आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगातील सर्वांत सुंदर इमारत म्हणून प्रसिद्ध असलेलं ताज महाल आपलं ३०० वर्षांपेक्षा जास्तीचं जुनं सौंदर्य घेऊन यमुनेच्या तीरावर अजूनतरी उभं आहे. ‘अजूनतरी’ यासाठी कारण हळू हळू ताजमहालचा वि*ध्वंस होत आहे. तत्कालीन विविध राज्यातील आणि देशांतील कारागिरांनी आणि स्थापत्यशास्त्रज्ञांनी या इमारतीची निर्मिती केली. तीन शतकांहून अधिक काळ ताजने जगभरातील पर्यटकांना आपल्या सौंदर्याने भुलवलं.
पांढऱ्या शुभ्र संगमरवरी खडकावर केलेलं नक्षीकाम, मोजून मापून उभारलेली इमारत अन यमुनेच्या पाण्यावर दिसणारं या जगातील आश्चर्याचं प्रतिबिंब म्हणजे अनेकांसाठी स्वर्गच! पण भारतातील एकेकाळी हस्तिदंतसमान पांढऱ्या स्मारकातील संगमरवर नैसर्गिक ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेतून कुरूप होत आहे.
पण आजमितीस ताज महाल आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे की काय असं दिसतंय. पर्यावरणवादी वकील एम. सी. मेहता काही दशकांपासून सर्वोच्च न्यायालयात ताजच्या घटत्या आयुष्यमानाबद्दल याचिका दाखल करीत आहेत. १९८६ पासून ते ताजच्या घटत्या आयुष्याबद्दल आणि सौंदर्याबद्दल न्यायालयात याचिका दाखल करीत आहेत.
ट्रॅपेझियम झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना वायू प्रदूषणामुळे धोका असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे. न्यायालयाने २९२ उद्योगांना कोक/कोळशाऐवजी प्रोपेन सारख्या सुरक्षित इंधनाचा वापर करण्याचे आदेश दिले, अन्यथा त्यांना स्थलांतरित व्हावे लागेल असेही सांगितले आहे. गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडकडे गॅसच्या अर्जांची जबाबदारी होती. न्यायालयाने या उद्योगांतील कामगारांना काही मूलभूत अधिकारही दिले आहेत आणि स्थलांतरासाठी लागणाऱ्या वेळेत त्यांचे वेतन देण्याची मागणी केली आहे.
ताजच्या हळू हळू ढासळण्यामागे आणि त्याचं सौंदर्य कमी होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे यमुना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात होणारं प्रदूषण. उत्तर प्रदेश राज्यात आणि आग्र्याच्या आसपास मागच्या काही वर्षांत औद्योगिक विकासाच्या नावाखाली अनेक कारखाने उभे राहिले. या कारखान्यातील आणि गाड्यांच्या धुरामुळे ताजचं सौंदर्य आणि अस्तित्व धोक्यात आल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.
यमुना नदी हिमालयातील यमुनोत्री या ठिकाणावरून अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ पाणी घेऊन भारतीय उपखंडावर उतरते. पण उतरल्यानंतर लगेचच राजधानी दिल्लीत सुमारे १७ गटारांचे पाणी आणि ३२९६ कालव्यांचे पाणी यमुना नदीत “निर्धास्तपणे” सोडण्यात येते. तर यमुना १२२ किलोमीटरचा प्रवास आग्र्यामधून करते, त्यावेळी यमुनेत तब्बल ९० कालव्यांमधून सांडपाणी सोडलं जातं. पावसाळ्यात जरी यमुना दुथडी भरून वाहत असली, तरी पावसाळ्याचे ४ – ५ महिने वगळता वर्षभर यमुनेमध्ये त्राण नसतात. आग्र्यापर्यंत येतानाच यमुना नदी कोरडी पडल्याचं दिसून येतं.
