काय आहे पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात नेमकी कशी झाली हे सांगणारी “पॅनस्पर्मिया थिअरी”..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


पृथ्वीवर जीवनाची सुरुवात नेमकी कशी झाली या प्रश्नाचं उत्तर आजही वैज्ञानिक शोधात आहेत. याच्याबद्दलचे अनेक सिध्दांत आज प्रसिद्ध आहेत. डार्विनसारख्या शास्त्रज्ञाचा सिद्धांत आज जगभर प्रसिद्ध आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीचा सिद्धांत सांगणारा बिगबँग सिद्धांतसुद्धा आज जगभर बरेच जण मान्य करतात.

प्रत्येक धर्मात यासाठी वेगवेगळे सिद्धांत सापडतात. धार्मिक ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक गोष्टी पृथ्वीवरील जीवनाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत असतील असे अनेक सिद्धांत आज प्रसिद्ध आहेत.

परंतु एक सिद्धांत असाही आहे जो सांगतो की पृथ्वीवरील जीवन दुसऱ्या ग्रहावरुन पृथ्वीवर स्थलांतरीत झालेले असू शकते.

डोकं चक्रावून सोडणारा हा सिद्धांत एखाद्या वैज्ञानिक कल्पककथेसारखा भासत असला तरीही तसं नाहीये. जगात या सिद्धांतावर विश्वास असणारे काही लोक आहेत. तसेच याची सिद्धता होइल असे काही पुरावेही उपलब्ध असल्याचे म्हटले जाते.

आज आपण याच अजब सिद्धांताला जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या सिद्धांताचे नाव आहे पॅनस्पर्मिया. या सिद्धांतानुसार काही सुक्ष्मजीव अतिशय उच्च तापमानात जिवंत राहू शकतात. जेव्हा ग्रहांची टक्कर होते तेव्हा त्या टकरीत एका ग्रहावरील सजीव दुसऱ्या ग्रहावर त्या टकरीमुळे निर्माण होणाऱ्या अवकाशीय कचऱ्याद्वारे स्थलांतरीत होऊ शकतात.

बेसिलस नावाच्या जीवाणूच्या अंतर्गत पेशी ४२० अंश सेल्सियस एवढ्या तापमानात तग धरु शकतात असे एका अहवालात आढळून येते. यावरुन पृथ्वीच्या जीवन उत्पत्तीचे बीज दुसऱ्या ग्रहावर लावले गेले असल्याची शक्यता निर्माण होते.

बिगबँगच्या स्फोटानंतर पृथ्वीवरील जीवनाच्या उत्पत्तीची प्रक्रिया सुरु झाली असावी.

१० ते १७ दशलक्ष वर्ष एवढं पृथ्वीचं वय असताना ही प्रक्रिया सुरु झाली. परग्रहावरील जीवन अजुनही एक गुढच असले तरीही कित्येक वैज्ञानिकांच्या मते परग्रहावर जीवसृष्टी आहे. पॅनस्पर्मियाचा सिद्धांत दुसऱ्या ग्रहावर आधीच असलेल्या सुक्ष्मजिवांची निर्मिती सांगत असला तरी पृथ्वीवर उत्पत्तीची सुरुवात कशी झाली याचं कसलंही स्पष्टीकरण हा सिद्धांत देत नाही.

पृथ्वीवर ४ ते ३.८ अब्ज वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात ग्रहीय वस्तूंची आदळआपट झाली. या वेळेत पृथ्वीला भरपूर मोठे तडाखे बसुन पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात उल्कापात झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. या उल्कापातात पृथ्वीवर ३.८३ अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे या उल्कापाताच्या आधीच पृथ्वीवर असलेली सजीवसृष्टी नष्ट झाली असे या सिद्धांताला मानणाऱ्या वैज्ञानिकांचे मत आहे. त्यामुळे आत्ताची सजीवसृष्टी ही पृथ्वीवर निर्माण झालेली नाही असा दावा काही शास्त्रज्ञ करतात.

या सिद्धांताच्या विरोधात असलेला एक मुद्दा म्हणजे विश्वातील जाण्यासाठी आणि परिक्षणासाठी शक्य त्या ग्रहांवर आतापर्यंत सजीवसृष्टीसाठी आवश्यक असलेले वातावरण शास्त्रज्ञांना मिळाले नाहीये. मग दुसऱ्या एखाद्या ग्रहावर सजीवसृष्टीची उत्पत्ती कशी शक्य आहे असा प्रश्न विरोधी शास्त्रज्ञ विचारतात.

तसेच काही जीव पृथ्वीवर अत्यंत उच्च तापमानात राहू शकतात. तर काही अतिशय कमी तापमानात. एवढ्या टोकाच्या तापमानात तग धरण्याची ही क्षमता यामुळे यातील काही जीव दुसऱ्या ग्रहावरील उच्च तापमानात राहणारे असू शकतात असा अंदाज पॅनस्पर्मिया सिद्धांताला मानणारे शास्त्रज्ञ सांगतात.

