जाणून घ्या, केरळमध्ये हिंदूंविरोधात झालेला मोपला विद्रोह काय होता…?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


२० ऑगस्ट १९२१ चा दिवस हा केरळच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी केरळच्या मलबार प्रांतात एका मोठ्या विद्रोहाला सुरुवात झाली होती. या विद्रोहाला मोपला विद्रोह म्हणून ओळखले जाते. इंग्रजांच्या विरोधात सुरू झालेल्या या मोपला विद्रोहाला पुढे हिंदू मुस्लिम दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले.

असं म्हटलं जातं की या दंगलीत मलबारमधील मोपला मुसलमानांनी हजारो हिंदूंची हत्या केली होती. यावेळी हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले होते. हजारो हिंदूंचे धर्मांतरण करून त्यांना मुसलमान बनवण्यात आले होते.

केरळमध्ये या मोपला दंग्याची चर्चा आजदेखील केली जाते. केरळमधील हिंदुत्ववादी या दंगलीवरून आजदेखील तिथल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर राजकीय टीकास्त्र सोडत असतात. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील प्रचारादरम्यान केरळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर भाजपाने कडाडून हल्ला चढवला होता. केरळच्या भाजपा अध्यक्षाने याला हिंदूंच्या विरोधात मुसलमानांचा पहिला जिहाद म्हटले होते. त्यावेळी हे प्रकरण फार चर्चेत आले होते.

केरळच्या मलबारमध्ये सुरू झालेल्या या मोपल्याचा बंडाची प्रेरणा खिलाफत चळवळीत दडली होती.

पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानचा पराभव झाला होता. त्यावेळी इंग्रजांनी त्या देशाचा राजाला जो जगभरातील मुसलमानांचा खलिफा होता, त्याला सत्तेतून खाली खेचले होते. इंग्रजांच्या या कारवाईमुळे जगभरातील सर्वच मुसलमान इंग्रजांवर नाराज झाले होते. तुर्कस्थानच्या सुलतानाला त्याची राजगादी परत मिळवुन देण्यासाठी भारतीय मुसलमानांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती.

भारतीय स्वातंत्र्यता चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम नेत्यांनी या चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. यात प्रामुख्याने अबुल कलाम आझाद, जफर अली खाँ, मोहम्मद अली आणि शौकत अली यांचा समावेश होता. महात्मा गांधींनी देखील या चळवळीला आपला पाठींबा दर्शवला होता. महात्मा गांधींचा या चळवळीला समर्थन देण्यामागे हिंदू मुस्लिमांना स्वातंत्र्यता लढ्यासाठी एकत्र करण्याचा उद्देश होता.

याच काळात महात्मा गांधींनी असहकार चळवळीला सुरुवात केली होती. अनेक हिंदुत्ववादी इतिहासकार असे मानतात की असहकार चळवळीच्या माध्यमातून गांधी हिंदूंना एकप्रकारे खिलाफत चळवळीला समर्थन मिळवून देण्यासाठी तयार करत होते. परंतु अनेक गांधीवादी अभ्यासकांच्या मते महात्मा गांधींनी असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ फक्त हिंदू – मुस्लिम एकता घडवून आणायला एकत्र केली होती, तिचा उद्देश ब्रिटिश विरोधाचाच होता.

केरळमध्ये खिलाफत चळवळीच्या आंदोलनात मलबारमधील मोपला मुसलमान सामील झाले होते.

मलबारमध्ये राहणाऱ्या मल्याळी मुसलमानांना “मोपला” असे संबोधले जात होते. या मोपला मुसलमानांमध्ये बहुतांश लोक हे शेती आणि व्यापार करायचे, या भागातील बहुतांश जमिनीवर आणि मोठ्या व्यापारावर हिंदूंचा कब्जा होता.

मोपला मुसलमान यांच्याकडे वेठबिगारी करायचे. त्यांना तिथे राबायची चौथाई मिळत असे.

खिलाफत चळवळीच्या सुरुवातीला तिचे स्वरूप हे इंग्रजांच्या विरोधात जनआंदोलनाचे होते. इंग्रजांनी या आंदोलनाला दडपण्याची योजना आखली होती. त्यांनी सुरुवातीला या आंदोलनाच्या मोठ्या नेत्यांना जेरबंद केले. यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व मुसलमानांच्या हाती गेले. मोपला मुसलमानांच्या हाती नेतृत्व गेल्यामुळे त्यांनी हिंदू जमीनदारांवर हल्ले करण्यास सुरुवात केली.

या चळवळीला जमीनदारांच्या विरोधात वेठबिगारांच्या बंडाचे स्वरूप प्राप्त झाले. मोपला मुसलमान हे हिंदू जमीनदार त्यांना देत असलेल्या अल्प मजुरीमुळे व त्यांच्या वेगळ्या धार्मिक परंपरामुळे त्यांच्यावर नाराज होते. केरळात असे बंड आधी देखील घडले होते. १८३६ आणि १८४९ साली झालेले असे बंड देखील फार मोठे होते, परंतु १९२१ याला मोठे हिंसक स्वरूप प्राप्त झाले होते.

मोपला मुसलमानांनी अनेक पोलीस स्टेशनाना आग लावली होती, सरकारी दौलत लुटली होती, इंग्रजांवर हल्ला केल्यानंतर त्यांनी हिंदूंवर हल्ला चढवला होता, अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले होते, हजारो हिंदूंचे धर्मांतर केले होते.

यानंतर आर्य समाजाने या धर्मांतर झालेल्या हिंदूंचे शुद्धी चळवळीच्या माध्यमातून पुन्हा शुद्धीकरण केले व त्यांची घर वापसी केली होती.

या शुद्धी चळवळीचे अग्रणी होते स्वामी श्रद्धानंद ज्यांची २३ डिसेंबर १९२६ रोजी राशीद खान नावाच्या मुसलमानाने दिल्लीत गोळ्या घालून हत्या केली होती.

मोपला बंडाला प्राप्त झालेले हिंदू विरोधी दंगलीचे स्वरूप हे स्वातंत्र्यता आंदोलनाला सुरुंग लावण्याचे ब्रिटिशांचे प्रयत्न होते, असं अनेक डावे इतिहासकार मानतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी या मोपला दंगलीवर ‘मोपल्याचे बंड’ असे पुस्तक लिहले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या पाकिस्तान या ग्रंथात या दंगलीच्या वेळी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे महात्मा गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.

मोपल्याची दंगल ही हिंदुत्ववादी चळवळीच्या उदयाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील एक कारण असल्याचे अनेक इतिहासकार मानतात. एकंदरीत वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघितले तरी या दंगलीला भारताच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे, हे नाकारता येत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!