भारताची मान जगभरात उंचावणारे हे अज्ञात खेळाडू आपल्याला माहीत असायलाच हवेत!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब


भारताला क्रीडा क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभला आहे. भारताच्या अनेक खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे. ध्यानचंद, कपिल देव, प्रकाश पदुकोन अशी अनेक नावे सांगता येतील ज्यांनी क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव मोठे केले आहे. आजही अनेक खेळाडू वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात भारताचे नाव रोशन करत आहेत.

आज क्रीडा क्षेत्रातील करिअर, त्यात मिळणारे यश, प्रसिद्धी यामुळे क्रीडा क्षेत्राकडे करिअरच्या अंगाने बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आज साधनांची आणि संधीची सोयही वाढली आहे. अर्थात क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी भारताकडे जाऊनही भरपूर संधी आहे.

परंतु, पूर्वीही भारतात असे काही महान खेळाडू होऊन गेले ज्यांनी फारसे साधनं उपलब्ध नसतानाही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या नावाचा झेंडा फडकवला. पण, अशा क्रीडापटूंची तितकीच हेळसांड देखील झाली.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी खेचून आणलेला विजय असाधारणच होता. तरीही त्यांच्या या कर्तृत्वाची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही. क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात अशा कित्येक असामान्य हस्ती होऊन गेल्या ज्यांचे कर्तृत्व आठवणे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणे आपले कर्तव्य आहे.

१. मिहीर सेन

अशाच दुर्लक्षित खेळाडूंपैकी एक असणारे मिहीर सेन. एकाच वर्षात पाच खंडातील समुद्र पोहून त्यांनी भारतीयांची क्षमता सिद्ध करून दाखवली होती.

मिहीर यांच्या घराची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांची आई कोंबड्या आणि त्यांची अंडी विकून घर खर्च चालवत असे. सेन यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ते रात्रीच्या वेळी हमाली करायचे.

इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला फोरेन्स चॅडविक हिच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी देखील ही खाडी पार करण्याचा निश्चय केला. २७ सप्टेंबर १९५८ रोजी त्यांनी १४ तास ४५ मिनिटात इंग्लिश खाडी पोहून पार केली. त्यांच्या या रेकॉर्डसाठी पुढच्याच वर्षी त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

Mihir Sen the postman
Mihir Sen

परंतु पाच खंडातील समुद्र पोहून पालथे घालण्याची त्यांची इच्छा होती. भारत आणि श्रीलंका दरम्यानची पाल्क खाडी पोहण्यासाठी त्यांना २५ तास २६ मिनिटे एवढा कालवधी लागला.

५-६ एप्रिल १९६६ रोजी त्यांनी हे अंतर पार केले. त्यानंतर लागलीच युरोप ते आफ्रिका दरम्यानची गीब्राल्टार खाडी पोहण्याचा विक्रम त्यांनी केला. ही खाडी पार करण्यासाठी त्यांना ८ तास लागले. २४ ऑगस्ट १९६६ रोजी त्यांनी हा विक्रम नोंदवला.

२९ ते ३१ ऑक्टोबर या दोन दिवसात त्यांनी बॉस्फोरस (४ तास), दर्डानेलेस (जवळपास १४ तास) युरोप ते सेड्युलबाबीर या दरम्यान ही खाडी आहे, हिला पार करण्यासाठी त्यांना १४ तासाचा कालावधी लागला. त्यानंतर संपूर्ण पनामा कालवा त्यांनी ३४ तास आणि १५ मिनिटात पूर्ण केला.

अवघ्या दोन दिवसात सलग हे रेकॉर्ड बनवल्याने गिनीज बुकमध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली. पुढच्याच वर्षी त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. परंतु अत्यंत कठीण प्रसंगात त्यांचा मृत्यू ओढवला.

२. खाशाबा दादासाहेब जाधव

सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर या खेडेगावात खाशाबा यांचा जन्म झाला. जाधव यांच्या घरी कुस्तीची परंपरा होती. त्यांचे वडील दादासाहेब जाधव पैलवान होते. पुढे त्यांनी चले जाव आंदोलनात देखील भाग घेतला. स्वातंत्र्यसैनिकांना आसरा देणे, लपण्यासाठी जागा देणे अशी कामे त्यांनी केली.

छत्रपती राजर्षी शाहुंच्या राजाश्रयाने त्यांना १९४८ साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यानंतर चार वर्षांनी हेलसिंकी येथे भरलेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कुस्तीतील ब्राँझ पदक जिंकले.

Khashaba Jadhav

स्वतंत्र भारतातील ऑलिम्पिक पदक जिंकणारे ते पहिले खेळाडू होते.

