आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगभरात फुटबॉलनंतर कुठला खेळ जर लोकप्रिय असेल तर तो म्हणजे क्रिकेट. दररोज जगाच्या कुठल्यानं कुठल्या कोपऱ्यात क्रिकेटचे सामने रंगलेले दिसतात. ब्रिटिशांनी मनोरंजनासाठी सुरू केलेल्या क्रिकेटनं कोट्यवधी लोकांना अक्षरश: वेड लावलं आहे. कसोटीपासून सुरु झालेला हा खेळ आता टी-ट्वेंटीपर्यंत येऊन पोहचला आहे.
भारतात तर काही ठिकाणी १० ओव्हर्सच्या ‘गल्ली क्रिकेट’ स्पर्धाही खेळवल्या जातात. आता क्रिकेटचं मोठ्या प्रमाणात व्यावसायिकीकरण झालं. विविध स्पर्धांमुळे खेळाडूंवर अक्षरश: पैशांचा पाऊस पडतो. परिणामी अनेक नवोदित खेळाडू अशा स्पर्धांकडे वळतात. काळाच्या ओघात क्रिकेटच्या स्वरुपामध्ये कित्येक बदल झाले. मात्र, या सर्व बदलांमध्ये आजही आपलं महत्त्व टिकवून ठेवण्यात कसोटी क्रिकेटला यश आलं आहे.
आजही जो खेळाडू कसोटीमध्ये तग धरू शकतो त्याला ‘लंबी रेस का घोडा’ समजलं जातं. कारण पाच दिवसाच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं खेळाडूच्या प्रतिभेचा कस लागतो. अगदी क्रिकेटचा ‘डॉन’ ब्रॅडमन यांच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘Test Cricket is not a light-hearted business’. आतापर्यंत १२ देशांना कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळालेला आहे. अनेकांनी चांगली कामगिरी देखील केलेली आहे.
मात्र, १२ पैकी २ संघ असे आहेत, ज्यांनी कित्येक वर्ष जागतिक कसोटी क्रिकेटवर एकहाती सत्ता गाजवली आहे. ‘अलमायटी’ लोकांचा देश असलेला वेस्ट इंडिज आणि ‘गरम डोक्याची’ ऑस्ट्रेलिया हे दोन देश कसोटी क्रिकेटमध्ये एकेकाळी कित्येक दिवस ‘अनबिटेबल’ राहिले होते.
दुसऱ्या महायु*द्धाच्या नंतरच्या काळात क्रिकेटला चांगले दिवस आले. आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी सामने खेळवण्याचं प्रमाणही वाढलं होतं. १९८० पर्यंत ऑस्ट्रेलियन संघ जागतिक कसोटी क्रिकेटचा अनाभिषिक्त सम्राट होता. रॉडनी मार्श, जी एस चॅपेल, इयान चॅपेल, डेनिस लिली, के डी वॉल्टर्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंची प्रतिस्पर्धी संघांमध्ये प्रचंड द*हश*त होती. कुठलाही संघ त्यांना टक्कर देण्यात यशस्वी झाला नव्हता. मात्र, १९८० च्या दशकात ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा डोलारा हळूहळू डळमळू लागला. विशेषत: मार्श आणि लिलीसारख्या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर.
ऑस्ट्रेलियन्स बॅकफूटवर जात असतानाचा वेस्ट इंडीजच्या संघानं जोरदार मुसंडी मारली. वेस्ट इंडीज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा भरणा ८०च्या दशकातील संघामध्ये होता. त्यांच्याकडे महान फलंदाज आणि गोलंदाजांची असेंब्ली लाइनच असल्याचं दिसतं. एक चांगला खेळाडू निवृत्त होताच, दुसरा त्याची जागा घेऊन पुढे सरकत असे.
१५ वर्षांमध्ये, वेस्ट इंडिजचा संघ सलग २७ कसोटी सामन्यांसाठी अपराजित राहिला होता. २७ पैकी १७ मध्ये त्यांनी विजय मिळवला होता तर १० सामने अनिर्णित राहिले होते. फेब्रुवारी १९८१ ते डिसेंबर १९८९ दरम्यानचा काळ विंडीजचा कसोटी क्रिकेटमधील सुवर्णकाळा होता. या कालावधीत त्यांनी ६९ सामने खेळून तब्बल ४० विजय मिळवले होते तर फक्त ७ सामन्यांमध्ये पराभव स्विकारला होता.
