मृत्युच्या दारातून परत येण्याचा या माणसाचा संघर्ष प्रत्येकाने एकदा तरी बघावा

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


काही ऐतिहासिक घटना एवढ्या भयानक असतात की त्या खोट्या वाटतात. भाकडकथा म्हणुन त्यांना बरयाच वेळी दुर्लक्षित केलं जातं. अशीच एक सत्य सूडकथा २०१५ मध्ये सिनेमाच्या रुपात जगासमोर आली.

‘अलेजांड्रो जी. इनारिटु’ या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा “द रेवेनंट” नावाचा सिनेमा जगभर प्रसिद्ध झाला तो यातील अभिनेता ‘लिओनार्डो दी कॅप्रिओ’ याला मिळालेल्या त्याच्या पहिल्या वहिल्या ऑस्करसाठी.

अतिशय उत्तम अभिनय, अगदी काहीही न बोलता फक्त चेहऱ्यावरील भावनांनी ‘ह्यू ग्लास’ हे पात्र या अभिनेत्याने साकारले आहे.

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ह्यू ग्लासला त्याचे २ सहकारी मृत्यूच्या दारात टाकुन येतात. या हल्ल्यातुन कसाबसा सावरत ह्यू या दोघांशी सूड घेण्यासाठी जातो. तो त्याच्या या योजनेत यशस्वी होतो की नाही, या प्रवासात येणारे अडथळे, त्याला होणारा त्रास या घटकांचे हृदयद्रावक चित्रण या सिनेमात दाखवले गेले आहे.

आता एका मोठ्या अस्वलाच्या हल्ल्यात सापडुन अगदी मृत्यूच्या दारात उभा असलेला व्यक्ती त्याच्या सहकाऱ्याने केलेल्या फसवणूकीचा सूड घेण्यासाठी रक्ताळलेल्या स्थितीत २००० मैल एवढा प्रवास करेल असं काहितरी सांगितलं की ते भाकडकथा वाटणे साहजिकच.

परंतु या सिनेमाची ही गोष्ट अगदी खरी आहे. एवढंच नव्हे तर ह्यू ग्लास हा त्याच्या खऱ्या आयुष्यात अजुनच जास्त धोकादायक आणि धाडसी व्यक्ती होता असं सांगितलं जातं.

ह्यू ग्लास याचा जन्म १७७५-१७८० या काळात पेन्सिल्वीनिया इथे झाला असावा. डोंगराळ भागात वास्तव्य असणाऱ्या काहींच्या मते तरुण असतानाच ग्लासने समुद्राचा रस्ता धरला होता.

जहाजाचा कैप्टन होण्याची त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने घर सोडले होते. त्याचं हे स्वप्न पूर्णही झालं, पण थोड्याच काळात त्याच्या जहाजाचं अपहरण करण्यात आले.

कुप्रसिध्द समुद्री चाचा ‘जीन लाफाईट’ याने त्याला मृत्यू किंवा चाचेगिरी असे दोन पर्याय दिले होते. त्यावेळी साहजिकच त्याने चाचेगिरी निवडुन जीन बरोबरच काही वर्ष काम केले.

काहींच्या मते त्याने अगदी विनाशकारक कृत्ये केली. काहींच्या मते तो अगदी विश्वासू आणि स्वाभिमानी व्यक्ती होता. थोडा विचित्र सुद्धा होताच. त्याच्या एका सहकाऱ्याच्या मते तो धीट, निष्काळजी आणि अतिशय स्वकेंद्रित व्यक्ती होता. तरीही तो अतिशय बुद्धीमान आणि शरीराने अगदी धष्टपुष्ट असा व्यक्ती होता.

१८१८ मध्ये ह्यू ग्लास आणि त्याचे सहकारी चाचांच्या तावडीतून आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी झाले. गैल्व्हस्टन बेटावरुन टेक्सासच्या किनाऱ्यावर येऊन ते थांबले.

कारनकावा प्रजातीच्या नरभक्षक लोकांपासून वाचण्यासाठी ते उत्तरेला गेले, परंतू तिथेही त्यांना पॉनीज लोक जे आत्ताच्या कांसस प्रांतात राहत होते, त्यांनी पकडले.

पॉनीज लोकांची एक प्रथा होती. पाईन वृक्षाच्या लाकडाने आपल्या कैद्यांना भोसकुन ते त्यांना जाळुन टाकत असत. ग्लासने त्याच्या एका साथीदारास असे जळताना बघितले होते. अशा वेळी त्याने स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कीटकाचा वापर केला.

