The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

‘त्या’ दिवशी उडती तबकडी बघून लंडनवासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता, पण…

by द पोस्टमन टीम
20 April 2022
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


परग्रहावर जीवसृष्टी असेल का; याबद्दल आपल्या सगळ्यांना कायमच कुतूहल वाटत आलं आहे. परग्रहावरून आलेल्या उडत्या तबकड्या (UFO) प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा अनेकांनी अनेकदा छातीठोकपणे केला आहे.

खुद्द अमेरिकेच्या संरक्षण विभागाचं मुख्यालय असलेल्या पँटागॉनने परग्रहावरची जीवसृष्टी आणि उडत्या तबकड्या यांच्या मागचं तथ्य जाणून घेण्यासाठी काही गुप्त मोहिमा आखल्या होत्या. त्यांचे अहवाल मात्र गुलदस्त्यात आहेत. या उडत्या तबकड्यांबाबत कुणीही काहीही उलटे-सुलटे दावे करत असलं तरीही एके दिवशी हजारो लंडनवासीयांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी ही उडती तबकडी पाहिली असल्याचा इतिहास आहे.

दि. १ एप्रिल १९८९ या दिवसाची संध्याकाळ. लंडन शहरावरचं आभाळ काळवंडलं होतं. शहरातल्या रस्त्यावरून वर्दळ सुरू होती. नोकरदार, व्यावसायिक मंडळी दिवसभराचं काम आवरून घराकडे निघाली होती. काही जण संध्याकाळचा फेरफटका मारायला, कुणी खरेदीला बाहेर पडले होते. एकूण, शहरातले रस्ते गजबजलेले होते.

दिवस पूर्ण मावळून आकाशात चांदण्या चमकायला लागल्या होत्या. इतक्यात आकाशातून प्रकाशाचा एक ठिपका जमिनीच्या दिशेने खाली येत असल्याचं लोकांना दिसलं. लोक उत्सुकतेने त्याच्याकडे बघतच राहिले. तो ठिपका जसा जवळ जवळ येत गेला तसतसे त्याच्यावरचे चमचमणारे दिवे दिसायला लागले. आणखी जवळ आल्यावर लक्षात आलं की उडती तबकडी (UFO) होती.

शेकडो लोक रस्त्यांवर थांबून त्या तबकडीकडे आ वासून पहात राहिले. वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आणि वृत्त वाहिन्यांचे कॅमेरामन त्या तबकडीच्या बातम्या देण्यासाठी धावाधाव करू लागले. आकाशवाणीवरून फक्त आणि फक्त तबकडीच्या माहितीची बातमी दिली जात होती. मुख्य गडबड झाली ती सुरक्षा यंत्रणांची!

ही तबकडी खरंच परग्रहावरून आली असेल का? त्यात नक्की कोण आणि किती संख्येने असतील? त्यांचा लंडनच्या आकाशात घिरट्या घालण्याचा नक्की उद्देश काय असेल? ते नक्की काय करतील? कशाचा अंदाज येण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या ३ तुकड्या तैनात करण्यात आल्या. इतकंच नाही तर खुद्द लष्कराला सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला.

ADVERTISEMENT

ही तबकडी हळूहळू लंडनच्या दिशेने खाली खाली येत राहिली. इतकंच नाही तर एका मोकळ्या मैदानात ती खाली उतरली. तैनात पोलीस सतर्क झाले. परग्रहावरून आलेल्या ‘एलियन्स’चं स्वागत करण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याला तबकडीजवळ रवाना करण्यात आलं. तो अधिकारी जसजसा तबकडीच्या जवळ येत गेला तसतससा तबकडीचा दरवाजा अतिशय संथ गतीने उघडत होता. त्यातून कोरडा बर्फ बाहेर पडत होता. त्यातून एक एलियन बाहेर पडला पण पोलिसाला बघून पट्कन उडी मारून परत आत पळून गेला.

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

तबकडीच्या अगदी जवळ गेल्यावर मात्र त्या पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ती परग्रहावरची तबकडी वगैरे काहीही नव्हतं; तर तो तबकडीच्या आकाराचा ‘हॉट एअर बलून’ होता. त्या पोलिसाने त्या बलूनमधल्या माणसांना चांगलंच फैलावर घेतलं.

