आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगात कोणालाही प्रश्न विचारला की सगळ्यात इमानदार प्राणी कुठला? तर हमखास उत्तर येणार – कुत्रा. जे त्याला पाळतात त्यांची सर्वतोपरी सुरक्षा करून तो त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता दाखवतो. घरचे बाहेर गेलेले असताना चोरांना हुसकावून लावण्याची कित्येक उदाहरणं आपण ऐकली/वाचली आहेत.
याशिवाय, कुत्र्यांची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला/व्यक्तीला लांबूनच हुंगणे. त्यांच्या याच ताकदीचा वापर अनेकदा गुन्हेगारांना पकडण्यासाठी करण्यात येतो.
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा दलात बेल्जिअन मेल्नॉइस या प्रजातीचा कुत्रा गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी वापरला जातो. काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दल (BSF) आणि सीआरपीएफचे जवान राजपालायम या प्रजातीच्या कुत्र्यांना आपल्यासोबत मदतीला ठेवतात. तर तिकडे दिल्लीमध्ये, बंगालमध्ये साध्या रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना विशेष ट्रेनिंग देऊन पोलिसांच्या मदतीसाठी पाठवतात.
याशिवाय जर्मन शेफर्ड, लॅब्राडॉर हेदेखील पोलीस दलात भरती केले जातात. खासकरून, बाँ*ब स्क्वाडमध्ये.
गुन्हेगारांचा शोध घेत कुत्रे कितीतरी मैल दूर जातात. असंच नुकतंच एका कुत्रीने तब्बल २ तास माग काढत १२ किमीचे अंतर कापून एका गुन्हेगाराला पकडून देण्यात यश मिळवले आहे.
डॉबरमॅन या प्रजातीची असणारी ९ वर्षांची तुंगा चोर आणि खु*न्यांना पकडण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिचा जन्म झाल्याच्या काही महिन्यांनंतरच ती दावणगेरेच्या पोलीस खात्यात दाखल झाली.
तर झालं असं की, १० जुलै रोजी दावणगेरेच्याच ‘काशीपुर तांडा’ या भागात राहणाऱ्या चेतन आणि त्याच्या काही मित्रांनी धारवाड जिल्ह्याच्या एका घरातून सोने आणि बंदुकीची चोरी केली. त्यातल्याच एकाने, चंद्रा नायकने, जेव्हा आपला हिस्सा मागितला आणि पोलिसात जायच्या धमक्या दिल्या तेव्हा चेतन आणि त्याच्या बाकी मित्रांनी नायकला मारण्याचा प्लॅन बनवला. त्यांनी नायकला सूलकेर जवळच्याच थोत्तीलू खाडीवर भेटायला बोलावले. तो तिथे आल्यावर त्याला जीवे मारून ते सगळे तिथून पळून गेले.
या घटनेची खबर लागताच हेड कॉन्स्टेबल के. एम. प्रकाश तुंगाला घेऊन लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रात्रीचे साडे नऊ वाजले होते. काही मिनिटांतच तुंगाने खु*न्याचा गंध पकडला आणि त्याचा माग काढत निघाली. तब्बल १२ किमी धावल्यावर ती आणि प्रकाश आधी काशीपुर तांड्यावर गेले, तिथून एका दारूच्या गुत्त्यावर पोहोचले. चेतन ज्या ज्या ठिकाणी गेला होता त्या सगळ्या ठिकाणी जात जात शेवटी तुंगा एका घराजवळ जाऊन थांबली. ते घर चंद्राच्या नातेवाईकांचं होतं. पोलिसांनी लगेच तिथे धाड टाकली.
त्यांना चेतन तिथेच लपून बसलेला सापडला. सुरुवातीला त्याने आपल्यावर असलेले आरोप धुडकावून लावले. पण जरा हिसका दाखवल्यावर त्याने लगेच घडाघडा चंद्राच्या खु*नासकट चोरीचे सगळे गुन्हे कबूल केले.
प्रकाश सांगतात की, “मी आजवर बरेच स्निफर कुत्रे बघितलेत पण तुंगासारखं कोणीच नाही. तिने नायकच्या टोपीवरून खु*न्याचा गंध ओळखला आणि त्याचा माग काढत निघाली. आजवर कुठलाच स्निफर कुत्रा एवढ्या लांब गुन्हेगाराचा माग काढत गेला नाहीये. गेल्या पंधरा वर्षांच्या सेवेत तुंगाने आम्हाला कधीच निराश नाही केले.”
प्रकाश यांच्याबरोबर लोहिथ आणि के. व्यंकटेश तुंगाची देखभाल करतात. रोज सकाळी पाच वाजता व्यायाम केल्यावर तिच्यासोबत ८ किमी धावायला जातात. याशिवाय तिच्या खाण्यापिण्याची देखील उत्तम काळजी डिपार्टमेंट घेतं.
आजवर तुंगाने ६० केसेसमधल्या गुन्हेगारांना पकडून दिलंय. यातील ३० चोर आणि बरेच खु*नी होते.
आत्तापर्यंत सगळ्यात लांब गुन्हेगाराचा माग काढत जाण्याचा रेकॉर्ड अरासिकेर तालुक्यातील स्निफर कुत्राच्या नावावर होता. त्याने ८ किमीचं अंतर कापत गुन्हेगाराला पकडून दिलं होतं. त्याचा हा रेकॉर्ड तुंगाने मोडून काढल्याने दावणगेरे तालुक्याच्या पोलिसांच्या कॉलर टाईट झाल्या आहेत.
या कामगिरीनंतर सिनीअर पोलीस अधिकाऱ्यांनी तुंगाचा विशेष सत्कार केलाय.
कुत्रा हा पोलिसांचा खरा मित्र असतो हेच यावरून सिद्ध होतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.