनेने देश आणि धर्माच्या सीमा देखील ओलांडलेल्या दिसल्या. कृतज्ञतेची ही कथा इथेच संपत नाही.
सनोबर फातमा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केलेल्या एका ट्विटनुसार, १९८१ साली कलकत्ता विद्यापीठाने डॉ. सलाम यांना देबाप्रसाद सर्बाधीकार्य गोल्ड मेडल देऊन त्यांना सन्मानित करण्याचे ठरवले. परंतु, सलाम यांनी अत्यंत नम्रतेने सांगितले की, या पारितोषिकावर माझ्यापेक्षा माझ्या शिक्षकांच्या जास्त अधिकार आहे, आणि हा पुरस्कार त्यांनाच देण्यात यावा.
त्यावेळी कलकत्ता विद्यापीठाने अनिलेन्द्रनाथ यांच्या दक्षिण कलकत्त्यातील घरी जाऊन हा सन्मान प्रदानाचा सोहळा पार पडला. १९८१ साली कलकत्ता विद्यापीठाने हा कार्यक्रम घेतला तेंव्हा आपल्या शिक्षकांचा होणारा सन्मान पाहण्यासाठी डॉ. सलाम त्याठिकाणी उपस्थित होते. वार्धक्याने थकलेल्या अनिल बाबूंचे त्यानंतर काही दिवसातच म्हणजे १९८२ साली निधन झाले. फातमा यांच्या ट्विटमध्ये हा वृतांत वाचायला मिळतो.
जगभरात गुरुप्रती आदराची भावना व्यक्त केली जाते. परंतु, भारतीय परंपरेत गुरु-शिष्य परंपरेचा प्राचीन इतिहास आहे. त्याच परंपरेतील हाही एक धागा. जिथे सगळ्या सीमा पार झाल्या आहेत.
पाकिस्तानमध्ये मात्र डॉ. सलाम यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. भारतीय शिक्षकांबद्दल या पाकिस्तानी विद्यार्थ्याने बाळगलेली ही उच्च कोटीची कृतज्ञता पाहून मात्र आवाक व्हायला होतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.