‘तुम्ही पोलिसांचा वेळ वाया घालवला. आता तुम्हाला गजाआड करतो,’ म्हणून धमकावलंही. मात्र, या प्रकारामागे लोकांना घाबरवण्याचा वगैरे उद्देश नव्हता. उलट ‘एप्रिल फूल’ दिवसाचं औचित्य साधून लोकांच्या ओठांवर हसू आणण्याचा, त्यांना क्षणिक का होईना, आनंद देण्याचा उद्देश होता, हे सांगितल्यावर तो पोलीस अधिकारीही खुश होऊन त्या आनंदात सहभागी झाला.

हा सगळा उद्योग होता लंडनचे सुप्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन आणि त्यांच्या व्हर्जिन उद्योग समूहाचा! ब्रॅन्सन यांना ‘एप्रिल फूल’च्या दिवसाचा आनंद घ्यायला खूप आवडतं. निरुपद्रवी उपद्व्याप करून आनंद मिळवायचा आणि इतरांनाही द्यायचा, हा या दिवसाचा उद्देश असल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे दरवर्षी या दिवशी ते असे छोटे-मोठे उपद्व्याप करतच असतात. मात्र, हा ‘यूएफओ’चा उद्योग आपल्यासाठी अविस्मरणीय आणि अभिमानास्पद असल्याची त्यांची भावना आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगवरही हे नमूद केलं आहे.

‘त्या दिवशी रस्त्यावरचं प्रत्येक वाहन रस्त्यांवरच उभं होतं. प्रत्येक जण आमच्या ‘तबकडी’कडे विस्मयचकीत होऊन पाहत होता. हजारो लंडनवासीयांच्या नजरा फक्त आमच्याकडे होत्या. शहराकडे येणाऱ्या सगळ्या महामार्गांवरची वाहतूक थांबवण्यात आली होती. खरंतर या उद्योगांमुळे आम्हाला तुरुंगातच जावं लागलं असतं. मात्र, नशिबानं त्या पोलीस अधिकाऱ्याची समजूत पटली आणि आम्ही सुटलो,’ असं या ब्लॉगमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

सर रिचर्ड ब्रॅन्सन हे लंडनमधले नामांकित उद्योगपती आहेत. तरुण वयातच त्यांनी उद्योजक होण्याचं स्वप्न बघितलं होतं. सन १९७० मध्ये त्यांनी व्हर्जिन उद्योग समूहाची स्थापना केली. आज विविध क्षेत्रातल्या तब्बल ४०० कंपन्या या उद्योगसमूहाच्या छत्राखाली कार्यरत आहेत. त्यांच्यासारखे द्रष्टे उद्योगपती कोणतीही गोष्ट निरुद्देश करत नाहीत.

‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने ते करत असलेले उपक्रमही याला अपवाद नसावेत. आज व्हर्जिन उद्योगसमूहाची विमान वाहतूक कंपनीही कार्यरत आहे. मात्र, कित्येक वर्षांपूर्वी त्यांनी आकाशातून खाली आणलेल्या तबकडीच्या कडांवर ‘व्हर्जिन गॅलॅटीक एअरवेज’ असं लिहिलेलं होतं. कदाचित हे लिहून त्यांनी स्वतःची विमान कंपनी सुरू करण्याची घोषणा केली असावी किंवा त्यातून स्वतःलाच प्रेरणा दिली असावी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

Next Post

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

31 January 2023
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

7 September 2022
मनोरंजन

या भुताटकीच्या जहाजावरील लोकांचे शेवटी झाले काय..?

4 June 2022
मनोरंजन

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

22 April 2022
मनोरंजन

‘हॅप्पी बर्थडे’ गाण्याची मालकी सांगून वॉर्नर म्युझिकने रग्गड पैसे छापले होते, पण…

14 April 2022
मनोरंजन

बॅटमॅन तयार केला एकाने आणि श्रेय लाटलं भलत्यानेच!

8 April 2022
Next Post

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)