आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कौटुंबिक व्यवसायाला तिलांजली देऊन माहिती तंत्रज्ञानात पाय रोवणारे अनेक जण आपल्याला माहित असतील. मध्यमवर्गीय कुटुंबातून वर येत अशा अनेक लोकांनी जगात आपले नाव उंचावले आहे. डेल हे त्यापैकीच एक नाव. अशी अनेक चरित्रं कदाचित भारतातही घडली असतील आणि आपल्याला त्याबद्दल माहितही नसेल. अशाच एका प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेण्यासाठी हा प्रपंच.
कुटुंबाच्या पारंपरिक शेतीत काम करणे त्यांना सोयीस्कर ठरले असते. पण कम्प्युटर्स आणि प्रोग्रॅमिंगवरील प्रेमाने त्यांचे नशीबच बदलून टाकले. त्यांच्या वडिलांनी कुटुंबाच्या शेतात काम करण्यासाठी आपल्या वकिलीच्या कारकिर्दीवर पाणी सोडलं. त्यांनी स्वतःसुद्धा शेतीत काम करण्याचा प्रयत्न केला पण ‘हे आपले क्षेत्र नाही’ हे लवकरच त्यांच्या लक्षात आले.
लवकरच त्यांनी अप्लाइड सायन्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते विज्ञान पदवीधर बनले. त्यांच्या या काहीतरी नवीन करण्याच्या प्रवासात वडिलांनी साथ दिली आणि कम्प्युटर्स, प्रोग्रॅमिंगबद्दल त्यांच्या मनात जिज्ञासा जागृत केली. लवकरच त्यांनी पुढचे पल्ले गाठायला सुरुवात केली. तामिळनाडूच्या नमक्कल जिल्ह्यातील आपली खानदानी शेती सोडून त्यांनी प्रोग्रामिंग प्रोफेशनची निवड केली.
आजमितीस ‘टाटा समूहाचे अध्यक्ष’ म्हणून व्यावसायिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या नटराजन चंद्रशेखरन यांनी शेती सोडल्यानंतर तिरुचिरापल्ली येथील एका प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. १९८६ साली ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये ‘इंटर्न’ म्हणून टाटा समूहात सामील झाले. १९८७ साली अभियंता म्हणून ते पूर्णवेळ कंपनीत रुजू झाले. चंद्रशेखरन तेव्हापासूनच टाटाचे कर्मचारी आहेत.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये त्यांनी आपली प्रगती सुरु ठेवली आणि अखेरीस नव्वदीच्या दशकात व्यवस्थापनाच्या पदापर्यंत पोहोचले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला जगात एक प्रतिष्ठित कंपनी म्हणून ओळख निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कंपनीप्रती त्यांचं हे मोलाचं योगदान पाहून २००९ साली त्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनवण्यात आलं. दरम्यान ते टाटा मोटर्स आणि टाटा ग्लोबल बेव्हरेजेसचेसुद्धा अध्यक्ष होते. टाटा समूहाचे प्रमुख होणारे ते पहिले पारशी धर्मीय नसलेले आणि व्यावसायिक कार्यकारी बनले.
चंद्रशेखरन ‘इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स’चे (IEEE) वरिष्ठ सदस्य आहेत, ‘कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया’ आणि ‘ब्रिटिश कम्प्युटर सोसायटी’चेही ते सक्रिय सदस्य आहेत. एप्रिल २०१५ मध्ये त्यांचे भारतीय ‘सॉफ्टवेअर आणि सेवा कंपन्यांची राष्ट्रीय संघटने’च्या (NASSCOM)अध्यक्षपदासाठी नामांकन देण्यात आले.
अडचणींचा सामना कोणाला करावा लागत नाही? चंद्रशेखरन काही अपवाद नव्हते. १८ डिसेंबर २०१९ रोजी नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलने (NCLAT) चंद्रशेखरन यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आणि सायरस मिस्त्री यांना कार्यकारी अध्यक्षपद बहाल केले. पण जानेवारी २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनलच रद्द्पात्र ठरवले.
२०१७ साली, ते टाटा समूहाची मुख्य कंपनी ‘टाटा सन्स’चे चेअरमन झाले. या कंपनीमध्ये रसायने, ऑटोमोटिव्ह, कंसल्टंसी सर्विसेस, हॉस्पिटॅलिटी आणि स्टील यांसह ३०हून अधिक व्यवसाय केले जातात. २०२१ च्या अहवालांनुसार, आज ते ज्या कंपनीचे नेतृत्व करतात त्या कंपनीचे जागतिक स्तरावर ७ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. या कंपनीचे मूल्य सुमारे १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
चंद्रशेखरन यांचे कौशल्य नोकरी करतानाच अनेक गोष्टी शिकणे आणि विविध प्रकल्प यशस्वीपणे हाती घेण्याच्या अनुभवातून विकसित झाले आहेत. केवळ कॉर्पोरेट दिग्गजांसाठीच नव्हे तर समाजासाठी देखील एक प्रभावशाली नेता बनून नटराजन चंद्रशेखरन यांनी जे.आर.डी. टाटा आणि रतन टाटा यांचा समाजोन्नतीचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवला आहे.
नटराजन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह कोविड -१९ विरूद्धच्या लढाईत अग्रगण्य कॉर्पोरेट संस्था ठरला आहे. त्यांनी कोविड -१९ संबंधित उपक्रमांसाठी १४ हजार कोटी रुपयांहून अधिकच्या रकमेची व्यवस्था करून जगासमोर एक आदर्श उभा केला आहे. रुग्णालये उभारण्यापासून आणि उपलब्ध असलेल्या हॉस्पिटल्सना आय.सी.यु.सारख्या सुविधा पुरवण्यासह कोविड -१९ विशेष वॉर्ड्स उभारत त्यांनी अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या. एके काळी, कोविड -१९ साथीच्या काळात भारताच्या एकूण वैद्यकीय ऑक्सिजन मागणीच्या १० टक्के मागणीच्या पुरवठ्याची जबाबदारी या कंपनीचीच होती.
इतरांना त्यांच्या करिअरची सुरुवात कशी करावी याचा सल्ला म्हणून चंद्रशेखरन म्हणतात, लोकांनी त्यांच्या पॅशनचे अनुसरण केले पाहिजे आणि त्यांना जे विषय आवडतात तेच त्यांनी करिअर म्हणून निवडावे. एका मोठ्या व्यावसायिक कंपनीत स्वप्रयत्नांनी उच्च पद मिळवलेले चंद्रशेखर म्हणतात, “लोकांच्या आयुष्यात कदाचित दोन, तीन किंवा चार करिअर असतील, म्हणून हा एक मोठा खेळ आहे. जर तुम्ही ३०, ४०, ५० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एखाद्या गोष्टीवर काम करणार असाल, तर तुम्ही प्रक्रियेचा आनंद घ्या. ”
फक्त उद्योगाच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच नाही तर अन्य क्षेत्रांमध्येही चंद्रशेखरन यांना रस आहे. चंद्रशेखरन एक फोटोग्राफर, संगीत शौकीन आणि लांब पल्ल्याचे धावपटू आहेत. त्यांनी ॲमस्टरडॅम, बोस्टन, शिकागो, बर्लिन, मुंबई, न्यू-यॉर्क आणि टोकियोमध्ये मॅरेथॉन पूर्ण केली आहे.
नटराजन चंद्रशेखरन हे युवा पिढीसाठी एक उत्तम आदर्श आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.