भारतात जन्मलेल्या या शास्त्रज्ञामुळे पाकिस्तान न्युक्लीअर पावर बनलाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“पाकिस्तान” म्हणजे आपला सख्खा शेजारी पण पक्का वैरी. कायम काही ना काहीतरी कुरापती करत स्वतःचंच नाव खराब करून घेणार. पाकिस्तानचं म्हणजे असं आहे “भारताकडे आहे मग मला पण पाहिजे.” मग तो काश्मीर असो नाहीतर IPL. त्यांना ती प्रत्येक गोष्ट हवी असते जी भारताकडे आहे. मग जेव्हा आपण अणुचाचणी घेतली आणि आपण जगजाहीर केलं की “हम भी किसीसे कम नहीं।” तेव्हा पाकिस्तानला पण अणुचाचणी करायची होती. त्यामध्ये फक्त भारताशी बरोबरी करणे एवढं एकच उद्दिष्ट नव्हतं तर त्यामागे एक भीती पण होती कारण भारत-पाकिस्तान फाळणीनंतर झालेल्या तिन्ही युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती.

तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकर अली भुट्टो यांनी ते जेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री होते तेव्हा एक विधान केलं होतं, “एकवेळेस पाकिस्तान घास खाऊन जगेल पण पाकिस्तानला अणुबॉम्ब पाहिजेच.” आता हे विधान सत्यात उतरवण्याची गरज त्यांना भासू लागली. भुट्टोना एक गोष्ट चांगलीच माहिती होती की भारत कधीही अणुबॉम्ब बनवू शकतो कारण तेवढी ताकद भारताकडे उपलब्ध आहे.

चीनने 1962च्या युद्धात भारताला हरवल्यानंतर तर भारत आता लवकरच अणुचाचणी घेणार हे त्यावेळी भुट्टोला कळलं होतं आणि झालंही तसंच. अण्वस्त्र बनवण्यासाठी लागणाऱ्या समृद्ध युरेनियमऐवजी भारत त्याच्या किरणोत्सर्गी कचऱ्यातून मिळणाऱ्या उपउत्पादक प्लूटोनियमचा वापर अण्वस्त्र बनवण्यासाठी करू लागला.

जेव्हा ही बातमी पाकिस्तानला कळाली तेव्हा त्यांनी जगभर त्याचा बोभाटा करून हे थांबवण्याची मागणी केली. तरीसुद्धा कोणीही त्याला विरोध केला नाही कारण भारताने त्यावर अणूऊर्जा निर्मितीच्या कार्यक्रमाचा मुखवटा जो घातला होता. त्यातही1971 ची हार पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. आता काहीही झालं तरी पाकिस्तान शांत बसणार नव्हता.

1971 मध्ये पाकिस्तान सैन्याच्या आत्मसमर्पणानंतर एका महिन्यातच भुट्टोने आपल्या 70 शास्त्रज्ञांची पंजाब प्रांतात बैठक बोलावली. बैठकीचा मुद्दा एकच होता पाकिस्तानला अण्वस्त्रधारी देश बनवायचा. भुट्टोच्या प्रश्नाला अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शास्त्रज्ञांनी फक्त 5 वर्षांचा कालावधी मागितला. या मोहिमेची धुरा भुट्टोने मुनीर अहमद खान ह्याच्याकडे सोपवली. मुनीर हा आधीपासूनच पाकिस्तानचा इंटरनॅशनल ऍटोमीक एनर्जी एजन्सीचा (IAEA) दूत म्हणून काम बघत होता.

अणूबॉम्ब बनवण्यासाठी 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात. पहिली म्हणजे न्युक्लिअर डिव्हाईस आणि दुसरी न्युक्लिअर डिव्हाईसला लागणारे इंधन म्हणजेच युरेनियम किंवा प्लूटोनियम. न्युक्लिअर डिव्हाईस तयार करणे पाकिस्तानसाठी काही अवघड काम नव्हते खरा प्रश्न होता तो इंधनाचा. कारण IAEA (International Atomic Energy Agency) ने घालून दिलेले निर्बध. तरीसुद्धा मुनीरने ते इंधन कॅनडानिर्मित अणुभट्टी जी पाकिस्तानात कार्यरत होती तिच्या किरणोत्सर्गी कचऱ्यातून घेण्याचं ठरवलं.

