आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजकाल मोबाईलचा वापर करणाऱ्यांपैकी ८० टक्क्यांहून जास्त ग्राहक स्मार्टफोन वापरतात. हे प्रमाण इतके जास्त आहे की पूर्वीचा नोकियाचा हँडसेट हा बहुतेकांसाठी आता नॉस्टॅल्जिया बनला आहे. या बहुतेक स्मार्टफोनचा आत्मा म्हणजे अँड्रॉइड. अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टिम आहे. म्हणजेच फोन कसा चालणार, त्यातील ॲप्लिकेशन्स कशी चालणार, किंवा युजरने दिलेल्या सूचनांचा अर्थ कसा लावला जाणार हे सर्व अँड्रॉइडमध्ये आधीच कोड केलेले आहे.
आज अँड्रॉइडचे जगभरात अब्जावधी युजर्स असले तरी तिच्या सुरुवातीच्या काळात मात्र तिला नकार पचवावे लागले आहेत, तेही सॅमसंग सारख्या बड्या खेळाडूकडून. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात आघाडीवर असलेली ही कंपनीही अँड्रॉइडमधील क्षमता ओळखू शकली नाही याचे अनेकांना आश्चर्य वाटते.
वास्तविक सॅमसंग ही टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील बलाढ्य कंपनी. परंतु ॲन्डी रुबिन या अँड्रॉइडच्या निर्मात्याने ज्यावेळी सॅमसंगला अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टिम खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा सॅमसंगने त्याला चक्क नकार दिला होता. त्यानंतर त्याने ही ऑपरेटिंग सिस्टिम गुगलला विकली होती. या व्यवहारात सॅमसंगने एक मोठी संधी गमावली होती.
फ्रेड व्होगेलस्टाईन नावाच्या लेखकाचे एक पुस्तक आहे. त्याचे शीर्षक आहे : ‘Dogfight: How Apple and Google Went to War and Started a Revolution’. या पुस्तकात या लेखकाने २००४ मधील अनुभव कथन केला आहे. सेऊलमध्ये त्या वर्षी अँड्रॉइडची टीम आणि सॅमसंग यांच्यात जी बैठक झाली त्याविषयीचा हा अनुभव आहे. या बैठकीदरम्यान ॲन्डी रुबिन याने अँड्रॉइडची संकल्पना आणि अशा प्रकारची ऑपरेटिंग सिस्टिम विकसित करण्यामागील व्हिजन यावर एक सादरीकरण केले.
संपूर्ण खोली सॅमसंगच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भरलेली. सादरीकरण पूर्ण झाल्यानंतर- ॲन्डी रुबिनचे सेल्स पिच संपल्यानंतर- काही काळ शांतता पसरली. ना काही प्रतिक्रिया ना उत्सुक चेहरे. उघड होते, बऱ्याच जणांना या कल्पनेत विशेष दम वाटला नव्हता.
अँड्रॉइडची संकल्पना हा एक मोठा विनोद आहे असाच त्यांचा एकंदरीत दृष्टिकोन दिसत होता. अँड्रॉइड सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देण्याचे ॲन्डी रुबिनचे स्वप्नही त्यांना खुळचटपणाचे वाटले.
त्यानंतर, ‘तुम्ही केवळ सहा माणसे आहात. एवढे सगळे करणे तुम्हाला कसे झेपणार आहे? तुम्ही शुद्धीवर तर आहात ना?’ अशा प्रकारचा शेरा त्यातल्या एका अधिकाऱ्याने मारला. बोर्ड रूममधून बाहेर पडतानाही हे सॅमसंगचे उच्चपदस्थ ॲन्डी रुबिनची आणि अँड्रॉइडची खिल्ली उडवतच बाहेर पडले.
पण नशिबाचे सगळेच फासे उलटे पडायचे नव्हते. गुगल ॲन्डी रुबिनच्या मदतीला धावली. गुगलने अँड्रॉइड 50 मिलियन डॉलर्स एवढी किंमत देऊन खरेदी केली, आणि त्याचबरोबर ॲन्डी रुबिन याची मोबाईल आणि डिजिटल कॉन्टेन्ट विभागाचा सीनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती केली.