या किटकापासून बनवण्यात येणाऱ्या लाल रंगाचा वापर प्रजातीला सांगून त्याने स्वत:ला वाचवले. अगदी सिनेमासारखी वाटणारी ही गोष्ट सत्य परिस्थितीत किती भयानक असेल याचा अंदाज लावला तरी अंगावर काटा येतो.

पुढे ४ वर्ष तो याच प्रजाती बरोबर राहिला. जंगलात जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्याने शिकुन घेतल्या. आदिवासी युध्दनिती सुद्धा त्याने शिकुन घेतली. हेच पुढे जाऊन त्याला फायदेशीर ठरणार होते.

१८२२ मध्ये ग्लासने सेंट लुईस येथील ‘एश्ले-हेन्री’ फर कंपनीत शिकारी म्हणून काम करण्याचे ठरवले. कंपनीने उत्तरेकडील मोठे पठार आणि उत्तरी रॉकी पर्वतांमध्ये वसलेल्या उच्च मिसूरी परिसरात एक मोहीम आखली होती.

प्राण्यांच्या मऊ केसांमधून त्यावेळी बक्कळ पैसा कमावला जात होता. परंतू त्यासाठी तेथील इंडियन प्रजातींना हुलकावणी देणे, पुराने फेसाळलेल्या नद्या पार करणे,भुस्खलन, मोठी अस्वलं अशा सगळ्यां पासून स्वत:चा बचाव करणे गरजेचे होते.

मोहिमेला सुरुवात झाली. आत्ताच्या दक्षिण डकोता प्रांतात मसूरी नदी त्यांनी शांततेत पार केली. त्यांचं काम संपवून परत जाताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. १२ जणांचा या चकमकीत मृत्यू झाला. ग्लास आणि बाकीचे काही जण जखमी झाले होते. वाचलेले शिकारी येलोस्टोन नदीकडे जाण्यासाठी पायी निघाले.

जमेल तेवढं लपुन जात असल्याने त्यांचा वेग कमी होता. तसेच त्यांना खाण्यासाठी शिकार करावी लागत असे. शिकार करताने होणाऱ्या गोळीबाराच्या आवाजाने त्यांच्या स्थानाची माहिती मात्र बाकीच्या लोकांना कळत होती.

एकदा असंच शिकारीला गेलेले असताना ह्यू ग्लासने त्याच्या गटापासून दुर जाउन एका मोठ्या अस्वलाला बघितले. अस्वलाची नजर ह्यूवर पडताच ते अस्वल ह्यूच्या दिशेने धावत आले. हातात असलेल्या बंदूकीतुन ह्यूने गोळी झाडली खरी परंतू भल्या मोठ्या अस्वलाला त्याने काहीही झालं नाही.

ह्यू ग्लासच्या अंगावर त्या अस्वलाने झडप घेतली आणि ह्यूच्या गळ्यावर मोठी जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता.

पाठीवर वार केले. आपल्या मजबूत नखांनी त्या अस्वलाने ह्यूच्या पाठीवर, खांद्यावर, हातांवर, पायांवर मोठमोठ्या जखमा केल्या होत्या.

ह्यूने चालवलेल्या गोळीने सतर्क झालेल्या बाकीच्या सहकाऱ्यांनी त्याच्या शरीराला पट्ट्या बांधुन रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या जखमेला टाके सुद्धा दिले. एवढ्या सगळ्या जखमा होउनही ग्लास जिवंत होता याचं नवल त्यांना वाटत होतं.

काहींच्या मते तीन तर काहींच्या मते सहा, दिवसानंतरही ह्यूला बोलताही येत नव्हतं आणि हलताही येत नव्ह्तं. हिवाळा जवळ येत असल्याने कमी वेगाने पुढे जात राहणे त्यांच्या गटासाठी धोक्याचे होते. त्यातच ह्यूला असंच सोडून जाणेही त्यांना योग्य वाटत नव्हते. म्हणुन गटाचा प्रमुख असलेल्या हेन्रीने दोन जणांना थोडे पैसे देऊन ह्यू बरोबर थांबण्यास सांगितले.

हे दोन व्यक्ती होते जॉन फीट्जरगाल्ड आणि किशोरवयीन जिम ब्रिजर. पुढे काही दिवस नेमकं काय झालं याची माहिती आज ऊपलब्ध नाही. काहींच्या मते दोघांनी ह्यू ला पाणी पाजले. त्याच्या गळ्याला अजुनही जखमा तशाच होत्या.