पाकिस्तानने जरी आंतरराष्ट्रीय अप्रसिद्धीकरारावर स्वाक्षरी केलेली नसली तरी कॅनडाने मात्र त्यांची अणुभट्टी IAEA च्या नियंत्रणाखाली ठेवणे अनिवार्य केले होते.  यामुळेच पाकिस्तानला इथे इंधननिर्मितीमध्ये अडचण येत होती. पण खरा धक्का तर पाकिस्तानला 1 मे 1974 रोजी बसला.

पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताने राजस्थानमध्ये हिरोशिमाला विध्वंस केलेल्या बॉम्बसारख्याच बॉम्बची चाचणी यशस्वीरित्या घेतली होती. यशाचा संदेश दिल्लीला पोहोचला.

“बुद्ध हसत आहे.”

या चाचणीमुळे साऱ्या जगाला कळलं आता भारताकडे अणुबॉम्ब आहे म्हणून. भुट्टोची तर तळपायाची आग मस्तकात गेली. इकडे भारताची अणू चाचणीसुद्धा झाली होती आणि तिकडे अजून पाकिस्तानी हातपायच मारत होते. पण जी आग भुट्टोला लागली होती तीच आग अजून एका देशप्रेमीला लागली. “भारताचा बुद्ध फक्त हसत नाहीये तर तो पाकिस्तानवर हसतोय.” हेच जणू त्याला हॉलंडमध्ये जाणवलं होतं. त्याने लगेच पाकिस्तानी पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलं की त्याला पाकिस्तानला अण्वस्त्र संपन्न देश बनवण्यात मदत करायची आहे.

त्या हॉलंडस्थित तरुणाचं नाव होतं “अब्दुल कादिर खान.” उर्फ “ए.क्यू.खान.”

1936 साली भोपाळ मध्ये मुस्लिम शिक्षकाच्या कुटुंबात खान यांचा जन्म झाला. वडील हे पहिल्यापासूनच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे साहजिकच खान यांचासुद्धा थोडा का होईना कल तिकडेच होता. लहानपणापासूनच खान अतिशय अभ्यासू होते.

झहीद मलिक ज्यांनी पुढे जाऊन खान यांचं आत्मचरित्र लिहिलं त्यांनी त्यात म्हटलंय, “एकदा लहानपाणी खान ह्यांच्या आईने त्यांना एका बाबाकडे त्याचं भविष्य पाहण्यासाठी नेलं होतं. तेव्हा तो बाबा म्हणला होता. हा मुलगा एक राष्ट्राच्या प्रगतीत खूप उपयुक्त कार्य करेल. याच्या कार्यामुळे खूप सारी संपत्ती आणि मान मिळवेल तो.” खरंच लहानपणी सांगितलेले ती भविष्यवाणी कालांतराने तंतोतंत खरी ठरेल असा कोणी विचारही केला नसेल.

भारत पाकिस्तान फाळणीनंतर भोपाळमध्ये राहण्याची इच्छा असूनही त्यांच्या आईला घर सोडावं लागलं. जर त्यावेळी ते भारतातच राहिले असते तर कदाचित आजही पाकिस्तान अण्वस्त्र शोधत असला असता. भोपाळमध्ये हिंदू मुस्लिम वाद दिवसेंदिवस वाढत होता. 1952 साली मॅट्रिक पास झाल्यानंतर अब्दुलसुद्धा कराचीमध्ये जाऊन आई आणि भावंडांसोबत राहू लागले. कराचीमध्ये गेल्यानंतर खानने डी. जे. महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

1960 मध्ये महाविद्यालयातुन पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी कराचीमध्येच सरकारी नोकरी घेतली. याच नोकरीतही खान आयुष्य काढू शकले असते. पण खान हे खूप महत्वाकांक्षी होते. त्यांना देशाबाहेर जाऊन अजून शिकायचं होतं. बाहेरच्या शिक्षणासाठी लागणार पैसा कमवून 1961 साली जर्मनीमधील पश्चिम बर्लिन तांत्रिक विद्यापीठाच्या धातू विज्ञान या शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. पाकिस्तानमधून येणारे ते पहिलेच विद्यार्थी होते. खूप कमी वेळात ते अस्खलित जर्मन बोलायला शिकले.

