ज्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींना हरवलं त्यांनाच पुढे जनता पक्षाने हाकलून लावलं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीत राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या “रायबरेली” मतदारसंघात मोठा पराभव केला. जनता पक्षाकडून निवडणुक लढवणाऱ्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा रुपात भारतातील सर्वात शक्तिशाली महिलेचा पराभव केला होता.

जायंट किलर असे बिरुद मिरवणारे राजनारायण हे जनता पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांपैकी एक होते. पण निवडणुकीच्या दोनच वर्षात अशा काही घटना घडल्या की पक्षातील बहुतांश लोक राजनारायण यांच्या विरोधात गेले. अखेरीस जनता पक्षातून राजनारायण यांची हकालपट्टी करण्यात आली.

२९ मार्च १९७९ ला जनता पक्षाच्या १५० पेक्षा जास्त खासदारांनी सही केलेल्या पत्रकात जनता पक्षातून राजनारायण यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली होती. २ एप्रिलला त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. राजनारायण कोणी साधारण व्यक्तिमत्त्व नव्हते, हे तेच नेते होते ज्यांनी १९७१ ला रायबरेलीमध्ये झालेल्या निवडणुकीला, ज्यात इंदिरा गांधी विजयी झाल्या होत्या, तिला अवैध घोषित केले होते.

राजनारायण यांच्या समर्थकांनी त्यांच्या हकालपट्टीनंतर त्यांनी स्वतःहून पक्ष सोडल्याची बतावणी केली होती, तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या दबावामुळे राजनारायण यांना पुन्हा जनता पक्षात समाविष्ट करण्यात येणार होते, परंतु राजनारायण यांनी पुन्हा परतण्यास नकार दिला म्हणून त्यांच्या जागेवर रवी राय यांच्यावर आरोग्य मांत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

राजनारायण यांचे विश्वासू सहकारी असलेल्या क्रांती प्रसाद यांनी एकदा सांगितले होते की राजनारायण यांच्या हकालपट्टीनंतर काही काळातच मोरारजी देसाईंचे सरकार कोसळले होते, त्यावेळी मोरारजी देसाईंनी राजनारायण यांची हकालपट्टी एक राजकीय चूक होती असे मान्य केले होते.

राजनारायण एक मुरब्बी नेते होते, त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षापर्यंत, ८० वेळा जेलची हवा खाल्ली होती. आयुष्यातील सतरा वर्षांचा काळ त्यांनी जेलमध्येच घालवला होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात तीन वर्षे आणि स्वातंत्र्योत्तर काळात चौदा वर्षे असा दीर्घ कारावास भोगणारे राजनारायण यांनी इंदिरा गांधींसमोर एक मोठे आव्हान उभे केले होते. आणीबाणी लावण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी ज्या कारणांमुळे घेतला त्यापैकी एक कारण राजनारायण यांना मानले जाते.

दिल्लीत वास्तव्यास असताना राजनारायण यांच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असायचे, कोणालाही त्यांच्या घरी जाऊन भरपेट जेवण करण्याची मुभा असायची. एखादं काम घेऊन त्यांच्या सरकारी बंगल्यावर कोणी आलंच तर त्याची व्यवस्था राजनारायण आपल्या घरीच करायचे.

राजनारायण हे प्रखर समाजवादी होते, राममनोहर लोहिया यांच्या समवेत समाजवादी पक्षाच्या स्थापनेत त्यांनी फार महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते सदैव लोकांना मदत करायचे आणि सेवेस तत्पर असायचे. परंत कालांतराने त्यांनी राजकारणातुन काढता पाय घेतला होता.

राजनारायण वाराणसी जवळच्या एका श्रीमंत जमीनदार घराण्यात जन्माला आले. त्यांचा परिवार तिथल्या स्थानिक राजघराण्याशी संबंधित होता. प्रचंड धनसंपदा आणि ताकद ही राजनारायण यांच्या परिवाराची ओळख होती. परंतु राजनारायण यांना हे ऐश्वर्याचं काहीच कौतुक नव्हतं. त्यांचा समाजवादी विचारसरणीकडे कल होता. त्यांनी आपल्या वाट्याची बहुतांश मालमत्ता गरिबांना वाटली होती. त्यांच्या परिवाराकडून यासाठी प्रखर विरोध झाला. पण त्यांनी कोणाचेच ऐकलं नाही. इतकंच नाही त्यांनी आपल्या अपत्यांसाठी साधी मालमत्ता देखील सोडली नव्हती.

राजनारायण यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात दुहेरी लढा लढवला होता. एक जमिनीवर आणि दुसरा संसदेत, एक निवडणुकीच्या रिंगणात दुसरा न्यायालयात!

राजनारायण हे समाजवादी नेते होते, इतर समाजवादी नेत्यांप्रमाणे १९६९ साली त्यांचा देखील इंदिरा गांधींच्या राजवटीमुळे भ्रमनिरास झाला होता. १९७१ साली इंदिरा गांधींच्या विरोधात संयुक्त समाजवादी पक्षाला प्रबळ उमेदवार उभा करायचा होता.

