आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मानवाने अश्मयुगापासून आतापर्यंत जगण्याच्या संघर्षात अनेक महत्वाचे टप्पे पार पाडले आहेत. त्याच प्रमाणे, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या आहेत. त्यातून आकाराला आल्या आहेत अनेक प्रकारच्या अभूतपूर्व वास्तू आणि रचना! वेगवेगळ्या कालखंडात साकारलेल्या अशा अद्भुतरम्य वास्तुरचना उजेडात येण्यामागच्या कथाही त्यांच्या निर्मितीच्या कथांइतक्याच अद्भुतरम्य आहेत.
तुर्कस्तानच्या जवळ जवळ केंद्रभागी असलेल्या कॅपाडोशिया या परिसरात घर असलेल्या एका माणसाला त्याच्या घरात एक खोली वाढवायची होती. त्यासाठी त्याने १९६३ साली घराला लागून असलेली एक जुनी दगडांची भिंत पाडण्याच्या कामाला सुरुवात केली. काम जसजसं पुढे सरकू लागलं तसतसं एक अद्भुत रहस्य उलगडत असल्याची जाणीव त्या माणसाला झाली आणि त्या कामात सहभागी असलेल्या अन्य लोकांनाही!
या जमिनीच्या खाली कातळ कोरून तयार केलेली एक विस्तीर्ण गुहा असल्याचं या भिंत पाडण्याचं काम करणाऱ्या लोकांना लक्षात आलं.
या गुहेत उतरल्यानंतर एकमेकांना जोडणाऱ्या अनेकविध गुहांचं एक शहर; अशा अनेक प्राचीन नगरांची एक मालिकाच जमिनीखाली असल्याचं त्यांना आढळून आलं. या मानवी वसाहतीचं एकूण क्षेत्रफळ तब्बल तीन लाख चौरस फूट होतं.
ही भूमिगत शहरं इ.स.पू. आठव्या आणि सातव्या शतकात फ्रिगियन लोकांनी बांधली होती, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्या काळातल्या वास्तुकारांनी या प्रदेशातील ज्वालामुखीपासून बनलेल्या मऊ खडकांमध्ये कातळ कोरून तयार केलेल्या गुहांमध्ये विस्तीर्ण वसाहत उभी केली होती. कॅपाडोशियामध्ये सुमारे २०० वसाहती आहेत.
प्रामुख्याने परकीय आक्र*मकांपासून स्थानिक नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी ही भूमिगत वसाहत उभारण्यात आली होती. त्या काळात हजारो नागरिक बाहेरच्या जगापासून; विशेषतः आक्रमकांपासून सुरक्षित असं संपूर्ण गुप्ततेत त्यांचं जीवन व्यतीत करत होते. विशेषतः चौदाव्या शतकात या भूमिगत लेण्या आणि गुहांनी ख्रिश्चन नागरिकांना तैमूरच्या नेतृत्वाखालील मंगोलियनांच्या आक्रमकांपासून सुरक्षित ठेवले.
अगदी विसाव्या शतकातही स्थानिक लोक ऑटोमन साम्राज्याच्या काळात या भूमिगत वसाहतींच्या आश्रयाला गेले. ग्रीस आणि तुर्कस्तान यांच्यात लोकसंख्येची अदलाबदली झाल्यानंतर साधारणतः सन १९२३ पासून ही भूमिगत वसाहत ओसाड होऊन जमिनीखाली गाडली गेली. त्यानंतर सन १९६३ पर्यंत ती अज्ञातच राहिली.
कॅपाडोशियामधल्या या भूमिगत शहरांपैकी सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेलं शहर म्हणजे डेरिंक्यु! हे शहर बायझेंटाईन साम्राज्याच्या काळात उभारण्यात आलं होतं. तेथील स्थानिक रहिवाशांनी सन ७८० आणि ११८० च्या काळात अरब आणि बायझेंटाईन यु*द्धांदरम्यान मुस्लिम अरबांपासून स्वसंरक्षणासाठी त्याचा वापर केला. हे शहर जमिनीखाली सुमारे ६० मीटर (१९७ फूट) खोल बहुमजली लेण्या आणि गुहांनी बनलेलं होतं.
त्याकाळी सुमारे २० हजार नागरीक, आणि त्यांच्याकडचं पशुधन यांना या वसाहतीत आश्रय मिळाला. त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या गरजेएवढे अन्नधान्य साठवण्याची क्षमता या वसाहतीत होती. कॅपाडोशिया हे भूमिगत वसाहत समूहामधलं आणि संपूर्ण तुर्कस्तानमधलं सर्वात खोल भूमिगत शहर आहे. डेरिंक्यु हे शहर सन १९६९ मध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी खुलं करण्यात आलं. मात्र, या शहराचा केवळ निम्म्या भागातच प्रवेश करण्याची परवानगी आहे.
या शहरात स्थानिकांची मोठी वसाहत असताना शहराला दोन मोठे दगडी दरवाजे होते. धोक्याच्या वेळी ते आतून बंद केले जात. या शहराच्या रहिवाशांना जरी या भूमिगत वसाहततीत लपून रहावं लागत असलं तरी त्यांची दिनचर्या निर्विघ्नपणे पार पडत होती.