1962 साली हेगमध्ये सुट्ट्या घालवताना त्यांची भेट झाली हेनीसोबत. हेनीचा जन्म आफ्रिकेत झाला होता पण वंशाने ती डच होती. पुढे जाऊन हीच डच युवती खानची बायको झाली. 1963 साली विवाहबंधनात अडकल्यानंतर दोघेही हॉलंडला स्थलांतरित झाले. धातू विज्ञानाचा राहिलेला अभ्यास खानने डेल्फ्ट (delft) विद्यापीठात चालू केला. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी तिथे स्वतःचे युरोपिअन तज्ञांशी संपर्क बनवायला सुरुवात केली. हे सर्व संपर्काचे जाळे त्यांना पुढे कामाला येणार होते.

चार वर्षांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर ते हेनीला घेऊन बेल्जियमला गेले. जिथे त्यांनी कॅथॉलिक विद्यापीठात प्रा. मार्टिन बार्बर्स याच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेटचा अभ्यास सुरू केला. (प्रा. बार्बर्सच नंतर पाकिस्तानी अणवस्त्र शस्त्रनिर्मिती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक बनले.) बेल्जियममध्ये असताना खान यांना 2 कन्यारत्न झाले.

पुरोगामी विचारांच्या खानने “मला दोनच अपत्य खूप आहेत. मुलाचा अट्टहास धरून मला पृथ्वीवरील लोकसंख्येचत अजून भर घालायची नाहीये” असं त्यांच्या चरित्रात नमूद केले आहे. त्यांच्या पूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत, म्हणजे हॉलंड आणि बेल्जियममध्ये, त्यांनी एकूण 23 पेपर्स प्रकाशित केले. तसेच बार्बर्ससोबत एक पुस्तकही प्रकाशित केलं. 1972 साली धातुशास्त्र अभियांत्रिकीमध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली. डॉक्टरेट मिळवल्यावर ते कुठलीही नोकरी करू शकत होते, प्राध्यापक किंवा विमान बनवणाऱ्या कंपनीत मार्गदर्शक किंवा स्टील कंपनीमध्ये अभियंता म्हणून.

पण नशिब बघा त्यांना अशा कंपनीत (FDO) नोकरी लागली जी कंपनी “ultra- centrifuges” म्हणजेच अतिशय वेगाने फिरणाऱ्या ट्यूब्स बनवण्यात माहिर होती. या ट्यूब्सचं काम होतं वायुरूपी युरेनियममधून विशिष्ट isotopes (समस्थानिके) वेगळे करून शेवटी समृद्ध युरेनियम तयार करणे. ज्याचा वापर अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून होतो. ही FDO कंपनी, URENCO नावाच्या मोठ्या कंपनीला या बनवून द्यायचं काम करत होती.

URENCO ही कंपनी हॉलंड, जर्मनी आणि ब्रिटन या तीन देशांनी स्थापन केली होती. ह्या कंपनीच उद्दिष्ट होतं समृद्ध युरेनियमचा वापर करून अणूऊर्जा निर्मिती करणे. ह्यासाठी त्यांनी जर्मनी आणि हॉलंडच्या सीमेवर अलमेलो (Almelo) येथे. एक अणुऊर्जा प्रकल्पसुद्धा उभा केला होता. इथे त्यांना U-235 नामक समस्थानिकावर प्रक्रिया करून U-238 हा समस्थानिक वेगळा करायचा होता.

