आज गल्लीबोळात स्टँड-अप कॉमेडीअन आहेत पण याची सुरुवात ‘उल्टा-पुल्टा’ने केलीये

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


राजकीय विनोद म्हटले की आपल्या समोर आज कुणाल कामरा, विर दास यांसारखे कॉमेडीयन आणि एआईबीसारख्या काही मालिका येतात. आत्ताच्या डिजिटल जगात हा विनोदी मसाला लोकांपर्यंत पोहचवणे  फार सोपे झाले आहे.

भारतात त्यावेळी दुरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. त्याचे सगळे नियंत्रण सरकारच्या हातात होते. सरकारच्या कार्यशैलीवर विनोद बनवायचा आणि तो सरकारचे नियंत्रण असलेल्या यंत्रणेद्वारे प्रदर्शित करायचा म्हणजे मोठे जिकरीचे काम होते. अशाही परिस्थिती एक मालिका भारतात बनवली गेली होती, जिचे नाव होते उल्टा-पुल्टा.

तुम्ही म्हणाल उल्टा-पुल्टा..? हे कसलं नाव..?

तर, या मालिकेचे निर्माते जसपाल भट्टी यांच्या मते आयुष्य सरळ बघितलं तर आपल्याला सगळीकडे द्वेष, घृणा, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टी दिसतात. पण जेव्हा आयुष्य उलटं करुन बघीतलं जातं तेव्हा तिथे आपल्याला गोष्टी अजुन चांगल्या दिसतात. म्हणुन चुकीच्या गोष्टीही अतिशय मिश्किलपणे हाताळणारया या मालिकेचे नाव- “उल्टा-पुल्टा.” मालिकेचे नाव एवढे प्रसिद्ध झाले की या मालिकेचे संचालक असलेले जसपाल भट्टी चक्क “उल्टा पुल्टा मॅन” म्हणुन ओळखले जाऊ लागले.

१९८६ साली सुरु झालेली ही मालिका भारतातील भ्रष्टाचारासारख्या गहन मुद्द्यांवर मिश्किल विनोद बनवत असे. यासाठी वेगवेगळ्या हस्तचित्रांचा वापर केला जात असे. व्यंगचित्रांचा वापर करुन देशव्यापी समस्यांना अतिशय सहजतेने आणि कोणाच्याही भावना न दुखावता दाखवणे हे या मालिकेचे वैशिष्ट होते.

स्केच कॉमेडी अमेरिकन एमी पुरस्कार विजेती मालिका “सॅटर्डे नाईट” या मालिकेशी मिळतीजुळती होती. सरकारी वाहिनीवर प्रदर्शित होत असुनही मालिकेत कुठेही गुणवत्तेशी तडजोड केलेली दिसत नाही. मालिकेचा मुख्य उद्देश्य सरकारी यंत्रणेत असणारा भ्रष्टाचार व्यंगरुपाने बाहेर आणणे हाच होता आणि संपुर्ण मालिकेत कुठेही त्याच्याशी तडजोड केलेली दिसून येत नाही.

भ्रष्टाचारी राजकीय नेते, घोटाळे करणारे दुकानदार, कामात टंगळ मंगळ करणारे डॉक्टर तसेच हुंड्यासाठी लाचार असणारी सासरची मंडळी असे कित्येक घोटाळेखोर व्यक्ती या मालिकेच्या निमित्ताने टीव्हीवर दाखवण्यात आले. जनलोकपालसाठी अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन जसपाल भट्टी त्यावेळी चित्रवाहिनीच्या माध्यमातुन करत होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे सगळं करत असताना सरकारची कसलीही भिती बाळगली गेली नव्हती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट होते.

जसपाल भट्टी यांच्या पत्नी या मालिकेबद्दल सांगताना म्हणतात, “ही मालिका म्हणजे एक शांततेचं आंदोलन होते. काहीही न बोलता सगळं बोलून जाणारं एक शांत वादळ.”

उल्टा पुल्टा कार्यक्रमात जसपाल भट्टी काही एकेरी संवाद म्हणत असत. हिंदी भाषेतील हे संवाद सार्वजनिक सुचना देतात तशा आवाजात म्हटले जात असत. मधेच त्या संवादाशी संबंधित एखादी चित्रफित किंवा व्यंगचित्र दाखवले जात असे.

सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील टिपलेले काहीसे डोळे उघडणारे चित्र या कार्यक्रमात दाखवले जाते.

