आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“युरेका, युरेका, युरेका!” अर्थात सापडलं, सापडलं हे थोर शास्त्रज्ञ आर्किमिडीज याचे उद्गार आपल्यापैकी बहुतेक लहान थोरांना माहिती आहेत. त्या मागची गोष्टही जगभरात मोठ्या चवीचवीने सांगितली जाते. या उद्गारांमागे जगात क्रांती घडवणारं विज्ञानाचं तत्व दडलेलं आहे. त्याला आर्किमिडीजचं तत्व म्हटलं जातं. ‘ऑन फ्लोटींग बॉडीज’ या त्याच्या पुस्तकात त्याने या सिद्धांताबद्दल सविस्स्तर माहिती दिली आहे.
बाथटबमध्ये डुंबताना बाहेर सांडलेल्या पाण्यामुळे त्याला एक उल्लेखनीय शोध लावता आला. कथेत वर्णन केल्याप्रमाणे, आर्किमिडीज या शोधाने इतका रोमांचित आणि उत्साहित झाला की तो नग्नावस्थेतच बाथटबमधून बाहेर पडला. राजाला त्याबद्दल सांगण्यासाठी रस्त्यावरून धावत सुटला आणि मोठ्याने ओरडला ‘युरेका! युरेका!’ (सापडलं, सापडलं)
आर्किमिडीजने विज्ञान आणि गणितात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. वर्तुळाचा घेर, वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि गोलाचे आकारमान आणि क्षेत्रफळ या सूत्रामध्ये Pi ही संख्या वैशिष्ट्यपूर्ण आहे हे जाणून घेणारा तो पहिला संशोधक होता. विशेष म्हणजे त्याने Pi च्या मूल्याचा अचूक अंदाज लावला.
ग्रीक गणितज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ असलेल्या आर्किमिडीजचा जन्म इसवीसनपूर्व २८७ मध्ये आता इटलीचा भाग असलेले बेट सिसिली इथल्या सिरॅक्यूज या ग्रीक वसाहतीत झाला. इ.स.पूर्व २१२ मध्ये रोमनांनी सिरॅक्युजवर आक्र*मण केले तेव्हा त्याचा मृत्यू झाला.
आर्किमिडीज आजही सर्वकालीन महान शास्त्रज्ञांपैकी एक महत्वाचा शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. त्याची ‘युरेका’ची कथा सुमारे २ हजार २५० वर्षांपूर्वी घडली. सिसिलीमधला सिराक्यूजचा राजा हियरॉन (दुसरा) याला मुकुट बनवणाऱ्या सोनाराने शुद्ध सोन्याऐवजी चांदीची भेसळ केल्याचा संशय आला. मात्र, राजाकडे आपली शंका दूर करण्याचा मार्ग नव्हता. त्यामुळे त्याने आर्किमिडीजला बोलावणं पाठवलं.
मुकुटाला कोणतीही इजा होणार नाही अशा पद्धतीने तो शुद्ध सोन्यापासून बनवला आहे की त्यात भेसळ करण्यात आली आहे हे शोधायला सांगितलं. त्याने राजाकडून विचार करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागून घेतली. एके दिवशी, या प्रश्नावर लक्ष केंद्रित असतानाच तो पाण्याने भरलेल्या टबमध्ये आंघोळ करायला गेला.
त्याच्या ताबडतोब लक्षात आलं की, त्याच्या बाथटबमध्ये त्याने ज्या क्षणी पाऊल टाकलं त्याच क्षणी पाणी जमिनीवर सांडायला सुरुवात झाली. त्याच्या वस्तुमानाएवढंच पाणी टबमधून बाहेर पडलं. आर्किमिडीजच्या डोक्यात आलं की, मुकुट पाण्यात टाकला तर किती पाणी बाहेर सांडेल त्यावरून सोन्याची शुद्धता तपासता येईल का?
आर्किमिडीजला आधीच माहित होतं की सोन्याची घनता चांदीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे समान वजनाची चांदी आणि सोनं पाण्याने भरलेल्या बादलीत टाकलं तर चांदीमुळे पाणी जास्त सांडेल. त्यावरून त्याने शुद्ध सोनं, शुद्ध चांदी आणि मुकुट यांची परीक्षा करून मुकुटात चांदीची भेसळ असल्याचं सिद्ध केलं.
आर्किमिडीजच्या ‘युरेका’बाबत जगभरात प्रसिद्ध असलेली ही एक कथा आहे. मात्र, ही कथा अतिशयोक्त असण्याची दाट शक्यता आहे. कारण ही कथा रोमन वास्तुविशारद व्हिट्रुव्हियसने आर्किमिडीजच्या कार्यकाळाच्या बऱ्याच कालावधीनंतर इ.स पूर्व पहिल्या शतकात लिहिली. ती अनेक शतकं चर्चेत राहिली. आपण सगळ्यांनीच ती वर्षानुवर्ष ऐकली आहे आणि त्यावर विश्वासही ठेवला आहे. केवळ चटपटीतपणामुळे या कथेला अधिक प्रसिद्धी मिळाली. मात्र, आर्किमिडीजच्या ‘युरेका’ची आणखी एक कथा सांगितली जाते आणि ती अधिक विश्वासार्ह असावी अशी शक्यता आहे.