“अणुऊर्जा” ही एक अशी ऊर्जा आहे जिचा वापर कसा करायचा हे वापरकर्त्यांवर अवलंबून असते. म्हणजे शांतीप्रिय वापर करून त्यातून विद्युत निर्मिती करायची की विध्वंस करणारा अणूबॉम्ब तयार करायचा. URENCOचं उद्दिष्ट तर शांतीप्रियच होतं. पण त्या प्रकल्पात असणारे U-235 हे समस्थानिक जर 90% पेक्षा जास्त केंद्रित केले तर त्यातून अणूबॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे इंधनसुद्धा मिळू शकते. त्यामुळे URENCO आणि FDO येथील सर्व प्रक्रिया आणि माहिती अतिशय गोपनीय ठेवण्यात आली.

तुमच्याकडे जर clearance पास नसेल तर तुम्ही कुठलीही माहिती जाणून घेऊ शकत नाही किंवा प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. या दोन्ही कंपन्यात सैनिकी तसेच खाजगी सुरक्षा मोठ्या प्रमाणात होती. पण खान FDOचा कर्मचारी तसेच हॉलंडमध्ये स्थायिक असल्याने त्याला कुठलाच अडथळा येत नव्हता. खानही त्यावेळी फक्त एकनिष्ठ कर्मचारी होता. जर्मनीतल्या छोटयाशा गावात, छोट्याशा घरात आपल्या बायको आणि दोन मुलींसोबत सुखाचे क्षण घालवत होता. त्यावेळी आपल्याला बॉम्ब तयार करायचा आहे हा विचार सुद्धा त्याच्या मनात आला नव्हता.

पण ते म्हणतात ना तुमच्या हाती जे कार्य लिहिले आहे ते कार्य नियती बरोबर तुमच्याकडून करून घेते. 1971 मध्ये झालेला पाकिस्तानच मानहानीकारक पराभव, खानमधल्या पाकिस्तानीला मनात जखमी करून गेला होता. त्या जखमेवर मीठ म्हणूनच की काय 1974 सालची भारताने घेतलेल्या अणूचाचणीने खानमधला देशभक्त जागा केला. आता तो फक्त एक कर्मचारी नाही तर एक पाकिस्तानी देशभक्त म्हणून कामावर जायचा.

याच कालावधीत त्याने एम्स्टरडॅममध्ये पवनचक्की विकत घ्यायला आलेल्या दोन वरिष्ठ अभियंत्यांची भेट घेतली. या भेटीत त्याने स्वतःची सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि पाकिस्तानला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्याचा काहीच फायदा नाही झाला. मग त्याने सरळ पंतप्रधान भुट्टो यांनाच पत्र लिहिले. या पत्रात त्याने व्यवस्थित सगळं नमूद केलं होत. पंतप्रधान भुट्टोनीसुद्धा पत्र मिळताच त्वरित त्याला उत्तर पाठवले.

डिसेंबर 1974 मध्ये खान आपल्या कुटुंबासोबत पाकिस्तानमध्ये सुट्ट्यांसाठी आला होता. पण त्याचा हेतू फक्त सुट्ट्या नव्हता तर त्याला आता खरं काम सुरू करायचं होतं देशासाठी. कराचीमध्ये खानने दोन मोठ्या व्यक्तींची भेट घेतली. त्यांना समजून सांगितलं की, मुनीर ज्या प्रणालीवर काम करतोय ती खूप वेळखाऊ आहे आणि त्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. प्लुटोनियम पेक्षा युरेनियम समृद्ध प्रणाली जास्त कार्यशाली आहे.

खानचं नशीबही खूप बलवत्तर हा सगळा वाद चालू असतानाच कॅनडाने पाकिस्तानला मदत करण्यास नकार दिला कारण भारताने प्लुटोनियमचा वापर करूनच बॉम्ब तयार केला होता, उद्या पाकिस्तानने जर तेच केलं तर उगीच आपल्याला संकटांना सामोरं जावं लागेल. म्हणून कॅनडाने यातून काढता पाय घेतला. मुनीर तरीही त्याच्याच प्रणालीवर अडून बसला होता. तो म्हणाला कॅनडा नसला तरी फ्रान्सकडून आपल्याला मदत भेटेल भुट्टोला ते पटत होत पण आता त्याला खानच म्हणणंसुद्धा पटलं होतं. मुनीरच्या बरोबरीनेच त्याने खानलासुद्धा त्याच्या स्वतःच्या प्रणालीवर काम करण्यास मुभा दिली आणि त्या प्रकल्पाचा अध्यक्षसुद्धा खानलाच बनवलं.

