आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आपलं प्रॉडक्ट खपावं यासाठी कंपन्या जाहिरातींमध्ये बऱ्याच गोष्टी वाढवून-चढवून दाखवतात. मग कोणी बॉडी स्प्रेमुळे मुली आकर्षित झालेलं दाखवतं, तर कोणी माऊथ फ्रेशनरमुळे किस मिळालेलं दाखवतं. मात्र, या गोष्टी खऱ्या नसतात, आणि खऱ्या आयुष्यात हे प्रॉडक्ट्स वापरुन असं काही होणार नाही हे पाहणाऱ्यांनाही लक्षात येतं. किंबहुना जाहिराती पाहणारे प्रेक्षक तेवढं समजून घेतील असा विचार करुन, केवळ ‘एंटरटेन्मेंट’साठी कंपन्या आपल्या जाहिरातींमध्ये अशा गोष्टी दाखवतात.
1996 मध्ये पेप्सिनेही आपलं नवं अॅड कॅम्पेन लॉंच केलं होतं. यामध्ये पेप्सीको आपल्या पेप्सी या शीतपेयांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन आली होती. यामध्ये पेप्सी पिऊन लोक पॉईंट्स गोळा करु शकत होते. असे ठराविक ‘पेप्सी पॉईंट्स’ गोळा केले, की त्या बदल्यात पेप्सिको विजेत्यांना भेटवस्तू देत होती. या भेटवस्तूंमध्ये टीशर्ट, लेदर जॅकेट, गॉगल्स, सीडी केस, बेसबॉल कॅप अशा बऱ्याच गोष्टी होत्या. मात्र, एक अशी गोष्टही होती जी पेप्सीकोने आपल्या जाहिरातीमध्ये नकळत दाखवली होती. ती म्हणजे, अमेरिकेचं फायटर जेट हॅरियर!
डीसी-मार्व्हल, रोनाल्डो-मेस्सी, लिव्हरपूल-मँचेस्टर युनायटेड या सगळ्यासोबतच कोक आणि पेप्सी यांमधील वादही जगप्रसिद्ध आहे. आजही या दोन्ही शीतपेयांचा मोठ्या प्रमाणात लॉयल फॅनबेस आहे. या दोन्हीमधील वॉरही कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्याकाळात कोला वॉर्स हे अत्यंत मोठ्या प्रमाणात सुरू होतं.
मार्केटवर आपलं वर्चस्व असावं यासाठी कोका कोला आणि पेप्सी या दोन्ही कंपन्या आपापल्या कॅम्पेनवर पाण्यासारखा पैसा खर्च करत होत्या. यातच पेप्सीने हे आपलं नवं कॅम्पेन सुरू केलं होतं. याच्या जाहिरातीमध्ये त्यांनी एक तरुण दाखवला होता, आपला टीशर्ट, जॅकेट आणि गॉगल दाखवत, त्या गोष्टींची किंमत पेप्सी पॉईंट्समध्ये सांगत आहे. म्हणजे, टीशर्ट- ७५ पेप्सी पॉईंट्स, गॉगल्स – 175 पेप्सी पॉईंट्स, असं. यालाच पुढे एक कॉमिक आणि सुपरनॅचरल असा टच देण्यासाठी म्हणून, हा तरुण चक्क हॅरियर फायटर जेटमधून उतरताना दाखवला आहे.
अर्थातच हे जेट खरं नसून, सीजीआयने बनवलेलं होतं. हा तरुण जेटमधून उतरुन निघून जातो, आणि स्क्रीनवर ‘हॅरियर फायटर – ७०,००,००० पेप्सी पॉईंट्स’ असं लिहिलेलं दिसून येतं. जेट आणि पुढील ही अक्षरं हा सगळा त्या जाहिरातीला देण्यात आलेला कॉमिक टच होता हे कोणीही सांगू शकलं असतं. याला कारण म्हणजे, पेप्सीचे १२ कॅन पिल्यानंतर अवघे पाच पॉईंट मिळणार होते. म्हणजेच, सत्तर लाख पेप्सी कॉईन्स मिळवणं हे केवळ अशक्य होतं.
