एका दिवसात ४० हजार सैनिक गमावल्यानंतर रेड क्रॉसची स्थापना करण्यात आली होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जगाच्या पाठीवर कुठेही संकट, नैसर्गिक अपात्ती, युद्ध किंवा माहणारी येईल तेंव्हा देशाच्या सीमांचे बंधन किंवा वर्ण, वंश, लिंग अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवणे, त्यांची सेवा-सुश्रुषा करणे, अशा उदार हेतूने रेड क्रोस संघटनेची स्थापना झाली. आजही कोरोना महामारीच्या काळात या संघटनेचे सदस्य कुठे मास्क आणि वाटत आहेत तर कुठे आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत करत आहेत.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही या संस्थेने खूप मदत केली. या संस्थेची स्थापना जीन हेन्री ड्युनांटने १८६३मध्ये केली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्याही आधी जखमी सैनिकांची सुश्रुषा करण्याचा इच्छेतून या जागतिक संघटनेचा जन्म झाला.

जगातील कुठल्याही युद्धात सैनिकांची होणारी हेळसांड हा अक्षम्य गुन्हा आहे. जे सैनिक प्राण हातावर घेऊन राष्ट्राच्या अभिमानासाठी लढतात, त्याच सैनिकांना जखमी अवस्थेत मात्र तातडीने उपचार मिळत नाहीत, याहून दुर्दैव ते काय?

अशाच एका युद्धातील सैनिकांची छिन्नभिन्न अवस्था पाहून हेन्री ड्युनांटला निव्वळ मानव सेवेला वाहिलेल्या संघटनेची गरज जाणवली आणि त्याने तातडीने त्या दिशेने पाऊले उचलली. त्याच्या या प्रस्तावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा करण्यात आली आणि त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला.

रेड क्रॉस संघटनेची स्थापना करणाऱ्या हेन्री ड्युनांटला १९०१ साली पहिले नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नोबेल पुरस्काराची सुरुवात इथूनच झाली. हेन्रीचा जन्म ८ मे १८२८ रोजी स्वित्झर्लंड मधील जिनीव्हा येथे झाला. दरवर्षी जगभर ८ मे हा दिवस जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो.

हेन्री जीनिव्हातील एक प्रसिद्ध उद्योगपती आणि कारखानदार होता. त्याला फ्रांसचा सम्राट नेपोलियनला भेटायचे होते. १८५९ साली नेपोलियनची भेट घेण्याच्या हेतूने तो फ्रांसला निघाला होता. इटलीत पोहोचल्यावर मात्र तो काहीसा सुन्न झाला. इटलीतील अवस्था त्याला फारच दयनीय वाटत होती. खराब रस्ते, पूल कोसळलेले.

थोड्याशा सांशंक मानाने त्याने प्रवास सुरु ठेवला पण, जेंव्हा तो सेल्फेरिनोमध्ये पोहोचला तेंव्हा तिथले दृश्य पाहून हेन्री पार कोसळून गेला. इटलीला ऑस्ट्रियाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी नेपोलियनने युद्ध पुकारले होते.

या युद्धात एकाच दिवसात ४० हजारपेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते.

रस्त्यावर रक्त आणि माती मिसळून चिखल साचला होता. युद्धात आपला अवयव गमावलेले सैनिक वेदनेने तडफडत होते. त्यांचे ओरडणे काळजाला चरे पडणारे होते. ते दृश्य पाहून हेन्री आपण नेमके कशासाठी तिथे आलो आहोत हेच विसरून गेला.

त्याने आजूबाजूचे काही लोक जमा केले आणि जमेल तितक्या जखमी सैनिकांना तो जवळच्या चर्चमध्ये घेऊन गेला. तिथे आणखी काही स्वयंसेवक त्याच्या मदतीसाठी आले. त्यांनी जखमींवर उपचार केले, त्यांना आवश्यक त्या वस्तू पुरवल्या.

