आफ्रिकेतील वाळवंटातून भारतातल्या शेतकऱ्यांवर येणारं ‘अस्मानी संकट’ : टोळधाड

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

‘टोळ’धाड हा शब्द ऐकला की शेतकऱ्याच्या अंगावर काटा येतो. एखाद्या आक्रमक राज्यकर्त्याने एखाद्या सार्वभौम भूमीवर आक्रमण करून त्या सुबत्त प्रदेशाची नासधूस केल्यावर जे चित्र निर्माण होतं अगदी तसंचं चित्र शेतकऱ्याच्या शेतात टोळधाड पडल्यावर निर्माण होत असतं.

शेतकरी आयुष्यभर इतरांच्या हितासाठी झटत असतो पण हे सर्व होत असतांना त्याच्या आयुष्यात बाधा निर्माण करणाऱ्या असंख्य गोष्टी असतात.

बऱ्याचदा निसर्ग साथ देत नाही, ऋतुचक्र बिघडल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर अगोदरच प्रचंड परिणाम होत असतो. पण तरी देखील ह्या दृष्टचक्रातून शेतकरी स्वत:ची यशस्वी पणे सुटका करून घेऊ शकला आणि त्याने याने यशस्वीपणे पीक उगवलं तरी त्याच्यासमोर ते टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असते.

ते आव्हान असते कीटकांचे आणि चराऊ प्राण्यांचे, यात शेतकरी प्राण्यांचा बंदोबस्त मनुष्यबळावर सहजरित्या करू शकतो पण कीटकांचा बंदोबस्त करण्यात शेतकऱ्याला नाकीनऊ येत असते.

हे कीटक शेतकऱ्याचे मोठे नुकसान करतात. शेतकऱ्याच्या पिकांना खराब करणाऱ्या प्रमुख कीटकांपैकी एक आहे ‘टोळ’ हा नाकतोड्या प्रजातीचा कीटक हा शेतकऱ्याच्या पिकाचा सर्वात मोठा शत्रू असतो.

 

tiddis-intrude the postman

 

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, पंजाब इत्यादी पश्चिमी राज्यात ह्या टोळधाडीचे प्रमाण अधिक प्रमाणात असून नुकतीच पाकिस्तानमध्ये सुरु झालेलं टोळधाडीचं सत्र भारताला येऊन धडकलं आहे.

यातून राजस्थान आणि गुजरात सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

आता पंजाब आणि हरियाणा नंतर महाराष्ट्रात टोळधाडीचे सत्र सुरु झाले आहे. यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पण ही टोळ धाड नेमकी काय असते आणि त्यामुळे नुकसान कसं होतं ते आपण आज जाणून घेऊयात..

टोळ आणि टोळधाड म्हणजे नेमकं काय ?

टोळ हा नाकतोड्याचा एक प्रकार आहे. टोळ प्रजातीत जबरदस्त प्रजनन क्षमता असते. ते मोठ्या संख्येने प्रजोप्तादन करतात. इतकंच नाही ह्या टोळ जातीच्या कीटकांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन करण्याची मोठी ताकद असते.

 

tiddis the postman

 

ते मोठ्या संख्येने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या जाऊ शकतात. त्यांचा ह्याच ताकदीमुळे ते शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमणात नुकसान करतात. ह्या टोळ प्रजातीचे अनेक प्रकार आहेत.

डेझर्ट लोकस्ट ही वाळवंटात आढळणारी टोळांची  प्रजाती आहे, जी प्रामुख्याने नुकसान होण्यास कारणीभूत ठरते आणि भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे.

याशिवाय मायग्रेटरी लोकस्ट, बॉम्बे लोकस्ट आणि ट्री लोकस्ट ह्या तीन अजून टोळ प्रजाती भारतात आढळतात.

टोळ कीटक पिकाचे नुकसान कशाप्रकारे करतात ?

टोळ कीटकांच्या  झुंडीच्या झुंडी शेतांवर आक्रमण करतात, ते सरळ सरळ पिकांवर जाऊन बसतात, अगदी शेंड्यापासून ते खोडापर्यंत ते पिकाच्या प्रत्येक झाडावर जाऊन बसतात.

