इतिहासाने कायमच अन्याय केलेला क्रांतिकारक विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


नजर थेट, वाऱ्याला समांतर हनुवटी तरीही त्या वाऱ्याच्या विरोधात असलेली शरीरयष्टी आणि एका स्थितप्रज्ञ माणसाचे स्थिर केस, जरब भरणारा विद्रोह डोळ्यात चमकत असलेला हा माणूस आयुष्यभर बंडखोर म्हणून जगला.

त्या काळात बंगालमध्ये प्रत्येक गोष्टीला तर्कसंगतपणाच्या कसोटीवर घासून मगच कुठल्याही बौद्धिक युद्धाला निघणारी पोरासोरांची जमात उदयास येत होती. त्यांचा वैचारिक बाप राजा राममोहन रॉय तर राष्ट्रवादी वसा हा विवेकानंद आणि बंकिमचंद्र यांचा होता.

आपला हा तरुणही वाघासोबत झडप खेळून त्याला लोळवलेल्या जतिन दास उर्फ बाघा जतीनचा चेला होता. या सगळया अनुशिलन समितीच्या लोकांनी मिळून फिडेल कॅस्ट्रो टाईप क्रांतीवादी कल्ट बंगालमध्ये जन्माला घातला होता. जे काम टिळकांनी महाराष्ट्रात केलं होतं.

या तरुणाच्या आयुष्यात जेमतेम अडीच गुरु लाभले होते तेही एकापेक्षा एक सरस. बाघा जतीन, रशियाचा अनभिषिक्त नेता लेनिन अन् उरलेला अर्धा गुरु म्हणजे जोसेफ स्टॅलिन.

त्या काळात ब्रिटिश अन् जमीनदार यांचे अत्याचार सहन केल्याशिवाय पर्याय नाही असं मानून डोळ्यांत इतकी आग भरलेली असताना हा बंडखोर काहीच पर्याय नाही म्हणून मरण्याचे दिवस मोजत होता. पण अचानक कार्ल मार्क्स वाचण्यात आला अन् याला वाटून गेलं या सगळ्यातून सोडवणारा ‘मुक्तिदाता’ आपल्याला भेटला.

त्यानंतर पुढे मार्क्सच्या क्रांतीच्या विचारांनी भारावून ‘Force must be stopped by Force’ असे म्हणत ब्रिटिशांना सामोरा जाणारा हा तरुण म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय क्रांतिकारक बनला.

रॉयचा काँग्रेसला तात्विक विरोध होता. त्याला गांधी हा धनाढ्य लोकांचा नेता वाटत होता. अहिंसेच्या नावाखाली गांधी जनतेवर हिंसा लादत आहे असंही त्याचं मत होतं. गांधी लोकांना मूर्ख बनवत असून गांधीच्या असहकार चळवळ मागे घेण्याला ती चळवळ चौरीचौरानंतर सामान्य लोकांच्या हाती जाण्याची भिती हे कारण होते असे म्हणत त्याने गांधीला लक्ष केलं.

त्याने गांधी हा माणूस मध्यमयुगी ,संकुचित अन् प्रतिक्रियावादी असून त्याचं चरखा तत्वज्ञान मागासलेपणाचे प्रतिक आहे असं म्हणत गांधीच्या तत्वज्ञानाला तडे द्यायला सुरुवात केली. रॉय अधार्मिक होता तर गांधी धार्मिक. त्याला गांधीचे भावनिक राजकारण अमान्य होते व ते दिर्घकाळ टिकू शकत नाही यावर तो ठाम होता. गांधी पक्का राजकारणी तर हा उच्च कोटीचा तत्ववेत्ता होता.

गांधीच्या नेतृत्वावर भाळलेल्या लेनिनने त्याला पाठिंबा द्यायला रणनीती ठरवण्यासाठी भारताचा प्रतिनिधी म्हणून रॉयला दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट परिषदेत आमंत्रित केले. कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानावर असलेली हातोटी अन् स्वतःचा असलेला गाढा अभ्यास यांच्या बळावर त्या काळात आंतरराष्ट्रीय समाजवादी वर्तुळात एम. एन रॉयनी चांगलाच जम बसवला होता.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ मेक्सिकोच्या स्थापनेत तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टी स्थापनेत त्याचा मोलाचा वाटा होता. लेनीनने त्या परिषदेत ब्रिटिश सत्तेच्या सावटाखाली असलेल्या देशांतील स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा देऊन मग त्या देशांना साम्यवादी बनवण्याचा प्रस्ताव मांडला.

