आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगभरात रस्ते अपघातांची संख्या काही कमी नाही. जगभरात दरवर्षी लाखो लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागतो. आपल्या देशात होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी साधारण दीड लाखांहून अधिक जण प्राण गमावतात. अपघातांच्या कारणांचा विचार केला असता लक्षात येतं की, आपली बेशिस्त वृत्ती आणि बेदरकारपणा, शिस्त न पाळण्याच्या गुणांमुळं जास्त अपघात होतात.
आतापर्यंत यांत्रिक दोषानं अपघात होण्यापेक्षा मानवी दोषामुळं सर्वात जास्त अपघात घडायचे. कुठल्याही वाहनाच्या अपघातासाठी त्या वाहनाच्या ड्रायव्हरला जबाबदार धरलं जातं. ही गोष्ट एक वैश्विक सत्य आहे. कारण, वाहन हे एक मशीन आहे आणि तिला हाताळण्याचं काम माणूस करत असतो. त्यामुळं ॲक्सिडेंटसाठी ड्रायव्हरलाच दोषी ठरवलं जातं.
जर नुकसानभरपाईसाठी दावा ठोकायचा असेल तरीदेखील ड्रायव्हरला आरोपी म्हणून ग्राह्य धरलं जातं. मात्र, जर वाहनामध्ये जर ड्रायव्हरच नसेल आणि तरीही ॲक्सिडेंट झाला तर मग? तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे, चालत्या गाडीमध्ये ड्रायव्हर असणारच ना? अशा प्रश्न डोक्यात येणं साहजिक आहे. पण, सध्या अनेक कंपन्या ड्रायव्हरलेस कार टेक्नॉलॉजिवर काम करत आहेत.
इलेक्ट्रिक व्हेईकल जायंट, टेस्लानं तर कारमध्ये सेल्फड्रायविंग फिचर आणलं आहे. टेस्लाच्या मते हे फीचर सर्वोत्कृष्ट आहे. मात्र, यामुळं आतापर्यंत काही लोकांचा जीवदेखील गेला आहे. अशा परिस्थितीत ड्रायव्हरलेस गाड्या सुरक्षित आहेत का? टेस्लाच्या गाडीनं अपघात झाल्यास आरोपी कुणाला म्हणायचं? असे प्रश्न आता समोर येऊ लागले आहेत.
वरील प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यापूर्वी आपण टेस्लाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. टेस्ला ही अमेरिकेतील टेक्सास ऑस्टिनमध्ये स्थित असलेली इलेक्ट्रिक व्हेईकल आणि क्लीन एनर्जी कंपनी आहे. टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार, घरापासून ग्रिड-स्केलपर्यंत बॅटरी ऊर्जा साठवण, सौर पॅनेल, सौर छतावरील टाइल्स, त्या संबंधित उत्पादनं आणि सेवांचं डिझाइन आणि उत्पादन करते. टेस्ला ही जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपन्यांपैकी एक आहे.
जवळपास १ ट्रिलियन युएस डॉलर्सच्या बाजार भांडवलासह टेस्ला ही जगातील सर्वात मौल्यवान ऑटोमेकर आहे. २०२० मध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहनं आणि प्लग-इन इलेक्ट्रिक वाहनांची जगभरात सर्वाधिक विक्री या कंपनीने केली आहे. टेस्लाची उपकंपनी असलेल्या टेस्ला एनर्जी युनायटेड स्टेट्समधील फोटोव्होल्टेइक सिस्टमची एक प्रमुख इंस्टॉलर आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेस एक्स या अंतराळ कंपनीचे मालक असलेल्या इलॉन मस्ककडे टेस्लाचे सर्वात जास्त शेअर्स आहेत.
ऑटोपायलट फीचर लाँच करणारी टेस्ला ही सध्या जगातील एकमेव कंपनी आहे. मात्र, या फीचरच्या सुरक्षिततेबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये टेस्ला कारने एका 15 वर्षांच्या मुलाला धडक दिली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीवर दावा ठोकला. टेस्लाचं ऑटोपायलट फीचर त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं कुटुंबीयाचं म्हणणं आहे.
