आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतात अनादि कालापासून निसर्ग पूजेची परंपरा आहे. बैल, गाय, घोडे, हत्ती अशा अनेक प्राण्यांची पूजा भारतीय अगदी प्राचीन काळापासून करत आलेले आहेत. तसेच नाग या सर्पजातीतील विषारी प्राण्याचीसुद्धा भारतात पूजा केली जाते हे सर्वश्रुत आहे. प्राण्यांची पूजेतून अनेक प्रकारचे भाव स्पष्ट होतात.
निसर्गामध्ये समतोल राखण्यासाठी सर्व प्रकारच्या प्राण्यांची गरज असते. सगळेच प्राणी आपापल्या स्तरावर तो समतोल साधून असतात. म्हणून प्रत्येक जीवाला सन्मान देण्याची पद्धत इथे रूढ झाली आणि उंदरापासून गरुडापर्यंत सर्व प्राणी-पक्ष्यांना देवांची वाहनं मानून त्यांना नमन करण्यात आलं.
फक्त प्राणीच नव्हे तर वनस्पतींच्या पूजेची परंपरासुद्धा भारताने जपली. वटवृक्ष, पिंपळ. कडुलिंब, तुळस या मानवपयोगी तसेच औषधी वनस्पतींना विशेष महत्त्व देऊन पुजण्यात आले. तसेच दुर्वा, नारळ, हळद, चंदन अशा नैसर्गिक घटकांना पूजेत महत्त्वाचं स्थान देऊन, नंतर प्रसादाच्या रूपाने वाटलं जातं. या सर्व वनस्पती आणि नैसर्गिक घटक मानवाला आरोग्यदायी ठरणारे आहेत.
आस्थेबरोबरच मानवी आरोग्याचा आणि निसर्गाचा समतोल साधणारी जगातील ही एकमेव संस्कृती असेल बहुधा. उंचच उंच हिमालयाच्या शिखरावर ज्या ठिकाणी सर्वसाधारण मनुष्य थंडीपासून रक्षण करण्याचे अनेक कपडे परिधान करून जातो, त्याठिकाणी काही योगी त्यांच्या तोकड्या वेशात तपश्चर्या करताना दिसतात.
एकूणच भारतीय समाज गेली कित्येक वर्षे निसर्गाच्या सान्निध्यात आणि निसर्गाच्या जवळ राहणारा आहे, म्हणूनच निसर्गाने भारतीयांना देतानाही सढळ हाताने दान दिले. अन्य देशांपेक्षा भारतातील गहू आणि अन्य अन्नधान्य उच्च दर्जाचे असते, येथील लोकांची रोग-प्रतिकारकशक्ती अन्य देशांतील लोकांपेक्षा काहीशी वाढीव आहे याचा प्रत्यय आपल्याला कोरोना काळात आलाच असेल.
सुयोग्य उपकरणांच्या अभावी सुमारे २१ हजार फुटाच्या उंचीवर जाऊन लढाई करणं आणि जिंकणं हे भारतीय सैन्याच्या बाणा सिंगलाच जमलं. सियाचीनसारख्या भयानक रणभूमीवर जगातील कोणताही सैन्य टिकण्याची शक्यता कमीच.
तर अशा या निसर्गाने भरभरून दिलेल्या भारतात अनेक चित्र-विचित्र प्रकार घडल्याचे आपल्यला दिसतात. पाऊस पडावा म्हणून बेडूक-बेडकीणीचं लग्न लावून दिलं जातं. अनेकदा परदेशात पाळीव प्राणी आणि त्यांच्या मालकाचे लग्न झाल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत आल्या असतील. पण भारतात अशी एक घटना घडली आहे. सापाच्या प्रेमात पडलेल्या एका महिलेने या सरपटणाऱ्या प्राण्याशी विधीनुसार लग्न केले. हा विचित्र विवाह सोहळा ओडिशा राज्यातील अटाला गावात २००६ साली पार पडला.
रेशमी साडी परिधान करून ३० वर्षीय बिंबला दास सुमारे एक तास विधी पूर्ण करण्यासाठी बसली होती. तिच्या घराजवळील वारुळात राहणारा साप या विवाहसोहळ्यात मात्र तिच्या बाजूला नव्हता. सापाची पितळी प्रतिकृती त्या महिलेच्या बाजूला ठेवण्यात आली होती. बिंबालाच्या मते, जरी सापांना बोलता येत नाही आणि बोललेलं कळतही नाही, तरी त्यांच्या एका विशिष्ट शैलीत ते संवाद साधतात. ज्यावेळी ती दूध घेऊन वारुळाच्या जवळ ठेवत असे, तेव्हा तेव्हा तो नाग दूध पिण्यासाठी वारुळाच्या बाहेर येत असे.
बिंबला म्हणाली, “मी जेव्हा जेव्हा त्याला वारुळाबाहेर आलेलं पाहिलं, तेव्हा मी त्याच्या जवळ गेले आणि त्याने मला काही इजा केली नाही!”
विशेष म्हणजे जेव्हा बिंबालाने आपली लग्नाची कल्पना सर्वाना सांगितली तेव्हा गावकऱ्यांनीही कोणताही विरोध न दर्शवता या विवाहसोहळ्याचे स्वागत केले. शिवाय सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन विवाहसोहळ्यानंतर मेजवानीचा बेत केला.
अशिक्षित असल्याने आणि रेडिओ, दूरदर्शन, दूरध्वनी किंवा कम्प्युटर आणि इंटरनेट सुविधा नसताना तिला तिच्या प्रसिद्धीच्या प्रमाणाबद्दल माहिती नव्हती. भुवनेश्वर येथील उमाकांत मिश्रा नावाच्या एका महत्त्वाकांक्षी तरुण पत्रकाराने प्रथम बिंबलाची कथा समोर आणली. सत्यसुंदर बारिक नावाच्या एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने हे टीव्ही कव्हरेज पाहिले आणि लग्न प्रत्यक्ष पाहिलेले नसतानाही त्याने गावच्या प्रमुखांशी फोनवर बोलून तब्बल दोनशे शब्दांचा लेख सादर केला.
यानंतर ही कथा ब्लॉगपर्यंत पोहोचली. शेकडो ब्लॉगर्स कथेशी जोडले गेले आणि हजारो ब्लॉग वाचकांनी त्या पोस्टवर कमेंट्स केल्या. ख्रिश्चन ब्लॉगर्सने ही घटना नैसर्गिक नियमांचे उल्लंघन असल्याचं सांगितलं. त्यानंतर या प्रकरणावरून अनेक वादही झाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.