या ४ भारतीयांना युनोने दहशतवादी म्हणून घोषित करावं यासाठी पाकिस्तानने जंग जंग पछाडलं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जेव्हापासून नेहरूंनी 1950 साली काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला त्याच्यानंतर पाकिस्तानने प्रत्येक वेळी भारताच्या कुरापती काढलेल्या आहेत आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये जाऊन मात्र उलट भारताच्या विरोधात नगारा पिटला आहे.

जम्मू-काश्मीर संदर्भात पाकिस्तानने युनोमध्ये नेहमीच भडकाऊ भाषणे केली आहेत आणि खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाकिस्तानचा हा प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी देखील होत होता.

परंतु अमेरिकेतील ११/०९च्या हल्ल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. त्याअगोदर फक्त भारताला पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा त्रास व्हायचा. मात्र युरोपियन देश आणि अमेरिका यांना जेव्हा दहशतवादाचा फटका बसला तेव्हा मात्र सगळे खडबडून जागे झाले.

इतके दिवस अमेरिकेने पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवादी लष्करी संघटनांकडे दुर्लक्ष करत होते. एवढेच नाही तर त्यांना पैसेही पूरवले. दुसरीकडे अमेरिकेबरोबर लांगूलचालन करून पाकिस्तान चीनची दाढी देखील कुरवाळत होता. जेणेकरून भारताला कोंडीत पकडता येईल.

मात्र आता परिस्थिती विपरीत आहे 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णच बदलले. भारताच्या पंतप्रधानांनी देशोदेशी जाऊन तिथल्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्यांचे भारताबद्दलचे मत बदलण्यास भाग पाडले. याचा परिणाम म्हणजे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा अधिक मजबूत झालेली आहे.

युनोमध्ये आता पाकिस्तानने कितीही कांगावा केला तरी बाकीचे देश त्याला काडीचीही किंमत देत नाहीत.

नुकतीच संयुक्त राष्ट्र संघ स्थापनेची 75 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने युनोच्या मुख्यालयामध्ये मोठा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. त्यासाठी देशोदेशीचे राजदूत उपस्थित होते. या बैठकीमध्ये पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद छेडला होता. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तान हे दहशतवादी यांचे केंद्र बनले आहे. अनेक दहशतवादी संघटनांच्या लोकांनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेला आहे. शिवाय पाकिस्तानमध्ये गेली कित्येक वर्षे अल्पसंख्यांकांवर प्रचंड अन्याय होतो आहे. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे, अशा अनेक मुद्द्यांवर भारताने पाकिस्तानच्या मुद्द्यांचे खंडन केले होते. ज्याला अनेक देशांनी अनुमोदन दिले.

सध्या जगभरात भारताचा वाढलेला प्रभाव पाहून पाकिस्तानची प्रचंड जळजळ होते आहे. कुठल्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडीत पकडता येईल याकडे पाकिस्तानचे लक्ष असते.

युनोने अल-कायदा प्रतिबंधक सूची नावाची लिस्ट बनवलेली आहे. ज्यामध्ये जगभरात जे अल कायदाचे हस्तक छुप्या रीतीने काम करतात त्यांना आयडेंटिफाय करण्याचे आणि त्यासंदर्भात प्रत्येक देशाच्या सरकारला अलर्ट ठेवण्याचे काम केले जाते.

या सूचीमध्ये पाकिस्तानमधील जवळपास 200हून जास्त नागरिकांचा उल्लेख आहे ही विशेष बाब. तरीही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या चार भारतीयांचे नाव या प्रतिबंधक सूचीमध्ये घालावे म्हणून युनोमध्ये जोरदार निदर्शने केलेली होती.

अंगारा अप्पाजी, गोविंद पटनायक, अजय मिस्त्री, वेणुमाधव डोंगरा. या चार भारतीयांची नावे युनोच्या अल-कायदा प्रतिबंधक सूचीमध्ये सामील व्हावे म्हणून पाकिस्तानचे प्रयत्न चालू होते.

हे चौघही सध्या अफगाणिस्तान येथे काम करतात.

पाकिस्तान केवळ त्या सूचीमध्ये यांचे नावं यावे एवढ्यावरच थांबला नाही तर, या चौघांना एकटे गाठून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याचे षड्यंत्र देखील पाकिस्तानने रचले होते. जेव्हा पाकिस्तानने युनोमध्ये हा ठराव मांडला तेव्हा या ठरावाला कुठल्याही देशाने पाठिंबा दिला नाही. उलट जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, इजिप्त, पोलांड, रशिया या देशांनी पाकिस्तानच्या या मुद्द्याचे खंडन केले.

याअगोदर जून आणि जुलैमध्ये देखील या भारतीय नागरिकांना दहशतवाद्यांचा दर्जा द्यावा अशी मागणी पाकिस्तानने युनोमध्ये केली होती. युनोच्या कामकाजाचे राजकारण करण्याचे हे पाकिस्तानचे हीन प्रयत्न आहेत अशा शब्दात भारताने प्रतिक्रिया नोंदवली.

सप्टेंबर महिन्यात जेव्हा पाकिस्तानने पुन्हा एकदा या चार भारतीय नागरिकांच्या विरोधात युनोमध्ये तक्रार केली असता युनोच्या सुरक्षा समितीच्या सदस्य देशांनी भारताला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली.

आता प्रश्न असा आहे की अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या या चार भारतीयांबाबत पाकिस्तानने हे पाऊल का उचलले?

पूर्वी अफगाणिस्तानमध्ये जास्तीत जास्त पाकिस्तानी नागरिक काम करत असायचे. अफगाणिस्तानमध्ये जे प्रोजेक्ट चालत असत मग ते शैक्षणिक असतील, आर्थिक असतील, तंत्रज्ञानविषयक असतील त्यामध्ये मूलतः पाकिस्तानवरून मनुष्यबळ उपलब्ध व्हायचे.

परंतु आता अफगाणिस्तान भारताकडून वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची मदत घेतो. भारतातील अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स, सरकारी अधिकारी, अभियंते आणि इतर विविध क्षेत्रातील कारागीर अफगाणिस्तानला जाऊन काम करीत असतात. यामुळे पाकिस्तानच्या रोजगारनिर्मितीला मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळे भारतीय कामगार हे काम करण्याच्या लायकीचे नाहीत आणि त्यांचे दहशतवाद्यांबरोबर संबंध आहेत असा बादरायण शोध पाकिस्तान लावत आहे.

या चौघांपैकी वेणू माधव डोंगर आहे अभियंता आहेत. अफगाणिस्तानमधल्या पावर प्रोजेक्टवर त्यांनी काम केलेले आहे ज्यामुळे अफगाणिस्तानमधील खेड्यांना वीज पुरवता येईल.

बाकीचे तीन लोक असेच वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करतात. त्यांचे पद मोठे आहे आणि त्यांना अधिकार भरपूर आहेत हे लक्षात घेऊन पाकिस्तानने त्यांच्यावर निशाणा चालवलेला होता. ही गोष्ट अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या भारतीय परराष्ट्र मंडळाच्या कार्यालयाला समजल्यानंतर त्यांनी या चारही भारतीयांना अफगाणिस्तानमधून जुलै महिन्यात बाहेर काढले होते.

हे चौघही आज भारतात परतले आहेत. मात्र या लोकांना ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी पाकिस्तानने लावून धरली होती. पाकिस्तानची ही मागणी युनोने स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावली. हा भारताचा एक मोठा राजनैतिक विजय झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!