आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एखादी इमारत भक्कमपणे उभी रहावी या साठी त्या इमारतीचा पाया भक्कम केला जातो, आणि ती इमारत काही खांबांच्या आधारे उभी केली जाते, त्याचप्रमाणे जशी समाजाची इमारत स्त्री आणि पुरुष या दोन खांबांच्या आधारे उभी असते, तशीच विश्वाची ही व्यवस्था लय आणि स्थिती या दोन अवस्थांच्या आधारे उभी असलेली आपल्याला दिसते. या मुळेच प्राचीन भारतीय ग्रन्थांत या दोन अवस्थांना दर्शवणाऱ्या ब्रम्हा आणि महेश या दोन देवतांना महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. शिवाय भारतीय तत्वज्ञान जन्म आणि मृत्यू या दोन घटनांना बाकीच्या जगापेक्षा थोड्या वेगळ्या अर्थाने बघते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मृत्यू म्हणजे जुनं शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश. कदाचित या मुळेच भारताच्या एका भागात “मानवाचा मृत्यू साजरा केला जातो”
प्राचीन काळापासून हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि बंगाल पासून ते कंदहारपर्यंत भारत एक संस्कृती व सभ्यता असल्याचे पुरावे मिळतात. राजसत्ता, भाषा, वेशभूषा आणि परंपरा जरी वेगवेगळ्या स्वरूपांत असल्या तरी त्या मागे काहीतरी एक सामान विचार असल्यासारखं वाटतं. या विस्तीर्ण भूभागावर शेकडो प्रकारचे लोक राहतात, भारतात प्रत्येक २०० किलोमीटरवर रूढी-परंपरा बदलत जातात असं म्हटलं तर अतिशयोक्त वाटायला नको. फक्त ही विविधता आपल्यासाठी गौरवास्पद असायला हवी. या विविधतेचा ‘फौल्टलाईन्स’ म्हणून बाहेरील शत्रूंनी किंवा आतील फितुरांनी गैरवापर करून घ्यायला नको.
भारतातील काही प्रमुख ऐतिहासिक राज्यांपैकी एक असलेलं राजस्थान. राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते अवाढव्य राजवाडे, किल्ले, चितोडगड, दूरवर पसरलेलं वाळवंट आणि आणि स्वतंत्र भारताच्या गौरवशाली इतिहासाचा भाग बनलेलं पोखरण. भारताच्या सर्व राज्यांमध्ये अगणित प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत. राजस्थान हे देखील याला अपवाद नाही.
प्रत्येक आदिवासी संस्कृतीचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. निसर्गाशी एकरूप झालेल्या या आदिवासी जमातींना बाह्य विश्वातील ज्ञान जरी कमी असलं, तरी आपल्या मुळांना ते धरून असतात. आफ्रिका आणि इतर देशांतील आदिवासीं जमातींपेक्षा भारतातील बहुतांश आदिवासी जमाती काही प्रमाणात वेगळ्या आहेत. मुख्य समाजापेक्षा विलग असूनही भारतातील काही आदिवासी जमातींनी ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध बंड पुकारलं होतं. त्यांच्या प्रत्येक कृत्यामागे आणि रूढीमागे काहीतरी बोध असतो, काहीतरी कार्यकारणभाव असतो, तो बोध किंवा कार्यकारणभाव ओळखण्यासाठी बघणाऱ्याची दृष्टी “साक्षेप” असायला हवी, अर्थात ज्या काही अत्यल्प प्रमाणात अनैतिक आणि अमानवीय रूढी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं समर्थन करण्याचा हेतू नाही. असो.
आपल्याला कदाचित विचित्र वाटेल पण, राजस्थानातील सातीया या भटक्या-आदिवासी जमातीत मानवाचा मृत्यू साजरा केला जातो! बहुतांशी अशिक्षित असलेल्या या जमातीची सुमारे २४ कुटुंबं संबंध राजस्थानात पसरलेली आहेत. हे लोक रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या झोपड्या उभारून राहतात आणि रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या जनावरांची विल्हेवाट लावून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ही भटकी जमात त्यांना लागलेल्या दारूच्या व्यसनामुळे कुप्रसिद्ध आहे.
