आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
विजयादशमीच्या मुहूर्तावर भारतामध्ये होत असलेल्या “रावण दहन” या उत्सवाविषयी तर तुम्हाला माहितीच असेल. “सत्प्रवृत्तीने अपप्रवृत्तीवर मिळवलेला विजय” म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जाते, श्री रामाने रावणावर मिळवलेला विजय या घटनेची पार्श्वभूमी या उत्सवाला आहे. परंतु जगाच्या इतर भागामध्येसुद्धा अशाच प्रकारचे “प्रतिमा दहन” होत असते याची तुम्हाला माहिती आहे का?
आज आम्ही तुम्हाला “नेवाडा, युनायटेड स्टेट्स” याठिकाणी होणाऱ्या अजब “बर्निंग मॅन” या इव्हेंटविषयी सांगणार आहोत. या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झालेला “इव्हेंट” आज मात्र प्रसिद्धीच्या शिखरावर आहे, साहजिकच तिथे असणारा गर्दीचा ओघसुद्धा प्रचंड आहे. कोरोनाकाळामध्ये खंडित झालेला हा इव्हेंट २०२३ साली मात्र पूर्ववत सुरु झाला असून गर्दीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांची त्यावेळी मोठी गैरसोय झाली, याचीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पण त्याआधी हा “बर्निंग मॅन” इव्हेंट काय आहे? त्याची सुरवात कशी झाली? या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ.
जागतिक श्रम दिवसाच्या आधी येणाऱ्या शनिवारच्या संध्याकाळी या कार्यक्रमाचा आरंभ होत असतो, विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी आयोजनकर्ते एका विशेष शहराची निर्मितीसुद्धा करत असतात. नेवाडा येथील “रेनो” या शहरापासून सुमारे १०० मैल अंतरावर असणाऱ्या “ब्लॅक रॉक डेझर्ट” या वाळवंट-सदृश प्रदेशामध्ये इव्हेंटच्या वेळी एक प्रतीकात्मक शहर निर्माण केले जाते. या प्रदेशाच्या नावावरूनच या तात्पुरत्या शहरास “ब्लॅक रॉक सिटी” असे म्हणतात.
“बर्निंग मॅन” सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे इथे दहन करण्यात येत असलेली एक प्रचंड मोठी लाकडी मानवी प्रतिमा, पण एवढेच या कार्यक्रमाचे स्वरूप नसून, “बर्निंग मॅन” या सोहळ्याच्या मूळ संकल्पनेवर आधारित म्हणजेच अभिव्यक्ति स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता, कला, सामाजिक जाणीव या मूल्यांना जोपासणारे अनेक कार्यक्रम व कलाकृती याठिकाणी सादर केल्या जातात. या इव्हेंटमध्ये गिफ्ट इकॉनॉमीचा अवलंब केला जातो.
“बर्निंग मॅन” हा कार्यक्रम सर्वप्रथम सॅन फ्रान्सिस्को येथील “बेकर बीच” याठिकाणी २१ जून १९८६ रोजी झाला होता. या कार्यक्रमाची सुरवात “लॅरी हार्वी” आणि “जेरी जेम्स” या दोन मित्रांनी केली होती व त्यांनीच पहिल्या बर्निंग मॅनला तयार केले होते. त्यांनी तयार केलेला बर्निंग मॅन केवळ ८ फुटांचा होता. त्यानंतर दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाच्या विस्तारामुळे आणि प्रचंड प्रसिद्धीमुळे या बर्निंग मॅनची उंची वाढतच गेली आणि १९९७ साली उभा केलेला बर्निंग मॅन तब्बल ४० फुटांचा होता.
अमेरिकेच्या नॅशनल पब्लिक रेडिओने दिलेल्या माहितीनुसार “बर्निंग मॅन” संकल्पनेची सुरुवात मुळात स्व:छंदी आणि सामान्य व्यक्तीपेक्षा स्वतंत्र “बोहेमियन” किंवा कुठल्याही समूहापासून वेगळे, वैयक्तिक आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीमुळे झाली. अशा जगावेगळ्या लोकांचा हा कार्यक्रम. पण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मात्र असे कुठलेही बंधन नाही. सामान्य लोकसुद्धा इथे सहभाग नोंदवू शकतात.