लोकांनी वर्गणी काढून त्याच्या हेलसिंकी दौऱ्याचा खर्च भागवला होता. पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या या खेळाडूचे शेवटचे दिवस मात्र अत्यंत हलाखीत गेले.

३. जयपाल सिंग मुंडा

१९२८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीत सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या संघाचे ते कर्णधार होते. त्यांनी आदिवासी जमातीच्या हक्कासाठी जन्मभर लढा दिला. शिवाय ते संविधान सभेचे एक जबाबदार सदस्यही होते. अनेक आदिवासी कुटुंबाप्रमाणेच जयपाल यांचे वडीलसुद्धा सामान्य शेतकरी होते. आयसीएससाठी प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची निवड झालेली असताना भारतीय हॉकी संघाकडून त्यांना आमंत्रित करण्यात आले.

 

ऍमस्टरडॅम येथे होणाऱ्या स्पर्धेत त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. आयसीएस की हॉकी अशी निवड करण्याची वेळ आली तेंव्हा मुंडा यांनी नागरी सेवेतील नोकरीऐवजी हॉकीची निवड केली. आदिवासी असूनही त्यांना संघात स्थान दिल्याबद्दल अनेकांना आक्षेप होता.

पण, मुंडा यांच्या खेळण्याने हॉकीपटू ध्यानचंद यांची आठवण ताजी केली. त्यांच्या टीमने केलेल्या कामगिरीमुळे भारताला या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकता आले.

४. डॉ. तालीमेरेन आओ

डॉ. तालीमेरेन आओ हे भारतीय फुटबॉल संघाचे पाहिले कर्णधार होते. ताय आओ या टोपण नावाने त्यांना ओळखले जाते. ताय नागालँडचे रहिवासी होते.

१९४८ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताच्या फुटबॉल संघाचे नेतृत्व केले. या संघात सैलेन मन्ना आणि ताज मोहम्मदसारखे दिग्गज खेळाडू देखील होते.

५. मोहम्मद सलीम

मोहम्मद सलीम हे एक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू होते. कलकत्ता येथील मोहम्मद यांनी आपल्या खेळाने युरोपचे देखील लक्ष वेधून घेतले होते. मोहमेडन स्पोर्टिंग क्लबचे ते स्टार खेळाडू होते. अमेरिकेला जाण्यापूर्वी ते चीनसोबत झालेल्या मॅचेसमध्येही खेळले.

सेल्टिक एफसी या नावाजलेल्या स्कॉटीश क्लब आणि युरोपियन फुटबॉल संघासमोर त्यांनी केलेल्या शानदार प्रदर्शनाने सर्वजण अवाकच झाले. एक भारतीय प्रसिद्ध स्कॉटीश संघाकडून खेळणार या कल्पनेनेच सेल्टिकचा व्यवस्थापक विली मेले याला हसू फुटले होते. परंतु, मोहम्मद सलीम यांनी आपल्या खेळातून आपली पात्रता सिद्ध करून दाखवली.

नंतर मात्र स्कॉटीश क्लबने त्यांना दोन मॅचेस खेळण्याची संधी दिली. या दोन्ही मॅचेसमध्ये त्यांनी संघाला विजय मिळवून दिला. परंतु, परदेशी वातावरण सहन न झाल्याने मोहम्मद व्यावसायिक करार न करताच भारतात परत आले.

६. आरती सहा

आरती सहा यांचा जन्म एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. १००मी ब्रेस्टस्ट्रोक पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी ऑल इंडिया रेकॉर्ड साधलं आहे. इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला होण्याचा बहुमान त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षीच पटकावला.

arati shah
Arati Shah

१६ तास २० मिनिटात ही खाडी पार करून सर्वात जलद खाडी पार करण्याचा विक्रमही त्यांनी मोडीत काढला. यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात पद्मश्रीने सन्मानित झालेली त्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या.

७. मुरलीकांत पेटकर

पॅरालंपिक्समध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारे पेटकर हे पहिले खेळाडू आहेत.

१९७२ सालच्या जर्मनी येथे झालेल्या पॅरालंपिक्समध्ये फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये पेटकर यांनी सुवर्णपदक पटकावले होते.

पेटकर भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागात कामाला होते. पूर्वी ते बॉक्सर होते, परंतु १९६५च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी बॉक्सिंग सोडून दिले. त्यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भारताचे नाव उज्वल करणाऱ्या या खेळाडूंची आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची माहिती एक भारतीय म्हणून आपल्याला असायलाच हवी!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!