वाइनचे साठे, जनावरांचे गोठे आणि तबेले, धान्य कोठारं अशा सुविधा या शहरात असल्याचं त्यांच्या अवशेषांवरून दिसून येतं. डेरिंक्यु शहरात धार्मिक शिक्षण देणारी एक सुसज्ज प्रशालाही होती. त्यामध्ये अध्ययन आणि अध्यापनासाठी अनेक स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. बोगद्यांच्या जाळ्याने डेरिंक्यु हे इतर भूमिगत शहरांशी जोडलेलं आहे.
कायमाकली हे या परिसरातलं आणखी एक महत्वाचं भूमिगत शहर! या शहराला प्राचीन काळात एनीगुप या नावाने ओळखलं जायचं. या भूमिगत शहराचा उपयोगही अरब आणि बायझेंटाईन यांच्या यु*द्धांच्या काळात अनेक शतकं स्थानिक रहिवाशांसाठी आश्रयस्थान म्हणून केला गेला. याच्या विशिष्ट प्रकारच्या विस्तारामुळे ते तुर्कस्तानमधलं सर्वांत मोठं भूमिगत शहर बनलं. कायमकली भूमिगत वसाहतीची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
सन १९६४ साली हे शहर पर्यटकांना भेट देण्यासाठी खुलं करण्यात आलं. सन १९८५ मध्ये या भूमिगत शहराला युनेस्कोकडून ‘जागतिक वारसा’ हा दर्जा देण्यात आला. या शहराचा विस्तार जमिनीखाली २० मीटर (६६ फूट) खोल आहे. हे शहर जमीन सपाटीपासून ८ पातळ्या खोलवर आहे. या पैकी वरच्या ४ पातळ्यांपर्यंत पर्यटक, अभ्यागतांना जाता येतं.
त्या काळच्या नियमानुसार शहरातली सर्वांत श्रीमंत कुटुंबं जमिनीच्या पृष्ठभागाजवळच्या टप्प्यांमध्ये राहत असत. कायमकली वसाहतीत गोठे, तबेले, शेतकऱ्यांची घरं, एक चर्च, आजही वापरात असलेली काही गोदामं आणि सामुदायिक स्वयंपाक घरही आढळून येतं. या स्वयंपाकघरात संपूर्ण शहराच्या लोकसंख्येला पुरेल एवढं जेवण बनवलं जात असे.
या अनोख्या भूमिगत शहरांमधून फेरफटका मारताना अनेक ठिकाणी मोठमोठे गोलाकार दगड रस्त्यांच्या बाजूला पडलेले दिसून येतात. जर या भूमिगत शहरात आक्र*मकांनी चुकून प्रवेश केलाच तर त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी म्हणून किंवा बंद करण्यात आलेल्या दरवाज्यांना अधिक बळकटी देण्यासाठी म्हणून या दगडांचा उपयोग केला जात असे. आक्र*मक शहरात घुसले तरी त्यांना चकवण्यासाठी अनेक प्रकारचे भुलभुलैय्ये या शहरांमध्ये तयार करण्यात आले आहेत. अंधाऱ्या गुहा, पुढे जाऊन बंद होणारे रस्ते, जिने, केवळ स्थानिकांनाच सापडू शकतील अशा चोरवाटा यांचा त्यात समावेश आहे.
या भूमिगत शहरांना पाण्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी अनेक विहिरी बांधण्यात आलेल्या आहेत. या विहिरींवर सर्वात खालच्या पातळीवरच्या माणसांचं नियंत्रण असायचं. या विहिरी वरून येणाऱ्यांना सहजपणे दिसून येऊ नयेत, यासाठी त्यांच्या मुखाजवळ मोठमोठाल्या शिळा आणि लाकडी ओंडके ठेवले जात. त्यामुळे आक्र*मकांनी शहरात प्रवेश करण्यात यश मिळवलं तरी पाण्याचे स्रोत सुरक्षित राहत असत.
डेरिंक्युच्या तुलनेत कायमकली शहरातले बोगदे अधिक अरुंद, तीव्र उताराचे आहेत. या दोन्ही शहरांना एक ९ किलोमीटर लांबीचा बोगदा जोडतो, परंतु तो वापरण्यासाठी अभ्यागतांना परवानगी नाही. मात्र, केवळ १० मिनिटांच्या ड्राईव्हने एका शहरातून दुसऱ्या शहरात जाता येतं. त्यामुळे एकाच दिवसात दोन्ही भूमिगत शहरांची सफर करणं शक्य आहे.
या भूमिगत शहरात जाण्यासाठी नेवसेहीर या जवळच्या शहरातून नियमितपणे शेअर टॅक्सी किंवा मिनीबस उपलब्ध होऊ शकते. नेवसेहीरपासून एका चांगल्या पक्क्या रस्त्याने खाली जाणारा हा सरळ प्रवास आहे. कायमाकलीपर्यंत जाण्यासाठी २० मिनिटं, तर डेरिंक्युला जाण्यासाठी ३० मिनिटं लागतात.
या ठिकाणी भेट देण्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात येतं. या ठिकाणी जाण्यासाठी गाईड्सही उपलब्ध होऊ शकतात.
अशा या अनोख्या ठिकाणांना आणि वास्तूंना भेट देणं हे केवळ मनोरंजनाचा आणि पर्यटनाचाच भाग आहे असे नाही. अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर इतिहास आणि संस्कृतीकडे बघण्यासाठी एक नवी दृष्टी आपल्याला प्राप्त होते. माणसाचा एकूण प्रवास जाणून घेण्यासाठी ही दृष्टी निश्चितपणे मार्गदर्शक ठरते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.