हेन्री जेंव्हा जिनिव्हाला परत गेला तेंव्हा सेल्फरीनोतील या आठवणी त्याचा पिच्छा पुरवत होत्या. त्याने या आठवणी ‘अ मेमरी ऑफ सेल्फीरिनो’ या पुस्तकाद्वारे प्रकाशित केल्या. या पुस्तकाच्या शेवटी त्याने असा प्रस्ताव मांडला की, देश, धर्म, जात, वर्ण वंश, लिंग अशा भेदभावाच्या सगळ्या सीमा पुसून फक्त माणसांच्या सेवेसाठी झटणारी एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली पाहिजे.

त्याच्या या सूचनेचा आदर करत पुढच्याच वर्षी जिनीव्हा पब्लिक वेल्फेअर सोसायटीने फेब्रुवारी १८६३ मध्ये एका समितीची स्थापना केली. या समितीमध्ये स्वित्झर्लंडमधील पाच नागरिकांचा समावेश होता. हेन्रीने आपल्या पुस्तकात ज्या काही सूचना मांडल्या होत्या त्यावर विचार विमर्श करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती.

या पाच कमिटीच्या सदस्यांत जनरल ग्युमे हेन्री दुफुर, गुस्तावे मोयनियर, लुई एपिया, थिओडोर मॉनोईर आणि हेन्री ड्युनांट यांचा समावेश होता. ग्युमे हेन्री दुफुर हे स्वित्झर्लंड सैन्याचे जनरल होते. गुस्तावे मोयनियर वकील होते, लुई आणि थिओडोर दोघेही डॉक्टर होते.

१८६३ साली या समितीने एक आंतरराष्ट्रीय संमेलन भरवले. या संमेलनासाठी १६ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या संमेलनात संघटनेची उद्दिष्टे आणि नियम ठरवण्यात आले. या संमेलनात सहभागी झालेल्या सर्व देशांनी कोणत्याही युद्धात, आपत्तीच्या वेळी कसलाही भेदभाव न करता जखमी आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी ऐच्छिक संघटना स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला.

सर्व देशात या संघटनेचे एक युनिट असेल ज्याला नॅशनल युनिटच्या नावाने ओळखले जाईल. या संघटनेचे आंतरराष्ट्रीय प्रतिकही याच संमेलनात ठरवण्यात आले.

सुरुवातीला जी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती तिला, इंटरनॅशनल कमिटी फॉर रिलीफ टू द वुन्डेड असे नाव देण्यात आले. नंतर याचे नाव बदलून इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस असे करण्यात आले.

प्रत्येक देशात या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न असणारी एक राष्ट्रीय रेड क्रोस संघटना कार्यरत आहे. या संघटनेचे चिन्ह मानवी अनुकंपा आणि करुणेचे प्रतिक म्हणून ओळखले जाते.

रेडक्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था खालील तत्वानुसार काम करते.

  • मानवता – मानवी दुखांना आळा घालणे आणि शक्य असेल तेवढे दु:ख परिहार करणे.
  • निष्पक्षपातीपणा – राष्ट्रीयत्व, वंश, धर्म, वर्ग, लिंग किंवा राजकीय मते या कुठल्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही.
  • तटस्थपणा – युद्ध काळात रेडक्रॉस कोणत्याही एका पक्षाची बाजू घेणार नाही.
  • स्वतंत्र – रेडक्रॉस एक स्वतंत्र संघटना आहे.
  • एकता – प्रत्येक देशात एकच रेडक्रॉस संघटना असली पाहिजे. या संघटनेत सर्वाना प्रवेश असला पाहिजे.
  • विश्वात्मकता – रेडक्रॉस ही जागतिक संघटना आहे. तिच्यामध्ये सर्व रेडक्रॉस संस्थाना समान मानले जाते. संघटनेची कर्तव्ये पार पडण्याची त्यांच्यावर समान जबाबदारी असते.

या संघटनेच्या बोधचिन्हाचा गैरवापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोठल्याही गाडीवर या बोधचिन्हाचे स्टीकर, झेंडा लावता येऊ शकत नाही.

भारताने १९५९ साली रेडक्रॉसशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला. यानुसार जिनिव्हा येथे एक करार करून या संघटनेच्या सर्व अटी शर्तींशी सहमती दर्शवली गेली. रेडक्रॉसच्या नियमांचा भंग होणार नाही, यासाठी भारतानेही कायदेशीर तरतुदींचा अवलंब केला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!