आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
युद्धाच्या वेळी प्रतिस्पर्धी देशांचे सैन्य एकमेकांशी प्रत्यक्ष लढत असले तरीही त्याचे गंभीर आणि दूरगामी परिणाम युद्धग्रस्त देशातल्या नागरिकांना विशेषतः, महिला आणि मुलांनाही भोगावे लागतात, हे आपल्याला दोन्ही महायुद्धांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच रशियाच्या युक्रेनवरच्या आक्रमणामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात असली तरीही रशियाच्या किंवा युक्रेनच्याही बाजूने प्रत्यक्ष रणांगणात उतरण्यापूर्वी अन्य देश १० वेळा विचार करताना दिसत आहेत.
दोन्ही महायुद्धांमधून अमेरीकेला खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त फायदा झाला. या महायुद्धांमुळे तत्कालीन इंग्लंड आणि फ्रान्ससारख्या महासत्ता विजयी झाल्या तरीही दुबळ्याही बनल्या. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आणि अमेरीका ही सर्वार्थाने महासत्ता म्हणून पुढे आली.
एक देश म्हणून आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये हे खरं असलं तरीही कोणत्याही युद्धांचे देशांतर्गत सामाजिक आर्थिक परिणामही भयानक असतात. इतके की दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या मुलांचे संगोपन करता येणार नाही, या भीतीने कित्येक पालकांनी त्यांची मुलं किरकोळ किंमतीला विकून टाकली.
त्या काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका छायाचित्राने संवेदनशील नागरिकांच्या काळजाची कालवाकालव करून टाकली होती. आपण आपल्याकडे जागा विकणे आहे, फ्लॅट विकणे आहे, दुकान विकणे आहे, शेतजमीन विकणे आहे, अशा पाट्या घराच्या भिंतीवर लावलेल्या सर्रास पाहतो.
या छायाचित्रात लाकडी जिन्याच्या पायऱ्यांवर बसलेली चार छोटी मुलं आणि त्यांच्यामागून तोंड लपवून आता निघालेली त्यांची आई दिसते. याच घराच्या भिंतीवर ‘चार मुले विकणे आहे,’ अशा अर्थाची पाटीही लावलेली दिसते. या छायाचित्रावरून त्यावेळची करूण परिस्थितीही जाणवते आणि अनेक प्रश्नही मनात उभे राहतात.
एक तर या मुलांचे पालक आपली मुलं केवळ २ डॉलर किंमतीला विकून काय साधू इच्छित होती? खरं तर या मुलांना विकण्यामध्ये त्यांचा हेतू पैसे कमावण्याचा नव्हता. त्यांची अडचण वेगळी होती. ते कुटुंब लवकरच घरदार सोडून रस्त्यावर येणार होतं. बेघर होऊन चार मुलांचं नुसतं पोट भरणं ही गोष्टही कठीण! मग त्यांचं इतर संगोपन तर दूरच!
त्यामुळे मुलं विकली तर विकत घेणाऱ्यांकडून त्यांच्या किमान गरज तरी भागवल्या जातील अशी त्यांच्या पालकांची धारणा होती. हे या कुटुंबांचं प्रातिनिधिक चित्र आहे. त्या काळात अशा हजारो मुलांची विक्री झाली. शेकडो जणांना काही सधन कुटुंबांनी दत्तक घेतलं.
मग सगळीकडे अशी भयानक परिस्थिती असताना या मुलांना चिल्लर किंमतीला का होईना, कोणी विकत का घेत असेल? स्वाभाविकच पहिला विचार मनात असा येतो की काही सहृदय आणि सधन कुटुंब भूतदया म्हणून मुलांना दत्तक घेतील; काही घरकामासारख्या कामांसाठी घेतील. इथे तसं झालं नाही.
त्या काळात सर्वाधिक मुलं सधन कुटुंबांनी नव्हे तर सर्वसाधारण शेतकऱ्यांनी विकत घेतली. अन्नाचे चार तुकडे टाकून त्यांच्याकडून शेतात ढोरमेहनत करून घेतली. काम संपल्यावर तर त्यांना साखळदंडांनी बांधून ठेवलं जायचं. थोडक्यात, अल्पमोबदल्यात त्यांना गुलाम किंवा वेठबिगार करण्यात आलं.
त्या काळात काही समाजकंटकांनी आपल्या तुंबड्या भरण्यासाठी मुलांच्या खरेदी- विक्रीचा धंदाच सुरू केला. हे दलाल गरीब, बेरोजगार, बेघर पालकांकडून २ डॉलर किंमतीला मुलं विकत घ्यायचे आणि तीच मुलं १०० डॉलरपर्यंत किंमतीला विकायचे. अनेकांनी तर त्यापुढे जाऊन या काळात सरळ अपहरण करून लहान मुलं पळवून आणून त्यांची विक्री करण्याचा धंदा सुरू केला. सन १९३६ ते ५० या कालावधीत तब्बल ५० हजार मुलांना त्यांच्या पालकांपासून पळवून नेण्यात आलं; तर ५ हजार मुलांची विक्री करण्यात आली.
पोटची मुलं विकण्याची पाळी आलेल्या पालकांपुढे अनाथालय किंवा रिमांड होमसारखा पर्याय उपलब्ध नव्हता का, किंवा परिस्थिती एवढी भीषण असताना सरकारने त्यांना अन्य काही पर्याय दिला नाही का; हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.
आपल्याकडच्या सुधारगृहांच्या (रिमांड होम) सुविधा आणि तिथे मुलांना मिळणारी वागणूक याबद्दल नेहमीच टीका ऐकायला मिळते. त्या काळात अमेरिकेतली सुधारगृह आणि अनाथालयामध्येही काही वेगळी परिस्थिती नव्हती.
तरीही अनाथालयांच्या माध्यमातून मुलं चांगल्या कुटुंबात दत्तक जातील म्हणून तिथे ठेवावं; तरी दत्तक घेण्याची प्रक्रिया फारच खर्चिक असायची. त्यासाठी ५०० ते १० हजार डॉलर इतका खर्च करावा लागायचा. त्यापेक्षा २ ते १०० डॉलर खर्च करून मुलं थेट विकत घेण्यालाच लोकांची पसंती होती.
या परिस्थितीतून जाणाऱ्या मुलांच्या मनावर होणाऱ्या आघातांचे घाव तर फार खोलवर होते. न कळत्या वयात आपल्या जन्मदात्या आई वडलांनी आपल्याला निर्दयपणे दुसऱ्याच्या हातात सोपवल्याचं बघितल्यामुळे निर्माण झालेली नाकारलेपणाची भावना मनाला पोखरणारी होती. पालकांनी हे कुठल्या परिस्थितीत आणि काय विचारांनी केलं हे समजायचं वय नव्हतं.
नशिबाने क्वचित कुणाला चांगले पालक मिळाले तर त्यांच्या भविष्याला आकार आला. मात्र, बहुतेकांना गुलामच बनवण्यात आलं. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातल्या जवळ जवळ निम्म्या पिढीला पुन्हा मध्ययुगीन गुलामगिरीच्या जोखंडात जखडण्यात आलं.
युद्ध आणि संघर्षामुळे काही मोजक्या आक्रमक युद्धखोरांना आसुरी आनंद मिळत असला तरी त्याचे परिणाम पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागत असल्याने आतापर्यंतच्या अनुभवांनी शहाणे होऊन संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग पत्करणे हेच इष्ट ठरणार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.