लाखो लोकांचं आयुष्य वाचवणाऱ्या या भारतीय शास्त्रज्ञाचं नोबेल अगदीच थोडक्यात हुकलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


कोरोना महामारीने जगभरातील देशाच्या सरकारांना नाकी नऊ आणले आहे. कित्येक महिने लोटले तरी ना कोरोनाचा कहर आटोक्यात येतोय ना त्यावर उपाय शोधण्यात यश येतेय. कोणत्याही रोगावर औषध शोधणे ही फार मोठी उपलब्धी आहे. आजाराचा कहर आटोक्यात आणण्यासाठी आणि लोकांना जीवदान देण्यासाठीच वैद्यकशास्त्राचा जन्म झाला. तरीही, काही दुर्धर आजारांवर आजही कसलेही लस किंवा औषध उपलब्ध झालेले नाही. वैद्यकीय शास्त्रात अनेक आजारांवर शोध लावणारे अनेक भारतीय संशोधक इतिहासात होऊन गेले.

१९२९ साली एका भारतीय संशोधकाला त्याच्या संशोधनासाठी नोबेलचे नामांकन देखील मिळाले होते. लिव्हर, अस्थीमज्जा आणि प्लीहा या अंतर्गत अवयवांवर परिणाम करणाऱ्या आजारांवर औषध शोधणाऱ्या डॉ. उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांच्याविषयी आम्ही बोलत आहोत.

याशिवाय अनेक जीवघेण्या आजारांवर औषध शोधण्यात ते यशस्वी ठरले. त्यांच्या संशोधनाने लाखो लोकांचे प्राण वाचले आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही त्यांचे हे संशोधन एक उपकारक ठरले आहे.

१८७० साली आसाममध्ये एका केमरू नावाच्या कीटकाच्या दंशाने होणाऱ्या काला आजार या रोगाची साथ पसरली होती. या रोगाने नागाव, गोलपारा, गारो हिल्स या भागात अक्षरश: मृत्युचे तांडव सुरु होते. आसाम पाठोपाठ पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यातही ही साथ पसरली.

जगभरातील डॉक्टर्सनी हा आजार पसरण्याचे नेमके कारण आणि त्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच यश मिळत नव्हते. या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जवळपास ९५% होते इतका हा आजार भयंकर होता.

उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांच्या प्रयत्नाने १९२५ साली हे प्रमाण १०% टक्क्यांवर आले आणि त्यानंतर ७% टक्क्यांवर. ब्रह्मचारी यांनी एका प्राणघातक रोगावर इलाज शोधला होता. त्यांचे हे संशोधन लाखों लोकांसाठी जीवनदायी ठरले.

१९ डिसेंबर, १८७३ रोजी बिहारच्या जमालपूर येथे डॉ. ब्रह्मचारी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील नीलमणी ब्रह्मचारी हे भारतीय पूर्व रेल्वेमध्ये वैद्य होते. त्यांची आई सौरभ सुंदरी देवी या गृहिणी होत्या. जमालपूर येथील रेल्वे बॉईज हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. गणित विषयात त्यांना लहानपणापासून रुची होती. पुढील शिक्षणासाठी त्यांनी गणित हाच विषय निवडला.

१८९३ साली त्यांनी हुघली मोहसीन कॉलेजमधून त्यांनी गणित आणि रसायनशास्त्रातील पदवी पूर्ण केली. त्यानंतर, १८९४ साली त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून मास्टर्स डिग्री मिळवली. पुढे त्यांनी करिअरचा ट्रॅक बदलून कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. १९०२मध्ये त्यांनी डॉक्टर्सची डिग्री पूर्ण केली. १९०४मध्ये त्यांनी हिमोलीसीस या विषयात पीएचडी प्राप्त केली.

१८९९ साली त्यांनी राज्य चिकित्सा सेवेमध्ये प्रवेश मिळाला. सर जेराल्ड बोम्फोर्ड यांच्या हाताखाली काम करण्याची त्यांना संधी मिळाली. सर जेराल्ड यांनी ढाका येथील मेडिकल कॉलेजमध्ये औषधनिर्माणचे शिक्षक म्हणून उपेंद्रनाथ यांची नेमणूक करण्याची शिफारस केली. उपेंद्रनी चार वर्षे या कॉलेजमध्ये काम केले.