टेस्लाच्या ऑटोपायलट फीचरमुळं २०१९ मध्येदेखील एक अपघात झाला होता. २०१९मध्ये टेस्लाची मॉडेल एस ही कार अमेरिकेतील ह्यूस्टन शहरात भगधाव वेगानं जात होती. रस्त्यावर अचानक वळण आल्यानं कारचे नियंत्रण सुटलं आणि ती झाडावर आदळली. झाडाला धडकताच कारनं पेट घेतला आणि कारमधील लोकांचा बाहेर पडण्यापूर्वीच जळून मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास करणार्या अधिकार्यांनी मीडियाला सांगितलं होतं की, अपघातादरम्यान कारमधील ड्रायव्हिंग सीटवर कोणीही बसलेलं नव्हतं. एक व्यक्ती ड्रायव्हिंग सीटच्या शेजारी बसली होती आणि दुसरी व्यक्ती मागे बसली होती. अशा अपघातांनंतर टेस्लाच्या टेक्नॉलॉजीबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.
टेस्लानं रेकॉर्ड केलेल्या सहा सेकंदाच्या व्हिडिओनुसार, त्यांचं ऑटोपायलट फीचर कार चालवू शकतं. ते कारचा वेग वाढवू शकतं आणि ब्रेक देखील लावू शकतं. मात्र, अनेक प्रसंगी गाडीचा अपघात घडतो, तेव्हा चालकालाही त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही.
कंपनी आपलं अपडेटेड ‘फुल सेल्फ ड्रायव्हिंग’ सॉफ्टवेअर लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, रस्ते अपघातांमुळं हे तंत्रज्ञान स्कॅनरच्या कक्षेत आले आहे. यूएस ऑटो सेफ्टी एजन्सीने २७ टेस्ला कार क्रॅश प्रकरणांची पुन्हा चौकशी सुरू केली आहे.
ह्यूस्टन शहरातील अपघाताबाबत स्पष्टीकरण देताना टेस्लाचं सीईओ आणि संस्थापक इलॉन मस्क म्हणतात की, आतापर्यंत दाखवलेल्या डेटा लॉगवरून स्पष्टपणे दिसून येतं की या कारमध्ये ऑटोपायलट सक्षम नव्हतं. शिवाय या कारसाठी एफएसडी (फुल सेल्फ ड्रायव्हिंग) प्रणाली खरेदी केलेली नव्हती.
अशा अपघातांमुळं टेस्ला विरुद्ध अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. ज्यात एप्रिलमध्ये फ्लोरिडा स्टेट न्यायालयातील लार्गो येथे झालेल्या कार क्रॅशशी संबंधित खटल्याचा समावेश आहे. ऑटोपायलट असलेली टेस्ला मॉडेल एसटी एका चौकात थांबू शकली नाही आणि समोरच्या शेवरलेट टाहोला धडकली. या अपघातात २२ वर्षीय नायबेल लियॉनचा मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी टेस्ला ड्रायव्हरला दोषी ठरवलं असून कार किंवा ऑटोपायलट तंत्रज्ञानाला नाही. तर ड्रायव्हरचं म्हणणं आहे की, तो कार चालवत नव्हता. ती ऑटोपायलट मोडवर होती. या प्रकरणामुळं टेस्ला कारचा अपघात झाल्यास नेमकं कुणाला दोषी ठरवायचं हा मुद्दा उपस्थित झाला.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधील दिवाणी दाव्याचे प्राध्यापक आणि कॅलिफोर्निया लॉ रिव्ह्यूमधील पेपरचे लेखक मार्क गीस्टफेल्ड यांनी गुन्हेगारी आरोपांचे महत्त्व आणि नवीन तंत्रज्ञानावरील ग्राहकांच्या विश्वासाबद्दल माहिती दिली आहे. कार डिझाईन करताना ड्रायव्हिंग तंत्रज्ञानासह येणार्या आत्मसंतुष्टतेची भावना लक्षात ठेवण्याचं निर्मात्यांचं कर्तव्य आहे.
टेस्ला किंवा इतर कोणतेही उत्पादक फक्त ग्राहकांवर जाबाबदारी टाकू शकत नाहीत. ड्रायव्हर्स लक्ष देत आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांना प्रत्यक्षात डिझाइनमध्ये काहीतरी विशेष सोय करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
टेस्लाच्या कारमध्ये अपघात होण्यापूर्वीच्या काही सेंकदांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे. त्यावरून दोषी कुणाला ठरवायचं हे निश्चित करता येऊ शकतं. सध्याच्या कायद्यानुसार, जर ड्रायव्हरला अपघात झाला आणि त्याला पुरेशी चेतावणी मिळालेली असेल तर या अपघाताला कार उत्पादकाला जबाबदार मानलं जात नाही.
तरीदेखील टेस्ला कार क्रॅश झाल्यानंतर ऑटोपायलट सिस्टिमला दोषी ठरवायचं की नाही, हा प्रश्न गुंतगुंतीचाच ठरत आहे
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.