आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शारीरिक आरोग्याबाबत जेवढ्या मोठ्या प्रमाणात जागृती सध्याच्या काळात निर्माण झाली आहे; तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्याबद्दलची उपेक्षा आणि गैरसमज अजूनही आहे. वैद्यकशास्त्राची प्रगती, नागरिकांमध्ये वाढलेलं शिक्षणाचं प्रमाण, हे सगळं असलं तरीही मानसिक आजार म्हणजे वेडेपणा ही समजूत आजही मोठ्या प्रमाणावर कायम आहे.
मात्र, मानसिक विकारांवर शास्त्रशुद्ध अभ्यास करायला पाश्चात्य देश आणि अमेरिकेत तीन साडेतीन दशकांपूर्वीच करण्यात आली होती. आजच्या प्रमाणेच त्या काळातही मनोविकार म्हणजे वेडेपणा ही समजूत अधिक ठाम होती. मात्र, या विकारांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी एक तात्कालिक कारण महत्वाचं ठरलं.
इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) हा १७८९ च्या काळात मनोविकारांनी ग्रस्त होता. त्याच्यावर त्या काळात उपलब्ध असलेले सर्व प्रकारचे उपाय करण्यात आले. मात्र, त्यांचा काहीही उपयोग होत नव्हता. त्याचा विकार बरा होईल की नाही हे कोणत्याही डॉक्टरांना ठामपणे सांगता आलं नाही. त्यामुळे त्याला राजगादीवरून खाली उतरवून नवा पर्याय शोधण्याबाबतही चर्चा सुरू झाली.
या राजकीय संकटामुळे त्या काळातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये मानसिक विकारांबाबत उत्सुकता निर्माण झाली आणि वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये त्याबद्दलची उत्सुकता आणि शोधक वृत्ती वाढीला लागली. प्रामुख्याने मानसिक विकार आणि अनुवंशिकता याचा संबंध तपासून बघण्याला मानवी अनुवांशिकतेच्या अंगाने मानसिक आरोग्याच्या अभ्यासाला गती मिळाली.
सध्याच्या काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘डीएनए’चा शोध लागला आहे आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म सांगणारी गुरुकिल्लीच माणसाच्या हाती लागली आहे. त्या काळात ‘डीएनए’चे तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने त्या काळातला अनुवंशशास्त्राचा, प्रामुख्याने मानसिक विकार आणि अनुवंशिकता या विषयाचा अभ्यास हा रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांच्याबद्दलची उपलब्ध माहिती संकलित करणे आणि तिचे विश्लेषण करून काही निष्कर्षाप्रत येणे; अशाच स्वरूपाचा होता.
सन १८०० च्या दशकात युरोप आणि उत्तर अमेरिका या दोन्ही देशांतील मोठ्या प्रमाणात वैज्ञानिकांनी वेडेपणा, बौद्धिक अपंगत्व याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी मनोविकारग्रस्तांची निवासी वसतिगृह, त्या काळच्या भाषेत वेड्यांची रुग्णालयं आणि गुन्हेगारांच्या मानसिक जडणघडणीचा अभ्यास करण्यासाठी कारागृहात जमवलेली माहिती, मतिमंद मुलांच्या शाळा यांचा मोठा उपयोग झाला.
आधुनिक अनुवंशशास्त्र आणि मानसिक आरोग्य या ज्ञानशाखेचा पाया या अभ्यासातूनच घातला गेला.
मानसिक विकार किंवा वेडेपणा या विषयामध्ये विशेष प्राविण्य करणाऱ्या तत्कालीन वैद्यक तज्ज्ञांपैकी काहींनी मनोविकार हे आधुनिक जीवनातल्या वाढत्या ताण-तणावांचे फलीत आहे हे मान्य केलं असलं तरीही बहुसंख्य तज्ज्ञांनी मतिमंदत्व मनोविकार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्या मुळाशी अनुवंशिकता, कुटुंबातल्या काही सदस्यांमध्ये असणारी काही जैविक घटकांची कमतरता किंवा अतिरिक्त उपलब्धता हेच घटक कारणीभूत असल्याचं गृहीतक हिरीरीने मांडलं.
मनोविकारग्रस्तांच्या वसतिगृहाच्या संचलकांनी त्यांच्याकडच्या रुग्णांच्या सर्व मनोविकार असलेल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. इतकंच नाही तर मानसिक विकार एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होऊ नयेत यासाठी अशा रुग्णांनी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी मुलं जन्माला घालू नयेत; या मताचा प्रसार करण्यास सुरुवात केली.
तज्ज्ञांना आवश्यक ती माहिती योग्य पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी मनोविकार रुग्णांच्या वसतिगृह संचालकांनी पद्धतशीरपणे आकडेवारीसाठी नोंदवून ठेवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये रुग्णाच्या रोगाचा प्रकार, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यातून बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी अशा आकडेवारीच्या सारण्या (टेबल्स) नोंदवून ठेवायला त्यांनी प्राधान्य दिलं. सन १८५९मध्ये नॉर्वेजियन संशोधक लुडविग डहल यांनी जनगणनेच्या तपशीलवार नोंदी वापरून मानसिक आजाराची कौटुंबिक वंशावळीही प्रकाशित केली.