गुगलने अँड्रॉइड घेतल्यानंतर सॅमसंग खडबडून जागी झाली. त्या दिवशी रुबिनला हसत बाहेर पडलेल्या सॅमसंगच्या अधिकाऱ्यांचा नक्षा पार उतरला. आपण मोठी चूक केली आहे हे त्यांच्या लक्षात आले. गुगलने अँड्रॉइड घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी यापैकी एका अधिकाऱ्याने रुबिनला फोन केला. सेऊलमधील ‘त्या’ मीटिंगमध्ये रुबिनने सॅमसंगला दिलेल्या एका प्रस्तावाबद्दल सॅमसंग पुनर्विचार करू इच्छित होती आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी हा अधिकारी रुबिनची भेट मागत होता. पण आता फार उशिर झाला होता. बाण हातातून सुटून गेला होता.
अँड्रॉइड ही आजमितीस जगातील सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या ॲक्टिव्ह डिव्हाइसेसची संख्या २.५ बिलियन इतकी आहे. जगभरातील ८० टक्के स्मार्टफोन्स अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम वर चालतात. ही आकडेवारी पाहता त्यावेळी सॅमसंगने अँड्रॉइड सिस्टीम विकत न घेऊन फार मोठी चूक केली असे कुणालाही वाटू शकते. परंतु….
दिसते तसे नसते. तसे पाहता गुगलने अँड्रॉइडच्या डेव्हलपमेंट आणि मार्केटिंगमध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे. स्मार्टफोनची दुनिया घडवण्याचे आणि त्यात बदल करण्याचे श्रेयही गुगलचेच. एवढेच नाही तर सॅमसंग सारख्या कंपनीचे विक्रीचे वाढते आकडे हेही गुगलमुळेच शक्य झाले आहेत.
अँड्रॉइडला प्रसिद्धी मिळेपर्यंत नोकिया हा स्मार्टफोनच्या बाजारपेठेचा अनभिषिक्त सम्राट होता. पुढे सॅमसंगने अँड्रॉइडला आपले म्हटले आणि नोकियाला पायउतार होण्यास भाग पाडले. गेले संपूर्ण दशक सॅमसंगने या बाजारपेठेवरील आपली पकड पक्की केली आहे. आता प्रश्न हा उरतो, की जर गुगलऐवजी सॅमसंगनेच अँड्रॉइड विकत घेतली असती तर?
तसे काही झाले असते तर आजचे चित्र बरेच वेगळे असते. गुगलने आधार दिल्यामुळे अँड्रॉइड ही यशोगाथा बनली. तसेच सॅमसंगच्याही बाबतीत घडले असते असे नाही. याचे कारण वेगवेगळ्या कंपन्यांची धोरणे वेगवेगळी असतात.
आज गुगलच्या कृपेने सर्व स्मार्टफोनसाठी अँड्रॉइड फुकट मिळते. सॅमसंगने कदाचित तसे केलेही नसते. त्यांनी अँड्रॉइड फक्त स्वतःच्या फोनसाठी ठेवली असती, किंवा इतर फोन कंपन्यांकडून त्यासाठी फी घेतली असती. अँड्रॉइड जर इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व फोन्ससाठी उपलब्ध नसती, तर डेव्हलपर्सना विविध ॲप्स डेव्हलप करण्यातही फारसा रस वाटला नसता. साहजिकच ॲप्स आणि गेम्स यांची बाजारपेठ लहान राहिली असती.
यामुळे इतर काही खेळाडूंनाही संधी मिळाली असती. कदाचित विंडोज मोबाईल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट जास्त पुढे आली असती. अर्थात हे सगळे फक्त अंदाज आहेत. सॅमसंगने २००४ मध्ये अँड्रॉइड विकत घेतल्यानंतर या कंपनीची पुढील रणनीती कशी राहिली असती याबद्दल आपण कोणीही ठोस तर्क करू शकत नाही.
कदाचित स्मार्टफोनची बाजारपेठ आज आहे त्याहून वेगळी असती, आणि सॅमसंग हा या बाजारपेठेचा राजाही नसता! शेवटी एवढ्या बलाढ्य कंपनीचे देखील काही आडाखे नक्कीच असणार. मग सॅमसंगने चुकीचा निर्णय घेतला असे तरी कसे म्हणायचे? आज बाजारपेठेवर तर त्यांचेच राज्य आहे ना! उलट सॅमसंगची घोडदौड पाहता वरवर त्यांनी जे चुकीचे निर्णय घेतले असे वाटते, ते प्रत्यक्षात त्यांच्यासाठी वरदान ठरले असेच म्हणावे लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.