खानने आता युरेनियम उत्पादन प्रकल्प रावलपिंडी पासून जवळच असलेल्या “कहुता” इथे सुरू केला.

खानने भुट्टोची परवानगी यायच्या आधीच माहिती गोळा करायचं काम सुरू केलं होतं. 1974 साली भुट्टोकडून परवानगी यायच्या आधीच 16 दिवस खानला अलमेलो प्रकल्पात URENCO साठी एक खास कामगिरी नेमून दिली होती. यात त्याला Centrifuge योजनेच्या काही भागाचं जर्मन मधून डचमध्ये भाषांतर करायचं होतं. या कामामुळे त्याला आता प्रकल्पात कुठेही फिरण्यास परवानगी होती. तो आता अशा भागातसुदधा होता, जो त्याच्या अखत्यारीत येत नव्हता, पण त्याला कोणीच अडवत नव्हतं.

या कामात त्याला खूप मोकळा वेळ मिळत असे, हा वेळ तो सत्कारणी लावत होता आणि होता होईल तेवढी माहिती उर्दू मध्ये लिहून घेत होता. त्याला जर कोणी विचारलं की काय लिहितोय तर तो बिनधास्तपणे सांगत की घरच्यांना पत्र लिहितोय.

विविध भाषा आत्मसात करतानाही आपली मातृभाषा न विसारल्याचा खानला इथे खूप फायदा झाला होता.16 दिवसांत खानने खुप सारी माहिती गोळा केली होती. URENCO ची कामगिरी संपवून खान आता पुन्हा एम्स्टरडॅमला FDO मध्ये कामावर रुजू झाला होता.FDO म्हणजे जणू खानचं दुसरं घरच होतं. URENCO पेक्षा FDO मधून माहिती काढणे खानला खूप सोप्प होतं.

आकार चुकलेले सेन्ट्रीफ्युज कर्मचारी आपल्या टेबलवर ठेवत जेणेकरून त्याचा हिशोब लागावा म्हणून. याच गोष्टीचा फायदा उचलून खानने सेन्ट्रीफ्युज गोळा करून नजर चुकवून घरी न्यायला सुरुवात केली. त्यातील काही भाग पाकिस्तानी दूतावासामार्फत थेट पाकिस्तानात दाखल झाले होते.

खानचे सहकारीसुद्धा खानला खूप मानत. खानचा स्वभाव अत्यंत साधा आणि मनमिळाऊ होता. कामावर त्याचं पद जरी वरिष्ठ असलं तरी त्याचा त्याला कधीच अहंकार नव्हता. म्हणूनच पदाने कमी असलेला फ्रिट्स वीरमन त्याचा चांगला मित्र होता. वीरमन हा FDO मध्ये मशिनिस्ट म्हणून काम करत तसाच तो कंपनीचा अधिकृत फोटोग्राफरसुद्धा होता. वीरमन आणि खान यांची खूप चांगली मैत्री होती. खान त्याला कायम स्वतःच्या घरी जेवायला बोलवत असत. त्यामुळे खानला लागत असलेले फोटोग्राफ्स वीरमन लगेच उपलब्ध करून देत.

वीरमनला याची जरासुद्धा कल्पना नव्हती की याचा वापर खान काहीतरी विध्वंसक तयार करण्यासाठी करतोय. वीरमन हा खूप कामाचा माणूस होता. यंत्र हाताळण्यात तो खूप तरबेज होता.म्हणून खानने त्याला आपल्या प्रकल्पात सामील करून घेण्याचं ठरवलं. त्याने वीरमनला आपल्यासोबत सुट्टयासाठी पकिस्तानला येण्याचा आग्रह केला. वीरमनसुद्धा मित्राच्या आग्रहास्तव तयार झाला. पण का कोणास ठाऊक वीरमनला यात काहीतरी संशय आला आणि त्याने नकार दिला. तो आता खानच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवू लागला.