‘युजेनिक्स चळवळ’ सुरू करण्यासाठी डहल आणि त्यांच्या अनुयायांनी सन १९०० पर्यंत फ्रान्सिस गॅल्टनसारख्या सुप्रसिद्ध सांख्यिकीशास्त्रज्ञांसाठी पाया घालून दिला. ग्रेगोर मेंडेलच्या वनस्पती-प्रजनन प्रयोगांनी युजेनिस्ट्सच्या आशा वाढवल्या.
पेरलेल्या मटारच्या बियाणांची साल जाड असेल तर उगवणारी मटार जाड सालीची असणार. त्याचप्रमाणे लोकांना मानसिक आरोग्य किंवा आजारांचा वारसा हा त्यांच्या पूर्वजांकडूनच मिळणार; या समजुतीने मूळ धरलं होतं. मात्र, मूळ कारणांकडे गांभीर्याने न पहाता समस्येचं सुलभीकरण करून मांडलेला सिद्धांत म्हणून १९२० पर्यंत हे मत नाकारण्यात आलं.
त्यानंतर जर्मन संशोधकांनी मनोरुग्ण, बौद्धिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी आणि कैद्यांच्या कौटुंबिक वैशिष्ट्यांचा डेटा गोळा करण्यासाठी एक अभूतपूर्व प्रकल्प हाती घेतला. नाझींच्या काळात या प्रकल्पाला चालना मिळाली. आनुवंशिकतेवर मोठा भरवसा असल्याने जगभरातील अभ्यासकांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर अनेक दशकं या जर्मन प्रकल्पाच्या अभ्यासाची दखल घेणं भाग पाडलं.
अनुवंशिकता आणि मनोविज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी सांख्यिकी माहिती जमा करण्याचा हा इतिहास ‘जेनेटिक्स इन द मॅडहाऊस’ या पुस्तकामध्ये प्रा. थिओडोर एम. पोर्टर यांनी सविस्तरपणे मांडला आहे. त्याबद्दल १९ व्या शतकात मनोरुग्णालय, मतिमंद मुलांच्या शाळा यामधून घेण्यात आलेली माहिती, त्या संबधीची देशोदेशीची हस्तलिखितं, आलेख आणि तक्ते यांचा संदर्भ या पुस्तकात घेण्यात आला आहे. शिवाय, या पुस्तकात प्रामुख्याने फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन,अमेरिका या देशात अनुवादित करण्यात आलेल्या नोंदींची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
या अभ्यासाच्या काळात अभ्यासकांनी मानसिक रुग्णांना शोधून काढून त्यांच्या कुटुंबातल्या कमतरता उघड करण्यामध्ये एवढे बेभान झाले होते की, त्यांच्यासंबंधीची सांख्यिकी जमा करण्यासाठी या मानसिक आणि शारीरिक दुर्बलता असलेल्या कुटुंबांचं प्रचंड शोषण होत आहे, याचं त्यांना भानच राहिलं नसल्याचं प्रा. पोर्टर यांनी निदर्शनाला आणून दिलं आहे.
पोर्टरने त्याच्या विश्लेषणाच्या सुरुवातीपासून नमूद केलं आहे की, संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत मानसिक रुग्णालये आणि संस्थांच्या वाढीचं सांख्यिकीशास्त्रज्ञांनी सातत्याने भांडवल केलं. जेणेकरून ‘वेडेपणा’ कारणाची वाढती टक्केवारी आणि मनोविकारांना जैविक वारसा म्हणू सिद्ध करता येईल.
वास्तविक जैवसांख्यिकी माहितीचा मोठा ढिगारा जमवणं आणि त्याच्यावरून मिळालेल्या निष्कर्षांवर गरजेपेक्षा अधिक विसंबून राहणं हा केवळ गंभीर वैज्ञानिक प्रश्नांना सोपी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न नव्हता तर त्या पेक्षाही गंभीर म्हणजे मनोरुग्ण म्हणून त्यांच्या कपाळावर शिक्के मारून त्यांना वैवाहिक संबंधांपासून आणि मुलं जन्माला घालण्यापासून वंचित ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता.
जैवसांख्यिकी आणि अनुवंशशास्त्राच्या विकासातल्या त्रुटी आणि क्षमता दाखवण्याचं काम प्रा. पोर्टर यांनी केलं आहे. मानवी आनुवंशिकत्याच्या निमित्ताने संबंधितांच्या आयुष्यात होणारा सामाजिक आणि वैद्यकीय हस्तक्षेप यांच्यातला धोकाही त्यांनी दाखवून दिला आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस त्या पूर्वी संकलित केलेल्या सांख्यिकी माहितीच्या मर्यादा उघड झाल्या. कौटुंबिक इतिहासावर अत्याधिक अवलंबून राहण्याने ‘युजेनिक चळवळ’ फोफावली. त्याचा फायदा राजकारण्यांनी आपलीच मतं लोकांवर थोपण्यासाठी केला. त्यामुळे या माहितीचं संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष हे वैज्ञानिक न राहता राजकीय बनले आणि विशिष्ट विचारसरणीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.