१९०५ साली ते कलकत्त्याच्या कॅम्पबेल मेडिकल स्कूलमध्ये संशोधन करण्यासाठी हजर झाले. इथे त्यांना शिक्षक आणि डॉक्टर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पडायच्या होत्या. इथेच असताना त्यांनी काला-आजारवर औषध शोधण्याचा अथक प्रयत्न सुरु केले.

१९१९मध्ये त्यांना भारतीय संशोधन निधी संघटनेकडून या संशोधनासाठी निधी मंजूर झाला. कॅम्पबेल स्कूलमधील एका छोट्याशा खोलीत त्यांचे हे संशोधन आणि प्रयोग सुरु होते.

शेवटी १९२२मध्ये त्यांना यावर उपाय सापडला आणि त्यांचा शोध यशस्वी ठरला. या औषधाला त्यांनी युरिया स्टीबामाइन हे नाव दिले.

वैद्यकीय क्षेत्रात त्या काळी अजूनही प्रतिजैविकांचा शोध लागला नव्हता. अशा काळात डॉ. उपेंद्रनाथ यांनी लावलेला शोध म्हणजे वैद्यकशास्त्रातील एक मैलाचा दगड होता. अर्थात, डॉ. उपेंद्रनाथ यांचा संशोधन प्रवास इथेच थांबला नाही.

काला-आजारमधून बरे झालेल्या रुग्णात एक विशिष्ट प्रकारचा त्वचारोग आढळत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. हा त्वचा रोग त्याकाळी नवाच होता. त्यामुळे याला त्यांच्याच नावाने ओळखले जाते. याला ब्रह्मचारी लेसमोनाइड असे नाव देण्यात आले.

मलेरियाच्या उपचारातही त्यांनी महत्वपूर्ण शोध लावला. शिवाय, जुना बुर्द्वान फिवर, क्वार्टर फिवर, सेरेब्रोस्पीनल मेनिनजायटीस, फिलारीयासीस, लेप्रसी आणि सिफिलीस अशा अनेक दुर्धर आजारांवर त्यांनी औषधे शोधली. त्यांच्या या संशोधनाचा फायदा लाखो लोकांना झाला. त्यांच्या औषधांची विक्री देशाबाहेरही होत होती. ग्रीस, फ्रांस, चीन देशात देखील या औषधांचा पुरवठा होत होता. फक्त देशातीलच नाही तर जगभरातील लोकांसाठी हे संशोधन एक संजीवनी ठरले.

१९३९ साली त्यांनी कलकत्ता येथे भारतातील पहिली रक्तपेढी सुरु केली. रेड क्रॉस बंगालच्या व्यवस्थापकीय मंडळावर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय होते. बंगालमध्ये त्यांनी रक्त चढवून देण्याची ब्लड ट्रान्सफ्युजनची सेवा देणारी पहिली संस्था देखील स्थापन केली.

त्यांना १९३४ साली ब्रिटीश सरकारने नाईटहूडचा दर्जा बहाल केला होता. “आशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल”ने त्यांना सर विल्यम जोन्स मेडलने सन्मानित केले तर, कलकत्ता युनिव्हर्सिटीने त्यांना ग्रिफिथ मेमोरियल प्राईज देऊन सन्मानित केले.

एकदा शरीरविज्ञानशास्त्र आणि एकदा वैद्यकशास्त्र अशा दोन वेगवेगळ्या विषयातून त्यांचे नाव नोबेलसाठी देखील निवडण्यात आले होते पण, दोन्ही वेळी त्यांची ही संधी कोणत्या ना कोणत्या कारणाने हुकली. १९२९ मध्ये नोबेल पुरस्कारासाठी दोन भारतीयांची नावे निवडली गेली होती. एक नाव होते चंद्रशेखर वेंकट रमण आणि दुसरे होते उपेंद्रनाथ ब्रह्मचारी. त्यावर्षी दोघांपैकी एकालाही हा पुरस्कार मिळला नाही.

१९४२ साली पुन्हा एकदा उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांचे नाव नोबेलसाठी निवडण्यात आले. परंतु त्याच वर्षी दुसऱ्या विश्वयुद्धाला तोंड फुटल्याने नोबेलपुरस्कारच रद्द करण्यात आले. खरंतर, उपेंद्रनाथ हे नोबेलचे खरे दावेदार होते.

पण, तरीही त्या पुरस्कारापासून ते वंचित राहिले. इतके महत्वाचे शोध लावूनही उपेंद्रनाथ यांचे नाव आज फारसे कुणाला परिचित नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!