खानकडे कायम येणारे त्याचे पाकिस्तानी पाहुणे. गरज नसताना अतिशय गोपनीय असलेले फोटोग्राफ्स मागून घेणे, खान हातात कायम एक मोठी अंगठी घालत असत. त्याला विचारलं असता तो कायम चेष्टेत सांगत “उद्या जर मला अचानक पाकिस्तानला जायचं म्हणलं तर ही विकून मी आरामात जाऊ शकेल.” आता वीरमनला ती चेष्टा सुद्धा खरी वाटू लागली होती. पण वीरमन काहीच बोलू शकत नव्हता. कारण खान हा डॉक्टर होता तर वीरमन एक साधा कर्मचारी. उद्या जर त्याने खानची तक्रार केली आणि ती खोटी निघाली तर त्याला त्याची नोकरी गमवावी लागली असती.

“पण खान जर खरंच बॉम्ब तयार करत असेल तर?”

हा विचार काही त्याला शांत बसू देत नव्हता. त्याने शेवटी सगळं धीर एकवटला आणि सार्वजनिक फोन वरून URENCO च्या मुख्यालयात फोन केला. पण त्याचं बोलणं URENCO च्या अध्यक्षाशी नाही होऊ शकलं. FDO मध्ये पण त्याला तोच अनुभव आला. त्याने मग तो विषय आपल्या प्रयोगशाळेतील वरिष्ठांकडे नेला. त्याने उलट वीरमनलाच बोल सुनावले आणि नको त्या विषयात नाक खुपसून तू स्वतःचच नुकसान करून घेशील.

पण त्याच वेळी डच सरकारला अशी माहिती मिळाली की कोणीतरी पाकिस्तानी जासुस जो ब्रुसेल्समधील दूतावासात काम करत होता त्याने अतिशय जटिल अशा सेंट्रीफ्युजचा भाग विकत घ्यायचा प्रयत्न केला. त्या जासुसाला एवढी माहिती कुठून मिळाली? याचा शोध घेत असताना संशयाची सुई आपसूकच खानवर आली.

पण भक्कम पुराव्याअभावी खानला कोणीच हात नाही लावू शकलं. पण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून FDO ने खानला बढती देऊन अतिसंवेदनशील कामापासून दूर केलं. आता खानचा तिथे राहून काहीच उपयोग नव्हता.

डिसेंबर 1975 मध्ये सुट्टीसाठी पाकीस्तानला जातो म्हणून गेलेला खान परत युरोपमध्ये आलाच नाही. शेवटी त्याच्या हातातली अंगठीच त्याला तिकिटासाठी कामाला आली.

आतापर्यंत त्याने FDO आणि URENCO या दोन्ही ठिकाणांहून अत्यंत उपयुक्त अशी माहिती चोरली होती. 1 मार्च 1976 मध्ये खानने अधिकृतरित्या आपला राजीनामा FDO ला पाठवला आणि कारण दिले की तो आता पाकिस्तानात एका सरकारी उपक्रमात काम करतोय. याचा खानला एक फायदा झाला त्याने उघड उघड सांगितल्याने FDO ला त्यात काहीच काळंबेरं वाटलं नाही. कोणालाच खानवर काहीच संशय नाही आलं. त्याच्या मित्रांना आणि सहकार्यांना फक्त एवढंच महिती होतं की तो कुठल्यातरी सरकारी प्रकल्पात काम करतोय. ती प्रकल्प फार फार तर सेंट्रीफ्युज प्रकल्प असेल. खान त्यांच्याशी कायम संपर्कात असायचा.

