आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“भगवान देता जै तो छप्पर फ़ाडके” किंवा “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” अशा म्हणी आपल्याकडे आहेत. वरील दोन्ही म्हणींमध्ये ‘नशिब’ खूप मोठी भूमिका पार पाडतं. ऑस्ट्रेलियन बार टेंडर, डॅन सॉंडर्सनं या दोन्ही म्हणींचा प्रत्यय घेतला. नशेत असताना मध्यरात्री देवानं त्याला खरचं छप्पर फ़ाडके पैसा आयता हातात दिला. कोणत्याही कष्टाशिवायच त्याच्या हातात लाखो रूपये आले. तुम्हाला वाटेल त्यानं हे पैसे जुगारात कमावले, तर तसं अजिबात नाही. तंत्रज्ञानाच्या घोटाळ्यामुळे कोणतेही प्रयत्न न करता अनावधानानं त्याला हे पैसे मिळत गेले. अर्थात, काही काळानंतर हे सर्व उघडकीस आले आणि डॅन महाशय गजाआड गेले. मात्र तोवर त्याचे ९ कोटी रूपये उडवून झाले होते.
बात एक रात की:
नेहमीसारखीच ती रात्र होती. ऑस्ट्रेलियातील वांगररट्टा येथे बार टेंडर म्हणून काम करणार्या डॅनीचं आयुष्य ही रात्र पूर्णपणे बदलवून टाकणार होती, ज्याची त्याला कल्पनाही नव्हती. त्या रात्री मद्यपानाची हुक्की आली म्हणून डॅनी घरातून निघाला. जाता जाता पैसे काढायचे म्हणून तो एका एटीएममध्ये गेला. नेहमीप्रमाणेच मशिनमधे कार्ड सरकवले, दहा हजाराची रक्काम टाकली आणि नोटा बाहेर येण्याची वाट बघू लागला.
काही क्षणातच, “ट्रॅन्झॅक्शन फ़ेल्ड” असा संदेश मशिनच्या स्क्रिनवर झळकला. त्यानं सहजच पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हातात रोख रक्कम आली आणि तो बघतच राहिला. कारण त्याच्या खात्यातून वजा न होताच त्याला ही रक्कम मिळाली होती. त्यानं त्या दिवशी याचा फ़ार विचार नाही केला कारण, कदाचित नंतर हे पैसे खात्यातून वळते झाल्याचा मेसेज येईल असा त्यानं विचार केला. मात्र असा मेसेज न आल्यानं आता त्याला कुतुहल वाटू लागले.
काही दिवस गेल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा प्रयत्न करून बघण्याचे ठरविले. यावेळेस त्यानं ६८ हजारांचा आकडा टाकला. सुरवातीच्या असफ़ल प्रयत्नांनंतर त्याच्या हातात रक्कम आली. याहीवेळेस मागीलप्रमाणेच घडले. “ट्रॅन्झॅक्शन फ़ेल्ड” असा संदेश झळकूनही रोख रक्कम हाती आली होती आणि खात्यातून पैसे वळते झाले नव्हते.
आता मात्र या प्रकाराची त्याला गंमत वाटून लागली होती. हे असं आणखी एकदोनदा घडल्यावर त्याच्या लक्षात आलं की या एटीएम यंत्रात किंवा प्रणालीत काहीतरी तांत्रिक घोटाळा आहे जो त्याच्या हातात करकरीत कोर्या नोटा देत आहे. आता मात्र तो सावध झाला. आपण करत असणारी कृती कितिही तांत्रिक घोटाळा असली तरिही तो एक प्रकारचा गुन्हा आहे हे त्याला समजले होते. त्यानं पुढील पाऊले सावधानतेने उचलण्याचे ठरवले.
