आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
चांद्रयान-३ च्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय अवकाश संशोधन केंद्राने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती साध्य केली आहे. पृथ्वीच्या बाहेरचे जीवन समजून घेण्याच्या पराकोटीच्या मानवी उत्सुकतेतून चंद्रावर जाण्याची पहिली मोहीम १९६९ साली यशस्वी झाली.
नील आर्मस्ट्रॉंगने संपूर्ण पृथ्वीवरील मानवजातीचे प्रतिनिधी म्हणून २० एप्रिल १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. या अंतराळ प्रवासात नील आर्मस्ट्रॉंग यांच्यासोबत एल्विन एलीड्रन देखील होते. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन केंद्राने अपोलो-११ या मोहिमेद्वारे पहिल्यांदा अंतराळ वीरांना चंद्रावर पाठवले होते.
यानंतर चंद्र हा जणू प्रत्येक देशाच्या आकर्षणाचा विषय झाला आणि सर्वच देशांनी आपापली याने चंद्रावर पाठवण्याची स्पर्धाच सुरु केली.
अमेरिकेने या प्रकल्पाअंतर्गत चंद्रावरील माती, दगड यांची पाहणी केली. या अंतराळवीरांनी आणि यानांनी चंद्रावरून जी माती आणि दगड गोळा करून आणले त्यावर अजूनही नासामध्ये संशोधन सुरु आहे.
नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर तब्बल अडीच तासांचा वेळ घालवला होता. तिथे त्यांनी अमेरिकेचा झेंडा रोवला आणि तिथून रेडीओद्वारे त्यांनी पृथ्वी वासियांना संदेश दिला,
“आज चंद्रावर पडलेले मानव जातीचे हे छोटेसे पाऊल, सर्व मनुष्यजातीच्या प्रगतीची मोठी झेप आहे.”
संपूर्ण मानव जातीच्या दृष्टीने तो एक अद्भुत, अपुर्व असा ऐतिहासिक क्षण होता.
सध्या नासा, स्पेस स्टेशन उभारण्याच्या आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दोन अंतराळवीर उतरवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. २०२४ पर्यंत नासाच्या या प्रकल्पांना मूर्त स्वरूप येईल अशी अपेक्षा आहे.
चंद्रावर जाणारा पहिला माणूस म्हणून नील आर्मस्ट्रॉंगचे नाव मात्र जगाच्या अंतापर्यंत अमर राहील. चंद्र मोहीम यशस्वी करून आल्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग आणि एल्ड्रिन यांनी जगभरातील अनेक देशांना भेट देण्याची मोहीम हाती घेतली.
त्यांच्या याच मोहिमेचा भाग म्हणून ते भारत भेटीवरही आले होते. या दरम्यान त्यांनी भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची देखील भेट घेतली. या एकाच भेटीत त्यांनी इंदिराजींवर अशी काही जादू केली की इंदिराजी त्यांचे कौतुक करताना अजिबात थकल्या नाहीत. आर्मस्ट्रॉंग यांच्या व्यक्तिमत्त्वाने त्या प्रभावित झाल्या होत्या.
२० एप्रिल १९६९ रोजी जेव्हा नील आर्मस्ट्रॉंगचे यान चंद्रावर उतरणार होते, तेव्हा ही मोहीम यशस्वी झाल्याची बातमी ऐकण्यासाठी आणि नील आर्मस्ट्रॉंग यांचा चंद्रावरील पहिले पाउल टाकण्याचा क्षण पाहण्यासाठी इंदिराजी रात्री ४.३० पर्यंत जाग्याच होत्या. त्यांना हा क्षण अजिबात चुकवायचा नव्हता.
आर्मस्ट्रॉंग दिल्लीत आले आणि त्यांनी इंदिराजींची भेट घेतली, तेव्हा माजी विदेश मंत्री नटवर सिंह देखील उपस्थित होते. हा प्रसंग त्यांनी आपल्या पुस्तकातही नोंदवला आहे. नटवर सिंह यांनी इंदिराजींच्या अनुमतीने नील आर्मस्ट्रॉंग यांना सांगितले की, तुम्ही चंद्रावर उतरला त्यादिवशी इंदिराजी पहाटे ४.३० पर्यंत जाग्या राहिल्या होत्या. कारण तुम्ही चंद्रावर उतरण्याचा क्षण त्यांना चुकवायचा नव्हता.
