आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पर्यटन म्हटलं की आपल्यासमोर उभे राहतात किल्ले, समुद्री किल्ले, बीचेस, संग्रहालये, रिजॉर्टस्, थंड हवेची ठिकाणं, डोंगररांगा, अभयारण्य आणि बरंच काही. इतकंच काय, महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी ‘जेल पर्यटन’देखील सुरु झालं आहे. पण आजवर तुम्ही पर्यटनासाठी एखाद्या खाणीमध्ये गेला आहात काय?
असं म्हणतात खाणकाम हे जगातील सर्वांत धोकादायक कामांपैकी एक आहे. पण युरोपमध्ये चक्क एक मीठाची खाणच पर्यटनासाठी खुली करण्यात आली असून त्याठिकाणी महिन्याला सुमारे ५० हजार लोक भेट देतात. नेमकं काय विशेष आहे त्या खाणीमध्ये, जाणून घेऊया आजच्या या विशेष लेखामधून..
युरोप. मानवी गेल्या काही शतकांमध्ये जीवनाच्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रात प्रगती केलेला खंड. यामध्ये पर्यटन तरी कसं मागे राहील. सलायना तुर्डा किंवा तुर्डा मीठाची खाण हे ठिकाण पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरण्याचं कारण म्हणजे येथील खाणींमध्ये दिसणारं विहंगम दृश्य. विहंगम दृश्याबरोबरच तिथलं आनंदमय वातावरण आलेल्या पर्यटकांना सहजासहजी बाहेर पाय ठेऊ देत नाही.
तुर्डा मीठाची खाण युरोपमधील सर्वात खोल मिठाची खाण म्हणूनही ओळखली जाते. तुर्डा मीठाची खाण रोमानिया देशातील तुर्डाजवळील ‘दुर्गाउ-वाल्या सरटा’ येथे आहे. याठिकाणाहून मीठाच्या उत्पादनाची सुरुवात मध्ययुगीन काळात सुरू झाली आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुरूच होती. ही खाण काही काळ बंद होती आणि दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीला पुन्हा सुरू करण्यात आली.
नव्वदच्या दशकात, या मीठाच्या खाणीमध्ये मोठा बदल झाला. आता ‘तुर्डा मीठ खाण’ हे एक ऐतिहासिक स्थळ बनले होते. पण अन्य ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे या खाणीचे रूपांतर कोणत्याही प्रकारच्या संग्रहालयात झाले नाही, तर भूमिगत थीम पार्कमध्ये झाले आहे. सध्या हे थीमपार्क केवळ रोमानियामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.
मध्ययुगीन काळात या खाणीतून मिठाचे उत्पादन सुरू झाले. हंगेरीतील ‘अर्पाडियन चॅन्सेलरी’ने १७०५ साली लिहिलेल्या दस्तऐवजात “तुर्डा किल्ल्याजवळील मिठाच्या खाणी”बद्दल तपशील आहेत. १ मे १२७१ रोजी हंगेरीच्या दुसर्या दस्तऐवजात, तुर्डा येथील मीठाच्या खाणींचा स्पष्ट उल्लेख आहे. मध्ययुगीन काळातील कागदपत्रांमध्ये तुर्डा येथील मीठाच्या खाणीचे संदर्भ अजूनही सापडतात. तुर्डा मीठाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात मीठाचे उत्पादन घेतल्याने खाणमालक बरेच श्रीमंत झाले होते.
आधुनिक युगातही मीठाच्या या खाणीतून मीठाचे उत्पादन होऊ शकते, याशिवाय हे एक पर्यटनक्षेत्र देखील आहे. तुर्डा मीठाच्या खाणीतील एका विभागाला ‘फ्रांझ जोसेफ गॅलरी’ म्हणतात. या गॅलरीचे बांधकाम १८५३ मध्ये सुरू झाले. फ्रान्झ जोसेफ गॅलरीच्या बांधकामाचे प्रमुख कारण म्हणजे भू-पृष्ठभागावर मीठ आणण्याचा खर्च कमी करणे. १८७० साली बांधकाम पूर्ण झाल्यावर, ही गॅलरी तब्बल ७८० मीटर्स लांबलचक होती, १८९९ सालापर्यंत ही गॅलरी आणखी १३७ मीटर्स वाढवली गेली.
एकोणिसाव्या शतकातील मिठाच्या खाणीचा आणखी एक भाग म्हणजे रुडॉल्फ खाण. तुर्डा मीठ खाणीतील ही सर्वांत शेवटची खाण आहे, आणि याच ठिकाणाहून खाणीच्या शेवटच्या दिवसांत मीठाचे उत्पन्न घेतले जात होते. ही खाण ४२ मीटर खोल, ५० मीटर रुंद आणि ८० मीटर लांब आहे. आणखी एक विशेषता म्हणजे रुडॉल्फ खाण व्हर्टिकल मीठ वाहतूक क्षेत्राशी जोडलेली होती, या व्हर्टिकल मीठ वाहतूक क्षेत्राला एक मॅन्युअल लिफ्ट होती, नंतरच्या काळात ही लिफ्ट ऑटोमॅटिक करण्याचा प्रयत्न झाला, पण दरम्यान खाणीचे कामकाज बंद झाले.
वर्षानुवर्षे तयार झालेल्या स्टॅलेक्टाईट्स (गुहांमध्ये बर्फासारखी लटकलेली एक निमुळता रचना) सर्वत्र दिसून येतील. हे स्टॅलेक्टाइट्स दरवर्षी २ सेंटीमीटर्सने वाढतात आणि जेव्हा ते ३ मीटर्सचे होतात तेव्हा तुटून पडतात. तुर्डा मीठाच्या खाणीत तेरेझिया नावाची खाण आहे, तेरेझिया खाणीमध्ये मीठाचे सरोवर तयार झाले आहे. ही खाण १२० मीटर लांब असून तलावाची खोली ८ मीटर आहे. सरोवराच्या मध्यभागी खाणीचे कामकाज चालू असताना टाकलेल्या राडारोड्याच्या ढिगाऱ्यामुळे एक बेट तयार झाले आहे.
तुर्डा मीठ खाण १९३२ साली बंद करण्यात आली आणि दुसरे महायु*द्ध सुरू होईपर्यंत त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले. यु*द्धाच्या काळात तुर्डा येथील खाणींचा उपयोग विमाने ठेवण्यासाठी केला जात असे. यावरूनच आपल्याला या खाणींच्या भव्यतेचा अंदाज येऊ शकतो. यु*द्धादरम्यानही तुर्डा मीठ खाणीचा वापर होत राहिला. यु*द्धादरम्यान फ्रांझ जोसेफ गॅलरीमध्ये चीज साठवण्यात येत असे.
१९९२ साली, तुर्डा सॉल्ट माईन हे लोकांसाठी थीम पार्क म्हणून मीठ संग्रहालय बनले. या थीम पार्कमध्ये एक ॲम्फीथिएटर, फिरणारा एक भव्य पाळणा (जत्रेमध्ये असतो तसा), तलावात फिरण्यासाठी विविध प्रकारच्या बोटी आहेत. याठिकाणी एक स्पा आणि ब्युटी सेंटर देखील उभारण्यात आले असून ते देखील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या खाणीला दरवर्षी सुमारे ६,५०,००० लोक भेट देतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.