अपघातात दोन्ही हात गमावलेली ही भारतीय महिला जगभरात लोकांना मोटिव्हेट करत आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


काही लोकांच्या आयुष्यात असे काही अपघात घडतात ज्यामुळे त्यांचे सर्व आयुष्यच बदलून जाते. अशा अपघातानंतर लोक एकतर कायमचे आतल्या आत तुटून जातात, नाहीतर जिद्दीने पुन्हा उभे राहून नवीन उंची गाठतात.

अशाच एका जिद्दी महिलेचे नाव आहे मालविका अय्यर, ज्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी आपले दोन्ही हात एका अपघातात गमावले, त्या घटनेचा खोलवर परिणाम मालविका यांच्या मनावर झाला. परंतु त्या पुन्हा जिद्दीने उभ्या राहिल्या.

ही गोष्ट २६ मे २००२ ची आहे. दुपारची वेळ होती. मालविका आपल्या घराबाहेर फिरत होत्या. फिरत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या पॅन्टचा एक खिसा फाटला आहे. त्यांनी विचार केला की याला दुरुस्त करायला हवं यासाठी मालविका यांनी आपल्या खिशावर थोडासा फेविकोल लावला, परंतु खिसा चिपकला नाही. एखाद्या जड वस्तूने याला दाबल्यास हे चिपकेल.

पण घरात त्यांना अशी एकही वस्तू सापडली नाही म्हणून त्या आपल्या गॅरेजमध्ये गेल्या. तिथे थोडं शोधल्यावर त्यांना एक मजबूत गोष्ट सापडली. त्या वस्तूला घेऊन त्या आपल्या खोलीत गेल्या. मग त्यांनी त्या वस्तूला आपल्या पॅन्टवर दाबलं आणि अचानक मोठा स्फोट झाला.

स्फोटाचा आवाज ऐकून मालविका यांचे आई वडील त्यांच्या खोलीच्या दिशेने पळाले. त्यांनी आत आल्यावर जे दृश्य बघितले त्यामुळे त्यांचा अंगाचा थरकाप उडाला. खोलीतील सगळं सामान अस्ताव्यस्त झालं होतं आणि मालविका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.

स्फोट इतका मोठा होता तरी मालविका यांची शुद्ध हरपली नव्हती. त्यांचे दोन्ही हात वेगळे झाले होते. त्यांना त्या परिस्थितीत रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शक्य तितके प्रयत्न केले. आधी फक्त हातांवर परिणाम झाला आहे अशी धारणा होती पण त्यांचे पायदेखील जखमी झाले होते.

त्यांच्या अनेक नसांनी काम करणे बंद केले होते. एक वेळ अशी आली होती की मालविका जिवंत राहते की नाही, याची शाश्वत्ती उरलेली नव्हती. परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे मालविकाचा जीव वाचला.

मालविका जिवंत होत्या खऱ्या परंतु भविष्यात त्यांच्यासमोर अडचणींचे ताट वाढून ठेवले होते. दुसरीकडे लोकांना मालविका यांच्या खोलीत कसला स्फोट झाला याचे कोडे उलगडत नव्हते. त्यासाठी त्यांच्या खोलीची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक गोष्टींचा उलगडा झाला. मालविका बिकानेर मध्ये राहत होती, जिथे अनेक हत्यारांचे दुकान होते. त्यापैकी एका दुकानात काही दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला होता, ज्यात अनेक ग्रेनेड इकडे तिकडे जाऊन पडले होते. असाच एक ग्रेनेड मालविका यांच्या गॅरेजपर्यंत पोहचला. ही एक छोटीशी चूक इतकी महागात पडली. मालविकाला आपले हात गमवावे लागले. त्यानंतर मालविका यांचे आयुष्य पालटले.

घटनेनंतर १८ महिने मालविका रुग्णालयात होत्या. ह्या दरम्यान त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एवढ्या दीर्घकाळ चाललेल्या उपचारामुळे त्यांच्या अभ्यासावर प्रचंड परिणाम झाला. त्यांना आपल्या ९ वि आणि १० वीच्या परीक्षेवर पाणी सोडावे लागले.

परंतु मालविका यांनी हार मानली नाही, त्यांनी बोर्डाची परिक्षा देण्याचे ठरवले. त्यांनी कुठल्याही प्रकारे स्वतःला कमजोर पडू दिलं नाही. हात नसल्याने त्यांनी आपल्यासाठी एक रायटर शोधला. त्यांनी आभ्यास केला आणि परीक्षा दिली.

१० वीचा निकाल आला, मालविका यांच्या निकालाने सर्वाना थक्क केले. त्यांना ५०० पैकी ४८३ गुण मिळाले होते. मालविका राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या, अनेकांना हा आश्चर्याचा सुखद धक्का होता.

त्यांच्या यशाची कीर्ती माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कानी पडली. त्यावेळी त्यांनी स्वतः मालविका यांची भेट घेतली, यामुळे मालविका यांना अजून जिद्दीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. शिक्षणाचा मार्गानेच यश प्राप्त करता येऊ शकते, हे मालविका यांना कळून चुकले होते.

१२ वीत देखील मालविका यांनी उत्तम गुण मिळवले आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजला अर्थशास्त्र विषयाला ऍडमिशन घेतली. त्यांनी सोशल वर्कमध्ये पीएचडी पूर्ण केली. पुढे त्यांनी अपंग व्यक्तींच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. त्यांनी अपंगांचे अनेक प्रश्न जगासमोर आणले आणि त्यावर त्यांनी समाधान देखील सांगितले.

मालविका यांचे नाव प्रसिद्ध झाले, जेव्हा त्यांना २०१३ साली सर्वप्रथम चेन्नई येथे भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्यांनी चेन्नईला केलेल्या भाषणात आपल्या आणि दिव्यांगांच्या संघर्षाची करूण गाथा जगासमोर ठेवली. त्यांच्यासाठी नवीन कायदे बनवण्याची मागणी शासनाकडे केली.

भारतातच नाहीतर विदेशात सुद्धा मालविका यांच्या नावाच्या चर्चा होऊन लागल्या. इतकच नाहीतर संयुक्त राष्ट्रांच्या संघटनांमध्ये त्या सामील झाल्या. यामुळे त्यांच्या मागण्या विश्वस्तरावर ऐकल्या जाऊ लागल्या.

२०१७ साली संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील हेड क्वार्टर मध्ये मालविका यांनी आपले भाषण केले. जगभरात त्यांचे कौतुक झाले. त्यांच्या अद्भुत कार्यासाठी त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आपल्या संपूर्ण आयुष्यात विविध गोष्टींसाठी संघर्ष करणाऱ्या मालविका यांना त्यांच्या संघर्षाचे यथोचित फळ मिळाले. आज त्यांनी केवळ जिद्दीच्या बळावर मालविकाजे स्थान प्राप्त केले आहे जिथे पोहचणे इतके सोपे नाही. 

मालविका अय्यर आज अनेकांच्या प्रेरणास्रोत असून आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणी, समस्या यांचा सामना करून त्यांनी विश्व कीर्ती प्राप्त केली आहे. आजसुद्धा त्या अनेक अपंग आणि संकटग्रस्त लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!