नंतर मात्र, त्यांची जादू ओसरू लागली. जानेवारी १९९० ते मार्च १९९५ दरम्यान त्यांनी सामने गमावण्यास सुरुवात केली. दीड दशक कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचा इतका दरारा होता की, त्यांना पराभूत करणं इतर संघासाठी ‘स्टेटस सिम्बॉल’ झालं होतं. विंडीजच्या संघानं दर्जेदार खेळ करून इतर संघांना देखील उत्कृष्ट बनण्यास मदत केली. त्यांचा खेळ पाहून अनेक संघांनी आपल्या खेळाचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न केले.
१९९५ मध्ये मार्क टेलरच्या नेतृत्त्वात, वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने विंडीजच्या कसोटी साम्राज्याला सुरुंग लावला. ती कसोटी मालिका जिंकून ऑस्ट्रेलियानं पुन्हा एकदा आपला नांगर जुंपला होता. स्टीव्ह आणि मार्क वॉ, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, मायकेल स्लेटर, इयान हिली यांसारख्या दणकट आणि बिनधास्त खेळाडूंचा संघामध्ये समावेश होता. त्यावेळचा वेस्ट इंडिजचा संघही फार वाईट नव्हता. रिची रिचर्डसन (कर्णधार), ब्रायन लारा, जिमी ऍडम्स, कार्ल हूपर, कर्टली ऍम्ब्रोस, कर्टनी वॉल्श यांच्यामध्ये कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला आव्हान देण्याची धमक होती.
ऑस्ट्रेलियानं ब्रिजटाउन येथे पहिली कसोटी १० गडी राखून जिंकली, सेंट जॉन्स येथील दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. तिसरा सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर झाला. वेस्ट इंडिजने तो सामना नऊ गडी राखून जिंकला. यामुळे किंग्स्टन येथे होणाऱ्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी एकदम रोमांचक पार्श्वभूमी तयार झाली.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करून पहिल्या डावात २६५ धावा केल्या. त्यात रिचर्डसननं १०० आणि लारानं ६५ धावांचं योगदान दिलं. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नव्हती. ३ बाद ७३ अशी त्यांची अवस्था होती. मात्र, त्यानंतर आलेल्या मार्क वॉ आणि स्टीव्ह वॉ या भावंडांच्या जोडगोळीनं मैदानात धुमाकूळ घातला. मार्क वॉनं १२६ धावा केल्या तर स्टीव्ह वॉनं २०० धावा केल्या. हे कसोटीतील त्याचं पहिल-वहिल द्विशतक होतं. दोघांनी मिळून वेस्ट इंडिजच्या विजयाच्या स्वप्न धुळीस मिळवलं. विंडीजचा संघ दुसऱ्या डावात साफ कोसळला. परिणामी ऑस्ट्रेलियानं एक डाव आणि ५३ धावांनी निर्णायक कसोटी जिंकली.
ऑस्ट्रेलियाच्या मालिका विजयाचा हिरो स्टीव वॉ होता. त्यानं मालिकेत १०७.२५च्या सरासरीनं सर्वात जास्त धावा केल्या फटकावल्या होत्या. काही अंतरावर तो त्या मालिकेतील सर्वोत्तम फलंदाज होता. मैदानावरील योगदानासोबतच इतर काही वादग्रस्त कारणांमुळं देखील स्टीव वॉसाठी ही मालिका संस्मरणीय राहिली. एका बम्प-बॉलवर लाराचा झेल घेतल्यानंतर मैदानावर चांगलचं नाट्य रंगलं होतं. संपूर्ण मालिकाभर तो वेस्ट इंडिज क्रिकेट चाहत्यांच्या टिकेचा धनी झाला होता. मात्र, त्यानं आपला फोकस ढळू दिला नाही आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या मालिकेत आपलं योगदान दिलं.
ऑस्ट्रेलियानं फ्रँक वॉरेल करंडक जिंकून क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित वेस्ट इंडिज संघाचा दरारा संपुष्टात आणला. त्यानंतर वेस्ट इंडिजनं कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा कधीच तशी उंची गाठली नाही आणि ऑस्ट्रेलियानं त्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. नंतरची दोन दशकं त्यांनी पुन्हा आपलं वर्चस्व गाजवलं. मात्र, सध्या न्यूझीलंड आणि भारताच्या संघाकडून ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत सध्या ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे तर वेस्ट इंडिजचा संघ थेट सातव्या स्थानावर घसरलेला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.