ही चीनी महिला आजही गांधीजींच्या शिकवणीप्रमाणे आपलं आयुष्य जगतेय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


१९२० साली टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यता लढ्याची चळवळ आपल्या हातात घेतली. दक्षिण आफ्रिकेत गांधींनी दिलेल्या लढ्यामुळे ते आधीच सर्वदूर लोकांना परिचित झाले होते. पण जसा त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले, त्यांची कीर्ती जगभर पसरली.

युरोप आणि अमेरिकाच नाही तर चीनमध्ये देखील गांधी आणि त्यांच्या अहिंसेच्या लढ्यातुन लोक प्रेरणा घेत होते. तिथे अनेकांना असा प्रश्न देखील पडत होता की सत्याग्रह आणि अहिंसेच्या पालनाने त्यांच्या देशाचं कल्याण शक्य आहे का?

भारतात त्याकाळी ब्रिटिश राजवटीने आपली पकड मजबूत केलेली, त्याप्रमाणेच चीनच्या भूमीवर देखील ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि जपान यांसारख्या परकीय सत्तांची हुकूमत होती.

या सत्तांमुळे चीनच्या भूमीवर सतत संघर्ष होत होता ज्यामुळे चीनमध्ये गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली होती. 

सर्वत्र हिंसेचे थैमान असलेल्या चीनमधील नागरिकांना गांधींच्या अहिंसापूर्ण आंदोलनाचे आकर्षण वाटणे ह्यात काही नवल नव्हते.

खरंतर महात्मा गांधींनी कधीच चीनचा दौरा केला नव्हता, पण चीनमध्ये त्यांचा एवढा प्रभाव आहे की चीनमध्ये त्यांच्यावर ८०० पुस्तकं लिहण्यात आली आहेत. साउथ चायना नॉर्मल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर शांग छुआनयु यांनी बीबीसी या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

चीनमध्ये गांधींची एकच मूर्ती असून ती बीजिंग शहरातील एका गार्डनमध्ये अनेक थोर विभूतींच्या पुतळ्यांच्या गराड्यात ठेवण्यात आली आहे. चीनमधील लोकांवर दिवसेंदिवस महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडत असून लोक त्यांचा अभ्यास करू लागली आहेत.

चीनच्या पूर्व आनहुई प्रांतात असलेल्या हुआन थियान गावात राहणाऱ्या ५७ वर्षीय वु पेई या देखील गांधींच्या विचारांनी प्रभावित झाल्या असून त्यांनी महात्मा गांधींच्या अनेक लेखांचा चिनी भाषेत अनुवाद केला आहे.

 त्या महात्मा गांधींच्या शिकवणीप्रमाणे अत्यंत सामान्य आयुष्य जगत असून त्यांनी चीनसारख्या मांसाहारी देशात देखील शाकाहारी जेवणाचा अवलंब केला आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वीच महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर आधारित एका शाळेची सुरुवात केली आहे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत वु पेई म्हणतात की त्या मुलांना गांधींच्या विचारांची शिकवण लगेचच देत नाही. त्या सुरुवातीला त्या मुलांना चांगलं काम करायला शिकवतात, त्यांना स्वच्छतेच महत्व पटवून देतात, निसर्गाचं महत्व पटवून देतात, त्यांना वयोवृद्ध लोकांसोबत वेळ घालवायला लावतात.

वु पेई यांच्या गावातील एका व्यक्तीनुसार, वु पेई यांनी त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी जी शाळेची देखणी इमारत उभारली आहे, ती ८०० वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अशी आहे. तिथे मोठा ब्लॅक बोर्ड आहे, वर छतावर कन्फ्युशियस धर्माचे विशाल चिन्ह कोरण्यात आले आहे.

या शाळेतील मुलांच्या बेंचच्या अवती भोवती त्यांच्या कलाकुसरीतुन निर्माण करण्यात आलेल्या वस्तू, चित्रे आणि कलाकृती रचण्यात आल्या आहेत. सुंदर आकाश कंदिलांनी शाळेची सजावट करण्यात आली आहे.

इथे नियमित प्रार्थना घेतली जाते, यात मुलांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांवर चांगले संस्कार होतात म्हणून त्यांचे पालक देखील वु पेई करत असलेल्या कार्याने प्रभावित झाले आहेत.

इथे शिक्षण घेत असलेल्या एका मुलाच्या आईनुसार जेव्हापासून त्यांचा मुलगा या शाळेत शिक्षण घेत आहे तेव्हापासून त्याच्या राहणीमानात अमुलाग्र असा बदल घडून आला आहे. या आधी त्याचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वापरात दीर्घ काळ जात होता, आता त्याचे प्रमाण कमी होत आहे.

वु पेई यांचा जन्म शांघाय शहरात झाला असून त्यांनी फिजिक्समध्ये मास्टर्सपर्यंतचा कोर्स केला आहे. त्यांनी लंडनमध्ये दोन वर्षे वाल्डर्फ या शैक्षणिक प्रणालीचा अभ्यास केला असून या माध्यमातून मुलांच्या मानसिक आणि शारीरिक जडणघडणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिक्षणाला त्यांनी चालना दिली आहे.

खरंतर चीनमध्ये मुलांना फार तांत्रिक शिक्षण दिले जाते. यात त्यांचा मानसिक विकास मात्र होत नाही. त्यामुळे त्या नवीन पद्धतीचा शाळेची कल्पना घेऊन काम करत आहेत.

वु पेई म्हणतात की त्यांच्यावर गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यावेळी पडला ज्यावेळी त्यांनी २००२ साली एका भारतीय वक्त्याचे गांधींवरील भाषण ऐकले, त्या अगोदर त्यांनी गांधीबद्दल फार वरवरचे वाचन केले होते. 

परंतु गांधींबद्दल ऐकल्यानंतर त्यांनी गांधीजींच्या तत्वज्ञानाचा अजून अभ्यास सुरू केला, त्यांनी त्यांचा एका मित्राच्या सांगण्यावरून गांधींच्या दोन पुस्तकांचे भाषांतर केले आहे. यापैकी एक त्यांचा निबंध संग्रह आहे आणि दुसरा वचन संग्रह आहे.

पृथ्वीवर माणसाच्या गरजा पूर्ण करण्या इतपत सर्व आहे पण त्यांचा अतिरेकी इच्छा पूर्ण करण्याइतपत काही नाही, हे गांधींजींचे वाक्य आपल्याला फार आवडते असे वु पेई सांगतात.

वु पेई म्हणतात सध्या चीनमध्ये गांधींच्या विचारांना लोक प्रचंड आदर्शवादी मानतात, चिनी लोकांना हे विचार पटत नाहीत पण वु पेई यांना अशी आशा आहे की एक ना एक दिवस लोकांना गांधींचे विचार समजतील, त्यातील मर्म समजेल. वु पेई या सध्या आपल्या शाळेच्या माध्यमातून हेच विचार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहेत.

आज महात्मा गांधींना जाऊन अनेक दशके उलटली तरी त्यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचा व सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव जगभरातील असंख्य लोकांवर कायम आहे. वु पेई आणि त्यांच्यासारखे अनेक लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन चीनसारख्या हुकूमशाही राष्ट्रात काम करत आहेत, हाच गांधींजींच्या विचारांचा विजय आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!