मासिक पाळी म्हणजे काय?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


दरवर्षी २८ मे हा जागतिक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो.

आपण एकविसाव्या शतकात वावरतोय, वेशभूषा बदलली, जात्याच्या जागी घरघंटी आली, चुलीची जागा शेगडीने आता तर इंडक्शनने घेतली. पण आजही आपण मासिक पाळीवर उघडपणे बोलत नाही. एखादीची मासिक पाळी आली असेल तर ती काहीतरी गुन्हा केलाय अशी आजूबाजूला फिरत असते.

शहरांमध्येच या विषयाबाबत म्हणावी तेवढी जागरूकता नाही. त्यामुळे लहान गावांत तर विचारूच नका.

“उघडपणे बोलू नये ही गोष्ट, चारचौघांना सांगण्यासारखी गोष्ट आहे का ही? तुला एकटीलाच होतं का हे? सगळ्यांनाच त्रास होतो.” ही वाक्य तर कित्येक घरात ठरलेलीच.

(माझं नशीब चांगलं म्हणावं लागेल कारण मला आणि बहिणीला हे असं कधीच ऐकावं लागलं नाही. शक्य तेवढा आरामच या दिवसात मिळतो) पण खरंच हा त्रास सहन होण्याजोगा असतो का? यावर उपाय काय?

शक्य तेवढा आराम?

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तो बाकी दिवसात मिळणं अशक्य तर हे 4 दिवस काय वेगळे असणारेत. दर महिन्यात सुट्ट्या टाकल्या तर मग अवघडच आहे. त्यामुळे खा गोळी आणि करा कामं असं दृश्य दिसतं. जोडीला PCOD/PCOS आहेच.

मासिक पाळी म्हणजे काय?

साधारण वयाच्या 12-13 व्या वर्षापासून प्रत्येक मुलीला दर महिन्याला किमान 4 दिवस योनीमार्गातून रक्तस्त्राव होतो. काही मुलींना लवकर सुरू होते, काहींना थोडी उशिरा. हे असं का होतं याचं कारण असं नाही पण प्रत्येकाची शरीररचना, जेनेटिक हिस्टरी या सगळ्याचा पाळी कधी येते यावर परिणाम होतो.

दर २७ ते ३० दिवसांनी येणाऱ्या या मासिक पाळीचं चक्र ४५  ते ५० वर्षापर्यंत सुरू असतं.

पण ही फक्त पुस्तकी माहिती झाली. खरंतर फक्त १० ते १५% बायकांना बरोबर २८ दिवसांनी पाळी येते आणि फार कमी अशा आहेत ज्यांना क्वचित त्रास होतो. बाकीच्यांना कोणाला 21 दिवसांत तर कोणाला अगदी १५-१५ दिवसांनी तेही ७-७ दिवस रक्तस्त्राव असतो. या काळात त्यांना जो त्रास होतो तो कल्पनासुद्धा नको.

फक्त शारीरिकच त्रास होतो असं नाही. हॉर्मोन्समध्ये बदल घडत असल्याने मानसिक त्रास खूप होतो. सारखी चिडचिड होते, मधेच विनाकारण रडू येतं. कुठल्याही गोष्टीसाठी फार सेन्सिटिव्ह होऊन जातो आपण. अशात खरी परीक्षा तिच्यासोबत असलेल्यांची होते.

मासिक पाळी (रक्तस्त्राव) जरी फक्त ४ दिवसांची असली तरी याचं सायकल महिनाभर चालू असतं.

याच्या ४ फेज असतात. (कोणी स्त्रीरोगतज्ज्ञ असल्यास मला करेक्ट करणे.)

पहिली अर्थातच मेस्ट्रुअशन म्हणजे रक्तस्त्राव होतो ती फेज.

फॉलिक्युलर फेज-

ही मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुरू होऊन ओव्ह्युलेशन होतं तेव्हा संपते. म्हणजे साधारण १३-१४ दिवस. हायपोथॅलमसनी सांगितलं की आपली पिट्यूटरी ग्लँड एक हॉर्मोन सोडते. फॉलिकल स्टीम्युलेटिंग हॉर्मोन (FSH). आपल्या बीजकोशाच्या (ovary) बाहेर छोटे छोटे कोंब तयार करतं. पण यातील एकाच कोंबातून फर्टिलाइस्ड बीज बाहेर पडतं.