फक्त पृथ्वीवरच सजीवसृष्टी असल्याचा दावा खोटा ठरवण्यात सुद्धा ही गोष्ट महत्त्वाची आहे.

मंगळ ग्रहावर तसेच गुरु ग्रहाचा उपग्रह असलेल्या ‘युरोपा’ इथे पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज आहे.

‘युरोपा’च्या अंतर्गत भागात महासागर असल्याच्या काही बातम्या सुद्धा वैज्ञानिक जगतात फैलावत आहेत.

अवकाशात बऱ्याच ठिकाणी जैविक घटक मोठ्या प्रमाणात आढळतो. यात असणारा कार्बन हा पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीव घटकात सापडतो. पृथ्वीवर आदळलेल्या काही उल्कांच्या अंतर्गत भागात सुद्धा कार्बन सापडला आहे.

अमिनो आम्ल जे की पृथ्वीवरील प्रत्येक सजीव शरीराच्या बांधणीत महत्त्वाचं काम बजावतात ते सुद्धा या उल्कांच्या अंतर्गत भागात सापडले आहेत, यावरुन सुद्धा पृथ्वीवरील जीवन हे अवकाशातुन आले असेल हा सिद्धांत अजुन मजबूत होतो.

एवढी चर्चा झाल्यानंतर ही पॅनस्पर्मियाचा सिद्धांत मांडताना पृथ्वीवर सजीवसृष्टी येण्याची प्रक्रिया मात्र या शास्त्रज्ञांना अजुन सिद्ध करता आलेली नाही.

या सिद्धांतानुसार दुसऱ्या ग्रहावरील सजीव पृथ्वीवर येण्यासाठी एकमेव वाहक आहे तो म्हणजे जैविक बीजाणू.

या बीजाणूमुळेच जीवाणू अधिक काळ एखाद्या पृष्ठभागावर जिवंत राहू शकतात. पृथ्वीवरील एक तृतीयांश जैविक घटक जीवाणू आहेत. यातील बरेच जीवाणू अतिशय उच्च तापमानात, उच्च दबावाखाली राहण्यासाठी ओळखले जातात. पॅनस्पर्मियाच्या सिद्धतेसाठी हे जीवाणू अवकाशात जगु शकतील की नाही हे सिद्ध करणे गरजेचे आहे.

याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जर्मन एरोस्पेस सेंटरच्या वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला. जैविक बीजाणुंना त्यांनी माती, लाल वाळूचा खडक, मंगळावरील उल्का यांच्यात मिश्रित केले. उपग्रहा द्वारे त्यांनी हे बीजाणू अवकाशात पाठवले.

२ आठवडे निरिक्षण करुन संशोधकांना असे लक्षात आले की लाल वाळूच्या खडकात मिश्र केलेले जवळ जवळ सगळे बीजाणू जिवंत होते. एका दुसऱ्या अभ्यासात हे बीजाणू सुर्याच्या अतीनील किरणांपासून दुर ठेवले तर ६ वर्ष अवकाशात जिवंत राहू शकतात असा निष्कर्ष समोर आला.

बीजाणू जिवंत राहत असले तरीही ग्रहामधील अंतर खुप जास्त असुन या बीजाणुंना दुसऱ्या ग्रहावर पोहचण्यासाठी काही दशलक्ष वर्ष लागू शकतात. काही संशोधनाच्या निष्कर्षांचा विचार केला तर काही जैविक बीजाणू २५० दशलक्ष वर्ष सक्रिय राहू शकतात. त्यामूळे कदाचित पृथ्वीवरील जीवनसृष्टीचे श्रेय जीवाणुंना दिले जाऊ शकते.

पृथ्वीवर असणारे जैविक बीजाणू अवकाशात आहेत का हा सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

हेलेचा धुमकेतु सुर्याच्या जवळुन जाताना त्यातून बाहेर पडणाऱ्या धुळीचं परीक्षण केल्यावर त्यात पृथ्वीवर उच्च तापमानात तग धरु शकणारया जीवाणूचे बीजाणू आढळून आले होते.

धुमकेतु भुतकाळात पृथ्वीवर आदळले असल्याने पॅनस्पर्मियाच्या सिद्धांताला बळ देणारा हा निष्कर्ष आहे.

एवढे सगळे मुद्दे असले तरी पृथ्वीवर सजीवसृष्टी वाढली कशी याचं स्पष्टीकरण हा सिद्धांत देत नाही. तरीही आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या सिद्धांतापेक्षा वेगळा असलेला हा सिद्धांत पूर्णपणे खोटा ठरवणं सुद्धा योग्य नाही.

अस्तित्वाच्या निर्मितीचा शोध घेणे हे एकच कोडं मानवाला लवकर उलगडेल असं काही वाटत नाही. पॅनस्पर्मियासारखे सिद्धांत हे कोडं अजुन रंजक बनवतात एवढं मात्र नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!