श्वास घेताना त्याला अजुनही त्रास होत होता. काही दिवसातच त्याला ताप पण चढला होता. अशा वेळी ह्यूचा मृत्यू जवळ आला असुन आपण त्याला आता इथेच सोडून जाण्याची वेळ आली आहे असे फिट्जरगाल्डने ब्रिजरला सांगितले.

ब्रिजरने विरोध केला की नाही याबद्दल आज ही दुमत आहे. परंतू दोघांनीही ह्यूला तिथेच सोडून बाकीच्यांसोबत सामील होण्याचा निर्णय घेतला.

अजुन एक महत्त्वाची बाब म्हणजे दोघांनी ह्यू जवळ असणारी बंदुक, चाकू, कुऱ्हाड, गारगोटी, शिसे, गोळ्या या गोष्टी काढून घेतल्या. त्याला या गोष्टींचा आता काहीच उपयोग होणार नाही म्हणून त्यांनी असे केले असावे. ताप चढलेला असतानाही ह्यू ग्लासला आसपास चाललेल्या या घटनांचा अंदाज येत होता.

काही वेळात ताप उतरल्यावर त्याने जवळ असलेल्या झाडाची फळे तोडली. फळांना हाताने दाबुन, पाण्यात टाकुन त्याने त्या फळांचा रस घेतला. पुढच्या दिवशी एक जाड मोठा साप त्याच्या दिशेने येत होता, त्याने त्याला खडकाने मारले आणि त्याचे कच्चे मांस खाल्ले.

ह्यूला अजुन चालता येत नव्हते, पण आता तो रांगू शकत होता. त्याने फिट्जरगाल्ड आणि ब्रिजरला पकडून मारण्याचे ठरवले. स्वत:कडे शस्त्र नसताना येलोस्टोनला जाण्यात काही अर्थ नव्हता म्हणुन त्याने ३५० मैल विरुद्ध दिशेला जाउन ‘फोर्ट कियोआ’ इथे जाउन शस्त्र मिळवण्याचे ठरवले.

एका ठिकाणी त्याला लांडगे म्हशीचे मांस खाताना दिसले, तेव्हा त्याने लांडग्यांना हुसकावून लावले आणि ते मांस स्वत: खाल्ले. तिथेच त्याने काही दिवस काढले. म्हशीच्या मांसाला चांगलं वाळवून त्याने आपल्या शरीराला पुर्ववत बनवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसात तो लंगडत चालू लागला.

याच प्रवासात त्याला ‘सू’प्रजातीच्या लोकांनी काही दिवस आश्रय दिला. त्यांनीच त्याच्या पाठीवर झालेल्या जखमांमधील अळ्या काढल्या. याच लोकांच्या मदतीने त्याने फोर्ट कियोआ गाठले आणि शस्त्र मिळवले.

त्यानंतर त्याने फ्रेंच-कॅनडीयन लोकांच्या एका समुहात सामिल होऊन मिसूरी नदी पार केली. येलोस्टोनला जाऊन आपला सूड पूर्ण होइल अशी अपेक्षा बाळगून असणारया ह्यू चा पुन्हा अपेक्षाभंग झाला.

सहा आठवडे प्रवास केल्यावर त्यांच्यावर अरिकारा जमातीच्या लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ग्लास सोडून सगळ्यांचा मृत्यू झाला. हल्ला झाला तेव्हा ह्यू समुहापासून दुर शिकारीसाठी गेला होता. इथे ग्लासला अरिकारा जमातीच्या विरोधी असलेल्या मंडन योद्धयांनी मदत केली.

पुन्हा त्याने आपला प्रवास सुरु केला. उत्तरी हिवाळा सुर झाला होता. एक महिना त्याने अतिशय कमी तापमानात काढून शेवटी तो नविन फोर्ट हेन्रीला पोहचला. बिग हॉर्न नदीच्या मुखाशी असलेला हा किल्ला आधी तिथून पुढे १०० मैलांवर वसलेला होता. काहींच्या मते नविन वर्षाला तो तिथे पोहचला.

शरीरावर सगळीकडे जखमांचे वण आणि बर्फाने आच्छादलेला. त्याच्या साथीदारांनी त्याला जेव्हा बघीतले तेव्हा ते थबकलेच. मृत्यूच्या दारातुन परत आलेल्या ग्लासला ते सगळे “रेवेनंट” समजत होते. रेवेनंट म्हणजे मृत्यूच्या दारातुन परत आलेला.

