आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
रशिया आणि युक्रेनमधील तणाव शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीत. सोमवारी (२८ फेब्रुवारी) बेलारूसमध्ये आयोजित करण्यात आलेली दोन्ही देशांदरम्यानची चर्चा निष्फळ ठरली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोप-अमेरिकेतील हालचालींना वेग आला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत आणीबाणीच्या चर्चेच्या बाजूनं २९ मतं पडली आहेत. भारतासह १३ देशांनी या मतदानात भाग घेतला नाही. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युरोपियन संसदेला संबोधित केलं. त्यांनी रशियन हल्ला हा एक प्रकारचा दहशतवादच असल्याचं म्हटलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ६४ किमी लांबीचा एक रशियन लष्करी ताफा युक्रेनची राजधानी कीव्हच्या दिशेने निघाला आहे. त्याचे सॅटेलाइट फोटोही प्रसिद्ध झाले आहेत. रशियाच्या बाजूनं युक्रेनची राजधानी कीववरील हल्ले अधिक तीव्र केले गेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धात अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, रशियानं युक्रेनवर ‘व्हॅक्यूम बॉम्ब’चा वापर केल्याचा आरोप केला आहे. रशिया या युद्धामध्ये बंदी घातलेल्या शस्त्रांचा वापर करत असल्याचा आरोप युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूतानं केला आहे. युक्रेनच्या आरोपानुसार, सोमवारी रशियानं अनेक निवासी भागात ‘व्हॅक्युम बॉम्ब’चा वापर केला आहे. युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी हा आरोप केला आहे.
याशिवाय, सीएएनं आपल्या एका बातमीमध्ये, रशियन सैन्यानं ‘थर्मोबॅरिक मल्टिपल रॉकेट लाँचर’चा वापर केल्याचा दावाही केला आहे. त्यामुळं आता सर्वत्र, अण्वस्त्रांनंतरचं दुसरं सर्वात धोकादायक अस्त्र मानल्या जाणाऱ्या ‘व्हॅक्युम बॉम्ब’ची चर्चा सुरू आहे.
२०२२ वर्षाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, रशियाची एकूण ऑटोमिक वॉरहेड इन्व्हेंटरीमध्ये ५ हजार ९७७ शस्त्रे होती. यातील ४ हजार ४७७ स्टॉकमध्ये होती तर एक हजार ५०० निवृत्त झाली होती. असं म्हटलं जातं की, रशियाकडे सर्वात जास्त अण्वस्त्रे आहेत. तरी देखील रशियानं व्हॅक्युम बॉम्बचा वापर का केला? व्हॅक्युम बॉम्ब आणि अणुबॉम्बमध्ये काही फरक आहे का? व्हॅक्युम बॉम्ब कशा प्रकारे काम करतो? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची सुरुवात आपण अणुबॉम्बपासून करूया.
आण्विक शस्त्रं ही सर्वात विध्वंसक असतात. न्यूक्लियर रिॲक्शन्सच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण केली जाते. आतापर्यंत युद्धामध्ये फक्त दोनदा अण्वस्त्रांचा वापर झाला आहे. १९४५ हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन जपानी शहरं अणुबॉम्बमुळं उद्ध्वस्त झाली होती. परंतु, हायड्रोजन किंवा थर्मोन्यूक्लियर बॉम्ब सारख्या अण्वस्त्रांमध्ये ‘न्यूक्लियर फिशन’ आणि फ्युजन यांसारख्या प्रतिक्रियांच्या संयोगानं स्फोट होतात.
दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारच्या विद्ध्वंसक अण्वस्त्रांच्या वापरावर जागतिक स्तरावर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील रशियानं युक्रेनसोबतच्या युद्धात यांचा वापर करण्याची धमकी दिली आहे. शिवाय व्हॅक्युम बॉम्बचा वापर केल्याचंही म्हटलं जात आहे.
अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही देशांनी १९६० मध्ये थर्मोबॅरिक शस्त्रे विकसित केली होती. सप्टेंबर २००७ मध्ये, रशियानं आतापर्यंत वापरल्या गेलेल्या सर्वात मोठ्या थर्मोबॅरिक शस्त्राचा स्फोट केला होता. ज्यानं ३९.९ टन ऊर्जा सोडली होती. दोन्ही देशांनी अशा बॉम्बच्या अनेक आवृत्त्या विकसित केल्या आहेत. परंतु, त्यांनी ते इतर कोणत्याही देशाला विकलेले नाहीत किंवा आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळं ते सार्वजनिकरित्या वापरले नाहीत. युएस थर्मोबॅरिक शस्त्रांच्या प्रत्येक युनिटची किंमत १६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
व्हॅक्युम बॉम्बला ‘थर्मोबॅरिक वेपन’ म्हणूनही ओळखलं जातं. हे अण्वस्त्रांपेक्षा थोडे वेगळे आहेत. कारण, त्यांचा वापर झाल्यानंतर ते सभोवतालच्या हवेतून ऑक्सिजन काढून घेतात आणि जास्त तापमानाच्या लाँगर ब्लास्ट वेव्ह्जसह स्फोट घडवून आणतात. या बॉम्बमध्ये मानवी शरीराचं वाफेमध्ये रुपांतर करण्याची क्षमता असते.
