आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपण केलेल्या कामाचे महत्त्व फक्त त्या कामावर अवलंबून नसते तर आपण किती प्रमाणात काम केले याला अधिक महत्त्व असते. प्रत्येक कामाचे किंवा वस्तूचे मोजमाप केल्यानेच त्याचे महत्त्व आपल्याला प्रकर्षाने जाणवते. आपण दैनंदिन जीवनात अनेक कामे करतो, पण त्या कामांचं मोजमाप केल्याशिवाय कशालाही पूर्णत्व प्राप्त होत नाही. मग ते तुमच्या वैयक्तिक जीवनातील काम असो किंवा व्यावहारिक जीवनातील. मोजमाप हे सगळीकडेच महत्त्वाचे आहे.
जेव्हा आपण कार किंवा बाईक चालवतो, तेव्हा त्या वाहनाचा वेग मैल प्रति तास किंवा किलोमीटर प्रति तास या एककांमध्ये मोजला जातो. पण बोट किंवा जहाजाच्या बाबतीत मोजमाप बदलले जाते आणि जहाज अथवा बोटीचा वेग मोजण्यासाठी ‘नॉट’ हे एकक वापरतात. हेच एकक विमानाची गती मोजण्यासाठीही वापरली जाते. पण जहाजांच्या स्पीडचे एकक हे ‘नॉट’ आणि समुद्री अंतर नॉटिकल माइल्समध्ये का मोजले जाते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल.
गॅलिलियो आणि काही शास्त्रज्ञांनी पृथ्वी गोलाकार असल्याचं सांगितल्यानंतर युरोपातून जागतिक प्रवासाला आणि अनेक भौगोलिक शोधांना सुरुवात झाली. त्यावेळी कोलंबससारख्या जागतिक खलाशांनी जगभर प्रवास करून अनेक खंडं, बेटं आणि देशांची ओळख युरोपीय लोकांना करून दिली.
पण जहाजे किनाऱ्यापासून दूर आणि समुद्राच्या मध्यभागी असताना त्यांना दिशा, अंतिम गंतव्य आणि लागणारा एकूण वेळ इत्यादी गोष्टी ठरवण्यासाठी त्यावेळी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा उपयोग करावा लागला. कारण साहजिकच त्या काळात जी.पी.एस. आणि ‘रेडिमेड’ नकाशांसारखी अत्याधुनिक साधने नव्हती. अशा वेळेस काही जहाजे समुद्रात हरवणे, जहाजांना गंभीर अपघात होणे असे प्रकार सातत्याने होऊ लागल्याने जहाजाच्या वेगासह इतर काही गोष्टी जाणून घेणे अत्यावश्यक ठरले!
वेग जाणून घेतल्याशिवाय जहाजे कोणत्याही अंदाजाविना किनाऱ्यापासून दूर जात असत आणि दिशाहीन होऊन समुद्रात हरवत असल्याने कित्येकदा ते जीवघेणेही ठरत होते. दिशादर्शनासाठी आणि अंतिम गंतव्यावर पोहोचण्याच्या निर्धारित वेळेसाठी एखादे जहाज नेमके किती वेगाने पुढे सरकत आहे हे जाणून घेणे अत्यावश्यक होते. त्यासाठी काही युरोपियन लोकांनी एक युक्ती शोधून काढली.
‘नॉट’ या इंग्रजी शब्दाचा शब्दशः अर्थ ‘गाठ’ असा आहे. या एककाचा दोरीशी काहीतरी संबंध असल्यासारखे वाटते, आणि ते खरेही आहे. ‘नॉट’ या शब्दाचा उपयोग सतराव्या शतकापासून ‘परिमाण’ म्हणून केला जात आहे. समुद्री मैलाच्या (नौटिकल माईल) लांबीवर ‘नॉट’ आधारित आहे. सतराव्या शतकातील खलाशी आणि नाविक ‘कॉमन लॉग’ किंवा ‘चिप लॉग’ नावाचे साधन वापरून जहाजाची गती ठरवत असत.
‘कॉमन लॉग’ म्हणजे त्रिकोणी लाकडी फिरकी आणि रीळभोवती अडकवलेली दोरी. नॉटिकल मैलाच्या लांबीच्या आधारावर, या लांबलचक दोरीला सुमारे १४ मीटरच्या अंतराने गाठी बांधलेल्या असत. दोरीचे एक टोक आणि रीळ जहाजाला जोडून लाकडी पाचर पाण्यात टाकली जात असे. लाकडी पाचर पाण्यात स्थिर राहावी यासाठी त्या त्रिकोणी आकाराच्या लाकडी पाचरेला तीन कोपऱ्यांमधून दोरीच्या गाठी बांधलेल्या होत्या.