आल्या आल्या त्याने फिट्जरगाल्ड आणि ब्रिजर यांची चौकशी केली. फिट्जरगाल्ड तिथे नव्हता. ब्रिजर मात्र तिथे होता. जेव्हा ग्लास ब्रिजरला भेटायला गेला तेव्हा तो अगदी नाजुक आवाजात त्याची माफी मागू लागला.

त्याच्या त्या काकूळतीने ग्लासला त्याच्याबद्दल सहानूभूती वाटली आणि त्याने ब्रिजरला माफ केले. आता त्याला फिट्जरगाल्डला संपवायचे होते. त्यासाठी फोर्ट अटकिन्सनला जावे लागणार होते.

तिथे जाण्यासाठी फेब्रुवारीच्या महिन्यात त्याच्याकडे एक संधी चालून आली.

हेन्रीने ग्लास आणि अजुन ४ लोकांना पत्र पोस्ट करण्यासाठी फोर्ट अटकिन्सनला जाण्याचे सांगितले. ग्लास आणि त्याच्या नविन साथीदारांनी दक्षिणेला पावडर नदी ओलांडली आणि उत्तरेकडे गेले. तिथे ग्लासने म्हशींची आणि मोठ्या बैलांची शिकार करण्यास सुरुवात केली.

त्यांच्या शरीराच्या आवरणावरुन चांगली नाव बनवता येऊ शकते हे तो पॉनीज लोकांकडून शिकला होता. अरुंद होत गेलेल्या नदीच्या प्रवाहात या छोट्या नाव कामी येणार होत्या. अरिकाराला पोहचताच त्यांच्यावर पुन्हा हल्ला झाला. यात २ जणांचा मृत्यू झाला.

ग्लास वाचलेल्या २ साथीदारांपासून वेगळा झाला आणि त्याने फोर्ट कियोआ येथुन घेतलेली बंदूकही गमावली. तरीही स्वत:कडे असलेल्या मोजक्या शस्त्रांबरोबर त्याने एकट्याने प्रवास सुरूच ठेवला.

४०० मैल अंतर चालत गेल्यावर तो शेवटी फोर्ट अटकिन्सनला पोहचला. आपली सूडभावना एवढे दिवस मनात दाबुन ठेवल्यानंतर शेवटी फिट्जरगाल्ड आपल्या हाती आला असा विचार करत असतानाच त्याला एक मोठा धक्का बसला.

फोर्ट अटकिन्सन आता एक मोठा सैनिकी तळ बनला होता. आणि फिट्जरगाल्ड एक शिकारी राहिलेला नसुन एक सैनिक झाला आहे हे त्याच्या लक्षात आले.

फिट्जरगाल्डला मारून ग्लासला स्वत: जिवंत परत जाता येणे शक्य नव्हतं. एवढे कष्ट, त्रास सहन करुन ज्या क्षणाची वाट बघावी त्या क्षणाने हुलकावणी द्यावी आणि आयुष्य संपल्यासारखं वाटावं अशी ह्यू ग्लासची अवस्था झाली.

परंतू मनोबल खचू न देता ग्लासने फिट्जरगाल्ड कडून आपली बंदुक परत मिळवली. काहींच्या मते तो फिट्जरगाल्डला खांद्यात गोळी मारण्यात यशस्वीही झाला. तिथुन पळत जाउन मग तो एकटाच रहायला लागला. त्याच्या कारनाम्यांनी त्याला एक दंतकथा म्हणुन प्रचलीत केले. एकटाच राहुन प्राण्यांचे केस गोळा करण्यात माहीर असलेला व्यक्ती म्हणून तो प्रसिध्द झाला.

१८३३ मध्ये आपल्या दोन साथीदारांबरोबर गेलेला असताना अरिकारा योद्धयांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यात ग्लासचा मृत्यू झाला. ५० वर्ष वय असताना त्याचा मृत्यू झाला. बिग हॉर्न, मॉन्टाना इथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूला हुलकावणी देत आलेल्या ह्यू ग्लासला शेवटी मृत्यूने पकडलेच.

ह्यू ग्लासची कहाणी खरी किती, खोटी किती हा नेहमीच वादाचा विषय राहिल. एवढं वादळी आयुष्य जगलेल्या माणसाच्या जीवनावर बनलेला ‘द रेवेनंट’ हा सिनेमा प्रत्येकाने एकदा तरी बघावाच.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!