जाणून घ्या इंडोनेशियामध्ये दर तीन वर्षांनी कबरीतून मृतदेह बाहेर का काढतात…?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुकयुट्युब


न जायते म्रियते वा कदाचि नायं भूत्वा भविता वा न भूय:।
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।।

शरीर नष्ट झाले तरी आत्मा मात्र चिरंतर जिवंत राहतो असा संदेश देणारा हा भगवद्गीतेतील श्लोक मृत्यूची भिती नक्कीच कमी करतो. आत्म्याच्या चिरंतर प्रवासात शरीराचा मृत्यू हा फक्त एक टप्पा आहे असंच काहीसं हा श्लोक सांगतो.

या श्लोकातील संदेशाप्रमाणेच मृत्यूला फक्त एक टप्पा समजुन मृत व्यक्तींना अगदी जिवंत व्यक्तींसारखं वागवणारी एक जमात इंडोनेशियामध्ये आहे. आज आपण याच अनोख्या जमातीबद्दल आणि त्यांच्या अनोख्या प्रथेबद्दल जाणुन घेणार आहोत.

इंडोनेशियामध्ये ‘तोरजा’(toraja) नावाची एक जमात दरवर्षी ‘मानेन’(ma’nene) नावाचा एक उत्सव साजरा करते. या उत्सवात मृत व्यक्तींचे मृतदेह खणुन बाहेर काढले जातात आणि त्यांना साफ केले जाते, त्यांचे कपडे बदलले जातात.

अहो, एवढंच काय तर त्यांच्या बरोबर फोटोसुद्धा काढले जातात!

आयुष्याचा उत्सव साजरा करा असं तुम्ही ऐकलं असेलही, परंतु मृत्यूचाही उत्सव साजरा करणारी ही अजब प्रथा ऐकुन डोकं चक्रावलं नाही तर नवलच.

मृत्यूपर्यंत एकत्र राहण्याचं वचन दिलं जातं कारण मृत्यू म्हणजे नात्याचा शेवट असंच आपण मानतो. इंडोनेशियातील सुलावेसी नावाच्या बेटावर मात्र नात्याचा हा धागा मृत्यूनंतर सुद्धा जपला जातो. या लोकांना मृत्यूची भिती वाटत नाही, नाही मृतदेहांची.

इथे घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर मृतदेह लगेच अंत्यविधीसाठी घेऊन जात नाहीत. मृत्यू म्हणजे फक्त एक आजार असुन मृत झालेली व्यक्ती आजारी आहे असा समज या लोकांमध्ये आहे. म्हणुन ते मृत व्यक्तीचा देह घरातच ठेवतात.

येथील लोकांच्या मते अंत्यसंस्कार म्हणजे आत्म्याने पृथ्वी सोडून पुढच्या जन्मात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात. मृत्यू झाल्यानंतर व्यक्तीवर अंत्यसंस्कार न करता त्याच्याऐवजी म्हशींचा बळी दिला जातो.

मृत व्यक्तीच्या घरातील लोक शक्य असतील तेवढ्या म्हशी घेऊन त्यांचा बळी देतात. यावेळी सगळे नातेवाईकसुद्धा जमा होतात. म्हशीच्या रूपात व्यक्तीचा जीवनाकडुन मृत्यूपर्यंतचा प्रवास साजरा केला जातो.

म्हैस हे मृत्यूनंतरचं एकमेव वाहन आहे असं इथे समजलं जातं. येथील पूर्वजांची अशी समजूत आहे की मृत व्यक्तीकडे जर म्हैस नसेल तर त्या व्यक्तीला पुढचा जन्म मिळण्यासाठी वेळ लागतो. म्हणुनच जेवढ्या जास्त म्हशींचा बळी दिला जाईल तेवढाच मृत व्यक्तीचा पुढचा प्रवास सुखकर होतो अशी या लोकांची धारणा आहे.