ओव्ह्यूलेशन-

बीज बाहेर पडलं की ही फेज सुरू होते. साधारण मिड सायकल. सगळ्याच crucial असतात फेज. ही थोडी जास्ती. फॉलिक्युलर फेजमध्ये इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं परिणामी FSH आणि अजून एक संप्रक असतं, ल्युटेनायसिंग हॉर्मोन (LH), या दोहोंचं प्रमाण वाढतं.

LHचं प्रमाण वाढल्यामुळे ओव्ह्यूलेशन ट्रिगर होतं. बीज आपल्या गर्भाशयाजवळ एक ट्यूब असते तिकडे सरकू लागतं. या ट्यूबमध्ये बीज फक्त २४ तास राहतं. आणि नंतर येणाऱ्या पाळीमध्ये रक्तस्त्रावासोबत ते डिसकार्ड होतं. या काळात शुक्राणूसोबत अटॅच झालं तर फलन होतं.

ल्युटल फेज-

ओव्ह्यूलेशनच्या वेळी कोंबातून बीज बाहेर पडलं की ते कोंब तिथेच राहतं. मग पुढे दोन आठवड्यात हे फॉलिकल पुन्हा सांधले जाते ज्याला कॉर्पस ल्युटीअम म्हणतात. प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन्सच्या मदतीनं गर्भाशयाच्या बाहेर एक जाड स्तर निर्माण होतो.

जर फलन नाही झालं तर कॉर्पस ल्युटीअम या २८ दिवसांच्या सायकलच्या २२व्या दिवशी गळून पडतं. साहजिकच प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, जाड स्तर हळूहळू कमी होऊन रक्तस्त्राव सुरू होतो.

हीच मासिक पाळी.

मासिक पाळीबाबत म्हणावी तेवढी जागरूकता नाही, योग्य ती काळजी घेताना फार कमी बायका दिसतात. सर्रास वापरले जाणारे केमिकलवाले सॅनिटरी नॅपकिन्स खरंतर अत्यंत धोकादायक.

सहा तासांच्या वर हे नॅपकिन्स वापरणं इन्फेक्शन्सला आमंत्रण देणारं. घरी ठीक आहे. पण कामावर असताना सारखंच बदलणं शक्य होत नाही, बऱ्याच ठिकाणी डीस्पोस करायची सोय नीट नसते. अशावेळी फार पंचाईत होते. आणि ऑरगॅनिक नॅपकिन्स सगळ्यांनाच परवडतील असे नाही.

टीव्हीवर जाहिरातीत जशी मुलगी पहाड चढते इकडे तिकडे उद्या मारते असं काहीही होत नसतं.

फारच त्रास होत असेल किंवा नसेलही होत तरी रेग्युलर स्त्रीरोगतज्ज्ञाकडे जाऊन आपली तपासणी करुन घेणे जास्ती योग्य. आजकालच्या राहणीमानामुळे PCOD/PCOS बरे होऊ शकतात. शक्यतो आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथीचा उपचार घेतला जातो, साईड इफेक्ट्स कमी असतात.

बाकी, आपल्या आजूबाजूला बहीण, आई, बायको, मैत्रीण, कलीग असतील त्यांची तुमच्याकडून होईल तेवढी काळजी घ्या. खाण्यापिण्याची, त्यांना शक्य तेवढा आराम द्या, गरम पाण्याची पिशवी शेकायला द्या त्याने फार आराम पडतो.

पॅडमॅन आणि अशा सिनेमांमुळे मासिक पाळीचा टॅबु हळूहळू कमी होतोय, जागरूकता वाढू लागली आहे. जागतिक मासिक पाळी दिन साजरा करणे हासुद्धा त्याचाच एक भाग.

त्यानिमित्ताने जी थोडी माहिती मला होती ती तुमच्यापर्यंत पोहचावी म्हणून हा लेखनप्रपंच!


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!