आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगातील विविध देशांतील सुरक्षा कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे, काही ठिकाणी अतिशय विचित्र गणवेश आहेत, उदाहरणार्थ चिनी सैनिकाची मान सतत उंच राहावी यासाठी शर्टच्या कॉलरवर पिन लावली जाते, फिजीच्या राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचा स्कर्ट, मंगोल सैन्याचा याकच्या पांढऱ्या अथवा काळ्या केसांच्या लाठ्या, ब्रिटिशांचे लांब लाल कोट आणि काली केसाळ टोपी , युरोपातील रोमन सैन्याप्रमाणे वेशभूषा करणारं वॅटिकन सैन्य, असे अनेक चित्र-विचित्र गणवेश असणारे सुरक्षा दलं जगभरात आहेत.
दलाचे सैनिक त्यांच्या सहकारी सैनिकांची ओळख पटण्यासाठी आणि त्यांची स्फूर्ती वाढवण्यासाठी गणवेश परिधान करतात. त्यांचे गणवेश त्यांना वेगवेगळ्या प्रकारे यु*द्धात मदत पुरवतात. काही औद्योगिक कंपन्यांना त्यांच्या सर्व कामगारांना गणवेश घालण्याची आवश्यकता असते, जेणेकरून ग्राहकांना कामगार ओळखण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, इंडियन पोस्टचे सर्व कर्मचारी आणि पोस्टमन सर्व एकसारखे तपकिरी गणवेश घालतात.
शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील गणवेश परिधान अनिवार्य आहे. बऱ्याच पालकांना शाळेचा गणवेश आवडतो, कारण ते शाळेत जाताना काय परिधान करायचे हे शोधून कंटाळतात. त्याचप्रमाणे गणवेश अवास्तव कपड्यांचा खर्च कमी करू शकतो, कारण ते इतर लोकप्रिय शैलींपेक्षा सामान्यतः कमी खर्चिक असतात.
भारतातही राजस्थानमधील सीमा सुरक्षा बलाचे सैनिक त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या मिशीच्या ठेवणीसाठी आणि वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला ते उंटांवरून राजपथ गाजवतात. या शिवाय कोणताही शीख कोणत्याही सुरक्षा बलात कार्यरत असो, त्याच्या शिरावर शीख पद्धतीची पगडी, आणि कमरेला कृपण हे असतंच. अगदी ब्रिटिश सैन्यातील शीख सैनिकसुद्धा त्यांचा हा गणवेश सोडत नाहीत.
असे अनेक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण गणवेश असल्यावर भारतीय पोलीस तरी कसे मागे राहतील? ऐतिहासिक वारसा असल्यामुळे, वाढत्या मिशांसाठीचा भत्ता फक्त मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या भारतीय राज्यांतील पोलिस कर्मचाऱ्यांना दिला जातो. मिशा वाढवण्याबद्दलचा भत्ता देऊ करणं हे भारतीय संहितेच्या प्रोव्हिजनल अर्म्ड कॉन्स्टेबलरीच्या गणवेशासंबंधीच्या नियमांत बसतं.
जरी मिशा ठेवणं हे भारतीय पोलिसांच्या नियमात बसत असलं तरी मोठी दाढी वाढवणं हे अवैध आहे. भारतीय पोलीस (गणवेश) सेवा नियम १९५४, १९८६ चे उत्तर प्रदेश राज्याचे गणवेशाबद्दलचे नियम, आणि प्रोव्हिजनल अर्म्ड कॉन्स्टेबलरीचे नियम या नियमांतून एका पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश तयार होतो.
उत्तर प्रदेशात १९८६ सालीच मिशांसाठीचा भत्ता सुरु करण्यात आला होता. सुरुवातीला महिन्याचे ५० ते १०० रुपये इतका भत्ता तर रुंद, रुबाबदार आणि मजबूत मिशा असतील तर महिन्याचे २५० रुपये असा भत्ता देण्यात येत होता. १९९५ पर्यंत रुंद आणि रुबाबदार मिशा ठेवण्याचं प्रमाण जास्त होतं. पण १९९५ नंतर तरुण पिढीने क्लीन शेवला पसंती दिली होती.
तर मध्य प्रदेशात, फक्त काही जिल्ह्यांचे अधिकारी दरमहा ३३ रुपये इतका मिशी ठेवण्यासाठीचा भत्ता घेत असत.
धार्मिक काळात दाढी राखू इच्छिणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनी पूर्व परवानगी घ्यावी असं २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले होते.
तर २०१९ मध्ये आग्रा पोलिसांनी उपनिरीक्षक हरेंद्र पाल सिंह यांना वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडून मिशा प्रोत्साहन भत्ता म्हणजे रोख स्वरूपातील बक्षीस दिल्याबद्दल ट्विट केले होते.
सुरक्षा दलाचा गणवेश हा फक्त दिसण्याचा विषय नसून त्याच्यामागे एक दृढ भावना असते. म्हणूनच कोणत्याही ‘वर्दी’ला मोठा मान मिळतो. मिशा ठेवणं ही भारतीय यो*द्ध्यांची एक परंपरा राहिलेली आहे. मग कोणताही ऐतिहासिक काळ असो, अगदी महाभारत-रामायणापासून ते आधुनिक राजपूत, मराठा आणि शीख साम्राज्यांपर्यंत मिशा असणं हे यो*द्ध्यांच्या पराक्रमाचं प्रतीक मानलं गेलं आहे. तसेच शीख धर्मात शीख पद्धतीची पगडी आणि कृपण हे क्षत्रियत्वाचं प्रतीक असून आजही शीख बांधव कोणत्याही देशात, राज्यात ते अभिमानाने मिरवतात.
सुरक्षा दलं ही प्रामुख्याने स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी असतात (निदान भारताची तरी). जर माणसाने ‘स्व’त्वच नाही जपलं तर तो कोणत्या प्रेरणेने यु*द्धभूमीवर लढणार? पण स्व’त्वाबरोबरच यु*द्ध करण्याच्या प्रेरणेसाठी यु*द्धाच्या कारणात नैतिकता असायला हवी. अन्यथा अफगाणिस्तानात रशियाच्या आणि अमेरिकेच्या सैन्याचं काय झालं याचा इतिहास साक्षीदार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.