मृत व्यक्तीला जेवण्यासाठी दिले जाते, दररोज अंघोळ घातली जाते. प्रार्थना करताना सुद्धा त्या व्यक्तीच्या जवळबसुनच प्रार्थना केली जाते. रात्री अंधार झाला की त्या व्यक्तीच्या खोलीतील लाईटसुद्धा चालू केले जातात.

थोडक्यात मृत व्यक्ती आजारी असल्याने झोपली आहे असं समजलं जातं आणि बाकी सगळी कामे दररोज चालू असतात तशीच चालू ठेवली जातात.

मृतदेह घरात किती दिवस ठेवायचा हे प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं. आधी मृतदेह जपण्यासाठी विशिष्ट वनस्पतीची पाने वापरली जात असत. आता त्याऐवजी फॉर्मालिन नावाचं रसायन वापरून मृतदेह साफ आणि ताजा ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

एकदा मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले की मग प्रत्येक ३ वर्षांनी मृतदेह खणून बाहेर काढले जातात. त्यांना स्वच्छ केले जाते. नविन कपडे घातले जातात, अगदी मृत व्यक्ती सिगारेट पित असेल तर मृतदेहास सिगारेटसुद्धा दिली जाते. तसेच गावात त्यांना घेऊन मिरवणुकसुद्धा काढली जाते.

तेथील लोकांच्या मते, या उत्सवातुन त्यांचं त्यांच्या पुर्वजांवर असलेलं प्रेम दिसून येतं. तसंच, नविन जन्माला आलेल्या, आपल्या पुर्वजांना न बघितलेल्या नविन पिढीसाठी हा सण म्हणजे आपल्या पुर्वजांप्रती असलेलं आपलं प्रेम दाखवण्याची, कृतज्ञता दर्शविण्याची एक संधी असते.

या जमातीचे लोक आयुष्यभर खूप कष्ट करून पैसे कमवतात. परंतु कमावलेली संपत्ती जिवंत व्यक्तींवर खर्च न करता ते ती मृतांसाठी जपुन ठेवतात.

अंत्यसंस्काराचा कार्यक्रम म्हणजे अगदी उत्सवासारखा साजरा केला जातो. आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीचा वापर टोलेजंग पद्धतीने निरोप देण्यासाठी केला जातो.

विघटीत होत चाललेल्या या मृतदेहांना जेव्हा बाहेर काढलं जातं तेव्हा नक्की काय वाटत असेल याचा विचार केला तरी आपल्याला भिती वाटू शकते. परंतु येथील लोकांच्या मते हे मृतदेह बघुन त्यांना कसलंही दु:ख किंवा भिती वाटत नाही.

याउलट उत्सवाच्या वेळी मनावर असलेलं दु:खाचं ओझं कमी होतं असं हे लोक सांगतात. या मृत व्यक्तींना संबोधताना ते आजही भुतकाळाच्या वाक्यरचनेचा नाही तर वर्तमान काळाचा वापर करतात. उत्सवाचा दिवस म्हणजे मृत व्यक्तींबरोबर असणाऱ्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस असे येथील लोक मानतात.

“Aluk to dolo” या जुन्या धर्मात मोडणारे हे ‘तोरजा’ जमातीचे लोक कायमच या प्रथेचं पालन करत आले आहेत. चर्चने केलेल्या प्रयत्नानंतर ही प्रथा आता कमी होत चालली असली तरी पूर्ण बंद झाली नाही. जवळ-जवळ ८०% लोकांनी aluk to dolo या धर्माचं पालन करणं आता सोडून दिलं आहे.

बाहेरील लोकांना ही प्रथा विचित्र किंवा चुकीची वाटू शकते परंतु या प्रथेमागे असणारी तत्वं तीच आहेत जी बाकीच्या संस्कृतींमध्ये आहेत. मृत व्यक्तींच्या आठवणी जपणं हा एकच हेतू यामागे आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत फक्त थोडी वेगळी आहे.

आता सगळ्याच वेगळ्या गोष्टी चुकीच्या असतीलच असं नाही ना..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!