एक रेग्युलर पेप्सी कप विकत घेतल्यानंतर एक पेप्सी पॉईंट मिळणार, दोन लिटर पेप्सी घेतल्यानंतर दोन पॉईंट्स आणि १२ कॅन्सचा पॅक घेतल्यानंतर ५ पॉईंट्स मिळणार होते. यातून मग ४० पॉईंट्सला सीडी केस, ६० पॉईंट्सला बेसबॉल कॅप, ८० पॉईंट्सला टीशर्ट, ३२५ पॉईंट्सला रिस्ट वॉच आणि सर्वात महागडं म्हटल्यास ३३०० पॉईंट्सला माऊंटन बाईक मिळणार होती.
इतर सर्वांचं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे असताना, वॉशिंग्टनमधील एका तरुणाचं लक्ष मात्र दुसऱ्याच गोष्टीकडे होतं. ती म्हणजे, जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं फायटर जेट! जॉन लिनर्ड असं या तरुणाचं नाव होतं. तो बिझनेस स्टुडंट होता. त्याला पहिल्यापासूनच विमानांमध्ये रस होता. त्यामुळे त्याला माहिती होतं, की हॅरियर हे काही साधंसुधं जेट नाही. हॅरियर हे अमेरिकेच्या हवाई दलातील त्या काळचं सर्वात शक्तिशाली आणि आधुनिक असं फायटर जेट होतं. त्याची किंमत ३ कोटी ३० लाख डॉलर्सच्या घरात होती. शिवाय मिलिट्री जेट असल्यामुळे ते सामान्यांसाठी उपलब्ध नव्हतंच.
जाहिरातीमध्ये दाखवलं होतं, की हॅरियर जेट हे ७ मिलियन पेप्सी पॉईंट्सला उपलब्ध आहे. तेवढे पॉईंट्स जमा करण्यासाठी लागणारी पेप्सी जर प्यायची झाली, तर त्यासाठी सुमारे ४० लाख डॉलर्स खर्च येऊ शकला असता. मात्र, तीन कोटींच्या जेटसमोर ही किंमत काहीच नव्हती. पण तेवढी पेप्सी पिणे, किंवा विकत घेणे तरी शक्य होतं का? तर नक्कीच नाही! पण जॉनला तर जेट मिळवायचंच होतं. जॉनचं नशीब एवढं चांगलं होतं, की त्याच्या या अडथळ्याला पेप्सीने आधीच दूर केलं होतं.
पेप्सीने आपल्या कॅम्पेनमध्ये असं जाहीर केलं होतं, की लोकांनी सर्वच्या सर्व पेप्सी कॉईन्स हे कॅन किंवा बॉटल्समधून गोळा करणे गरजेचे नाही. अशा प्रकारे गोळा केलेले कमीत कमी १५ पेप्सी कॉईन्स तुमच्याकडे असतील, तर तुम्हाला हवे असणारे इतर कॉईन्स तुम्ही पेप्सीकडून विकत घेऊ शकत होता, तेही १० सेंट्स प्रती पेप्सी कॉईन एवढ्या दराने. म्हणजेच, तुम्हाला बेसबॉल कॅप हवी असेल, तर आवश्यक असणाऱ्या ६० पेप्सी पॉईंट्स पैकी केवळ १५ तुम्ही पेप्सी पिऊन मिळवले, आणि बाकी ४५ पेप्सीकडून विकत घेतले, तरी चालत होतं.
हे पाहून जॉनने सर्व गणित मांडलं. त्याला लक्षात आलं, की पेप्सीकडून ७० लाख पॉईंट्स गोळा करायचे असतील, तर त्याला सात लाख डॉलर्सची गरज होती. ही किंमत तरीही ३ कोटींच्या जेटपुढे कमीच होती. त्यामुळे जॉन लिनर्डने तातडीने आपले सर्व कॉन्टॅक्ट्स वापरुन कसेबसे ७ लाख डॉलर्स जमा केले.
फेब्रुवारीमध्ये त्याने पेप्सीची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर एकाच महिन्यात त्याने हा सर्व जुगाड केला. २८ मार्च १९९६ ला त्याने पेप्सीला पत्र पाठवले. या पत्रासोबत १५ पेप्सी पॉईंट्स, आणि सात लाख ८५० डॉलर्सचा चेक (डिलिव्हरी चार्जेससह) या गोष्टी होत्या. त्याने या पत्रामध्ये त्याने आपल्या जेटची मागणी केली होती.