‘बर्निंग मॅन’विषयी बोलताना अजून एक जण, “हा कार्यक्रम मुख्यतः ‘का?’ या प्रश्नाशी संबंधित नसून ‘का नाही?’ या प्रश्नाशी जास्त निगडित आहे”, असे मत व्यक्त करतो. या कार्यक्रमात सहभागी होणारे लोक इथे विविध उपक्रम, कलाकृती सादर करत असतात. विविध प्रकारची शिल्पे, प्रतिकृती सुद्धा इथे उभारण्यात येत असतात. ते सुद्धा अगदी स्वखर्चाने व इथे निर्माण होणाऱ्या “ट्रॅश” ची म्हणजेच कार्यक्रम झाल्यानंतर मागे राहणाऱ्या कचऱ्याची पूर्ण साफसफाई करूनच सहभागी लोक परत आपल्या वाटेला लागतात.
सामान्य लोकांना या कार्यक्रमाचे जसे आकर्षण आहे तसेच विविध क्षेत्रांमध्ये यश संपादित केलेल्या सेलिब्रिटीज्, उच्चभ्रू वर्गातील व्यक्तींनासुद्धा या बर्निंग मॅनचे आकर्षण आहे. त्यामुळेच या इव्हेन्टला लोकप्रियतेचे वलय निर्माण झाले असून यात सहभागी होणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा ही वर्षागणिक वाढतच आहे. सन २०१९ साली या कार्यक्रमाध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या गर्दीने ७८,५५० एवढा उच्चांक गाठला होता आणि २०२३ साली सहभागीची संख्या ८०,००० पर्यंत होती.
कोरोना काळात खंड पडलेला हा कार्यक्रम २०२३ साली मात्र जोरदार पद्धतीने साजरा झाला, जगभरातील लोक या बर्निंग मॅनमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. पण गर्दी जशी वाढते तसे नियोजनातसुद्धा अडचणी निर्माण होतात. त्यातच नेवाडा येथील ज्या वाळवंटामध्ये हा कार्यक्रम होता तिथे एक धुळीचे वादळसुद्धा आले होते. त्यानंतर मात्र खरी समस्या उद्भवली.
आधीच प्रचंड उष्ण असलेल्या या भागात जेव्हा अनेक लोक प्रवास करू लागले तेव्हा मात्र वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी परतीच्या मार्गावर निर्माण झाली. शिवाय वाहनास लागणाऱ्या “गॅसोलिन” या इंधनाचा पुरवठासुद्धा कमी झाला होता. तब्बल ९ तासांपेक्षा अधिक वेळ हा ट्रॅफिक जॅममधून सुटण्यास लागत होता.
दूर अंतरावर पसरलेल्या या ट्रॅफिक जॅमचे फोटो मात्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. काही लोकांना ही “हजारो वाहनांची रस्त्यावर अडकलेली रांग” बघून वाळवंटातील असाच एक सीन असलेल्या “मॅड मॅक्स: फ्युरी रोड” या सिनेमाची आठवण झाली. “बर्निंग मॅन” या कार्यक्रमाचे नियोजनकर्ते मात्र हा ट्राफिक जॅम सोडवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत होते. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या वाहनांना इंधन पुरविण्यापासून ते ज्यांना शक्य आहे अशा व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था तिथे करून देण्याचा प्रयत्न करू लागले. शिवाय आपल्या “बर्निंग मॅन” या ट्वीटर हँडलवरून सुद्धा तेथील परिस्थितीचे अपडेट्स ते वेळोवेळी देत होते.
“रेनो” येथील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जवळपास ८०० नागरिकांनी एक रात्र तेथील विमानतळावरच व्यतीत केली. टुरिझम अधिकाऱ्यांनीसुद्धा अनेक सहभागींना स्थानिक हॉटेल्समध्ये तात्पुरती व्यवस्था निर्माण करून दिली होती. “बर्निंग मॅन” हा इव्हेन्ट मुळातच शहरापासून दूर होत असल्याने सहभागींची वाहतूक करणाऱ्या बसेसचा थांबासुद्धा इव्हेन्टपासून तब्बल १६० किलोमीटरवर होता.
शेवटची ही गैरसोय वगळता “बर्निंग मॅन” हा इव्हेंट एकदाचा पार पडला. येथील ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या सहभागींना आपल्या संयमाची परीक्षा पाहणारा हा इव्हेंट नेहमीच लक्षात राहील हे विशेष!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.