यावर नील आर्मस्ट्रॉंगनी जे उत्तर दिले ते सर्वांनाच चकित करणारे होते. इंदिराजींना तर हे उत्तर ऐकून खूपच आश्चर्य वाटले. आर्मस्ट्रॉंग अत्यंत नम्रतेने म्हणाले, मॅडम प्राइम मिनिस्टर, तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पुढील वेळी जेव्हा आम्ही चंद्रावर जाऊ तेव्हा तुम्हाला इतका काळ जागं राहावं लागणार नाही याची मी खात्री देतो.
अत्यंत विनम्रतेने त्यांनी दिलेले हे उत्तर ऐकून सगळेच दंग राहिले. विशेष बाब म्हणजे ज्या गोष्टीत त्यांची काहीच चुक नव्हती त्यासाठी त्यांनी अत्यंत निम्रतेने दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांच्या स्वभावातील ही विनम्रताच इंदिराजींना खूप भावली. इतका मोठा माणूस, पण दिलगिरी व्यक्त करताना त्यांना जरासाही संकोच वाटला नाही.
नील आर्मस्ट्रॉंग यांचे हे उत्तर ऐकून त्या पुढे आल्या आणि त्यांनी स्वतःहून त्यांच्या या नम्र स्वभावाचे आणि मृदू बोलण्याचे कौतुक केले. नील आर्मस्ट्रॉंग यांनी देखील इंदिराजींची ही भेट कायम स्मरणात ठेवली.
अर्थात, ते पुन्हा चंद्रावर गेले नाहीत, हेही खरे आहे. परंतु असे म्हटले जाते की, जेव्हा पहिल्यांदा आर्मस्ट्रॉंग चंद्र मोहिमेवर गेले तेव्हा ते खूपच घाबरलेले होते. ही मोहीम यशस्वी करून आपण परत जिवंत जाऊ की नाही याचीही त्यांना धास्ती वाटत होती. परंतु ते सुरक्षित आणि सुखरूप परत आले. त्यांच्या या मोहिमेने त्यांना जगभर प्रसिद्धी आणि प्रशंसक मिळवून दिले.
नील आर्मस्ट्रॉंग यांना सुरुवातीपासूनच एरोनॉटिक्समध्ये गती होती. त्यांना २०० पेक्षाही जास्त विविध प्रकारची विमाने लीलया हाताळण्याचा सराव होता. सोळाव्या वर्षात त्यांच्याकडे गाडीचे लायसन्स नव्हते पण त्यांनी वैमानिकाचे लायसन्स मिळवले होते.
नासाचे ते पहिले-वहिले अंतराळवीर होते. १९६६ साली जेमिनी ८ मध्ये ते कमांड पायलट होते.
१९७१ साली आरोग्याच्या तक्रारी सुरु झाल्याने आर्मस्ट्रॉंग नासातून बाहेर पडले. नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना स्पेस इंजिनियरिंगचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यांची तब्येतही बरीच खालावली होती. त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला होता. हळूहळू त्यांचे आरोग्य ढासळतच गेले. २५ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.
आजही किंवा भविष्यातही चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मनुष्य कोण? हा प्रश्न जेव्हा भावी पिढ्यांना विचारला जाईल तेव्हा त्याचे एकमेव उत्तर असेल, ‘नील आर्मस्ट्रॉंग.’ इतके मोठे संचित मिळवणाऱ्या व्यक्तीची पराकोटीची विनम्रता पाहून आश्चर्यचकित व्हायला होते.
जरा कोणी थोडे शिष्टपणे वागायला लागला की आपण, तोऱ्यात त्याला म्हणतो ‘काय चंद्रावर जाऊन आलास का, इतका शिष्टपणा करायला?’ पण, प्रत्यक्षात चंद्रावर जाऊन आलेल्या व्यक्ती जवळ मात्र अशी घमेंड अजिबात नव्हती.
मानवी जीवनाचे खरे संचित नील आर्मस्ट्रॉंग यांनाच गवसले होते!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.