काही आठवड्यांनंतर त्याला पेप्सिकोकडून पत्र मिळाले. त्यात त्यांनी जॉनचा चेक त्याला परत केला होता. यासोबतच काही छोटी-मोठी बोनस कुपन्सही त्याला दिली होती. या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं, “तुम्हाला हवी असणारी गोष्ट पेप्सीच्या कॅम्पेनचा भाग नाही. कॅटलॉगमध्ये दिलेल्या वस्तूंपैकीच एखादी वस्तू तुम्ही घेऊ शकता. जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं हॅरियर जेट हे केवळ मनोरंजनासाठी वापरण्यात आलं होतं. तुमच्या गैरसमजाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. भरपाई म्हणून आम्ही तुम्हाला काही कुपन्स पाठवत आहोत.”
आता या सगळ्या दरम्यान जॉनचे स्वतःचे चार हजार डॉलर्स खर्च झाले होते. पैसे जमा करण्यासाठीची धावपळ, वकीलांचा खर्च असा सगळा खर्च त्याला स्वतःला करावा लागला होता. सात लाख डॉलर्स जरी परत मिळाले असले, तरी हा वरचा खर्च त्याला परत मिळणार नव्हता.
त्यामुळे त्याने पेप्सिकोला पुन्हा एक पत्र लिहिले. यावेळी जॉनच्या वकिलांनी हे पत्र लिहिले होते. यात ते म्हणतात, “७ मे १९९६ला आलेले तुमचे पत्र आम्हाला मान्य नाही. आम्ही जाहिरातीचा व्हिडिओ नीट पाहिला आहे, ज्यात स्पष्टपणे ‘७ मिलियन पेप्सी पॉईंट्सच्या बदल्यात हॅरियर जेट’ असा उल्लेख आहे. त्यामुळे आपली कमिटमेंट पूर्ण करत तुम्ही १० दिवसांच्या आत माझ्या आशिलाची मागणी पूर्ण केली नाही, तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल.”
जॉनचं हे पत्र बीबीडीओ न्यूयॉर्क या कंपनीपर्यंत पोहोचलं. ही तीच कंपनी होती, ज्यांनी पेप्सीची ती जाहिरात तयार केली होती. या कंपनीचे व्हॉईस प्रेसिडेंट जॉनचं हे पत्र वाचून आश्चर्यचकित झाले. त्यांनी वक्तव्य दिलं, “डोकं ताळ्यावर असणारा कोणताही व्यक्ती सांगू शकेल, की ते जेट स्कीमचा भाग नाही”. त्यांच्या या वक्तव्यानंतर जॉनने खरोखरच पेप्सिकोला कोर्टात खेचले.
हे प्रकरण तब्बल तीन वर्षे सुरू राहिलं. या दरम्यान जॉनला बराच खर्चही आला. आपण हे सर्व प्रसिद्धीसाठी करत नसून, आपल्याला केवळ ते जेट हवं आहे असं जॉन सांगत होता. तीन वर्षांनंतर अखेर ५ ऑगस्ट, १९९९ला या प्रकरणाचा निकाल पेप्सिकोच्या बाजूनेच लागला. यावेळी जाहिरातीत दाखवलेला जेटचा भाग हा केवळ मनोरंजनासाठी आहे असं मत न्यायाधीशांनी मांडलं. शिवाय ५०० डॉलर्सपेक्षा अधिक रकमेच्या वस्तूची खरेदी-विक्री करताना दोन्ही बाजूंची संमती आवश्यक आहे, मात्र पेप्सिकोने अशी कोणतीही संमती दर्शवली नाही. या मुद्द्यांच्या आधारे पेप्सिकोच्या बाजूने निकाल लागला.
‘निगेटिव्ह पब्लिसिटी इज अल्सो पब्लिसिटी’ असं म्हणतात. या सर्व प्रकरणाचा पेप्सीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. आतापर्यंतचं पेप्सीचं हे सर्वात यशस्वी अॅड कॅम्पेन ठरलं. या सगळ्या दरम्यान, पुन्हा असं होऊ नये म्हणून पेप्सीने एक गोष्ट मात्र केली. त्यांनी आपल्या जाहिरातीमधील जेटसाठी आवश्यक असणारे पॉईंट्स हे ७ मिलियन वरुन ७०० मिलियन केले. तसेच, जाहिरातीच्या शेवटी ‘जस्ट किडिंग’ असंही दर्शवलं. जॉनला मात्र आपलं फायटर जेट नाहीच मिळालं!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.