गटार आणि कालव्यांमधील सांडपाण्यामुळे आणि कारखान्यातील दूषित पाण्यामुळे यमुनेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रदूषणामुळे विविध प्रकारचे कीटक यमुनेमध्ये तयार होतात. या कीटकांच्या विष्ठेमुळे देखील ताजच्या पांढऱ्या शुभ्र भिंतींवर हिरवे-काळे डाग दिसून येत आहेत. संगमरवरी दगड स्वच्छ करण्याच्या पारंपरिक पद्धती वापरूनही ही अस्वच्छता दूर करता येत नाही. वाढत्या वायुप्रदूषणामुळे आणि हवेत पसरणाऱ्या कार्बनसारख्या अनेक रासायनिक घटकांमुळे ताजच्या भिंतींवर पिवळे डाग पडलेले आपल्याला दिसून येतात.
यमुनेच्या वाढत्या प्रदूषणामुळे यमुनेतील पाण्याचा स्तर मोठ्या प्रमाणावर घटत आहे. पाण्याच्या घटत्या स्तरामुळे ताज महालाच्या भक्कम पायाला आवश्यक असलेली आर्द्रता मिळत नसल्याने ताज महालचा पाया अधू होत आहे, आणि यामुळेच ताजची इमारतही धोक्यात आली आहे.
तसेच ताजच्या आणि त्याच्या आजूबाजूच्या खांबांच्या भिंती विटांच्या रचनांनी तयार केल्या असून विटांच्या भिंतींवर चुन्याच्या साहाय्याने संगमरावरचं बांधकाम करण्यात आलं आहे. चुन्याच्या बांधकामाला टिकून राहण्यासाठी सतत आर्द्रता असलेल्या जागेची आवश्यकता असते. पुरेशी आर्द्रता न मिळाल्याने चुन्याचं हे बांधकाम धोक्यात आलं आहे, आणि सतत संगमरवराचे तुकडे पडताना दिसतात.
संगमरवराच्या तुकड्यांप्रमाणेच ताज महालाच्या इमारतीचे अनेक लहान-मोठे दगड कोसळण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. दगड आणि दगडांचे तुकडे कोसळण्याबरोबरच इमारतींच्या अनेक भागांवर चिरा पडल्याचेही दिसून आलं आहे.
संगमरवर पिवळं पडण्याचं नैसर्गिक कारण म्हणजे संगमरवर एक नैसर्गिकरित्या रूपांतरित खडक आहे. संगमरवरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. संगमरवरात पसरलेल्या लोहाची थोडी मात्राही ते लोह ऑक्सिडाइझ करू शकते आणि पृष्ठभागाचा रंग बदलू शकते. पाणी ऑक्सिडायझेशन प्रक्रियेला गती देते. ताजमहाल जवळपास ४०० वर्षं जुना आहे, त्यामुळे कालांतराने नैसर्गिक रंगहीन होणेही अपेक्षित आहे.
तर संगमरवर पिवळं पडण्याचं मानवनिर्मित कारण म्हणजे भारतातील मोठ्या प्रमाणावरचं वायू प्रदूषण! आग्रा शहर याला अपवाद नाही. वाढत्या कारच्या वापरामुळे आणि आग्राच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांमधून प्रदूषित हवा प्रवाही होते. यामुळे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि प्रामुख्याने कार्बन-आधारित कणांमुळे ताजच्या तेजस्वी पांढऱ्या भागाला पिवळा रंग आला आहे. कायदेशीररित्या अशा प्रकारच्या गॅसेसच्या उत्सर्जन मर्यादा दीर्घकालापासून ओलांडण्यात आल्या आहेत आणि त्याकडे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जाते. इतकंच काय तर कचऱ्याचे ढीगही निर्धास्तपणे ताजच्या अगदी जवळ जाळले जातात.
या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ताजच्या आजूबाजूच्या १० हजार ४०० स्क्वेअर किलोमीटरचा भाग ‘ताज ट्रॅपिझियम झोन’ निश्चित करावा असे निर्देश सरकारला १९९६ साली दिले होते. पण ‘ताज ट्रॅपिझियम झोन’ हा आज ४००० स्क्वेअर किलोमीटरचाच आहे.तरीही प्रदूषणामुळे ताजची स्थिती बिकट होत चालली असून शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि जनता यांनी एकत्रितरित्या काम करून जगातील या आश्चर्याचं संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.