त्याला तिथेच विरोध करत भारतात काँग्रेसला साथ देण्यापेक्षा तिथल्या कामगार, गोरगरीब अन् शेतकऱ्यांच्या चळवळीला पाठिंबा द्यावा असं मत रॉयने मांडले.

कारण काँग्रेस साम्राज्यवादी ताकदीच्या वळचणीला उभी राहील याची रॉयला भिती होती. लेनिनला डोळ्यात डोळे घालून केलेल्या विरोधामुळे तिथून राॅयची तिथून तत्काळ हकालपट्टी झाली. पण रॉयने भाकीत केल्याप्रमाणे काँग्रेसने पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना पाठिंबा दिला. त्याचवेळी गांधी इंग्रजांसाठी सैन्यभरती करत होता.

भारतात आल्यानंतर रॉयला ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला भरून थेट शिक्षा सुनावत तुरुंगात रवानगी केली.

पण हा माणूस इतका प्रचंड क्रांतिकारी विचारांचा होता की याची खुली कोर्ट ट्रायल घेतली तर भारतात क्रांती घडून येईल म्हणून ना वकील ना पुरावे ना न्यायालय असे करत रॉयला ६ वर्षे तुरुंगात डांबून ठेवले.

त्यानंतर रॉयने आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. लेनीनने केलेल्या अपमानाचा बदला म्हणून तसेच स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यासाठी काँग्रेसमध्ये घुसून काँग्रेसला आपल्या इशाऱ्यावर नाचवत क्रांती घडवून आणायची असा प्रण त्याने केला. नेहरूंची भेट झाली. नेहरूही कॉम्रेड असल्याने काँग्रेसमध्ये सहज प्रवेश मिळाला. दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले.

याच काळात फैजपूर अधिवेशनात १९३६ साली रॉयला उपस्थितीचा मान मिळाला. तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या पटेल, प्रसाद अन् देसाई यांना वृत्तपत्र चालवण्यासाठी पैसे जमवून देण्याची मागणी केली. पण त्या बदल्यात त्या तिघांनी आम्ही तुला काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत घेऊ तसेच तुला काँग्रेसचा अध्यक्षही करू पण तू फक्त गांधींना तुझा नेता मानून नेहरूंच्या समाजवादी विचारांची धार कमी करायची असा प्रस्ताव ठेवला.

म्हणजे नेहरूंना संपवायचं असाच तो प्रस्ताव होता.

पण नेहरूंशी असलेल्या मैत्रीखातर आणि गांधींशी असलेल्या वैचारिक विरोधामुळे रॉयने हा प्रस्ताव धुडकावला. पुढे त्याने ही गोष्ट नेहरूंना कळवली.

पुढे याच अधिवेशनात संध्याकाळी गांधी अन् रॉयची तब्बल ९० मिनिटे बैठक चालली. या भेटीत रॉयने गांधीला काँग्रेसचा वापर रक्तरंजित क्रांती घडवून आणण्यासाठी करावा यासाठी विनवणी केली. तसेच चरखा अन् कुटिरोद्योगाचा नाद सोडण्याचा आग्रह केला. त्याजागी औद्योगिक समाज निर्माण करावा अशी सूचना केली.

पण गांधींनी त्याला “तुला देश समजला नाही. तू तुझे लिखाण बंद कर! अन् देश फिरून ये” असा दम भरला.

तसेच “काँग्रेसच्या प्रत्येक आंदोलनास तू मूकसंमती द्यावी” अशी अट घातली. त्यानंतर लगेच गांधीने रॉयला प्रार्थनेसाठी बोलावले तेव्हा “असल्या थेरांवर विश्वास नाही” हे सांगून त्याने गांधीला नकार देऊन तिथून काढता पाय घेतला.

रॉयचे विचार गांधीला धोकादायक वाटू लागले. “रॉयवर टिका करणेसुद्धा धोकादायक असून त्याच्या प्रत्येक प्रतिउत्तराने माझ्या विचारांची मूळं उखडली गेली आहेत” अशी भावना गांधीने व्यक्त केली. माझ्या अनुयायांनी त्याच्यापासून दूर राहावे असा सल्ला गांधीने आपल्या चेल्यांना दिला.

रॉयचा इतका प्रभाव काँग्रेसवर पडला की पुढे नेहरू आणि बोस हे मोठे समाजवादी नेते म्हणून उदयास आले. गांधीच्या काँग्रेसमधील हुकुमशाही वृत्तीला कंटाळलेल्या सुभाषचंद्र बोस यांनासुद्धा रॉयने पाठिंबा दिला.