सॉंडर्सनं सकाळी बॅन्केत फ़ोन करून त्याच्या खात्यातीतल व्यवहारांबाबत चौकशी केली. काही तांत्रिक घोटाळा तर नाही ना? याची खातरजमा करून घेतली. सर्वकाही आलबेल असल्याचे समजल्यावर आतो निश्चिंत झाला. हा सगळा प्रकार नेमका कसा घडतो आहे याचा त्यानं अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आले की, मध्यरात्री १ ते ३ दरम्यान बॅन्केचे नेटवर्क एटीएम मशिनपासून डिस्कनेक्ट केले जात असल्याने या दरम्यान होणारे व्यवहार खात्यात नोंदही होत नाहीत की खात्यावर त्याचा काही परिणामही होत नाही. हे म्हणजे डॅनच्या हाती घबाड लागल्यासारखेच झाले होते.
दोन खात्यांत तो हवी तितकी रक्कम तो खेळवू शकणार होता. यानंतर त्यानं अगदी निर्धास्तपणे पैसे उधळण्यास सुरवात केली. शहरातल्या उच्चभ्रू रेस्टॉरंटसमधे खान-पान, उंची मद्य, देखण्या मदिराक्षी, महागडे कपडे, महागडे शौक असं नवीन आयुष्य तो जगू लागला. एकदा तर त्याने २० सिटर खाजगी विमान भाड्याने घेऊन सुंदरीसह हवेत पार्टी केली. एखाद्या फ़िल्मस्टार सारखं आयुष्य तो जगू लागला होता.
केवळ स्वप्नातच बघणं परवडू शकणार्या गोष्टी, शौक तो आता विचार न करता करत होता. साधारण नऊ कोटी रूपये त्यानं अगदी मुक्तपणे उधळले. मात्र हे करत असताना कुठेतरी सभ्य मनाला बोचही होती की, हे पैसे आपले नाहीत आणि आपण ते गैरमार्गाने, घोटाळा करुन घेत आहोत. त्याला आता सतत दू:स्वप्नं पडू लागली होती की, त्याच्या हॉटेलच्या खोलीबाहेर पोलिस उभे आहेत आणि त्याला अटक झालली आहे. हा त्रास इतका वाढला की अखेरीस त्याला थेरपिस्टची मदत घ्यावी लागली. त्याच्याशी बोलल्यानंतर थेरपिस्टनं डॅनीला सल्ला दिला की त्यानं आता हा सर्व प्रकार पोलिसांच्या कानावर घालायला हवा.
आपल्याबाबतीत काय काय घडले हे अगदी प्रामाणिकपणे त्याने थेरपिस्टला सांगितले. खरे पहाता त्याची यात काहीच चूक नव्हती. एका तांत्रिक घोटाळ्यानं त्याला ही रक्कम देऊ केली होती. त्याच्या ती लक्षात आली होती इतकंच. त्याच्या या उधळपट्टीची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली होती. मिडियानंही याची दखल घेणं सुरू केलं होतं. त्यानं बॅन्केशी संपर्क केला असता बॅन्क पोलिसांशी संपर्कात आहे मात्र बॅन्केने काहीही कारवाई केली नसल्याचे त्याला समजले. हे सगळे तीन वर्षं अगदी सुरळीतपणे चालले होते. त्यानंतर मात्र पोलिसांनी धाड टाकून त्याला अटक केली.
चोरी आणि फ़सवणूकीचे आरोप त्याच्यावर लागले. आपल्या अटकेबाबत डॅनला कसलीही शरम वाटत नव्हती. २०१६ साली तो शिक्षा भोगून बाहेर आला आणि आपले पूर्वीचेच बारटेण्डरचे काम करू लागला. तासाला एक हजार रूपये कमावून पुन्हा सामान्य आयुष्य जगला. त्याच्या या सुरस आयुष्यावर एखादा सिनेमा निघेल अशी शक्यता अनेकांनी वर्तविली होती. मात्र स्पॉटीफ़ायच्या एका पॉडकास्टमधे ‘द ग्लिच’ या शीर्षकांतर्गत त्यानं त्याच्याबाबत घडलेली ही घटना लोकांसमोर मांडली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.