परंतु इंदिरा गांधींच्या विरोधात उभं रहायला ना चंद्रभानू गुप्ता तयार होते, ना चंद्रशेखर यांची हे धाडस करायची हिंमत होती. अशावेळी राजनारायण यांनी धनुष्य पेलत संयुक्त समाजवादी पक्षाच्या वतीने इंदिरा गांधींच्या विरोधात निवडणूक अर्ज भरला.

१९७१ च्या निवडणूकीत राजनारायणचा दारुण पराभव झाला. राजनारायण यांनी इंदिरा गांधींच्या एकूण निवडणूक यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवले होते, निवडणूक झाल्यावर ते इंदिरा गांधींच्या चुकांचा पाढा घेऊन कोर्टात गेले आणि त्यांनी इंदिरा गांधींवर सात आरोप केले. अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला सुरू झाला. एकवेळ अशी येऊन ठेपली की स्वयं इंदिरा गांधींना न्यायालयीन दरबारात उभे राहावे लागले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली.

या प्रकरणाचा पाच वर्षांनी निकाल आला, इंदीरा गांधींच्या दबावाला झुगारून न्यायालयाचे न्यायमूर्ती जगनमोहन लाल सिन्हा यांनी निकाल दिला. इंदिरा गांधींच्या कुठल्याच दबावाला त्यांनी भीक घातली नाही, अगदी एक गुप्तहेर निकाल काय लागतो म्हणून टपून बसलेला तर त्याला कटवण्यासाठी न्यायमूर्ती सिन्हानी घरीच टायपिस्ट बोलवून निकाल टाईप केला व तो कोर्टात जाऊन सादर केल्यावरच टायपिस्टला घराबाहेर जाऊ दिले.

निकाल खळबळजनक होता, त्यांनी इंदिरा गांधींचा रायबरेली इथला विजय अवैध ठरवला होता व त्यांनी पुढचे सहा वर्षे इंदीरा गांधींना निवडणूक लढवता येणार नाही, अशी शिक्षा केली होती. १२ जून १९७५ ला हा निकाल आला आणि याच्या ठीक १४ दिवसांनी इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली.

आणीबाणी जाहीर केल्याचा काही काळातच राजनारायण यांना अटक करण्यात आली. जयप्रकाश नारायण, सत्येंद्र नारायण सिन्हा आणि अटल बिहारी वाजपेयी यांना देखील अटक करण्यात आली. देशभरातले सगळे कारागृह भरले ह्होते. राजनारायण यांच्यामुळे इंदिरा गांधींनी उचललेल्या या पावलाचा परिणाम म्हणजे सगळे विरोधी पक्ष एका छत्रीखाली आले.

१९७७ साली स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसेतर पक्ष जिंकला होता. पण जनता पक्षातील अंतर्विरोध इतका टोकाला गेला की हे सरकार अल्पावधीच कोसळले. हे सरकार जरी कोसळले तरी बलाढ्य काँग्रेसला नमवता येऊ शकते ही ऊर्जा इथल्या गैर काँग्रेसी पक्षांना मिळाली.

आपल्या संपुर्ण राजकीय कारकिर्दीत इंदिरा गांधी फक्त एका माणसाकडून हरल्या होत्या ती व्यक्ती म्हणजे राजनारायण!

जनता पक्ष सत्तेत असताना राजनारायण यांनी स्वास्थ्य मंत्री म्हणून गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या, त्यांना मोफत उपचार आणि औषधे मिळतील असे कायदे तयार केले. त्यांनी दिल्लीच्या शासकीय रुग्णालयांचे नामकरण केले.

राजनारायण यांनी जनता पार्टीचे सरकार पाडण्यात भूमिका बजावली असे म्हणतात. 

राजनारायण यांचे आयुष्य गरीबांच्या सेवेसाठी समर्पित होते, त्यांनी स्वतःसाठी काहीच ठेवले नाही. ते आयुष्यभर समाजकारण करत राहिले. त्यांना ना संपत्तीचा मोह होता राजसत्तेचा मोह होता, ज्यावेळी ३१ डिसेंबर १९८६ ला त्यांचे निधन झाले, तेव्हा त्यांच्या बँक खात्यात फक्त ‘१४५० रुपये’ इतकी रक्कम होती.

राजनारायण यांना एकदा एका पत्रकाराने विचारले की तुम्हाला स्वास्थ्य मंत्री का केले त्यावर ते उत्तरले की स्वास्थ्य मंत्रालय त्यालाच देतात ज्याचे स्वास्थ्य सर्वोत्तम आहे, सध्या जनता पक्षात माझ्याहुन स्वस्थ कोणी नाही, त्यामुळे मला हे पद दिले.

राजनारायण यांचे नाव जरी आज अनेकांना माहिती नसले तरी एकेकाळी देशाची लोकशाही वाचवण्यात त्यांनी फार फार मोलाची भूमिका बजावली होती!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!