आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्या आयुष्यात किंवा सभोवताली जे काही घडतं ते आधीपासूनच निश्चित असतं की आपल्या कर्मानुसार ठरत जातं असा प्रश्न तुम्हाला आयुष्यात एकदातरी पडला असेलच. तुम्ही ज्योतिष शास्त्रावर, वास्तू शास्त्रावर किंवा तत्सम कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल आणि तुम्ही त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही केला असेल.
कदाचित ही उत्तरे शोधताना आपल्या विश्वाबरोबरच अनेक समांतर विश्वं अस्तित्वात आहेत या आशयाच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. गेली अनेक दशके अनेक शास्त्रज्ञ आणि कॉन्स्पिरसी थेअरिस्ट्स या संकल्पनेचा मग लावण्याच्या प्रयत्नांत असून त्या समांतर विश्वामध्ये तिथले वेगळे भौतिकशास्त्रीय (फिजिकल) नियम, वेगवेगळ्या प्रकारचे जीव आणि मुख्य म्हणजे कदाचित आपलं स्वतःचंच वेगळं अस्तित्व असण्याची शक्यताही आहे. यालाच अनेकदा मल्टिव्हर्सही म्हटले जाते. नेमकं काय आहे हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..
मल्टिव्हर्सची ही संकल्पना गेल्या अनेक शतकांपासून वेगवेगळ्या नावाने लोकांसमोर आली आहे. पंधराव्या शतकात निकोलस नावाच्या तत्त्वज्ञाने ही संकल्पना आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवली. त्याच्या मते आपण ज्या ब्रह्मांडात राहतो ते ब्रह्माण्ड आपल्या कल्पनेपेक्षा कित्येक पटीने मोठे आणि वैविध्यपूर्ण आहे.
आधुनिक काळात विसाव्या शतकापासून या संकल्पनेची सुरुवात झाली. क्वांटम मेकॅनिक्सच्या शोधामुळे आधुनिक भौतिकशास्त्रात या विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. १९५७ साली भौतिकशास्त्रज्ञ ह्यू एव्हरेटने “मल्टी-वर्ल्ड इंटरप्रिटेशन”चा सिद्धांत मांडला. त्यानुसार कोणताही क्वांटम इव्हेंट विश्वाच्या एका शाखेला जन्म देतो आणि असे अनेक विश्वं तयार होत जातात. क्वांटम इव्हेंट म्हणजे एखादी अशी घटना जी भौतिकशास्त्राच्या नियमांचे उल्लंघन करते. एकच घटना विविध कलांमध्ये एकाच ठिकाणी घडते या संकल्पनेलाही मल्टिव्हर्स म्हटले जाऊ शकते.
या संकल्पनेने पॉप कल्चरमध्येही प्रवेश केला असून आज अनेक रॅपर्स आणि कलाकार या संकल्पनेचा वापर आपल्या शोज आणि गाण्यांसाठी करतात. लुईस कॅरोलच्या वंडरलँडपासून ते “द मॅट्रिक्स”च्या साय-फाय एपिकपर्यंत या संकल्पनेने आपला प्रभाव पाडलेला दिसतो. याशिवाय हॉलिवूडमधील अनादर अर्थ, डॉक्टर स्ट्रेंज इन अ मल्टिव्हर्स ऑफ मॅडनेस, एव्हरीथिंग इज एव्हरीव्हर ऑल ॲट वन्स हे चित्रपट देखील मल्टिव्हर्स या संकल्पनेवर आधारित आहेत.
मेटावर्स संकल्पना मल्टिव्हर्सपेक्षा वेगळी आहे. मेटावर्स म्हणजे इंटरनेटचे एक आभासी विश्व. या विश्वामध्ये व्हर्च्युअल रिऍलिटी आणि ऑगमेंटेड रिऍलिटीद्वारे तुम्ही प्रवेश करू शकता. अर्थात हे विश्व आभासी असले तरी अनेकांना ते एक नवे, काल्पनिक विश्व तयार करून देते. आज अनेक व्हर्चुअल रियॅलिटी आणि ऑगमेंटेड रिऍलिटीवर काम करणाऱ्या कंपन्या या क्षेत्रात सुरु होत आहेत.
मल्टिव्हर्स किंवा अनंत ब्रह्मांडाचे संदर्भ आपल्याला भारताच्या इतिहासात देखील पाहायला मिळतात. रामायण आणि महाभारतात याचे दाखले आहेत. रामायणामध्ये प्रभू श्री राम जेव्हा मारुतीरायाला आपली अंगठी देऊन सीतामातेचा शोध घेण्यासाठी पाठवतात, तेव्हा ती अंगठी जमिनीवर असलेल्या एका फटीतून खाली पडते. मारुतीरायांना अणुपासोनि ब्रह्मांडाएवढे रूप धारण करता येत असल्याने सूक्ष्म रूप धारण करून ते अंगठीच्या शोधात त्या फटीतून जमिनीच्या आत म्हणजेच पाताळ लोकात गेले. तिथे त्यांना अनेक अंगठ्या पडलेल्या दिसल्या. याचठिकाणी नागांचे साम्राज्य असल्याचे सांगितले जाते, तेव्हा नागराजाने त्यांच्या प्रश्नाचे निराकरण केले आणि विविध युगांमध्ये असं रामायण होत असतं हे सांगितलं. ही घटना देखील मेटॅव्हर्सच्या कल्पनेसारखीच आहे. याशिवाय कोळियाची कीर्ती वाढली गहन । केलें रामायण रामा आधीं ॥ असं म्हणत संत तुकारामांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
*जगभरात रामायणांची संख्या एकूण ३०० आहे, त्यापैकी प्रत्येक रामायणात संदर्भ वेगवेगळे येऊ शकतात.
याशिवाय जर तुम्ही महाभारत आणि रामायण अभ्यासात असाल तर तुम्हाला काकभूषुंडी नाव परिचित असेलच. त्याला नेहमी कावळ्याच्या रूपात दाखवले जाते. तो रामाचा भक्त असून रामायणाची कथा गरुडाला सांगतो, तसेच तो चिरन्जीवी असल्याचेही अनेकांचे मत आहे. या काकभूषुंडीने आपल्या सामर्थ्याच्या बळावर ११ वेळा रामायण आणि १६ वेळा महाभारत प्रत्यक्ष घडताना पहिले आहे असे सांगितले जाते. हासुद्धा मेटॉवर्सचाच एक प्रकार आहे.
मल्टिव्हर्स ही एक संकल्पना आणि काल्पनिक गोष्ट जरी असली तरी त्यासाठी दिले जाणारे तर्क विचारात घेण्यासारखे आहेत. तुम्हाला काय वाटतं या संकल्पनेबद्दल, कमेंट्समध्ये नक्की कळवा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.