पण या जमातींचं खास वैशिष्ट्य म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतर आणि त्याच्या अंतिमसंस्काराच्या वेळी साजरा होणारा उत्सव. या वेळी सर्व लोक नवे कपडे परिधान करून अंतिम यात्रेत सहभागी होतात. अंतिम यात्रा वाजत-गाजत जवळच्या स्मशानभूमीत आणली जाते आणि तो मृतदेह पूर्णपणे जळेपर्यंत मेजवानीचा बेत आखला जातो. स्थानिक दारू मागवली जाते आणि मिठाई वाटली जाते. थोडक्यात स्मशानभूमीत स्मशानशांतते ऐवजी मृत्योत्सव साजरा केला जातो. कारण त्यांच्या मते मुत्यू म्हणजे शरीररुपी पिंजऱ्यातून आत्म्याची झालेली सुटका होय.
या उलट मानवाचा जन्म हा या जमातींमध्ये एक दुःखद घटना मानली जाते. ज्या प्रमाणे मृत्यू ही शरीररुपी पिंजऱ्यातून सुटका आहे, त्या प्रमाणे जन्म ही शरीररूपी पिंजऱ्यात अडकण्याची घटना आहे. त्यांच्या मते मानवाचा जन्म म्हणजे देवाने पापी आत्म्यांना दिलेली शिक्षा होय. त्यामुळे ज्याप्रमाणे सामान्यतः बाळाच्या जन्मानंतर जगभरात जो उत्सव साजरा होतो, त्याच्या अगदी उलट या जमातीत नव्याने जन्मलेल्या बाळाला अनेकांचे शिव्या-शाप मिळतात, इतकंच काय तर त्याच्यासाठी घरात अन्नही शिजवलं जात नाही.
मुलींच्या जन्माला मात्र अगदी काळजीपूर्वक हाताळलं जातं, याचं कारण म्हणजे वेश्याव्यवसायाच्या माध्यमातून त्या मुली कुटुंबाचं पैसे कमावण्याचं साधन बनतात, याच जमातीतील एका जाणकाराने दशकभरापूर्वी इंदिरा आवास योजना या सरकारी योजनेतून जमातीतील लोकांना राहण्यासाठी पक्की घरं उपलब्ध करवून दिली होती, पण त्या लोकांनी ही सरकारी योजनेतून मिळालेली घरं विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
शरीररुपी पिंजऱ्यातून आत्म्याची सुटका या दृष्टीने मृत्योत्सव साजरा करणं हे एकवेळ काही बाबतीत बरोबर असेलही. पण मानवी जन्माचं दुःख होणं हा मात्र अज्ञानातून आलेला अंधःकार आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर कर्मबंधनात अडकल्याने मानवाचा जन्म होतो, कर्म करणं हे प्रत्येकाला अनिवार्य आहे. सर्वसर्वेश्वर श्री कृष्णालाही कर्मबंधनात अडकून महाभारताच्या रणभूमीवर कर्म करावं लागलं, असं स्वतः तो सांगतो!
मग जर त्या जमातीच्या विचारसरणीनुसार पाप कर्मामुळे मानवजन्म होतो, तर आत्म्याला मिळालेला मानवजन्म म्हणजे त्या आत्म्याला मिळालेली सुवर्णसंधी होय, कारण विचार आणि ज्ञानार्जन करू शकणारा मानव हा एकमेव प्राणी आहे. सद्विचार आणि सत्कर्माच्या जोरावर मुक्ती कशी मिळवावी याचं उत्तर देणारं मोठं संत-साहित्य भारतात उपलब्ध आहे. पण जर शिक्षणच नसेल तर यांच्यापर्यंत ते कसं आणि कोण पोहोचवणार?
शिवाय शिक्षणाचा आभाव असल्याने आणि भूमिहीन भटकी जमात असल्याने कोणत्याही आधुनिक साधनांचा संपत्ती मिळवण्यासाठी वापर होऊ शकत नाही.
राज्य आणि केंद्र सरकारांनी अशा भटक्या जमातींकडे जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे. अशा भटक्या जमातींना मुख्य प्रवाहात न आणल्यास भविष्यात सरकार आणि समाजाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. आगीत तेल म्हणजे भारतात असे अनेक राजकीय विचार/पक्ष/व्यक्ती आहेत जे यांच्या गरिबी, अज्ञान आणि अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी नक्षलवादासारख्या देशविरोधी चळवळी उभ्या करतील. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे वाक्य अर्थपूर्णरित्या अशा भटक्या जमातींपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.