आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
इजिप्तची राणी क्लिओपात्राला जगात आजवरची सर्वात सुंदर स्त्री मानले जाते. आजपर्यंत या राणीच्या महालात कोणालाच प्रवेश नव्हता, यामुळे या राणीच्या इतिहासाबद्दल आणि सुंदरतेविषयी लोकांचा मनात संभ्रम होते. आता तब्बल २००० वर्षांनी या महालाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे. काही पुरातत्व संशोधकांना अलेक्झांड्रिया शहराजवळ काही जुने नाणे आढळले होते. यावरून त्यांनी राणीच्या मकबऱ्याचा शोध सुरु केला.
इजिप्तच्या पुरातत्व संशोधक कॅथरीन मार्टिनेज यांना असे वाटते की लवकरच त्या क्लिओपात्राचा हरवलेला मकबरा शोधून काढतील. टॅपोसिरिस मॅग्ना मंदिर या मंदिराच्या जवळ त्यांना सापडलेल्या क्लिओपात्राच्या नाण्यांमुळे त्यांना जवळच तिचा मकबरा असण्याची शक्यता वाटतेय.
उत्खननात सापडलेल्या नाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या नाण्यांवर क्लिओपात्राचा चेहरा अंकित केलेला आढळून आला आहे. या चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजूला ग्रीक भाषेत क्लिओपात्रा असे कोरण्यात आले आहे. हे नाणे सापडल्याने जगातील सर्वात सुंदर स्त्रीचा चेहरा लवकरच जगासमोर आणण्यात यश मिळणार आहे असे दिसते.
पुरातत्व संशोधक डॉ. ग्लेन गॉडेन्हो यांनी विश्वास व्यक्त केला आहे की या प्राचीन नाण्यांमुळे क्लिओपात्राच्या आजवर रहस्यमय असलेल्या अस्तित्वाला मान्यता मिळते आहे. ज्याप्रकारे नाणे आढळून आले आहेत, त्याच प्रकारे तिचा एखादा मकबरा देखील आसपास जमिनीत गाडला गेलेला आहे. या भागात उत्खनन करून लवकरात लवकर हा मकबरा बाहेर काढून त्यातील क्लिओपात्राच्या थडग्याचा शोध घेण्यात येणार आहे.
या मकबऱ्याच्या शोधाने आजवर कथांमधून जगातील सर्वात स्त्री मानण्यात आलेली क्लिओपात्रा वास्तवात किती सुंदर होती, हे जगासमोर येणार आहे. असं म्हणतात की राणी तितकी सुंदर नव्हती, पण ती त्या काळात वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांमुळे सुंदर दिसत होती. त्या काळात ती कुठले सौंदर्य प्रसाधन वापरत असावी, याची आपण कल्पना करू शकत नाही.
एका अख्यायिकेनुसार क्लिओपात्रा ही रोज मादी गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची, यामुळे तिच्या शरीरावर वय वाढण्याचे कुठलेच चिन्ह दिसत नव्हते. तिच्या केसांना आणि शरीराला अत्तर लावायला तिच्या दासी रात्रंदिवस काम करायच्या. हे अत्तर खास फुल आणि वनौषधींच्या मदतीने तयार केले जात होते.
ही राणी जितकी सुंदर होती, तितकी बुद्धीने चाणाक्ष देखील होती. तिच्या बुद्धीचा पैलू तिच्या सौंदर्याच्या चर्चेमुळे दुर्लक्षित राहिला आहे. ती फार बुद्धिमान व बहुभाषिक होती. एका रिपोर्टनुसार क्लिओपात्राला १२ हुन अधिक भाषांचे ज्ञान होते.
या राणीच्या सौंदर्याचे दोन दिवाने होते. पहिला होता ज्युलियस सीझर आणि दुसरा होता मार्क अँथनी. मार्क अँथनीशी या राणीने लग्न केलं होतं. रोमन जनरल मार्क अँथनी हा एक शूर सेनानी आणि कुशाग्र बुद्धीचा माणूस होता. त्याची आणि क्लिओपात्राची जोडी काही खास कारणांमुळे खूप चांगल्याप्रकारे मेळ खायची.
दोघांनाही दारूचे वेड होते. ते इतकेदारू प्रेमी होते की यांनी बेवड्यांचा ‘Inimitable Livers’ नावाचा क्लब स्थापन केला होता. आपल्या काही वफादार साथीदारांना घेऊन दोघेही कित्येक दिवस दारू पित बसायचे. त्यावेळी क्लिओपात्रा वेष बदलून शहरात फिरायची.
क्लिओपात्राच्या रहस्यमय मृत्यूबद्दलचे गूढ मात्र अजूनही कायम आहे. काही इतिहासकार मानतात की साप चावल्याने तिचा मृत्यू झाला. काही म्हणतात तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला. ती स्वत: सोबत खूप सारे कंगवे घेऊन फिरायची, या कंगव्यामुळे तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला असंही काही लोकांचं म्हणणं आहे.
क्लिओपात्रावर हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. १९६३मध्ये आलेल्या क्लिओपात्रा नावाच्या चित्रपटाने मोठे यश कमावले. हा त्यावेळचा सर्वाधिक खर्च करुन तयार करण्यात आलेला चित्रपट होता. यातील बहुतांश खर्च क्लिओपात्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या कपड्यांवर करण्यात आला होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.