थर्मोबॅरिक शस्त्रांमध्ये, सामान्य बॉम्बमधील इंधन आणि ऑक्सिजनचं मिश्रण वापरण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरलं जातं. याचा अर्थ ते अधिक ऊर्जा वाहून नेतात. बंकर, बोगदे आणि फॉक्सहोल्स नष्ट करण्यासाठी फील्ड ऑपरेशनमध्ये व्हॅक्युम बॉम्ब लाँच केल्यास मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो. दरम्यान, ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’सारख्या मानवाधिकार गटांनी अशी शस्त्रे न वापरण्याची चेतावणी दिली आहे. जर दाट लोकवस्तीच्या, निवासी भागात क्लस्टर बॉम्ब किंवा व्हॅक्युम बॉम्बचा वापर झाल्याची खात्री झाल्यास त्याला ‘वॉर क्राईम’ ठरवण्यात येईल.
रॉयटर्स या न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, युक्रेनच्या अमेरिकन राजदूतानं सोमवारी रशियानं युक्रेनियन लोकांवर क्लस्टर बॉम्ब आणि व्हॅक्युम बॉम्बनं हल्ला केल्याचा आरोप केला आहे. युक्रेनमध्ये व्हॅक्युम बॉम्बच्या वापराची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’नं दिलेल्या माहितीनुसार, 220 मिमी उरागन रॉकेटच्या मदतीनं, सुमी ओब्लास्टमधील एका नर्सरी आणि किंडरगार्टनवर क्लस्टर युद्धसामग्री टाकली गेली आहे. या दोन्ही जागा स्थानिक लोकांच्या आश्रयासाठी वापरल्या जात होत्या.
रशियानं यापूर्वीदेखील ‘थर्मोबॅरिक वेपन’सारख्या शस्त्रांचा वापर केल्याचा संशय ह्युमन राईट्स संस्थांना आहे. २०००मध्ये, ह्युमन राइट्स वॉचनं दिलेल्या अहवालानुसार रशियानं चेचन्या या रशियन प्रजासत्ताकमध्ये अशा शस्त्रांचा वापर केला होता. ऑगस्ट १९९९मध्ये, रशियाच्या तांडो येथील दागेस्तानी गावावर रशियन सैन्यानं FAE बॉम्बचा वापर केल्याचं म्हटलं जातं. अमेरिकेनं देखील २०१७मध्ये अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेट गटाच्या गुहांमध्ये अशाच प्रकारचे थर्मोबॅरिक बॉम्ब वापरले होते, असं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं होतं.
सीआयएच्या अभ्यासात असं म्हटलं आहे की, या शस्त्रांचा अंदाधुंद वापर विनाशकारी आहे. व्हॅक्युम बॉम्बच्या प्रेशर वेव्हमुळं व्यक्तीचं फुफ्फुसं फुटून त्याचा जीव जातो किंवा जर बॉम्बचा स्फोट झाला नाही तर त्यातील इंधनामुळं जीव गुदमरू लागतो.
इथिलीन ऑक्साईड आणि प्रोपीलीन ऑक्साईड यासारखी सर्वात सामान्य FAE (फ्युएल-एअर एक्सप्लोसिव्ह) इंधनं अत्यंत विषारी आहेत. याव्यतिरिक्त, जेव्हा अनेक थर्मोबॅरिक शस्त्रे एकत्र फोडली जातात, तेव्हा ते एकमेकांना आणखी मजबूत करतात. त्यामुळं अधिक शक्तीशाली स्फोट घडवतात. स्फोटाच्या जवळपास असलेल्या लोकांची फुफ्फुसं आणि अंतर्गत अवयव फुटू शकतात.
युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कोवा यांनी रशियावर केलेल्या आरोपामध्ये जर तथ्य असेल तर हा मोठा धोका आहे. इतर देशांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, हे युद्ध वाढत गेलं तर भविष्यात संपूर्ण जगाला याची किंमत मोजावी लागू शकते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.