आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजचं युग हे इन्स्टंट आणि रेडिमेडचं युग आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वेळ आणि कष्ट वाचवण्यासाठी म्हणून आज अनेक प्रकारच्या आधुनिक सामग्रीचा वापर केला जातो, अशा अनेक आधुनिक साधनांनी जुन्या सामग्रीची जागा घेतली आहे. मग यात स्वयंपाकघर तरी कसं मागे राहील? मागच्या दशकांमध्ये खलबत्त्याची आणि पाटा-वरवंट्याची जागा मिक्सरने घेतली, जात्याची जागा गिरणीने घेतली, धान्य पाखडण्याचं सूप, धान्य बारीक करण्यासाठी आणि चटण्या बनवण्यासाठी वापरलं जाणारं उखळ शहरांतून नाहीस झालं, या सर्व मजबूत भांड्यांची जागा आता आधुनिक यंत्रांनी घेतली आहे. कमी वेळ आणि कमी कष्टांत आपली कामं करून देणाऱ्या काही आधुनिक साधनांचे तोटे देखील आहेत. स्वयंपाकघरातील अशाच एका आधुनिक, सोयीस्कर पण तरीही धोकादायक असलेल्या साधनाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
असं म्हणतात कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान सर्वांत आधी यु*द्धभूमीसाठी तयार केलं जातं, कालांतराने त्याचा वापर सर्वसामान्य लोक करतात. उदाहरणार्थ जीपीएस, चिकटपट्टी, मायक्रोवेव्ह ओव्हन, आपण सर्रास वापरतो ते इंटरनेट, पॅकेज्ड अन्नपदार्थ, आणि ही यादी न संपणारी आहे. याच यादीत आणखी एका गोष्टीचा समावेश होतो , ज्याचा वापर आज जगातील प्रत्येक स्वयंपाकघरात सर्रासपणे केला जातो, ती गोष्ट म्हणजे नॉन-स्टिक तवे किंवा तत्सम नॉन-स्टिक म्हणजेच टेफ्लॉनची भांडी. स्वयंपाक करताना पोळी, डोसा, ऑम्लेट इत्यादी गोष्टी भाजताना तव्याला चिकटू नयेत म्हणून बाजारात काही वर्षांपूर्वी असे तवे आणण्यात आले.
दुसऱ्या महायु*द्धात लष्करी वाहनांमध्ये आणि रणगाड्यांमध्ये पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीनचा पहिल्यांदा वापर झाला. पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीनवर इतर रसायनांचा सहजासहजी प्रभाव पडत नसे, तसेच अतिउष्णतेचा देखील त्यावर प्रभाव पडत नसे. यामुळेच पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीन रणगाडे किंवा इतर लष्करी वाहनांच्या आतील भागात लावले जात, जेणेकरून हानिकारक रसायनांची ने-आण करताना पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीनमुळे त्यांच्यावर काहीही फरक पडणार नाही. याच पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीनचाच वापर आज नॉन-स्टिक तवे आणि भांड्यांमध्ये केला जातो. पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीनलाच टेफ्लॉन या नावाने अथवा ब्रॅण्डने संबोधले जाते.
परंतु टेफ्लॉनचेच अनेक तोटे देखील आहेत. टेफ्लॉन-कोटेड भांडी जास्त गरम झाल्यानंतर ते काही गॅसेस उत्सर्जित करतात. या गॅसेसमुळे ‘पॉलिमर फ्यूम फिव्हर’चा त्रास होतो, यामध्ये ताप, थंडी आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळून येतात. पेरफ्लुरॉटॉनॉईक ॲसिड हे एक मानवनिर्मित रसायन आहे. याचा वापर टेफ्लॉन तयार करण्यासाठी होतो. प्लॅस्टिकप्रमाणेच टेफ्लॉन देखील शतकानुशतके न कुजता तसंच राहतं. आपल्या शरीरात त्याचा प्रवेश झाल्यानंतरही विपरीत परिणाम दिसून येऊ लागतात. पेरफ्लुरॉटॉनॉईक ऍसिडमुळे मूत्रपिंड आणि अंडकोषाचा कर्करोग, थायरॉईड, हाय कोलेस्टेरॉल तसेच गर्भधारणेमधील समस्या दिसून येतात.
यावर उपाय म्हणून पेरफ्लुरॉटॉनॉईक ॲसिडशी संबंधित आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी, उत्पादकांनी नॉन-स्टिक कोटिंग्जला सुरक्षित पर्याय म्हणून जेन-एक्स (GenX) रसायनांचा वापर सुरू केला आहे. पण, जेन-एक्सचे गुणधर्म पेरफ्लुरॉटॉनॉईक ॲसिडसारखेच आहेत, त्यामुळे पेरफ्लुरॉटॉनॉईक ॲसिडमुळे उद्भवणारे धोके जेन-एक्स रसायनांपासूनही उद्भवू शकतात. जेन-एक्स रसायने देखील प्लॅस्टिकप्रमाणेच न कुजता तसेच राहतात.
पेरफ्लुरॉटॉनॉईक ॲसिड आणि जेन-एक्स सारख्या संयुगांचा पर्यावरणीय प्रभाव लक्षणीय आहे. ही रसायने सहजपणे तुटत नाहीत. शिवाय अशी रसायने माती, पाणी तसेच सजीवांमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतात. ते निसर्गात टिकून राहतात, अगदी कमी प्रमाणात निसर्गात असले तरी त्यांचे निसर्गावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. परिणाम कसे तर, ही रासायनिक संयुगे अन्नसाखळीत प्रवेश करून परिसंस्था प्रदूषित करू शकतात, प्लॅस्टिकप्रमाणे टेफ्लॉनमुळे देखील अनेक जीवांच्या प्राणाला धोका संभवू शकतो.
आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. टेफ्लॉन-कोटेड नॉन-स्टिकी भांड्यांच्या ऐवजी सर्वसाधारण लोखंडी अथवा स्टील, तांबं आणि पितळीची भांडी आणून अशा हानिकारक रसायनांपासून आपण कुटुंबाचे आणि पर्यायाने पर्यावरणाचे देखील संरक्षण केले पाहिजे. स्वतःची अंतःप्रेरणा आणि अचूक माहिती यांच्या मदतीने एखादे आधुनिक उत्पादन वापरायचे की नाही या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोपे जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.