शेतकऱ्यांसाठी किसान सभा, काँग्रेसमध्ये ट्रेड युनियन स्थापना, काँग्रेसच्या आतून काम करणाऱ्या समाजवादी काँग्रेसला बळकटी अन् नेहरू हेच गांधींचे वारसदार या सगळ्या घडामोडीत रॉयचा प्रभाव होता.

इतिहास त्याच्या बाजूने कधीच लिहला नाही. एव्हाना बघितलाही गेला नाही. भारतीय काँग्रेसने घटना समिती स्थापन करून सत्ता आपल्या ताब्यात घ्यावी ही कल्पना रॉयच्या डोक्यात उपजली होती जी नंतर वीस वर्षांनी स्वीकारली गेली.

कार्ल मार्क्सच्या “ऐतिहासिक वर्गसंघर्ष” सिद्धांताला “ऐतिहासिक वर्गसहकारिता” म्हणत खोडून काढले. गरिबांवरील अत्याचाराचे मूळ हे अधिकचा नफा किंवा अधिकचे उत्पन्न (Surplus Value) हे नसून त्याचे होणारे असमान वाटप (Inequal Distribution) हे आहे म्हणत मार्क्सच्या विचारांना रॉयने तिलांजली दिली.

उदारमतवाद अन् साम्यवाद यांना तिसरा पर्याय म्हणून ‘नव मानवतावाद’ जो स्वातंत्र्य, तर्क आणि नीतिमत्ता यावर आधारित असेल असा नवा वैचारिक प्रवाह रॉयने जन्माला घातला.

रॉय जर युरोपात जन्माला आला असता तर कदाचित मार्क्सच्या ‘कम्युनिस्ट मेनिफेस्टो’ इतकाच त्याचा ‘न्यू ह्यूमॅनीज्म’ सिद्धांत चर्चिला गेला असता.

पुढे स्वातंत्र्य चळवळीच्या प्रवाहाबाहेर फेकल्या गेल्यानंतर रॉयची गांधीबद्दलची मते ‘भारत छोडो १९४२’ चळवळीत खरी ठरली. त्यावेळी ‘ब्रिटिशांनी लादलेल्या हिंसेविरोधात हिंसा होणार’ हे तत्त्व गांधीने मान्य केले.

स्वातंत्र्यानंतर गांधीचा चरखा अडगळीत पडला. औद्योगिक समाज निर्माण करण्याचे तत्व नेहरूंनी स्वतंत्र भारताच्या आर्थिक धोरणात स्वीकारले. इथेही खादी अन् विकेंद्रित उत्पादन हा गांधी विचार पराभूत झाला.

रॉय सगळीकडे जिंकत आला तरी गांधी यशस्वी नेता अन् रॉय ‘उल्लेखनीय अपयश’ म्हणून का गणला गेला?

कारण गांधीने भारतीय लोकांची नस ओळखली होती. लोकांमध्ये जाऊन गांधी मिसळला होता. तो त्यांच्यासारखाच सामान्य दिसला, वागला. रॉय इथे अपयशी ठरला. त्याने गरिबीचे तत्वज्ञान उलगडून सांगितले पण गांधी प्रत्यक्षात गरिबी जगला. जे लोकांना भावलं. म्हणून रॉयची क्रांती कधीच घडून आली नाही. गांधी कासवगतीने स्वातंत्र्य देण्यात यशस्वी ठरला.

तुम्ही नेता म्हणून नेहमीच बरोबर असू शकत नाही पण तुम्ही चूक असला तरी जोपर्यंत जनता तुमच्यासोबत असते तोपर्यंत तुम्ही बरोबर असता.

पुढे स्वातंत्र्यानंतर दिल्लीतील सत्तेपासून दूर राहत बंगालमध्ये दंगे रोखण्यातील गांधीच्या योगदानाने रॉय प्रभावित झाला. गांधीच्या जनतेतील असलेल्या नैतिक बळावर रॉयचा विश्वास बसला. जेव्हा गांधीच्या खुनाची बातमी रॉयला कळली तेव्हा तो कलकत्त्यात एका कॉलेजात भाषण देत होता. त्याला हुंदका गिळता आला नाही.

भाषण अर्ध्यात बंद करत गांधीच्या तत्वज्ञानाला पहिली अन् शेवटची सहमती देत (शेवट जसा केला गेला तो न्याय्य मार्ग नव्हता) “End does not justify the Means” म्हणत ट्रिब्यूट दिला.


लेखक-रविकुमार सुभाषराव.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!