‘कामराज प्लॅन’मुळे कॉंग्रेस पक्ष संघटनेत आलेली मरगळ दूर झाली होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या कॉंग्रेसने देशाला अनेक असे नेते दिले, ज्यांनी देशाच्या जडणघडणीत मोठा वाटा दिला. १५ व्या वर्षी शिक्षण सोडून स्वातंत्र्य लढ्यात उतरलेल्या के. कामराज यांना आधुनिक भारतातील किंगमेकर म्हणून ओळखले जाते. १९६२ साली चीनकडून दारूण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतात कॉंग्रेस पक्षाची प्रतिमा काहीशी खालावली होती. अशावेळी ते पंडित नेहरूंच्या मदतीला धावून आले. पक्षीय संघटन मजबूत करण्यावर त्यांनी जास्त भर दिला.

२ ऑक्टोंबर १९६३ रोजी त्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांना तामिळनाडूचे कॉंग्रेस अध्यक्ष बनवण्याची मागणी केली.

मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षीय मोर्चेबांधणीसाठी संघटनेत काम करण्याचा त्यांचा हा प्लॅन कॉंग्रेसमध्ये बराच लोकप्रिय ठरला. याला कॉंग्रेसमध्ये कामराज प्लॅन म्हटले जाते.

(२०१९ मध्ये जेंव्हा कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या वेळी पराभव स्वीकारावा लागला तेंव्हाही या प्लॅनची बरीच चर्चा झाली होती.)

पंडित नेहरुंना त्यांचा हा प्लॅन इतका आवडला की, फक्त तामिळनाडूच नाही तर इतर ठिकाणीही त्यांनी हाच प्लॅन लागू करत, सहा कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये मोरारजी देसाई, लाल बहाद्दूर शास्त्री, बाबू जगजीवन राम आणि एस. के. पाटील यासारखे लोक होते. शिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रभानू गुप्त, मध्यप्रदेशचे मंडलोई, ओडीसाचे बिजू पटनायक या मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. यानंतर कामराज यांना कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नेमण्यात आले.

त्यांच्या मते पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी आपल्या सरकारी पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी आपली शक्ती कॉंग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी वापरावी. काही राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांच्या या प्लॅनमुळे नेहरुंना आपली नवी टीम उभारण्याची संधी मिळाली. याकाळातील त्यांची पक्षीय निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळेच कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकू शकले. पक्षाच्या उभारणीत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे केंद्रातील राजकारणात त्यांचे वजन वाढत गेले.

नेहरूंच्या निधनानंतर त्यांनीच पंतप्रधानपद स्वीकारावे अशी बहुतेक कॉंग्रेस नेत्यांची इच्छा होती. पण, त्यांनी मात्र लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या नावाला पाठींबा दिला. शास्त्री यांना पंतप्रधान बनवण्यात कामराज यांनीच पुढाकार घेतला. शास्त्रींच्या निधनानंतर जेंव्हा पुन्हा एकदा पंतप्रधानपद रिक्त झाले तेंव्हाही त्यांना पंतप्रधानपद स्वीकारण्याची संधी होती. मात्र याही वेळी त्यांनी इंदिरा गांधींचे नाव पुढे केले. कदाचित यामुळेच त्यांना किंगमेकर म्हटले जात असावे.

के. कामराज यांचा जन्म १५ जुलै १९०३ रोजी तामिळनाडूतील विरदुनगर येथे झाला. त्यांचे कुटुंब एक मध्यमवर्गीय व्यापारी कुटुंब होते. त्यांचे मूळ नाव कामाक्षी कुमारस्वामी नाडेर असे होते. नंतर त्यांनी बदलून आपले नाव के. कामराज असे केले. जलियनवाला बाग हत्याकांड घडले तेंव्हा ते १५ वर्षांचे होते. याच घटनेनंतर ते स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. १६ व्या वर्षी ते कॉंग्रेसमध्ये सामील झाले. १८ व्या वर्षी त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभाग नोंदवला.