आर्किमिडीज हा त्याच्या विलक्षण बुद्धिमत्ता, अलौकिक कौशल्य आणि विश्लेषणात्मक वृत्तीमुळे संशोधक म्हणून त्या काळातही नामांकित होता. त्याचा थेट राजाबरोबर पत्रव्यवहार असे. जगात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘पुली’च्या शोधावर आर्किमिडीजचा पूर्ण विश्वास होता. त्याने राजाला लिहिलेल्या एका पत्रात नमूद केलं होतं की मला जर उभं राहायला योग्य ती जागा मिळाली तर मी पृथ्वीदेखील हलवून दाखवू शकेन.
आर्किमिडीजवरच्या विश्वासामुळे राजा हियरॉन (दुसरा) याने एक महत्वाची कामगिरी त्याच्यावर सोपवली. त्याने आर्किमिडीजला एका जहाजाची बांधणी करण्याचं काम दिलं. हे जहाज जगातलं सर्वात भव्य आणि दिमाखदार जहाज असावं, अशी राजाची सूचना होती. त्या काळात ग्रीक, रोमन आणि ईजिप्शियन लोक केवळ समुद्राच्या काठालगतच्या पाण्यातूनच प्रवास करत असत. खोल समुद्रातले वारे आणि वादळं यांची त्यांना भीती होती. त्यांची जहाजं त्या वारा-वादळाला तोंड द्यायला असमर्थ होती.
मात्र, आर्किमिडीजने त्याच्या अलौकिक प्रतिभेचा वापर करून एका भव्य जहाजाची बांधणी करण्यासाठी आराखडा तयार केला. त्यावरून इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात ‘सिरॅकुसिया’ या महाकाय जहाजाची बांधणी करण्यात आली. त्या काळातल्या सर्वांत मोठ्या जहाजांपैकी एक म्हणून सिरॅकुसियाची गणना होऊ लागली.
भूमध्य समुद्राला ओलांडून पलीकडे जाण्याची या जहाजाची क्षमता होती. त्या काळात सामान्यपणे वापरली जाणारी ६० जहाजं बांधण्यासाठी जेवढं साहित्य लागेल, तेवढं साहित्य एकट्या सिरॅकुसियाच्या बांधणीसाठी वापरण्यात आलं.
केवळ भव्यता हेच या जहाजाचं वैशिष्ट्य नव्हतं तर त्याची अंतर्गत रचनाही अतिशय सुंदर होती. या जहाजावर शिल्प होती. मनोरे होते. जलाशय होते. व्यायामशाळा आणि वाचनालयही होतं. मंदिरही होतं. त्याच्या रचनेसाठी उत्कृष्ट प्रकारच्या लाकडाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या संगमरवराचा वापर केला होता.
मात्र, या जहाजाची भव्यता हीच एक मोठी अडचण ठरली. कारण, या जहाजाला सामावून घेऊ शकेल, एवढं मोठं एकही बंदर त्या काळात सिसिलीमध्ये नव्हतं. अखेर नाईलाजाने राजा हियरॉन (दुसरा) याने हे जहाज इजिप्तच्या राजाला भेट म्हणून देऊन टाकायचं ठरवलं. कारण त्या काळात एवढ्या मोठ्या जहाजाला सामावून घेऊ शकणार अलेक्झांड्रिया हे एकमेव बंदर अस्तित्वात होतं आणि त्याचा ताबा इजिप्त साम्राज्याकडे होता. त्यामुळे या जहाजाचं ‘सिरॅकुसिया’ हे नाव बदलून ‘अलेक्झांड्रिया’ असं ठेवण्यात आलं.
मात्र, आर्किमिडीजने राजाला त्याच्या प्रचंड प्रतिभा सामर्थ्याचं दर्शन घडवलं. त्याने पुलीचा वापर करून अक्षरश: एकट्याने हे भव्य जहाज समुद्रात सरकवून दाखवलं. ही ‘ब्लॉक-अँड-टॅकल’ पुली यंत्रणा जगातल्या महान तांत्रिक आविष्कारांपैकी एक म्हणून ओळखली जाते. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही पुलीची यंत्रणा आजही मोठमोठ्या अवजड कामांसाठी वापरली जात आहे.
आर्किमिडीजने आपल्या विलक्षण कौशल्याने अनेक वैज्ञानिक शोध लावले. त्याच्या संशोधनांनी केवळ त्याला मान-सन्मान मिळवून दिले नाही तर त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असे क्रांतिकारक बदल घडून आले की त्यांनी जगाचं जगणं सुलभ केलं. पुरातन काळातील एक अग्रगण्य विद्वान म्हणून आर्किमिडीजची ओळख आहे.
प्राचीन लेखकांनी आर्किमिडीजच्या ‘युरेका’ क्षणाची अतिशयोक्ती केली. सुलभीकरणाने त्याला एक मनोरंजनाची चटपटीत गोष्ट बनवलं. ‘युरेका’चा उगम त्या मुकुटाच्या आणि नग्नावस्थेत धावण्याच्या गोष्टीत अडकून पडल्यामुळे त्याच्या खऱ्या ‘युरेका’ क्षणाचा शोध खुंटूनच गेला. अनेक विद्वानांच्या मते पुलीचा क्रांतिकारक शोध हाच खरा ‘युरेका’ क्षण असावा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.