जसपाल भट्टी यांना कायम विचारला जाणारा एक प्रश्न होता तो म्हणजे या विनोदांचं उगमस्थान. हे विनोद त्यांच्या डोक्यात नेमके येतात कुठून? याला उत्तर देताना ते नेहमी म्हणत की “विनोद तर सगळीकडेच आहे. सकाळी दूध घ्यायला जातानाही विनोद घडतात आणि रात्री सहज फेरफटका मारायला गेलं तरीही विनोद घडतातच. मी हेच विनोद चोरतो. या विनोदांच्या चोरीचं मला काहीही गैर वाटत नाही.”

कार्यक्रमात झुम इन- झुम आउट या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असे. एखादा दुकानदार जेव्हा ग्राहकाला फसवत असे तेव्हा त्याच्या फसवेगिरीचं दर्शन घडवून आणण्यासाठी अगदी जवळून ते दृश्य चित्रीत केले जात असे. तर निवडणुक प्रणाली, राजकीय परिस्थिती दर्शविताना ती दुरवर चित्रीत केलेल्या दृश्यातुन दाखवली जात असे. मानवी स्वभाव शोधणारा हा कार्यक्रम त्यावेळी प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचला होता.

उल्टा पुल्टा या कार्यक्रमाची अजुन एक विशेषता ही होती की या कार्यक्रमात कधीही कोणाला चुक किंवा बरोबर असं दाखवलं जात नसे. सत्य घटनांपासून प्रेरीत होऊन त्यावर बनवल्या गेलेल्या कार्यक्रमात गोष्टी आहेत तशा मांडल्या जात आणि चुक की बरोबर हे ठरवण्याचा हक्क जनतेला सोपवला जात होता. बाकीच्या दुरदर्शन कार्यक्रमांना प्रसिद्धीच्या चढाओढीत मागे टाकताना मालिकेचे हे वैशिष्ट्य त्यावेळी जास्त महत्त्वाचे ठरले.

चांगली कला असेल तर जास्त रंगीबेरंगी सेट आणि महागडे कलाकार यांची गरज पडत नाही असे सविता भट्टी (जसपाल भट्टी यांच्या पत्नी) सांगतात. तसेच जसपाल नशीबवान होते की त्यांना ही सोपी आणि उपयुक्त पद्धत लवकर सापडली. अतिशय मोठ्या गोष्टी अगदी सहजतेने सांगून कसलाही राजकीय, धार्मिक द्वेष त्यांच्या वाट्याला आला नाही असेही त्या म्हणतात.

विद्युत अभियंते असलेले जसपाल आधी राजकीय व्यंगचित्रकार होते. नंतर त्यांनी पंजाबमधील काही प्रादेशिक कार्यक्रमात काम केले. उल्टा पुल्टाने त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. नंतर त्यांनी ‘फ्लॉप शो’ आणि फुल टेंशन अशा कार्यक्रमातून देशाचे मनोरंजन केले.

अजुन महत्त्वाची एक बाब म्हणजे त्यावेळी सिख समाज हा विनोदाचा भाग असायचा. जसपाल भट्टी यांच्यामुळे सिख समाज विनोद नाही तर विनोद बनवणारा समाज झाला.

सकाळी ७:३० ला सुरू होणारा हा कार्यकर्म कित्येक जण सकाळी सकाळी मुलांना शाळेत पाठवता पाठवता बघत असत. जसपाल भट्टी यांच्यावर जनतेचं असलेलं प्रेम हे या मालिकेचं यश तर होतंच परंतू त्याच बरोबर टिवीवर आणि खरया आयुष्यात असणारया जसपाल यांच्या स्वभावाचंही ते फळ होतं.

२५ ऑक्टोबर २०१२ रोजी जसपाल यांचा रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला. २०१३ मध्ये त्यांना मृत्यू पश्चात पद्मभुषण पुरस्काराने गौरवण्यात आले. जसपाल यांचे कार्य आजही त्यांची पत्नी त्यांच्या स्टुडिओ आणि ‘द नॉन्सेंस क्लब’ या कलाकार संघाद्वारे चालवत आहेत.

“असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी कोणीतरी येऊन आम्ही जसपालचे आणि त्याच्या कामाचे चाहते आहोत असं म्हणत नाही.”अशा सविताजी सांगतात.

मोठी गोष्ट सांगण्यासाठी ओरडावं लागतं किंवा मोठमोठ्या घोषणा द्याव्या लागतात असं नाही. शांततेचं आणि योग्य मोजक्या शब्दांचं महत्त्व पटवून देणारा हा कार्यक्रम आज कित्येक जणांनी शिकावा असा एक धडा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!