भारताचा तिरंगा तयार करणाऱ्या या व्यक्तीला कधीच नावलौकिक मिळाला नाही

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय राष्ट्रगीत लिहिणारे रविंद्रनाथ टागोर आज सगळ्यांना माहीत आहेत. तसेच भारताचे राष्ट्रीय प्रतिक असलेली राजमुद्रा ही सारनाथ स्तंभावरून घेण्यात आली आहे हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. परंतू या दोन्ही गोष्टीच्या बरोबरीचं महत्त्व असलेला भारताचा तिरंगा ध्वज कोणी डिझाइन केला याबद्दल मात्र आज बऱ्याच लोकांना माहीत नाही.

भारताचा तिरंगा ध्वज डिझाईन केला तो पिंगली वेंकय्या यांनी.

आज आपण याच देशभक्त आणि स्वातंत्र्य लढ्यातील एका राष्ट्रप्रेमी व्यक्तीच्या जीवनाचा आढावा घेणार आहोत.

पिंगली वेंकैय्या यांचा जन्म २ ऑगस्ट, १८७६ ला आंध्रप्रदेशमधील मछलीपटणम (मसुलीपटनम) येथे झाला. १९ वर्षाचे असताना त्यांनी ब्रिटिश सेनेत नोकरी स्विकारली. ब्रिटीश सेनेत काम करत असले तरीही वेंकय्याजीचं राष्ट्रप्रेम त्यांना शांत बसू देत नव्हतं. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांची भेट महात्मा गांधींशी झाली आणि वेंकय्या यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. गांधींच्या विचारापासून प्रेरीत होऊन त्यांनी मग आयुष्यभर गांधीजींच्या सान्निध्यात राहण्याचा निर्णय घेतला आणि तो पाळलासुद्धा. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोठे योगदान दिले.

पिंगली वेंकय्या हे एक विशेषज्ञ होते. लेखक होते. १९१३ मध्ये त्यांनी जापानी भाषेत एक मोठे भाषण वाचले होते. या वाचनावरुनच त्यांना “जापान वेंकय्या”, “पट्टी वेंकय्या” आणि “झेंडा वेंकय्या” असली टोपणनावे त्यावेळी भेटली होती.

भूशास्त्रज्ञ असलेले पिंगली वेंकय्या यांनी मछलीपटणम इथे एक शैक्षणिक संस्था उभारली होती. भुशास्त्राबरोबरच शेतकीमध्येही त्यांना रस होता.

१९१६ मध्ये त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी ३० वेगवेगळ्या देशांच्या ध्वजांचा अभ्यास करुन आपला भारतीय ध्वज कसा निर्माण करता येइल याबद्दल लिहिले होते. १९१८-१९२१ या प्रत्येक वर्षीच्या कॉंग्रेस अधिवेशनात त्यांनी देशासाठी स्वत:च्या ध्वजाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.

शेवटी १९२१ विजयवाडा येथील कॉंग्रेस समितीच्या बैठकीत महात्मा गांधी यांनी पिंगली वेंकय्या यांच्या डिज़ाइनचा स्वीकार केला. याबद्दल गांधीजींनी त्यांच्या ‘यंग इंडिया’ या वृत्तपत्रातही लिहिले होते.

“मछलीपटणम येथील आंध्र राष्ट्रीय महाविद्यालयात काम करत असलेल्या पिंगली वेंकय्या यांनी वेगवेगळ्या देशांचे ध्वज वर्णन करत एक पुस्तक लिहिले असुन आपल्या राष्ट्रीय ध्वजासाठी काही डिझाईनसुद्धा सुचवल्या आहेत. कॉंग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी मी त्यांची स्तुती करतो.” अशा आशयाचे शब्द महात्मा गांधी यांनी पिंगली वेंकय्या यांच्यासाठी यंग इंडियाच्या लेखात लिहिले होते.

यावेळी बनवलेल्या झेंड्यामध्ये लाल, हिरवा आणि पांढरा रंग होता, मध्ये निळ्या रंगात चरखा होता. यात लाल रंग हा हिंदू धर्मीयांसाठी, हिरवा रंग मुस्लिम धर्मीयांसाठी आणि पांढरा रंग बाकीच्या धर्मांसाठी होता.

१९३१ मध्ये तिरंगा स्वीकारला गेला. स्वीकारताना त्यात काही बदल केले गेले. लाल रंगाऐवजी केसरी रंग निवडण्यात आला. २२ जुलै, १९४७ ला संविधान सभेने या ध्वजास राष्ट्रीय ध्वज म्हणून जाहीर केले. काही वेळेनंतर यात पुन्हा बदल करण्यात आला आणि चरख्या ऐवजी अशोक चक्रास स्थान देण्यात आले. काहींच्या मते या निर्णयावर महात्मा गांधी जास्त खुश नव्हते. यातील रंगांचे अर्थही बदलण्यात आले.

भगवा रंग समृद्धीचे प्रतीक, पांढरा रंग शांततेचा प्रतीक आणि हिरवा रंग प्रगतीचे प्रतीक म्हणुन स्विकारण्यात आले. तसेच २४ तासांचं महत्त्व सांगणारे २४ आऱ्यांचे अशोक चक्र मध्यभागी स्विकारण्यात आले.

अशाप्रकारे भारताच्या एकतेचं दर्शन घडवून आणणारया तिरंगी ध्वजाची सुरुवात पिंगली वेंकय्या यांच्या कल्पनेतुन झाली. एवढे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या पिंगली वेंकय्या यांच्या वाट्याला आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र गरिबी वाट्याला आली. देश आणि त्यांच्या पक्षानेसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अशा दुर्लक्षित अवस्थेतच ४ जुलै १९६३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

२००९ मध्ये त्यांच्या नावे पोस्टाचे तिकिट काढून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच २०११ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिले जावे अशी शिफारसही केली गेली आहे. या शिफारशीचा निर्णय अजुनही अज्ञात आहे.

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एका ध्वजात सामावण्याचे जटील कार्य करणारया या बहाद्दर कलाकाराची जीवनगाथा अज्ञात रहावी हे दुर्दैवच. परंतू देशाच्या विविधतेचं दर्शन देत असतानाच त्याच्या एकतेची जाणीव करुन देणारया तिरंगा ध्वजाचं श्रेय मात्र कोणी त्यांच्या कडून हिरावुन घेऊ शकणार नाही एवढं नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!