1977 साली तर FDO ने एक प्रवक्ता इस्लामाबादला पाठवला आणि त्यांनी URENCO साठी तयार केलेली अतिशय महागडी प्रणाली त्यांनी पाकिस्तानला विकली. खान अजूनही वीरमनच्या संपर्कात होता. तो त्याला सारखे पत्र लिहायचे. एका पत्रात तर त्याने त्याला सरळ सरळ वीरमन कडे सेंट्रीफ्युजसाठी लागणाऱ्या अतिशय निर्णायक भागांची मागणी केली. कर्तव्यनिष्ठ नोकर म्हणून वीरमनने ते सगळे पत्र त्याच्या वरिष्ठांकडे सोपवले.

पण त्याचा  फटका वीरमनलाच बसला त्याला नोकरीवरून काढून टाकलं आणि उलट त्याचीच चौकशी करण्यात आली. आता ही गोष्ट माध्यमांनी चांगलीच उचलून धरली होती. कुठलाही पुरावा खान विरुद्ध डच सरकारला भेटत नव्हता. पण माध्यमांच्या दबावामुळे त्यांनी खानविरुद्ध वॉरंट काढले.

3 वर्षांनंतर त्यांनी खानला कोर्टापुढे उभे केले .पण पुरेसे पुरावे नसल्याने त्यांनी खानला हेरगिरीसाठी नाही तर “हेरगिरी करण्याचा प्रयत्न” म्हणून पकडले. यासाठी त्याला फक्त 4 वर्षाचा कारावास झाला. तोसुद्धा नंतर 2 वर्षावर आणला.

2 वर्षांनी पाकिस्तानात परत आल्यानंतर त्याने माध्यमांना सांगितलं की पाश्चिमात्य देशांनी कसं त्याला विनाकारण अडकवलं होतं. आता 1986 चा जून उजाडला होता. हॉलंडमधून पाकिस्तानात येऊन खानला आता दशक उलटून गेलं होतं.पाकिस्तान आता अणूबॉम्ब बनवण्याच्या अगदी उंबरठ्यावर उभा होता. पाकिस्तान अणुबॉम्ब तयार करतोय ही गोष्ट आता अमेरिकेत पोहोचली होती. 1977 ला भुट्टोला पायउतार केल्यानंतर, झिया उल हक पाकिस्तानचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. पण झिया उल हकने सुद्धा बॉम्ब बनवण्यासाठी खानला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं.

अमेरिकेने आता झिया उल हकवर दबाव आणायचा प्रयत्न केला. 1977 साली अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक मदत देणं बंद केलं. 1979 साली पुन्हा एकदा अमेरिकेने पाकिस्तानला चेतावणी दिली आणि पुन्हा पाकिस्तानला मदत देणं बंद केलं.

1981 साली कहुता प्रकल्पात आता समृद्ध युरेनियम तयार होण्यास सुरुवात झाली होती. ह्या कामाचा गौरव म्हणून झिया उल हक यांनी या प्रकल्पाला खानचं नाव दिलं. “खान रिसर्च लॅबोरेटरी”.

1982 साली ह्या प्रकल्पात पहिल्यांदाच शस्त्रांसाठी लागणारे युरेनियम मिळाले होते. सगळ्या संकटांना तोंड देऊन शेवटी खानने ते प्राप्त केलंच होतं. 1984 मध्ये तर खानने सगळ्याना तोंडात बोटं घालायला लावली.

पाकिस्तानकडे आता Fissionable (विखंडणीय) साहित्य होतं की त्यामुळे ते दरवर्षी अनेक अणुबॉम्ब बनवू शकत होते. हे सगळं शक्य झालं होतं खानच्या अपार कष्टामुळे. त्याने दाखवलेल्या देशप्रेमामुळे आणि एकनिष्ठतेमुळे पाकिस्तान आज एक आण्विक देश झाला होता.

1998 मध्ये पाकिस्तानने अणुचाचणी घेऊन जगाला सांगितलं होतं की आता पाकिस्तानसुद्धा अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. याचं सगळं श्रेय जातं ते डॉ. अब्दुल कादिर खान ह्यांना.

ही खबर भारताला कशी कळली आणि खानला पाकिस्ताननेच का नजरकैदेत ठेवलं? हे जाणून घेण्यासाठी आम्ही लवकरच दुसरा लेख तुमच्यासाठी आणणार आहोत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!