वेळ मोजण्यासाठी सॅण्ड क्लॉकचा उपयोग होत असत. सॅण्ड क्लॉकचा वापर करून, जहाजावरील क्रू-मेम्बर्स पाण्यात सोडलेल्या त्रिकोणी लाकडी तुकड्याशी बांधलेल्या दोरींवरील गाठींची संख्या २८ सेकंदांसाठी मोजत असत. जहाज किती वेगाने प्रवास करत आहे हे ठराविक वेळ निघून गेल्यानंतर मोजल्या गेलेल्या गाठींच्या संख्येवरुन समजत असत. ही प्रक्रिया प्रत्येकी अर्ध्या तासात एकदा होत असत. जहाजावर प्रत्येक अर्ध्या तासानंतर एक बेल होत असे. जहाजाचा एकूण वेग आणि दिशा ठरवण्यासाठी ट्रॅव्हर्स बोर्डचाही वापर होत असत.
ट्रॅव्हर्स बोर्डवर एकूण आठ ओळी आणि दिशादर्शक असत. समजा २८ सेकंदासाठी केलेल्या एका मोजमापानंतर ५ नौटिकल माइल्स एवढा स्पीड कॅल्क्युलेट झाला तर ५ व्या ओळीत एक काडी लावली जात असे. त्याचवेळी जहाज ज्या दिशेस जात आहे त्या दिशादर्शक ठिकाणी एक काडी लावली जात असे.
प्रत्येकी चार तासाच्या निरीक्षणावरून जहाजाची सरासरी गती ठरवली जात. ‘ट्रॅव्हर्स बोर्ड’च्या साहाय्याने प्रत्येकी चार घड्याळी तासांना (अर्ध्या तासाच्या आठ बेल्सनंतर )किती नॉटस प्रति मैल प्रवास झाला याची नोंद ठेवली जात असे. एका विशिष्ट वेळेनंतर हा ‘ट्रॅव्हर्स बोर्ड’ जहाजाच्या कप्तानाकडे नेला जात. कप्तान या ट्रॅव्हर्स बोर्डची स्वतःकडे असलेल्या नकाशाशी तुलना करून अंतर, गंतव्यापर्यंत पोहोचण्याचा वेळ, वेग इत्यादींची काहीशी किचकट पण अचूक गणना करत असे.
एक समुद्री मैल (नॉटिकल माईल) पृथ्वीच्या परिघावर आधारित आहे आणि एक नॉटिकल माईल एक मिनिट अक्षांशाइतके असते. प्रत्यक्ष जमिनीवरील मैल आणि समुद्री मैल नॉटिकल मैल यांच्यात फारसा फरक नाही. साधारणतः १ नॉटिकल मैल = १.१५०८ मैल!
प्रवासाच्या संपूर्ण वेळेत खलाशांना जहाजाची अचूक गती वेळोवेळी कळेल अशी कोणतीही स्पीडोमीटरसारखी सोय नव्हती आणि ते किती वेगाने प्रवास करत होते याची सरासरी काढण्यासाठी त्यांना स्वतः दिवसभर गतीचे मोजमाप करावे लागत असे. यामुळे त्यांना जहाजाचे समुद्रातील स्थान आणि गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा वेळ या गोष्टी अधिक अचूकपणे ठरवता आल्या.
आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानात वेग मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांना अजूनही ‘लॉग’ म्हणतात. परंतु आधुनिक काळात मोजमापाच्या पद्धतीमध्ये मोठा बदल घडून आला आहे. अल्ट्रासोनिक सेन्सरचे डॉप्लर मोजमाप वापरून, जहाजाचा वेग कोणत्याही वेळी अचूकपणे मोजला जातो. पण यात ‘नॉट्स’ हे परिमाण मात्र आजही बदललेले नाही. याचा उपयोग आजही अंतर मोजण्यासाठी केला जातो. विमानांची गती पृथ्वीच्या परिघावर आधारित असल्याने त्यांची गती नॉट्समध्ये मोजली जाते तर त्यांचे अंतर नॉटिकल माइल्समध्ये मोजली जाते.
पुढच्या वेळी कधीही ‘नॉट’ किंवा ‘नॉटिकल माईल्स’ या संज्ञेचा वापर करत असाल किंवा ऐकाल तेव्हा हे एकक कित्येक शतकांपूर्वीच्या खलाशांनी आपल्या बुद्धिचातुर्याने शोधून काढले आहे हे विसरू नका.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.