अमेरिकेत या १४ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला गुन्ह्याच्या संशयावरून मृत्युदंडाची शिक्षा दिली होती

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जगभरात मृत्युदंडाच्या शिक्षेवर मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू असतात. अनेकांना वाटतं की मृत्युदंड ही अत्यंत घातक शिक्षा असून अशा प्रकारची शिक्षा देण्याचा अधिकार कोणालाच नसावा. मृत्युदंडच नाहीतर अल्पवयीन मुलांना त्यांचे गुन्हे कितीही गंभीर असले तरी कुठल्याही प्रकारची कडक शिक्षा केली जाऊ नये, अशीही मागणी वेळोवेळी जगभरात केली जाते. 

पण जगातील सर्वात विकसित देश समजल्या जाणाऱ्या अमेरिकेने त्यांचा देशातील एका अत्यंत कमी वयाच्या आरोपीला एका खोट्या गुन्ह्याखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.

त्या आरोपीचे वय फक्त १४ वर्षे इतके होते. एका सडपातळ आणि मध्यम बांध्याचा लहान मुलाला, फ़क्त गुन्हा केल्याच्या संशयावरूनच मृत्युदंड सुनावण्यात आला होता.

पुढे सत्य समोर आल्यावर तो मुलगा निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर अमेरीकन न्यायालयाने यासाठी लोकांची माफी देखील मागितली होती. अनेकांच्या मते तो मुलगा कृष्णवर्णीय असल्याने फक्त वर्णद्वेषातून त्याला ती शिक्षा ठोठावली गेली होती.

गेल्या काही दशकांपासून ऍमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था असा दावा करत आहे की इराणमध्ये असंख्य लहान मुलांना वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी अत्यंत कडक शिक्षा केली जात आहे. मानवाधिकार संघटनेच्या मते इथे मुलांना आणि मुलींना वयाच्या १५ व्या आणि ९ व्या वर्षीच अत्यंत कडक शिक्षा केली जाते. संयुक्त राष्ट्राने देखील अल्पवयीन मुलांना इराणमध्ये जी वागणूक मिळत आहे यावर चिंता व्यक्त केली आहे.

या सगळ्यात सर्वात अल्पवयीन गुन्हेगाराला मृत्युदंडासारखी शिक्षा देण्याचं श्रेय मात्र अमेरिकेच्या नावावर आहे. त्यामागे एका निर्दोष कृष्णवर्णीय बालकाची करुण गाथा आहे.

मार्च १९४४ मध्ये जॉर्ज स्टेनी आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या पुढील अंगणात खेळत होता, तेव्हा दोन गौरवर्णीय मुली तिथे फुलांच्या शोधार्थ आल्या आणि त्यांनी जॉर्जला यासंदर्भात विचारपूस केली. त्यांना मदत करण्यासाठी १४ वर्षाचा जॉर्ज त्यांच्यासोबत फुलं शोधायला गेला आणि कालांतराने त्या मुली अचानक गायब झाल्या.

त्या मुलींचा शोध घेण्यात आल्यावर त्यांचे मृतदेह हे रेल्वे ट्रॅकजवळ पडलेले आढळले. त्या दोघींचे डोके अत्यंत वाईट पद्धतीने चिरडण्यात आले होते. पोलीस तपासात आढळून आले की त्या मुली सर्वात शेवटी जॉर्जसोबत दिसल्या होत्या. मग पोलिसानी जॉर्जला अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली. 

मग मिडियात अचानक बातमी पसरली की जॉर्जने गुन्हा कबूल केला आहे आणि त्यानेच ११ व ८ वर्षाच्या त्या दोन मुलींची हत्या केली आहे. पोलिसांनी जाहीर केलं की त्या १४ वर्षीय मुलाला ११ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, पण ती मुलगी तयार न झाल्याने त्याने त्या मुलींचा खून केला.

पोलिसांच्या आरोपांच्या आधारावर त्या मुलाला कोलंबियाच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. तो अनेक महिने तिथे होता. कोणालाही त्याची भेट घेण्यापासून मज्जाव करण्यात आला. पुढे समोर आलं की जॉर्जच्या कबुलीजबाबावर त्याची स्वाक्षरी सुद्धा नव्हती. जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा पिडीत परिवाराच्या वकीलापासून ते जॉर्जच्या वकीलापर्यंत, न्यायाधीशासकट सर्व श्वेतवर्णीय होते. 

सुनावणीवेळी कुठल्याही अश्वेत व्यक्तीला न्यायालयात प्रवेश नाकारण्यात आला होता. न्यायालयाने जॉर्जला एका वयस्क व्यक्ती सारखी वागणूक दिली आणि त्याची बाजू न ऐकून घेता त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप लावत त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

४० च्या दशकात अमेरिकेत अनेक प्रकारे मृत्युदंड दिला जात होता. यात विजेच्या झटक्याने देखील मारले जात होते. जॉर्जला इलेक्ट्रिक चेयरवर बसवण्यात आले आणि त्याची लांबी रुंदी दोन्ही इलेक्ट्रिक चेयर पेक्षा खूप कमी होती, त्यामुळे त्याला पुस्तकांचा आधारावर बसवले गेले आणि विजेचे तीव्र झटके देऊन त्याला मृत्युदंड देण्यात आला. काही झटक्यातच त्या मुलाचा मृत्यू झाला.

२०१४ साली काही वकिलांनी लहान मुलांना फाशीचा शिक्षेवरून ह्या केसचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी ती केस पुन्हा उघडली. कुठेच कुठला पुरावा आणि कुठला साक्षीदार नसताना फक्त कृष्णवर्णीय असल्यामुळे तत्कालीन न्यायालयाने त्या बालकाला ही क्रूर शिक्षा दिली असल्याचे समोर आले. 

आजसुद्धा त्या मुलाला अमेरिकेतील सर्वात कमी वयाचा मृत्युदंड मिळवणारा मुलगा म्हणून ओळखले जाते. जॉर्ज स्टिनी नंतर अजून एका १४ वर्षीय कृष्णवर्णीय मुलाला मृत्युदंड ठोठावला गेला होता. जो पर्सन्स नावाच्या ह्या कृष्णवर्णीय व्यक्तीने आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्याने बलात्कार इतक्या अमानुषपणे केला होता की त्याचा वडीलानी त्याला मृत्युदंड द्या अशी मागणी केली होती. त्याने बलात्कार केला तेव्हा त्याचे वय १३ वर्षे होते तर तो १४ वर्षांचा असताना त्याला शिक्षा झाली.

आज अमेरिका अमेरिका जगभरातल्या लोकांना मानवाधिकाराचे पाठ शिकवत असते परंतु अमेरिकेच्या इतिहसात मानवाधिकारांचं क्रूरपणे हनन करणाऱ्या अनेक घटना आहेत. त्यातलीच हि एक दुर्दैवी घटना.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!