कणीस, धान्य, फुलं, पानं, खोड ह्या सर्वांचे हे कीटक इतकं नुकसान करतात की काहीच उरत नाही, ६० % पेक्षा  जास्त पिकाचे नुकसान हे कीटक करत असतात.

त्यामुळे टोळधाडी नंतर शेताचे चित्रच पालटते आणि यासोबतच पिकांचे उत्पादन मोठया प्रमाणात घटते. कीटकांच्या संख्येवर टोळधाडीची तीव्रता ठरवली जात असते.

 

tiddi the postman

 

जर कीटकांची संख्या कमी असेल तर तीव्रता इतकी नसते पण जर ती जास्त असेल तर मात्र होणारे नुकसान हे मोठे असते.

टोळधाडीवर भारत सरकार काय करते ?

भारतात टोळधाड ही एक मोठी कृषीविषयक समस्या असल्याने भारत सरकार ह्यावर विविध उपाययोजना राबवत असते. भारत सरकारने टोळ प्रतिबंध योजनेची सुरुवात केली असून १९३९ साली स्थापन झालेल्या वृक्ष संवर्धन आणि जतन संस्थेने टोळधाड सूचक यंत्रणेची निर्मिती केली आहे.

ही संस्था भारताच्या कृषि मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. टोळधाड सूचक यंत्रणा वाळवंटी प्रदेशात टोळ्यांच्या उपद्रवावर आणि नुकसानावर नजर ठेवण्याचं कामी करते.

ही संस्था भारतभरात कार्यरत असली तरी राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागात ह्या संस्थेचे कार्य मोठ्या प्रमाणावर चालते कारण टोळांची संख्या ह्या भागात सर्वात जास्त आहे.

फरिदाबाद येथील केंद्र सरकारच्या वृक्ष संवर्धन आणि जतन महामंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एका लहानश्या टोळधाडीत धान्य इतक्या प्रमाणात त्या कीटकांकडून खाल्लं जातं की त्याच्या समोर हत्तींचा कळप देखील काहीच नाही.

हे कीटक एका हल्ल्यात १० हत्ती, २५ उंट आणि २५०० माणसांना पुरेल इतकं धान्य खातात आणि नष्ट करतात, यावरून तुम्हाला टोळधाड किती नुकसानदायक असते हे समजायला सोपे जाईल.

१९२६ -१९३१  ह्या कालावधीत टोळधाडीमुळे १० कोटी रुपयांचे नुकसान त्याकाळी नोंदवण्यात आले होते, ज्याची आज किंमत लावली तर हजारो कोटींच्या घरात आकडा जाण्याची शक्यता आहे. १९४०-१९४६ या साली नुकसानाची रक्कम प्रतिवर्ष दोन कोटी इतकी होती.

१९५९ ते १९६१ साली आलेल्या शेवटच्या टोळधाडीच्या साथीने ५० लाख रुपयांचे नुकसान प्रतिवर्षी केले होते.

१९६२, १९७५ आणि १९९३ साली देखील काही सौम्य दर्जाच्या टोळधाडीने कृषिक्षेत्राचे मोठे नुकसान केले होते.

टोळांच्या धाडींचा उगम हा आफ्रिकेतील वाळवंटात होतो तेथून ते अरबस्तानमार्गे भारतात येतात आणि इथल्या शेतकऱ्यांचे आयुष्य नष्ट करतात.

आज ह्या टोळधाडीवर सरकार जरी असंख्य उपाययोजन करत आहे परंतु ही समस्या समूळ नष्ट करणे अवघड आहे.

टोळधाडीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळत असली तरी ह्या समस्येवर अजूनही असा काही विशेष उपाय ण मिळाल्यामुळे आपलं पीक नष्ट होताना बघण्यावाचून शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो.

शास्त्रज्ञांच्या मते कालांतराने ही समस्या ग्लोबल वार्मिंगमुळे उद्भवणाऱ्या वाळवंटीकरणाबरोबर अधिक गंभीर होऊ शकते!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!