१९३० साली गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरु केला. कामराज यांनी या आंदोलनात भाग घेतला.

मिठाच्या सत्याग्रहात त्यांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला. नंतरही त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. जवळपास ३००० दिवस त्यांनी तुरुंगात काढले. तुरुंगात राहूनच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

ते पहिल्यांदा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष झाले तेंव्हाही तुरुंगातूनच निवडणूक लढवली होती. परंतु तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नऊ महिन्यांतच त्यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या मते ज्या पदाशी तुम्हाला न्याय करता येत नाही, त्या पदावर राहण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नसतो.

१३ एप्रिल १९५४ रोजी ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. त्यांनी सलग तीनवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्राथमिक शिक्षण सुधारण्यावर जास्त जोर दिला. तामिळनाडूची साक्षरता ७ टक्क्यावरून ३७% वर आणली.

स्वातंत्र्यानंतर तामिळनाडूत जन्म घेणाऱ्या पिढीसाठी त्यांनी सारी मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. आपल्या कार्यकाळातच त्यांनी तामिळनाडूतील प्रत्येक गावात एक प्राथमिक शाळा असेल याची तरतूद केली. निरक्षरता पूर्णतः नष्ट करण्याचा त्यांनी चंगच बांधला. एवढेच नाही तर ११ वी पर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. शाळेत येणाऱ्या गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबवली. त्यांच्यामुळे तामिळनाडूमधील मुलांना तमिळ माध्यमातून शिक्षण घेणे शक्य झाले.

लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्युनंतर त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारावे अशी अनेकांची इच्छा होती. परंतु, ज्याला हिंदी आणि इंग्रजी नीट येत नाही त्याने भारताचे पंतप्रधानपद भूषवू नये असे त्यांचे मत होते. कामराज आणि त्याच्या सहकाऱ्यांना कॉंग्रेसमध्ये सिंडीकेट म्हणून ओळखले जायचे. इंदिरा गांधी पंतप्रधान असल्या तरी पक्षातील अंतर्गत राजकारणावर कामराज यांचीच पकड होती.

नेहरूंच्या मृत्युनंतर तर कामराज यांचे पक्षातील स्थान जास्तच मजबूत झाले. इंदिरा गांधी यांना सिंडिकेटची ताकद वाढू द्यायची नव्हती आणि म्हणूनच त्यांनी कामराज यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु केले.

हळूहळू पक्ष आणि सरकार यांच्यातील दुही वाढत गेल्याने १९६९ साली पक्षात फुट पडली. यानंतर मात्र, कामराज यांनी केंद्रीय राजकारणातून आपले लक्ष काढून घेतले आणि त्यांनी तामिळनाडूचा रस्ता धरला. १९७१ साली त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवली. कामराज यांना या निवडणुकीत यश मिळाले मात्र त्यांच्या पक्षाला म्हणजे कॉंग्रेस ओ (ऑर्गनायझेशन)ला मात्र सपशेल पराभव स्वीकारावा लागला. याचवेळी इंदिरा गांधी आणि त्यांची कॉंग्रेस आय मात्र मोठ्या संख्येने विजयी झाली. लोकांनी इंदिरांजींचे नेतृत्व मान्य केल्याचीच ही पोचपावती होती.

ज्या कामराज यांनी इंदिराजींना राजकारणाच्या प्रवाहात आणले त्यांनाच इंदिराजींनी कॉंग्रेसमधून बाहेरचा रस्ता दाखवला. इंदिराजींच्या पंतप्रधानपदासाठी कामराज यांनी वकिली केली असली तरी इंदिराजींच्या राज्यकारभाराची पद्धत त्यांना मुळीच मान्य नव्हती. इथेच दोघांच्यातील मतभेद वाढीस लागले.

१९७१ नंतर कामराज यांचा राजकारणातील प्रभाव कमी कमी होत गेला. गांधी जयंती दिनीच म्हणजे २ ऑक्टोबर १९७५ रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. १९७६ मध्ये त्यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!